भगतसिंह जनअधिकार यात्रेच्या दुसऱ्या टप्प्याच्या शेवटी आयोजित आंदोलनाला थांबवण्याच्या प्रयत्नात दिल्ली पोलिसांनी त्याला आणखी यशस्वी बनवले.

काल ३ मार्च ला जंतर-मंतर, नवी दिल्ली येथे गेल्या तीन महिन्यांपासून चालु असलेल्या भगतसिंह जनअधिकार यात्रेच्या दुसऱ्या टप्प्याचा शेवट होणार होता. ही यात्रा 10 डिसेंबर 2023 पासून सुरू होती आणि 13 राज्य, 85 जिल्हे आणि 8500 किलोमिटर चा प्रवास पार करून 26 फेब्रुवारी 2024 ला दिल्लीत पोहोचली होती आणि तेव्हापासून दिल्लीतल्या वेगवेगळ्या भागात चालु होती. यात्रेचा भाग म्हणून बवाना इण्डस्ट्रियल एरिया, ट्रॉनिका सिटी इण्डस्ट्रियल एरिया, करावलनगर, खजूरी इत्यादी भागातील कामगारांनी संप पुकारला होता. तसेच 12 राज्यांमधून कामगार, स्त्रिया, विद्यार्थी तरुण आज दिल्लीला पोहोचले होते. सकाळी 11 वाजता कामगार, स्त्रिया, विद्यार्थी तरुण मोठ्या संखेने जंतर मंतर मैदानात जमू लागले होते. पोलिसांनी तेथे कलम 144 लागू असल्याचा बहाणा करून हजारोंच्या संख्येने उपस्थित आंदोलनकर्त्यांवर बळाचा वापर करत शेकडो लोकांना वीसएक बसांमध्ये कोंबून दिल्लीच्या वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात घेऊन गेले. परंतु हे एक प्रदर्शन आणखी दहा प्रदर्शनांना जन्म देत आहे याची पोलिसांना कल्पना नव्हती. ज्या ज्या पोलिस ठाण्यांमध्ये आंदोलकांना नेण्यात आले त्या त्या ठिकाणी निदर्शने सुरू झाली. मंदिर मार्ग पोलिस ठाण्यासह अनेक पोलिस ठाण्यांचे पोलिस वैतागले आणि त्यांनी खासगी बसेस बोलावून आंदोलकांना त्यात भरून दिल्लीच्या दूरवरच्या भागात सोडण्यास सुरुवात केली. पण त्याच दरम्यान सुमारे 1000 लोकांचा दुसरा जमाव बॅरिकेड्स हटवून जंतरमंतरवर पोहोचला आणि तिथे सभा सुरू झाली. परिणामी, पोलिसांनी त्यांना पुन्हा ताब्यात घेतले आणि नजफगढ, द्वारका, विमानतळाजवळील भाग, दिल्ली कँट इत्यादी दिल्लीच्या दूरवरच्या पोलीस ठाण्यांमध्ये घेऊन गेले. पोलिस ठाण्यांमध्ये पुन्हा निदर्शने सुरू झाली. सायंकाळपर्यंत पोलीस वैतागले आणि त्यांना पुन्हा आंदोलनकर्त्यांना सोडावे लागले. दरम्यान, बवाना औद्योगिक परिसरात पोलिसांनी संप करणाऱ्या कामगारांवर लाठीमार केला आणि बवाना औद्योगिक क्षेत्र मजदूर युनियनचे संयोजक भरत यांच्यासह अनेक राजकीय कार्यकर्त्यांना अटक केली. ते अजूनही पोलिसांच्या ताब्यात आहेत. मात्र बवाना औद्योगिक क्षेत्रातील बहुतांश कारखाने बंद राहिले आणि संप यशस्वी झाला.

