नौजवान भारत सभा ‘लोकसभा निवडणूक – 2024’मध्ये समान किमान कार्यक्रमाच्या आधारे भारताचा क्रांतिकारी कामगार पक्षाला (RWPI) पाठिंबा देते!

या निवडणुकीत धर्मवादी फॅसिस्ट भाजपवर पूर्ण बहिष्कार टाकावा असे आवाहन देशातील तरुण आणि सर्वसामान्य जनतेला आम्ही आवाहन करत आहोत!
निश्चितच, सध्याच्या निवडणुकीत इतर निवडणुकबाज पक्षही योग्य पर्याय नाहीत, पण फॅसिस्ट भाजप हा जनतेसाठी सर्वात धोकादायक आहे, त्यामुळे भाजपला कोणत्याही किंमतीत सत्तेपासून दूर ठेवले पाहिजे!
मित्रांनो, सध्याच्या लोकसभा निवडणुकीत भारताचा क्रांतिकारी कामगार पक्ष हा एकमेव असा पक्ष आहे ज्याचा कार्यक्रम नौजवान भारत सभेच्या ध्येय आणि उद्दिष्टांच्या विरोधात जात नाही. ‘RWPI’ ने आपल्या जाहीरनाम्यात नौभासच्या लोकसभा निवडणुक मागणीपत्राचा समावेश केला आहे. या पक्षाची स्थापना अशा कार्यकर्त्यांनी केली आहे जे लोकांना त्यांच्या योग्य मागण्या आणि प्रश्नांच्या आधारे संघटित करण्याच्या कामात दीर्घकाळ कार्यरत आहेत. हा पक्ष देशी-विदेशी भांडवलदार, कुलक शेतकरी आणि मोठे उद्योगपती, एनजीओ-फंडिंग एजन्सी, सरकारी संस्था, कॉर्पोरेट घराणे आणि त्यांचे निवडणूक ट्रस्ट यांच्याकडून कोणत्याही स्वरूपात कोणतेही आर्थिक सहाय्य किंवा देणगी घेत नाही. नौजवान भारत सभेचा ‘RWPI’ ला सशर्त पाठिंबा आहे. आम्ही देशातील तरुणांना आणि सामान्य जनतेला भारताचा क्रांतिकारी कामगार पक्षाला (RWPI) मतदान करण्याचे, त्याला पाठिंबा देण्याचे आणि आर्थिक सहयोग देण्याचे आवाहन करतो.
मित्रांनो, देशातील सध्याच्या लोकसभा निवडणुका अशा वेळी होत आहेत, जेव्हा फॅसिस्ट पक्ष भाजप सत्तेत आहे. आज जीवघेण्या महागाईने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. तीव्र बेरोजगारीमुळे तरुण लोकसंख्या नैराश्य, व्यसनाधीनता आणि गुन्हेगारीला बळी पडत आहे. सामान्य घरातील मुला-मुलींचे मोठ्या प्रमाणावर धर्मवादीकरण सुरू आहे. भाजप आणि संघ परिवाराने सर्व सरकारी संस्थांमध्ये प्रचंड घुसखोरी केली आहे. त्यांच्या स्वतंत्र चारित्र्यावर याआधीही प्रश्न उपस्थित केले गेले आहेत, पण भाजपने तर त्यांच्यावर ‘कब्जा’च केला आहे. काँग्रेसपासून ते सपा, बसपा, आरजेडी, जेडीयू, डीएमके, एआयएडीएमके, टीएमसी, आप इत्यादींपासून तर तथाकथित डाव्या पक्षांपर्यंतचा कारभारही जनतेसाठी चांगला नव्हता आणि तेही उदारीकरण-खाजगीकरणाचीच धोरणे अवलंबत आले आहेत. मात्र भाजपच्या गेल्या 10 वर्षांच्या राजवटीत शिक्षण, आरोग्य आणि रोजगाराची परिस्थिती प्रचंड वाईट झाली आहे.
