नौजवान भारत सभेतर्फे पुण्यातील शहीद भगतसिंह वाचनालय, सुपर बिबवेवाडी येथे “द ग्रेट डिक्टेटर (The Great Dictator (1940))” या चित्रपटाचे प्रदर्शन करण्यात आले

great dictator movie screening

great dictator movie screening

नौजवान भारत सभेतर्फे पुण्यातील शहीद भगतसिंह वाचनालय, सुपर बिबवेवाडी येथे गेल्या आठवड्यात विसाव्या शतकातील महानतम सिने-कलाकार आणि उत्कट मानवतावादी, जनवादी चार्ली चॅप्लिन यांच्या “द ग्रेट डिक्टेटर (The Great Dictator (1940))” या चित्रपटाचे प्रदर्शन करण्यात आले. चॅप्लिनने आपल्या चित्रपटांमध्ये समाजाच्या नृशंस वास्तवावर ताशेरे ओढले ती सुद्धा त्याची विनोदी शैली जोपासून, जे चॅप्लिनच्या कलात्मक प्रतिभेची महत्ता दाखवते. अशा प्रकारे वास्तवदर्शी कलानिर्मिती करणे, आपल्या कलेतून समाजातील विडंबनयुक्त वास्तवाचे, अन्याय-अत्याचाराचे चित्रण करणे, यांमुळे चॅप्लिन एक सच्चा कलाकार ठरतो. “द ग्रेट डिक्टेटर” या चित्रपटामध्ये देखील त्याने हेच केले. चित्रपटसृष्टीत बोलपटांचा शोध लागण्याच्या काळातही मूकपट बनविणाऱ्या चार्ल्सने सर्वप्रथम याच चित्रपटापासून बोलपट निर्मितीला सुरुवात केली. अभिनेता, निर्माता, दिग्दर्शक, लेखक, हास्यकलावंत, गायक, गीतकार, संगीतकार अशा अनेक भूमिका पार पाडणाऱ्या सर्वगुणसंपन्न आणि अष्टपैलू चार्ल्सने या चित्रपटात पीडित ज्यू आणि फॅशिस्ट हुकुमशहा अशा परस्परविरोधी दुहेरी भूमिका देखील सुबोधरित्या अभिनयित केल्या. चित्रपटात फॅशिझमचा काळ, ज्यूंवरील अत्याचार, युद्ध आणि त्याचे सामान्य कष्टकरी जनतेवरील परिणाम इत्यादी अगदी सम्यकतेने मांडले आहे. ज्यू भांडवलदारांकडून वरदहस्त प्राप्त करण्याच्या कृतीतून फॅशिस्टांचे दुतोंडी चरित्र देखील उजागर करण्यात आले. चित्रपटाच्या शेवटील समापनात्मक मानवतावादी भाषणाला अनेकजण ‘सिनेमाच्या संपूर्ण इतिहासातील एकमेव सर्वोत्कृष्ट महानतम संबोधन/स्वगत’ म्हणतात. त्यामध्ये भांडवली जगतात मानवजातीच्या सुख-सुविधांऐवजी विज्ञानाला आणि सर्व शोधांना साम्राज्यवादी युद्धांभोवती खिळवून ठेवल्या गेल्याचे वास्तव, युद्धांत सामान्य जनतेलाच होणारी हानी, जनतेला एकमेकांविरुद्ध लढवले जाणे, बहुतांश कष्टकरी जनतेतूनच येणाऱ्या सैनिकांना माणसाऐवजी यंत्र म्हणून वागविणे, या नफाकेंद्री व्यवस्थेपासून मानवतेला धोका, प्रेम, औदार्य, आंतरराष्ट्रीयता इत्यादींची विश्वाला असलेली गरज इत्यादी गोष्टी अधोरेखित करण्यात आल्या. परंतु चित्रपटामध्ये एकाच भाषणातून, त्या भाषणाच्या श्रवणातून लोकांचे मनपरिवर्तन झालेले दाखवण्यात आले आहे, जे तंतोतंत काल्पनिक आहे, जे चॅप्लिनच्या विचारविश्वात समाज-परिवर्तनाविषयीच्या मर्यादांना दाखवते. तरीसुद्धा या भाषणातून चॅप्लिनची जनपक्षधरता, मानव्य, आणि साम्राज्यवादाच्या कचाट्यातून सुटून जनतेच्या मुक्तीची, जनसंघर्षातून भांडवलशाहीचा पराभव होण्याची उमेद दिसते. यादरम्यान उपस्थित प्रेक्षकांनी चित्रपटात दाखविलेल्या विसाव्या शतकातील पाश्चिमात्य देशांमध्ये ज्यू धर्मियांवर झालेल्या अत्याचाराविषयी आणि साम्राज्यवादामुळे घटित दोन्ही विश्वयुद्धांविषयी खंत प्रकट केली. भांडवलशाहीत आर्थिक संकट सतत येत असतात. भांडवलशाहीच्या बचावकार्याअंतर्गत जनतेत फूट पडण्यासाठी खोट्या शत्रुची निर्मिती केली जाते, जे विसाव्या शतकात ज्यू धर्मीय आणि आजघडीला एकविसाव्या शतकातील भारतात मुस्लिम धर्मीय आहेत. विसाव्या शतकात प्रामुख्याने जर्मनीमध्ये नाझी पार्टीचा हिटलर आणि इटलीमध्ये मुसोलिनी या फॅशिस्ट हुकूमशहांची सत्ता आली, जे खरंतर भांडवली वर्गाचेच प्रतिनिधी होते. त्यांच्या निरंकुश सत्तेमध्ये क्रूरतेच्या सर्व सीमा पार करीत ज्यू धर्मियांचा जनसंहार केला गेला, ज्याला ‘होलोकॉस्ट’ म्हणून संबोधले जाते आणि ज्यू-विद्वेषाला ‘अँटी-सेमिटिझम’ या संज्ञेने ओळखले जाते. चार्ली चॅप्लिन यांचे चित्रपट एकाच वेळेला आपल्याला हसवतात आणि सामाजिक वास्तव दाखवून समाज म्हणून आपल्याला आत्मपरीक्षण करायला देखील भाग पडतात. नौभासकडून अशा प्रकारचे चित्रपट प्रदर्शन आणि चर्चा कार्यक्रम यापुढेही नियमित आयोजित केल्या जातील. सामिल होण्यासाठी आम्हाला नक्की संपर्क करा.
संपर्क – 8329869421

Related posts

Leave a Comment

twenty − 11 =