भारताचा क्रांतिकारी कामगार पक्ष, दिल्ली स्टेट अंगणवाडी वर्कर्स ऍण्ड हेल्पर्स युनियन, दिशा विद्यार्थी संघटना, नौजवान भारत सभा, स्त्री मुक्ती लीग, करावलनगर मजदूर संघ, बवाना औद्योगिक क्षेत्र मजदूर संघ, ऑटोमोबाईल इंडस्ट्रियल कॉन्ट्रॅक्ट वर्कर्स युनियन आणि इतर अनेक संघटनांच्या संयुक्त प्रयत्नातून सुरू करण्यात आलेल्या भगतसिंह जनअधिकार यात्रेचा दुसरा टप्पा अपेक्षेपेक्षा जास्त आणि वेगळ्या पद्धतीने यशस्वी झाला. एका प्रदर्शनाऐवजी आज दिल्लीत शेकडो कामगार, कर्मचारी, अंगणवाडी सेविका, विद्यार्थी, तरुणांनी जंतरमंतर, पोलीस ठाण्यांच्या आत आणि बाहेर, कॅनॉट प्लेस, शिवाजी स्टेडियम आणि रामलीला मैदानाजवळच्या भागात मोर्चे आणि निदर्शने केली. दिल्ली पोलिसांच्या ताकदीचा बराचसा भाग त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्याच्या अयशस्वी प्रयत्नांमध्ये खर्च झाला. सुप्रीम कोर्टाचे वकील महमूद प्राचा आणि कॉलिन गोन्साल्विस, प्रसिद्ध कवी आणि वैज्ञानिक मुद्द्यांचे तज्ज्ञ गौहर रझा आणि प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते हिमांशू कुमार यांनीही या आंदोलनात सामील होऊन व्हिडिओ स्टेटमेंट प्रसारित करून मोदी सरकार आणि दिल्ली पोलिसांच्या वृत्तीचा निषेध केला. या यात्रेला देशभरातील पुरोगामी लोक, विचारवंत, संघटना आणि कार्यकर्त्यांचा पाठिंबा मिळाला आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सक्रिय असलेल्या पर्यायी पुरोगामी माध्यमांनी आज संपूर्ण घटना कव्हर केली.
भगतसिंह जनअधिकार यात्रा देशात वाढलेली भयंकर बेरोजगारी, महागाई, भ्रष्टाचार, सांप्रदायिकता आणि ईव्हीएम घोटाळ्यांच्या विरोधात सुरू आहे. आज झालेल्या प्रदर्शनांच्या माध्यमातून या यात्रेचा संदेश दूरवर पसरला आहे. ही यात्रा ‘भगतसिंह राष्ट्रीय रोजगार हमी कायदा’ पारित झाला पाहिजे, नवे शैक्षणिक धोरण रद्द झाले पाहिजे, चार नवीन श्रमसंहिता रद्द झाल्या पाहिजे, श्रीमंत वर्गावर कर लावून गरीब शेतकऱ्यांना सवलतीच्या दरामध्ये खते, सिंचन, बियाणांची व्यवस्था करण्यात यावी, मनरेगा कामगारांना वर्षभर रोजगार देण्यात यावा, दंगली करणाऱ्या माध्यमांवर बंदी घालण्यात यावी, ईव्हीएम रद्द करून बॅलेट पेपरद्वारे निवडणुका घेण्यात याव्या, कठोर सांप्रदायिकता विरोधी कायदा पारित करण्यात यावा आणि खरे धर्मनिरपेक्ष राज्य प्रस्थापित करावे, कंत्राटी पद्धत रद्द करण्यात यावी आणि किमान वेतन रु. 30000 रुपये करावे या मागण्या करत आहे.
आता आपण समजू शकतो की मोदी-शहा सरकारच्या पोलिसांनी आज आपले पूर्ण बळ वापरून भगतसिंह जनअधिकार यात्रेचे प्रदर्शन रोखण्याचा प्रयत्न का केला. नेमक्या याच त्या मागण्या आहेत ज्या मोदी सरकारच्या फॅसिस्ट धोरणांवर हल्ला करतात, लोकांमध्ये जागरुकता आणतात, त्यांना एकत्र आणतात आणि संघटित करतात. मात्र या निष्फळ प्रयत्नाच्या द्वारे फॅसिस्टांनी आपला मूर्खपणा दाखवून हे प्रदर्शन अधिक व्यापक करून शहरभर पसरवले. हा दुसरा टप्पा संपला आहे तो म्हणजे खरेतर आता तिसऱ्या टप्प्याची तयारी सुरू करण्यासाठीच. आजच्या घडामोडींमुळे लोकांची लढण्याची शक्ती अधिक बळकट झाली आहे आणि हा समाजाचा नियमच आहे की जिथे अत्याचार आहे तिथे प्रतिकार होणार, जिथे शोषण आणि अन्याय असेल तिथे संघर्ष होणार आणि जिथे विषमता असेल तिथे समानतेसाठीचा लढा होणार.

Related posts

Leave a Comment

two × 5 =