
शहीद भगतसिंह, राजगुरू आणि सुखदेव यांचे स्वप्न अपुरे! कष्टकरी आणि नवयुवक करतील पुरे!! साथींनो, आज आपण एका अशा काळात जगत आहोत जेव्हा फासीवादी शक्तींचा हल्ला निरंतर वाढत चालला आहे. तर दुसऱ्या बाजूला सामान्य जनता नरकासमान परिस्थितीमध्ये जगण्यासाठी मजबूर आहे. लोकांनी संघटीत होऊ नये यासाठी कट्टरपंथ, सांप्रदायिकता आणि अंधराष्ट्रवादाचे जहर लोकांच्या डोक्यात भरले जात आहे. तर्क, प्रगतिशील विचार व मानवतेला पुढे घेऊन जाणाऱ्या मूल्यांवर संघटीत हल्ले सुरु आहेत. अशा काळात भगतसिंह यांच्या शब्दात “क्रांतीचे चैतन्य जागे करण्यासाठी जेणेकरून मानवतेच्या आत्म्यात खळबळ पैदा होईल” आम्ही शहीद भगतसिंह, राजगुरू आणि सुखदेव यांच्या 92 व्या शहीद दिनानिमित्त त्यांच्या स्वप्नांना आठवत आहोत आणि त्या स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी तरुणांना आवाहन करत आहोत. 👉🏻काय होते शहीद भगतसिंह, राजगुरू आणि सुखदेव यांचे स्वप्न? या शहीदांचे स्वप्न केवळ इंग्रजांना या देशातून हाकलून लावणे एवढेच नव्हते. तर त्यांचे स्वप्न हजारो वर्षांपासून चालत आलेली श्रीमंती व गरिबीची व्यवस्था इतिहासाच्या कचराकुंडीत फेकून समता आणि न्यायावर आधारित समाज बनवून एका नव्या युगाची सुरुवात करणे हे होते. 1930 मधेच भगतसिंह यांनी सांगितले होते कि आम्ही एका मनुष्याद्वारे दुसऱ्या मनुष्याच्या आणि एका देशाद्वारे दुसऱ्या देशाच्या शोषणाच्या विरोधात आहोत. काँग्रेस आणि गांधींचे वर्गचरित्र आणि धनिक व भूस्वामींवर त्यांचे असलेले अवलंबित्व बघून भगतसिंह यांनी इशारा दिला होता कि त्यांचा उद्देश लुटण्याची ताकत गोऱ्यांच्या हातून घेऊन ती मूठभर भारतीय लुटखोरांच्या हातात सोपवणे आहे. त्यामुळेच त्यांच्या लढाईचा अंत कुठल्या ना कुठल्या तडजोडीच्या स्वरूपात होईल. भगतसिंहांनी 6 जून 1929 रोजी दिल्लीचे सेशन जज लियोनार्ड मिडलट्न यांच्या कोर्टासमोर दिलेल्या आपल्या ऐतिहासिक निवेदनात म्हटले होते कि – “क्रांती म्हणजे मूठभर परजीवी जमातींद्वारा सामान्य जनतेच्या लुटीवर आधारित, अन्यायावर आधारित प्रचलित समाजव्यवस्थेत आमूलाग्र परिवर्तन. समाजाचे प्रमुख अंग असूनही आज कामगारांना त्यांच्या प्राथमिक हक्कांपासून वंचित ठेवले जात आहे आणि त्यांच्या कमाईचे सारे धन शोषक भांडवलदार हडप करतात. इतरांचा अन्नदाता शेतकरी आपल्या परिवारासहित एकेका दाण्यासाठी मोताद आहेत. जगभरच्या बाजारपेठांसाठी कपडे उपलब्ध करून देणाऱ्या विणकराला आपले व पोराबाळांचे शरीर झाकण्याइतके देखील कपडे मिळत नाही.
