विद्यार्थ्यांमधील सुप्त कलागुणांना वाव मिळावा, वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित व्हावा आणि समतामूलक समाज घडवणाऱ्या जबाबदार नागरिकांची जाणीव निर्माण व्हावी, या उद्देशाने यंदाही उन्हाळी सुट्टीच्या काळात साप्ताहिक सामूहिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
नौजवान भारत सभा, अहिल्यानगर शाखेने गेल्या दोन आठवड्यांपासून दर शनिवारी मुलांसाठी विविध सामूहिक उपक्रम सुरू केले आहेत. या उपक्रमांना विद्यार्थ्यांसोबतच पालकांचा देखील उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. वर्षभर असे उपक्रम सातत्याने सुरू ठेवावेत, अशी भावना अनेक पालकांनी व्यक्त केली आहे.
उपक्रमाची सुरुवात क्रिकेट खेळाने झाली. विद्यार्थ्यांमध्ये विशेषत: मुलींमध्ये पहिल्यांदाच बॅट-बॉल हातात घेण्याचा उत्साह दिसून आला. खेळानंतर घेण्यात आलेल्या चर्चासत्रातून नियम, शिस्त आणि संघभावना याची जाण निर्माण झाली.
‘टाकाऊपासून टिकाऊ’ ही संकल्पना समजावून देत जुन्या वर्तमानपत्रांपासून पेन स्टँड तयार करण्याची कार्यशाळा घेण्यात आली. मुलांनी उत्साहाने सहभाग घेतला व आपल्या कलाकृती सादर केल्या. ही क्रिया पर्यावरणपूरकतेची जाणीव निर्माण करणारी ठरली.
या उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये सर्जनशीलता, सामाजिक भान, समानतेची जाणीव आणि वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करण्याचा प्रयत्न आहे. पालकांचा सहभाग आणि मुलांचा उत्साह यामुळे उपक्रम अधिक प्रभावी ठरत आहेत.
