साथींनो, 93 वर्षांपूर्वी म्हणजेच 27 फेब्रुवारी 1931 रोजी इंग्रजांशी लढतांना चंद्रशेखर आझाद शहीद झाले. शहिद चंद्रशेखर आझाद यांनी ज्या स्वप्नासाठी स्वतःच्या प्राणाचे बलिदान दिले ते आजही पूर्ण झालेले नाही. भांडवलशाही-सम्राज्यशाही आणि सर्व प्रकारच्या शोषणाविरुद्ध लढणाऱ्या योद्धांमध्ये चंद्रशेखर आझाद यांचा समावेश आहे. चंद्रशेखर आझाद यांचा जन्म 23 जुलै 1906 रोजी मध्यप्रदेश मधील भाबरा गावात झाला. एका अत्यंत गरीब कुटुंबात त्यांचा जन्म झाला असल्यामुळे त्यांना प्राथमिक शिक्षण पूर्ण करण्याची संधीही मिळाली नव्हती. अगदी बालपणापासूनच चंद्रशेखर आझाद हे स्वातंत्र्य चळवळीतील आंदोलनांमध्ये सहभाग घेत. वयाच्या अवघ्या 15 व्या वर्षी 1921 मध्ये सुरू असलेल्या असहकार आंदोलनात चंद्रशेखर आझाद यांनी सहभाग घेतला होता. या आंदोलना दरम्यान त्यांना अटक सुद्धा झाली. 1925 साली काकोरी येथे रेल्वेमधून खजिना लुटण्यामध्ये चंद्रशेखर आझाद सहभागी होते. काकोरी कटानंतर इंग्रजांनी क्रांतीकारकांची धरपकड सुरू केली. चंद्रशेखर आझाद यांनी क्रांतिकारक चळवळीतील विखुरलेल्या तत्वांना जोडण्याचे काम केले. चंद्रशेखर आझाद “हिन्दुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन एसोसिएशन” चे कमाण्डर बनले. हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन (HSRA) मध्ये असलेले क्रांतिकारी देशाला इंग्रजांपासून स्वातंत्र्य मिळाले पाहिजे यासाठी तर लढत होतेच पण ते स्वातंत्र्यानंतर समाजवादी सत्ता म्हणजेच देशातील सत्ता कामगार कष्टकऱ्यांच्या हातात येण्यासाठी सुद्धा लढत होते. आज देशाला इंग्रजांपासून स्वातंत्र्य जरी मिळाले असले तरी भांडवली शोषण मात्र आजही सुरू आहे. श्रीमंत हा श्रीमंत होत चालला आहे आणि गरीब हा गरीबच होत चालला आहे. महागाई, बेरोजगारी, सांप्रदायिकतेमूळे लोकांचे जीवन नरकासमान बनले आहे. चंद्रशेखर आझाद, अश्फाक उल्लाह खान आणि इतर क्रांतिकारकांनी हिंदू-मुस्लिम एकतेचा संदेश दिला होता आज मात्र देशभरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि संघ परिवारातील इतर संघटना सांप्रदायिकतेचे वातावरण पसरवत आहेत. आज अशा परिस्थितीमध्ये शहीद चंद्रशेखर आझाद आणि तमाम क्रांतिकारकांचा वारसा घेऊन सांप्रदायिक फासीवादी शक्तींविरुद्ध संघर्ष उभा करावा लागणार आहे. यासाठी पुन्हा एकदा नव्याने क्रांतिकारकांचे विचार हे जनतेमध्ये घेऊन जावे लागणार आहे. क्रांतिकारकांनी दाखवलेल्या मार्गाने त्याग, निष्ठा व समर्पित भावनेने जनतेला एकजुट करण्याचा संकल्प आज करूयात. शहीद चंद्रशेखर आझाद अमर रहे! इंकलाब जिंदाबाद!
27 फेब्रुवारी, चंद्रशेखर आझाद ह्यांच्या बलिदानदिनाच्या निमित्ताने