सुंदर महाल निर्माण करणारे गवंडी, लोहार, सुतार स्वतः मात्र घाणेरड्या वस्त्यांत राहून आपली जीवनयात्रा समाप्त करतात. या विपरीत समाजातील शोषक भांडवलदार त्यांच्या छोट्यामोठ्या लहरींखातर लाखो-कोटींची उधळपट्टी करतात.” भगतसिंहांनी 1928 ला फिरोजशहा कोटला मैदानात झालेल्या क्रांतिकारकांच्या बैठकीत आधीपासून सुरु असलेले संघटन एच. आर. ए. मध्ये ‘सोशालिस्ट’ हा शब्द जोडत समतामूलक समाजाची निर्मिती हा संघटनेचा उद्देश घोषित केला.
भगतसिंह आणि त्यांचे साथी असा समाज घडवू इच्छित होते ज्यात जाती आणि धर्माच्या नावावर झगडे नसतील. भगतसिंहांनी जेव्हा देशातील युवकांना संघटीत करण्यासाठी ‘नौजवान भारत सभेची’ स्थापना केली तेव्हा त्यांनी या गोष्टीकडे विशेष लक्ष दिले. भगतसिंहांचे संघटन सुरुवातीपासूनच धर्मनिरपेक्ष संघटन होते. तरुणांमध्ये धार्मिक आणि जातीय विभाजन कमी करण्यासाठी विचारांच्या प्रचार प्रसाराव्यतिरिक्त सहभोजनाचे कार्यक्रम नेहमी आयोजित केले जात. इंग्रज जिथे एका बाजूला स्वातंत्र्याच्या लढाईला कमजोर करण्यासाठी हिंदू व मुसलमानांना आपापसात लढवत होते तिथेच दुसऱ्या बाजूला हिंदू महासभा व तबलिगी जमात सारखे कट्टरपंथी संघटन सुद्धा हिंदू मुस्लिम झगडे सुरू करून इंग्रजांची प्रकारांतराने मदतच करीत होते. भगतसिंहांनी लोकांना आपापसात लढण्यापासून परावृत्त करण्यासाठी लोकांमध्ये वर्गचेतना जागृत करण्यावर भर दिला. त्यांनी सांगितले “लोकांना आपआपसात लढण्यापासून रोखण्यासाठी त्यांना वर्गचेतनेची गरज असते. गरीब कष्टकरी व शेतकऱ्यांना समजावून सांगितले पाहिजे की तुमचे खरे दुष्मन भांडवलदार आहेत. त्यामुळे तुम्ही त्यांच्या षडयंत्रापासून सावध राहिले पाहिजे आणि त्यांना बळी पडून काहीही करता कामा नये…” भगतसिंहांसारख्या क्रांतिकारकांच्या विचारांना भारताच्या शासक वर्गाने केवळ धूळ आणि राखेखाली दाबून टाकण्याचे घृणित षडयंत्रच रचले नाही तर त्यांना बंदूक-पिस्तूल वाल्या युवकाच्या रुपात जनतेत स्थापित केले. जेव्हाकी आपल्या सुरुवातीच्या क्रांतिकारी दिवसांना वगळता भगतसिंह जनतेला जागृत करणे व त्यांच्या व्यापक संघटीत ताकदीच्या बळावर क्रांती करण्याचे प्रबळ समर्थक होते. जेलमधून विद्यार्थ्यांच्या नावे पाठविलेल्या पत्रात ते लिहितात – “आम्ही आता तरुणांना हे सांगू शकत नाही की त्यांनी हातात बॉम्ब व बंदूक घ्यावी. आज विद्यार्थ्यांसमोर यापेक्षाही महत्वपूर्ण कार्यभार आहे…
युवकांना क्रांतीचा हा संदेश देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवायचा आहे, उद्योग-कारखान्यांच्या ठिकाणी, अस्वच्छ वस्त्या आणि गावातील जीर्ण झोपड्यांत राहणाऱ्या करोडो लोकांमध्ये तरुणांनी क्रांतीची चेतना जागवली पाहिजे, त्यातूनच स्वातंत्र्यप्राप्ती होईल आणि एका मनुष्याद्वारे दुसऱ्या मनुष्याचे शोषण अशक्य होईल.” भगतसिंहांनी देशी-विदेशी लूटीला संपवून टाकणे आपले लक्ष्य सांगितले होते. फाशी जाण्याच्या 3 दिवस आधी पंजाबच्या गव्हर्नर ला लिहिलेल्या एका पत्रात त्यांनी म्हटले – नजीकच्या भविष्यात हे युद्ध अंतिम स्वरूपात लढल्या जाईल. साम्राज्यवाद आणि भांडवलशाही काही काळाचेच आगंतुक आहेत. हेच ते युद्ध आहे ज्यात आम्ही प्रत्यक्ष स्वरूपात भाग घेतला आहे. त्यासाठी आम्हाला स्वतःवर गर्व आहे. ह्या युद्धाला आम्ही सुरू केले नाही, आणि ते आमच्या आयुष्यासोबत समाप्तही होणार नाही.
