पालघर मध्ये झालेल्या मॉब लिंचिंगच्या घटनेत न्याय मिळालाच पाहिजे! जमावाद्वारे होणाऱ्या हत्या थांबल्याच पाहिजेत !

हत्येला धार्मिक रंग देऊन सामाजिक शांतता भंग करणाऱ्यांना अटक करा !
गुरुवार दिनांक 16 एप्रिल रोजी पालघर येथे गाडीने सुरतला चाललेल्या तीन व्यक्तींची जमावाद्वारे हत्या केली गेली. मृत व्यक्तींमध्ये गाडीचे ड्रायव्हर निलेश तेलगडे (वय 30) तसेच सुशिलगिरी महाराज (वय 35) आणि चिकणे महाराज कल्पवृक्षगिरी (वय 70) हे साधू सामील आहेत. लॉकडाऊनच्या काळात पालघर जिल्ह्यातील ग्रामीण भागात काही चोर दरोडेखोर येतात आणि किडन्या काढून नेतात अशा अफवा नागरिकांमध्ये पसरत होत्या. याच अफवांमधून जमावाने तीन जणांची हत्या केल्याचं स्पष्टपणे पोलिस अहवालामध्ये म्हटले आहे. या प्रकरणात 110 जणांवर गुन्हाही दाखल झाला आहे. अशा घटनेमध्ये सामील प्रत्येक व्यक्तीला कायद्याद्वारे कठोरात कठोर शिक्षा झालीच पाहिजे! परंतु पुन्हा एकदा झालेल्या या मॉब लिंचींग च्या घटनेमुळे देशामध्ये सतत दिसून येणारी ‘जमावाची’ मानसिकता आणि या घटनेनंतर चाललेले धर्माचे राजकारण हे प्रश्न पुन्हा ऐरणीवर आले आहेत.
यात गंभीर मुद्दा हा की, लॉकडाऊन असतानाही जमाव जमला, जमावाने मारहाण केल्यानंतर पोलिस तेथे पोहोचले आणि या व्यक्तींना ताब्यात घेतले, परंतु त्यानंतर पोलिसांच्या उपस्थितीमध्ये पुन्हा हल्ला करत जमावाने ही हत्या केली! यामध्ये पोलिस यंत्रणेचे अपयश, अकार्यक्षमपणा तर दिसून येतोच; शिवाय बाहेर भडकलेला जमाव उभा असताना बळी पडलेल्या व्यक्तींना पुरेशा सुरक्षेअभावी जमावामध्ये नेणाऱ्या पोलिस यंत्रणेचा हलगर्जीपणाही दिसून येतो. जनतेचे संरक्षण करण्यात ठाकरे सरकार अपयशी ठरले आहे हे निश्चित!
अशामध्ये मॉब लिचिंगच्या बहाण्याने समाजात विष पसरवणाऱ्या टोळ्या पुन्हा सक्रीय झाल्या आहेत. मारणाऱ्यांना “जिहादी” आणि “शांतीदूत” म्हटले जात आहे. तुम्हाला तर माहितच आहे की ही विशेषणं आजकाल कोणासाठी वापरली जातात. तपास अधिकारी आणि गृहमंत्र्यांनी सांगितले आहे की मारणारे आणि मृत हे एकाच धर्माचे आहेत आणि या घटनेला कोणतीही धार्मिक बाजू नाही. तरीही या घटनेच्या नावाने लोकांच्या “पौरुषत्वाला” आह्वान दिले जात आहे आणि हिंसेला चिथावणी दिली जात आहे. अशा घटनांचे निमित्त करून राजकारणाच्या पोळ्या भाजत सत्ता सोपानापर्यंत जाण्याची तयारी चालली आहे. जमावाद्वारे हत्यांना योग्य ठरवणारे, दंगलींच्या आगीत राजकारण करणारेच लोक आता या घटनेवर मगरीचे अश्रू ढाळत आहेत. त्यांना आता उदार, प्रगतीशील लोकांकडून ‘उत्तर’ पाहिजे आहे! *महाराष्ट्राच्या गॄहमंत्र्यांनी स्पष्टपणे सांगितले आहे की या मुद्यामध्ये मृत आणि हल्लेखोर हे दोन्ही एकाच धर्माचे होते.* तरीही कोरोनाच्या काळात सर्व धर्मीय कोट्यवधी गरिब, कष्टकरी, कामगारांवर कोसळलेल्या संकटाच्या पहाडाकडे दुर्लक्ष व्हावे म्हणून अगोदर तबलींगींचा मूर्खपणा, आणि आता ही घटना हिंदूत्ववाद्यांनी निमित्त बनवले आहेत – जेणे करून पुन्हा एकदा जनतेने हिंदू-मुस्लिम तणावात गुरफंटून जावे आणि कोरोनाच्या संकटात सरकारचे अपयश झाकले जावे. *द्वेष पसरवणे हेच ज्यांचे काम आहे, त्यांच्याकडून अजून कुठलीही अपेक्षा केली जाऊ शकत नाही.* कोरोनापेक्षा धोकादायक अशा या धार्मिक विद्वेषाच्या व्हायरस पासून सावधान !
