सावित्रीबाई फुले यांच्या जन्मदिनानिमित्त (3 जानेवारी 1831)

 सावित्रीबाई फुलेंचा वारसा जिंदाबाद! सर्वांना समान आणि मोफत शिक्षणाच्या हक्कासाठी पुढे या! आज आपण अशा वेळी सावित्रीबाई फुले यांचे स्मरण करत आहोत, जेव्हा दलित आणि कामगार कष्टकरी लोकसंख्येतील बहुसंख्य विद्यार्थी-तरुण शिक्षणाच्या हक्कापासून वंचित आहेत. तसेच शिक्षण व्यवस्थेच्या सतत चाललेल्या खाजगीकरणामुळे सामान्य घरातील मुले शिक्षणाच्या क्षेत्रातून बाहेर ढकलली जात आहेत. 1991 मध्ये सुरू झालेल्या या खाजगीकरणाच्या धोरणाचा कळस मोदी सरकारच्या कार्यकाळात पाहायला मिळत आहे. नव्या शैक्षणिक धोरणांतर्गत शिक्षण हे केवळ श्रीमंतांच्या मुलांपुरतेच मर्यादित झाले आहे. सक्तीचे शिक्षण, शिष्यवृत्ती, आरक्षण या सगळ्याचा लाभ आज सर्वसामान्य कष्टकरी लोकांना मिळत नाही. ज्या शिक्षण बंदी विरोधात सावित्रीबाईंनी लढा दिला होता, तीच शिक्षण बंदी आज एका नव्या पातळीवर आणि नव्या स्वरुपात आपल्यासमोर उभी आहे. दुसरीकडे फॅसिस्ट सरकारने शिक्षणाच्या भगवेकरणाची मोहीम सुरू केली आहे. एका अशा काळात आज आपण सावित्रीबाई फुले यांचे स्मरण करत आहोत आणि त्यांचा वारसा पुढे घेऊन जाण्याची प्रतिज्ञा करत आहोत. सावित्रीबाई हे शिक्षण क्षेत्रातील ते नाव आहे, ज्यांनी 176 वर्षांपूर्वी ब्राह्मणी शक्तींशी लढा देऊन ज्योतिराव फुले यांच्यासोबत पुण्यातील भिडे वाड्यात मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली. या घटनेला क्रांतिकारी महत्त्व आहे. दलितांवर पिढ्यानपिढ्या अनेक निर्बंधांबरोबरच लादलेल्या “शिक्षण” बंदीमुळे दलित आणि स्त्रियांचेही मोठे नुकसान झाले. त्यामुळेच जोतीराव आणि सावित्रीबाईंनी वंचितांच्या शिक्षणासाठी गंभीर प्रयत्न सुरू केले. मनुस्मृतीच्या अघोषित शिक्षण बंदी कायद्याविरुद्ध हे जोरदार बंड होते. या संघर्षाच्या काळात त्यांना सनातन्यांच्या दगड, शेण, मातीचा मारही सहन करावा लागला, पण सावित्रीबाईंनी न थांबता शिक्षणाचे महत्त्वाचे कार्य सुरू ठेवले. ब्रिटीशांनी भारतात सुरू केलेल्या औपचारिक शिक्षणाचा उद्देश “शरीराने भारतीय पण मनाने इंग्रज” असे कारकून तयार करणे हा होता. त्यामुळे ब्रिटिशांनी शिक्षणाच्या व्यापक प्रसारावर किंवा तार्किक आणि वैज्ञानिक शिक्षणावर भर दिला नाही. जोतिराव-सावित्रीबाईंनी केवळ शिक्षणाच्या प्रसारावरच नव्हे तर प्राथमिक शिक्षणातच तार्किक आणि वैज्ञानिक शिक्षणावर भर दिला. अंधश्रद्धेविरुद्ध जनतेचे प्रबोधन केले. ज्योतिराव आणि सावित्री यांनी ब्रिटिश सत्तेवर अवलंबून न राहता शिक्षणाचा हा प्रकल्प चालवला. मुलींची शाळा असो की प्रौढ साक्षरता शाळा, त्यांनी ती जनतेच्या चळवळीतून उभी केली आणि चालवली. आपले संपूर्ण जीवन वाहून देऊन काम करणाऱ्या या महान लढवय्या क्रांतिकारी स्त्रीला आम्ही अभिवादन करतो आणि त्यांच्या स्वप्नांना पुढे घेऊन जाण्याचा संकल्प करतो. त्यांचा शिक्षण हक्काचा लढा पुढे नेण्याचा आणि सर्वांना समान आणि मोफत शिक्षणाच्या हक्कासाठी लढण्याचा संकल्प करूनच आपण खऱ्या अर्थाने सावित्रीबाईंना अभिवादन करू शकतो.

Related posts

Leave a Comment

twenty − 16 =