👉🏻75 वर्षाच्या “स्वातंत्र्याचा” सफरनामा
साथींनो, जर आपण स्वातंत्र्याच्या 75 वर्षाच्या इतिहासाच्या चित्राला आपल्या शहिदांच्या स्वप्नांसोबत जोडून बघितले तर ते कुठेच जुळत नाही. स्वातंत्र्यानंतरचा इतिहास आपल्याला हे सांगतो की ज्या जनतेने एवढा त्याग करून ह्या देशाला उभे केले आज तीच कष्टकरी जनता पावलोपावली ठेचा खाण्यास मजबूर आहे. आज हे स्पष्ट बघितल्या जाऊ शकतं कारण प्रत्यक्षाला पुराव्याची आवश्यकता नसते; कारण आपल्या मेहनतीने जनतेने जे सार्वजनिक क्षेत्र (रेल्वे, विमा ई.) उभे केले होते त्यांना आज एक एक करून भांडवलदारांना विकल्या जात आहे. स्वातंत्र्यानंतर सत्तेत येणाऱ्या प्रत्येक पक्षाच्या सरकारने जनतेची दिशाभूल करत भांडवलदारांच्या नफ्यात हरप्रकारे वाढ करण्यासाठी खूप जोर लावला आहे. जिथे आज देशात बेरोजगारी प्रत्येक दिवशी नवा रेकॉर्ड करीत आहे तिथे दुसऱ्या बाजूला मोदी-शहा सरकार द्वारे बेरोजगार तरुणांना हिंदू-मुस्लिम किंवा जात-धर्माचे खेळणे पकडवून आपापसात लढवल्या जात आहे. मागच्या वर्षी मार्च मध्ये सुरू झालेल्या लॉकडाउन आणि त्यानंतरच्या महिन्यांमध्ये देशातील करोडो लोकांचा रोजगार गेला. मोठी लोकसंख्या दोन वेळच्या जेवणाला पण मोताद झाली. बेरोजगारी, भूक आणि अभावाची ही शृंखला सतत सुरु आहे. अनियंत्रित वाढणारी महागाई गरिबांच्या ताटाला अजूनच रिकामे करत आहे. दुसऱ्या बाजूला देशातील सर्वात श्रीमंतांच्या संपत्तीत अमाप वाढ होत आहे. महामारी च्या काळात मुकेश अंबानी ने प्रत्येक तासाला जेवढी कमाई केली तेवढे पैसे कमावण्यासाठी एका अकुशल कामगाराला 10,000 वर्षांपर्यंत काम करावे लागेल.
एवढेच नव्हे, देशातील वरच्या 100 अब्जाधीशांच्या संपत्तीत गेल्या एका वर्षात 14 लाख कोटी रुपयांची वाढ झाली आहे. पेट्रोल, डिझेल आणि गॅस च्या अंधाधुंद वाढत्या किंमतींचा चौफेर परिणाम येणाऱ्या काळात गरिबांच्या आधीच झुकलेल्या कमरेवर आणखीन बोझा टाकणार आहे.
