नौभास तर्फे कॉम्प्युटर प्रशिक्षण केंद्र आणि स्पोकन इंग्रजीचे वर्ग सुरू! या वर्गांमध्ये शिकवण्यासाठी पुढे या, व्हॉलंटीयर बना!

मागील दोन आठवड्यांपासून पुणे शहराच्या मध्यवर्ती भागातील शहीद भगतसिंह वाचनालयामध्ये नौजवान भारत सभेकडून स्थानिक विद्यार्थ्यांचे कॉम्प्युटर आणि स्पोकन इंग्रजीचे वर्ग घेण्यात येत आहेत. यामध्ये विद्यार्थ्यांना कॉम्प्युटरबद्दल मूलभूत माहिती देण्याबरोबरच कॉम्प्युटर हाताळण्याबद्दल, टायपिंग, तसेच संबंधित इतर कौशल्यांचे प्रशिक्षण दिले जात आहे. सर्व क्षेत्रांमध्ये कॉम्प्युटर आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून उत्पादन होत असले तरीही बहुतांश शाळा-कॉलेजांमध्ये त्याच्या शिक्षणाबद्दल अजूनही तेवढी जागरूकता दिसून येत नाही आणि त्यातल्या त्यात आर्थिक आणि सामाजिक दृष्ट्या निम्न वर्गांतून येणारे विद्यार्थी ज्या शाळांमध्ये जातात, तिथे त्या प्रकारचे प्रशिक्षण उपलब्ध असण्याची शाश्वती जवळपास नसतेच. बाजारात उपलब्ध असलेले कॉम्प्युटर कोर्सेस सामान्य कामगार-कष्टकरी पार्श्वभूमीतून येणाऱ्या विद्यार्थ्यांना परवडण्याजोगे नाहीत. इंग्रजी भाषा आज उत्पादनाची गरज बनली असली तरी तिच्यावर प्रभुत्व मिळवणाऱ्यांमध्ये भाषा शिकण्याची संधी मिळालेले श्रीमंत घरातील मुलंच दिसतात. आर्थिक सक्षमतेच्या अभावी आणि अभ्यासासाठी प्रतिकुल वस्त्यांमधील वातावरणामुळे हे विद्यार्थी दर्जेदार शिक्षणापासून वंचित राहतात.
आजच्या खासगीकरणाच्या काळात शिक्षणाला जणू काही ती एक आवश्यक आणि विद्यार्थ्यांचे मानवीकरण करणारी क्रिया नसून चैनीची वस्तू आहे, असे वाटावे इतके सामान्य जनतेपासून वेगळे करण्यात येत आहे. शिक्षणाची मक्तेदारी देशातल्या उच्चभ्रू वर्गाकडे एकवटली जात आहे. याचा अर्थ हाच होतो की मेहनतीच्या लुटीतून चालणारी ही भांडवलधार्जिणी व्यवस्था अधिकाधिक प्रतिक्रियावादी बनत आहे. आजवर भारतामध्ये भांडवली व्यवस्थेतील सर्व दुर्गुणांसहित तथाकथित “कल्याणकारी राज्य” नावाचा असमानता लपवणारा आणि त्यावर एक उदार पडदा टाकणारा जो मुखवटा राज्यसत्तेकडे होता, तो आता व्यवस्थेच्या आर्थिक संकटाच्या काळात छिन्न-भिन्न होऊन पडू लागला आहे. आजवर ज्या तोकड्या सुविधा समाजातील निम्न आणि शोषित वर्गातील एका हिश्श्याला मिळू शकत होत्या, त्या देखील आता हिसकावून घेतल्या जात आहेत. परिणामी इतर क्षेत्रांमध्ये सुरु असलेल्या खासगीकरणासोबतच शिक्षणाचे देखील खाजगीकरण वाढत आहे.
नौभास युवकांच्या खऱ्या गरजा आणि समस्या ओळखते आणि म्हणूनच शिक्षण आणि रोजगाराच्या मागणींना प्राधान्य देत सर्वांना शासनाकडून मोफत, समान आणि दर्जेदार शिक्षण आणि भगतसिंह रोजगार हमी कायदा लागू होऊन रोजगाराचा अधिकार या मुद्द्यांवर संघर्ष करते. तसेच, ज्ञान ही समाजिक संपत्ती आहे आणि त्यामुळे समाजाने ज्यांना उच्च शिक्षणाच्या संधी निर्माण करून दिल्या आहेत, त्यांनी ग्रहण केलेले ज्ञान परत कष्टकरी जनतेपर्यंत घेऊन जाणे ही त्यांची जबाबदारी आहे असे नौभास मानते. आम्ही सर्व न्यायप्रिय जनतेला या उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन करत आहोत.
नौजवान भारत सभा, पुणे

Related posts

Leave a Comment

seventeen + 1 =