नौजवान भारत सभा, मुंबई तर्फे नियमितपणे सुरू आहे — शहीद सुखदेव फिरते वाचनालय

मुंबईतील मानखुर्द-गोवंडी परिसरातील झोपडपट्ट्यांमध्ये राहणाऱ्या तरुणांमध्ये वाचनाची आवड निर्माण करणे, त्यांच्यात जगाबद्दल जाणून घेण्याची जिज्ञासा वाढवणे, आणि समतामूलक समाजाची जाणीव रुजविण्याच्या उद्देशाने नौजवान भारत सभा (नौभास) दर रविवारी ‘शहीद सुखदेव फिरते वाचनालय’ हा उपक्रम राबवत आहे.
या उपक्रमात नौभास चे सदस्य पुस्तकांनी भरलेल्या बॅगा घेऊन वस्त्यांमध्ये जातात. या पुस्तकांमध्ये कथा, कविता, इतिहास, विज्ञान, कला अशा विविध विषयांचे साहित्य असते.
गेल्या काही आठवड्यांपासून गौतम नगर आणि साठे नगर या भागांमध्ये नियमित वाचक तयार झाले आहेत. दर रविवारी हे वाचक पुस्तकं वाचतात, चित्रं काढतात, काहीजण आपले लेखनही सादर करतात, तर काही जण वाचलेल्या गोष्टी सर्वांना सांगतात. मुलांपासून ते पालकांपर्यंत, सर्वांमध्ये साहित्य वाचण्याची आवड वाढताना दिसत आहेत.
गौतम नगरमध्ये मागील दोन रविवारी मुलांबरोबर अनेक रंजक कथा वाचल्या गेल्या. या गोष्टींनी फक्त मुलं नव्हे, तर त्यांचे पालकही मंत्रमुग्ध झाले. इतकेच नव्हे, तर रस्त्याने जाणारे काही लोकही थांबले आणि कथांमध्ये रममाण झाले.
आजच्या नफा केंद्रित भांडवली व्यवस्थेत, सामान्य माणसाने कितीही मेहनत केली तरीही त्याला दारिद्र्यात जगावे लागते. धर्माच्या नावावर फूट पाडणाऱ्या प्रवृत्ती, अवैज्ञानिक विचार, महिलाविरोधी मानसिकता, जातीय भेदभाव, आणि अमली पदार्थांचे वाढते जाळे—यांसारख्या गोष्टी मुलांचे भविष्य हिरावून घेत आहेत.
ही स्थिती बदलण्यासाठी आपल्याला एकत्र येण्याची आणि समाज परिवर्तनाच्या लढ्यात सक्रिय सहभाग घेण्याची गरज आहे. ज्ञान, विज्ञान, कला आणि इतिहासाला सर्वसामान्यांपर्यंत घेऊन जाण्यासाठी आम्ही पुस्तके घेऊन थेट मुलांच्या दारी जात आहोत.
ही चळवळ अधिक व्यापक करण्यासाठी आणि सातत्याने चालू ठेवण्यासाठी तुमच्या सहभागाची गरज आहे. म्हणून आम्ही प्रत्येक संवेदनशील व्यक्तीला ह्या अभियानात सहभागी होण्याचे आवाहन करतो.

Related posts

Leave a Comment

8 + 20 =