👉🏻शहीदांच्या विचारांवर अंमल करा! नव्या क्रांतीचा मार्ग धरा!!
साथींनो, प्रश्न आपल्यावर पण आहे कि काय आपण अशा दुर्गतीपूर्ण आयुष्याला आपली नियती मानून बसून राहणार? या प्रश्नावर आपले लक्ष नाही जाणार तर मग कोणाचे जाणार? हिंदू-मुस्लिम आणि मंदिर-मशिदीच्या नावावर कधीपर्यंत आपण एक दुसऱ्यांची डोकी फोडत राहणार? खरी गोष्ट ही आहे की सर्व निवडणूकबाज पक्षांचे उद्दिष्टच सामान्य जनतेची दिशाभूल करणे हे आहे. आणि आज लुटखोरांच्या सर्व दलांपैकी भाजपच भांडवलदारांना चांगला वाटत आहे. हा योगायोग नाही कि 2017-18 मध्ये एकट्या भाजपला एकूण कार्पोरेट देणगी पैकी 80 टक्के देणगी प्राप्त झाली होती.
आता तुम्हीच विचार करा की यांना आपली काळजी वाटणार की त्यांना देणगी देणाऱ्या कार्पोरेट कंपन्यांची?
आपण केवळ आणि केवळ आपल्या एकजुटीच्या बळावर शिक्षण-आरोग्य-रोजगाराशी जोडलेले आपले हक्क अधिकार मिळवू शकतो. विद्यार्थी युवकांना ह्या गोष्टीला खोलात समजून घ्यावे लागेल. जाती धर्माच्या झगडे भांडणात नुकसानीशिवाय आपला कुठलाही फायदा होणार नाही. ह्या गोष्टीला आपण जेवढे लवकर समजू तेवढे चांगले नाहीतर येणाऱ्या पिढ्या आपल्याला कधीही माफ करणार नाहीत. इतिहास सांगतो कि प्रत्येक समाज हा बदलत असतो आणि त्याला मनुष्यच बदलतात, आपला समाज सुद्धा निश्चितच बदलेल, यासाठी गरज आहे की भगतसिंह-सुखदेव-राजगुरूंचा वारसा पुढे घेऊन जाण्यासाठी आपण पुढे आले पाहिजे.
साथींनो, भगतसिंह-सुखदेव-राजगुरू आणि त्यांच्या इतर सर्व साथींपासून प्रेरणा घेत आपल्याला उठून उभे राहावे लागेल. आम्ही सर्व न्यायप्रिय नागरिक, कष्टकरी जनता आणि विद्यार्थी-युवकांकडे आमचा हात पुढे करत आहोत. देशात एक नवी सुरुवात झालेली आहे. भगतसिंहांनी स्थापन केलेल्या “नौजवान भारत सभेला” पुन्हा जिवंत केल्या गेले आहे. देशातील अनेक विद्यापीठांत, कॉलेजांमध्ये आम्ही याच आदर्शांवर क्रांतिकारी विद्यार्थी संघटन उभे करत आहोत. कामगार-कष्टकऱ्यांमध्ये सुद्धा काम सुरु केल्या गेलं आहे, स्त्रियांचे आणि जागरूक नागरिकांचे मंच आणि संघटन ठिकठिकाणी संघटीत केल्या जात आहे. या विशाल देशाला बघता ही सुरुवात छोटी वाटू शकते. परंतु प्रत्येक लांब मार्गाची सुरुवात ही उचललेल्या पहिल्या पावलाबरोबरच होत असते.
दिशा जर योग्य असेल, संकल्प मजबूत असेल आणि विचार वैज्ञानिक असतील तर हवेच्या उठलेल्या एका लाटेला तुफानात बदलण्यास वेळ लागत नाही. जर तुम्ही एका जिवंत माणसाप्रमाणे जगणे आणि लढण्याला आयुष्याची रीत बनवायला तयार असाल तर आमच्याशी नक्की संपर्क करा.
नौजवान भारत सभा
संपर्क: रवि पुर्णे 8956840785
