अय्यंकाली: एक प्रेरणादायी जातिविरोधी लढवय्या!

18 जून हा केरळच्या त्रावणकोरमधील बंडखोर आणि निर्भय योद्धा अय्यंकाली (1863–1941) यांचा स्मृतिदिवस आहे. जाती अत्याचाराविरुद्ध दलित प्रतिकाराची मशाल त्यांनी त्या काळात पेटवली होती, जेव्हा जातीय शोषणाचा मुद्दा अजून देशाच्या अजेंड्यावरदेखील नव्हता. ‘अस्पृश्य’ ठरवण्यात आलेल्या पुलायर समाजात जन्मलेल्या अय्यंकालींनी दलितांना आदराची वागणूक मिळावी म्हणून भीक मागितली नाही; त्यांनी ती लढून मिळवली.
1893 साली अय्यंकालींनी जातीप्रथेने ग्रासलेल्या केरळमध्ये त्या काळातील सर्वात क्रांतिकारी बंड उभारले. त्या वेळी दलितांना सार्वजनिक रस्त्यांचा वापर करण्यासही मनाई होती, बैलगाडी बाळगणे तर दूरच. पण अय्यंकालींनी वरच्या जातींना राखून ठेवलेले वस्त्र—धोतर, अँगवस्त्र आणि पगडी घातली, पांढऱ्या बैलांची एक जोडी आणि बैलगाडी खरेदी केली आणि आपल्या गावातील मध्यवर्ती बाजारातून मिरवत गाडी चालवली. ही केवळ गाडीची फेरी नव्हती, तर जातीय व्यवस्थेने घालून दिलेल्या भौगोलिक आणि प्रतीकात्मक सीमांना दिलेले थेट आव्हान होते. जेव्हा उच्चवर्णीय पुरुषांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्यांनी बैलगाडीतून उडी मारली, खंजीर काढला आणि त्यांना मागे हटवले. त्या दिवसानंतर पुन्हा कोणीही त्यांना अडवण्याचे धाडस केले नाही.
पण अय्यंकालींचे स्वप्न केवळ वैयक्तिक बंडखोरीपुरतं मर्यादित नव्हतं. त्यांना संपूर्ण दलित समाजाचा उद्धार हवा होता. म्हणूनच त्यांनी ‘स्वातंत्र्याची चाल’ (Walk for Freedom) ही मोहीम राबवली. पुलायर समाजाच्या लोकांना सार्वजनिक रस्त्यावरून चालण्याचा आणि बाजारपेठांमध्ये प्रवेश करण्याचा हक्क मिळावा, यासाठीचं हे सामूहिक आंदोलन होतं. जेव्हा हे मोर्चेकरी पुथेन बाजाराच्या दिशेने पुढे सरकले, तेव्हा उच्चवर्णीयांच्या जमावाने त्यांचा मार्ग रोखण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर जे घडलं, ते ‘चालियार दंगल’ म्हणून ओळखलं जातं. हा एक तीव्र संघर्ष होता ज्यात दोन्ही बाजूच्या लोकांनी प्राण गमावले. ही घटना त्रावणकोरमध्ये जातीआधारित बहिष्काराविरोधात दलितांनी उभारलेली पहिली सशस्त्र चळवळ ठरली आणि भारतातील जातिविरोधी लढ्याचा एक निर्णायक टप्पा बनली. या संघर्षाची किंमत मोठी होती. पण विजय खरा होता. 1900 साली त्रावणकोर संस्थानाला दलितांना सार्वजनिक रस्त्यांवरून चालण्याचा अधिकार देण्यास भाग पाडले गेले. हा कोणताही अनुग्रह नव्हता, तर सामूहिक लढ्याच्या जोरावर मिळवलेला हक्क होता. ही केवळ प्रतीकात्मक सुधारणा नव्हती तर जागेचा, सन्मानाचा आणि दलितांच्या सार्वजनिक क्षेत्रातल्या सहभागासाठीचा विजय होता.
अय्यंकाली स्वतः निरक्षर होते, पण त्यांना हे ठाऊक होते की शिक्षणाशिवाय समानतेचा लढा अपूर्णच राहील. जेव्हा एका पुलायर मुलीला सरकारी शाळेत प्रवेश देण्यास जबरदस्तीने नकार देण्यात आला, तेव्हा अय्यंकालींनी पुन्हा एक धाडसी कृती सुरु केली. अय्यंकालींनी शेती मजुरांचा ऐतिहासिक संप पुकारला. जोपर्यंत सरकार शिक्षणावर असलेली जातीय बंधने हटवण्याची मागणी मान्य करत नाही तोवर दलित शेतमजुरांनी वरच्या जातींच्या जमीनदारांच्या शेतात काम करणे थांबवले, परिणामी, 1907 साली सरकारला दलितांसाठी शिक्षणाचे दरवाजे उघडावे लागले. हा भारतातील शेतमजुरांचा पहिला संघटित संप ठरला, असे म्हणायला हरकत नाही.
या संघर्षाला पुढे नेत अय्यंकालींनी “साधु जन परिपालना संघम्” या संघटनेची स्थापना केली. ज्याचा उद्देश होता शोषितांना शिक्षण, कायदेशीर मदत आणि त्यांची राजकीय चेतना जागी करणे. त्यांनी वरच्या जाती जागृत होण्याची वाट पाहिली नाही. त्यांनी सत्ताधाऱ्यांना याचिकापत्रे लिहिली नाहीत. त्यांनी कामगार कष्टकरी शोषित जनतेला संघटित केले, जातीच्या अन्यायकारक फतव्यांना थेट आव्हान दिले आणि शोषणाभोवती पसरलेल्या दीर्घ शांततेला भंग केले. अय्यंकालींनी सिद्ध करून दाखवलं की मुक्ती कधीच वरून दिली जात नाही — ती इतिहासाच्या काळजातून श्रम, एकता आणि धाडसाच्या बळावर लढून मिळवली जाते.
आजही जातिप्रथा समाजाच्या प्रत्येक मुळामुळांत खोलवर रुजलेली आहे. जेव्हा जातीगत अत्याचारांना ‘कायदा आणि सुव्यवस्थेची समस्या’ म्हणून सादर केलं जातं, जेव्हा दलितांना त्यांच्या हक्कांची मागणी केल्याबद्दलच मारहाण केली जाते, जेव्हा राज्ययंत्रणा शोषितांविरोधात झुकलेल्या आहेत तेव्हा अय्यंकालींचे जीवन आपल्याला शिकवून जातं की जातीच्या उच्चाटनाचा मार्ग सत्ताधाऱ्यांकडून सवलती मागण्यात नाही, तर तो शोषित कष्टकऱ्यांच्या तडजोडविहीन आणि संघटित लढ्यात आहे.

Related posts

Leave a Comment

five × five =