जर जमावाला भडकावणाऱ्या लोकांना किंवा मारणाऱ्या लोकांना जर फुलांचे हार घालून सन्मानित केले जाईल, त्यांना पैसा आणि वकील पुरवले जातील, त्यांना ‘धर्मरक्षक’ सारख्या उपाध्या दिल्या जातील, तर मॉब लिंचिंगच्या घटना वाढणारच आहेत! सर्व देशाला माहित आहे की मॉब लिंचिंग करणाऱ्यांना डोक्यावर कोणी चढवले आहे. दररोज अंधविश्वास, धर्मवादाचा विषारी कचरा आणि वेगवेगळ्या अफवा पसरवून लोकांना विवेकशून्य रोबोट्स मध्ये बदलवण्याचे काम यांनी चालवले आहे. पालघर च्या घटनेमध्ये हिंदुत्ववादी संघटनांसहीत, अर्धवट लोकांनी अफवा पसरवण्यात कसर सोडलेली नाही. असे दंगलखोर लोक समाजासाठी अत्यंत धोकादायक आहेत. सरकारने या द्वेषाच्या व्यापाऱ्यांना लगेच अटक केली पाहिजे!
खरे तर चोरीच्या संशयावरुन हत्या होण्याची ही पहिली घटना नाही ! विशेषत: ग्रामीण भागामध्ये आणि उत्तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा यापूर्वी असंख्य अशा घटना घडल्या आहेत. ठाण्यात 2020 मध्ये चोर समजून एकाची हत्या, सोलापुरामध्ये 2018 मध्ये चोरीच्या संशयावरून 2 जणांची हत्या, 2018 मध्येच धुळ्यात चोरीच्या संशयावरून 5 जणांची हत्या, 2011 मध्ये पनवेल मध्ये एकाची चोरीच्या संशयावरून हत्या अशा अनेक घटनांची यादी देता येईल. पालघर भागामध्ये तर चोरांच्या अफवा चालूच होत्या असे स्पष्टपणे समोर आले आहे. जमावाद्वारे हिंसेच्या घटना भाजप शासनामध्ये सामान्य गोष्ट बनली आहे. गेल्या 6 वर्षांमध्ये मोहमंद अखलाख, पहलू खान, इन्सपेक्टर सुबोध कुमार, मधू, तबरेज अंसारी सहीत शेकडो लोक जमावाद्वारे मारले गेले आहेत. अनेकदा जमावला गाय आणि धर्माच्या नावाने खोट्या गोष्टींनी भडकावले गेले आणि अनेकदा अफवांमुळे जमावाने हत्या केल्या. फक्त गायीच्या नावानेच 2012 नंतर मॉब लिंचिंगच्या 88 घटना झाल्या आहेत, ज्यापैकी 86 भाजप शासनात झाल्या आहेत. अनेकदा मुलं पळवणे, चोरी, ‘चेटकीण’ होण्याच्या आरोपांमध्ये मारले गेले आहे.
झुंडीच्या या मानसिकतेला थांबवले गेलेच पाहिजे! लोकशाही मूल्यांची रुजवण जिथे कमी आहे, कायदा-पोलिस यंत्रणा जिथे न्यायपूर्ण वाटणे बंद झाले आहे, जिथे कायद्याची प्रक्रिया सामान्य माणसांच्या आवाक्याबाहेर आहे, आणि लोकशाहीकरणाचा अभाव आहे, अशा देशामध्ये जात-धर्म-चोरी अशा कोणत्याही निमित्ताने लोकांच्या भावना भडकावल्या जातात आणि कायदा हातात घेऊन झुंडीला वाटू लागते की ‘थेट न्याय’ करण्याच्या मार्गानेच आता गेले पाहिजे. प्रश्नांच्या मुळाशी न जाता तडकाफडकी न्यायाची ही कल्पना झुंडशाहीकडेच नेते. लक्षात ठेवले पाहिजे की विद्वेष आणि झुंडशाहीने कधीही कोणतेही परिवर्तन होत नाही !
आम्ही राज्य सरकारकडे मागणी करत आहोत की या गुन्ह्यातील सर्व दोषींना तातडीने कडक शिक्षा झाली पाहिजे!
सोशल मिडीयावर धार्मिक भावना भडकावणाऱ्यांवर कारवाई झालीच पाहिजे!
आम्ही सर्व जनतेला आवाहन करत आहोत की धार्मिक विद्वेष भडकावण्याच्या संघी षडयंत्रा पासून सावधान ! शांतता ठेवा, धार्मिक-जातीय़ तणाव भडकू देऊ नका!

Related posts

Leave a Comment

five × two =