आज समाजाच्या कानाकोपऱ्यात धर्मवाद, धर्मांधता, कट्टरता आणि अतार्किकता पसरली आहे. भाजपच्या फॅसिस्ट राजवटीने सत्तेत असताना उरल्यासुरल्या लोकशाही-धर्मनिरपेक्ष-पुरोगामी मूल्यांवरही आघात केला आहे. वाचलेला लोकशाही अवकाश भाजपला पूर्णपणे गिळंकृत करायचा आहे आणि तो त्यांनी मोठ्या प्रमाणात गिळंकृत केला आहे. गोदी मीडियाची संपूर्ण फौज, भाजप आयटी सेलचे लोकं आणि ‘भक्त’ भाजपच्या राजवटीला विरोध करणाऱ्या प्रत्येक आंदोलनावर हल्ला करतात. लोकशाही अधिकारांना आज काही अर्थ उरलेला नाही. दडपशाहीच्या बुलडोझरने जनतेचे मूलभूत हक्क चिरडले जात आहेत. भाजप पुन्हा सत्तेत येऊन या प्रक्रियेला आणखी गती देईल. अशा परिस्थितीत पुरोगामी विद्यार्थी-युवक चळवळीची मोठी भूमिका बनते. भाजपला सत्तेतून घालवण्यासाठी तरुणांनी सर्व ताकदीने प्रयत्न केले पाहिजेत. कारण लोकशाहीच उरली नाही, तर आपला संघर्ष पुढे नेणे आपल्याला कठीण जाईल. निश्चितच केवळ भाजप सत्तेत नसल्याने जनतेला मुक्ती मिळणार नाही. फॅसिझम सत्तेत नसला तरी फॅसिझमचा धोका दूर होणार नाही. जरी ते संसदेत-विधानसभेत नसले तरीही समाजात त्यांचे धोकादायक अस्तित्व कायम राहील. पण फॅसिस्ट भाजप सत्तेतून बाहेर असणे हे आपल्या आंदोलनाला अनुकूल ठरेल. त्यामुळे या निवडणुकीत आम्ही देशातील तरुण, विद्यार्थी आणि कष्टकरी जनतेला धर्मवादी फॅसिस्ट पक्ष भाजपवर पूर्ण बहिष्कार टाकण्याचे आवाहन करतो! फॅसिस्ट भांडवली पक्ष आणि इतर भांडवली पक्ष यांच्यातील स्पष्ट फरक आपण विसरता कामा नये. ही बाब वेगळी की भविष्यात कोणत्याही युतीची सत्ता आली किंवा फॅसिस्ट भाजपची जरी सत्ता आली तरी आपली एकजूट आणि आपला संघर्ष हीच आपल्या हक्काची हमी असू शकते.
मित्रांनो, आजच्या सर्व समस्यांच्या मुळाशी सध्याची नफेखोर भांडवलशाही व्यवस्था आहे. विद्यार्थी, तरुण आणि सामान्य कष्टकरी लोकांना त्यांचे हक्क तेव्हाच मिळू शकतात जेव्हा एक मानवकेंद्रित सामाजिक व्यवस्था निर्माण केली जाईल ज्यामध्ये उत्पादन, वितरण आणि शासनावर कामगार-कष्टकरी वर्गाचे नियंत्रण असेल. निश्चितच अशा व्यवस्थेची निर्मिती समाजव्यवस्थेतील आमूलाग्र बदलातूनच शक्य आहे. त्यासाठी जीवनाच्या खऱ्या प्रश्नांच्या आधारे जनतेची लढाऊ एकजूट प्रस्थापित करणे अत्यंत आवश्यक आहे. सध्याच्या भांडवली व्यवस्थेने दिलेल्या औपचारिक लोकशाहीच्या कोणत्याही मंचावर घडणाऱ्या कोणत्याही घडामोडीकडे आपण दुर्लक्ष करू शकत नाही. हे लक्षात घेऊन नौजवान भारत सभेने 2024 च्या लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आपले मागणीपत्रक सादर केले होते. संघर्षाच्या प्रत्येक आघाडीवर आणि टप्प्यावर आपण हस्तक्षेप केला पाहिजे.
मित्रांनो, शेवटी आम्ही हे पुन्हा अधोरेखित करू इच्छितो की वर्तमान लोकसभा निवडणुकीत नौजवान भारत सभा भारताचा क्रांतिकारी कामगार पक्षाला (RWPI) पाठिंबा देत आहे. आम्ही देशातील तरुण आणि कष्टकरी जनतेला ‘RWPI’ ला आपले मत, पाठिंबा आणि सहकार्य देण्याचे आवाहन करतो. आम्ही जनतेला आवाहन करतो की, भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांना कोणत्याही परिस्थितीत सत्तेपासून दूर ठेवा.
क्रांतिकारी अभिवादना सह,
केंद्रीय परिषद,
नौजवान भारत सभा

Related posts

Leave a Comment

1 × 5 =