‘औरंगजेब’ च्या नकली मुद्द्यावरून हिंदू-मुस्लीम द्वेष भडकवून जनतेला दंगलखोर गर्दी बनवण्याच्या संघी प्रयत्नांना हाणून पाडा!
जाती-धर्माचे झगडे सोडा, खऱ्या लढाईशी नाते जोडा! –
नौजवान भारत सभा मागील काही दिवसांपासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) परिवारातील ‘बजरंग दल’, ‘विश्व हिंदू परिषद’ आणि ‘पतित पावन संघटना’ या फॅशिस्ट संघटनांनी मुघल सम्राट औरंगजेब याची खुलताबाद, छत्रपती संभाजीनगर येथील कबर काढून टाकण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्राच्या अनेक मोठ्या शहरांमध्ये आंदोलन केले. नागपूर येथे झालेल्या आंदोलनात “मुस्लीम समाजाला पवित्र अशी चादर जाळली” या अफवेनंतर तिथे दंगल भडकली. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या “छावा” चित्रपटाच्या यशाच्या लाटेवर स्वार होऊन पुन्हा एकदा वाद पेटवून जनतेमध्ये फूट पाडण्यासाठी ह्या संघटना काम करत आहेत. आधुनिक लोकशाही, व्यक्तिस्वातंत्र्य, कायद्यापुढे समानता, स्व-बचावाचा अधिकार अशा तत्वांवर आधारित कायदेव्यवस्था असल्याचे बोलले जाते, परंतु राजेशाही, कायद्यापुढे असमानता, बेलगाम शिक्षा अशा मध्ययुगीन काळातील कल्पना आणि घटनांना धरून आज न्यायाची मागणी केली जाते. नवीन मुडदे पाडण्यासाठीच भूतकाळात गाडलेले मुडदे उकरले जात आहेत. न्यायप्रिय युवक-युवतींनी आणि जनतेने मिळून यांच्या प्रचाराचा प्रतिकार करत कष्टकरी जनतेची एकता टिकवण्याचा पूर्ण प्रयत्न केला पाहिजे. मागील अनेक वर्षांपासून खोट्या शत्रूच्या रूपात अल्पसंख्याक मुस्लीम धर्मीय जनतेला देशाचा शत्रू म्हणून प्रस्थापित करण्यात संघ-परिवाराने कोणतीच कसर सोडली नाही. मस्जिदींखाली मंदिर शोधणे, गोमातेच्या नावाखाली माणसांच्या कत्तली करणे, मशिदींसमोर ढोल-डीजेवर मुस्लिमविरोधी गाणे वाजवणे, छोट्या दुकानदारांवर हल्ले करणे, शहरांची नाव बदलणे, व्यवसायाच्या अधिकारावर हल्ला करणे अशा अनेक प्रकारच्या घटनांतून हेच दिसते की व्यवस्थेच्या अपयशांचे खापर एका धर्मावर फोडले जात आहे. 500 वर्षापूर्वीच्या घटनेला आज जनतेच्या आयुष्याचा महत्त्वाचा प्रश्न बनवू पाहणाऱ्या संघ परिवाराचा व्यापक हिंदू जनतेच्या हिताशी काडीमात्रही संबंध नाही. शिक्षणाचे बाजारीकरण, खाजगीकरण-कंत्राटीकरण, बेरोजगारी, महागाई या सर्व मुद्द्यांवरून भरकटवण्यासाठी आणि भांडवलदारवर्गाचे पाय चाटत या व्यवस्थेला टिकवण्यासाठी संघ-परिवार इतिहासात गाडलेले मुडदे उकरून धार्मिक द्वेषाचे विष पेरत आहे.
अशा दंगलींमध्ये नितेश राणे-फडणवीस-अमित शहा यांची अतिमहागड्या शाळांमध्ये, परदेशी विश्वविद्यालयांमध्ये शिक्षण घेऊन मोठमोठ्या पदांवर पोहोचणारी मुलं मरत नाहीत; मरतात ती कष्टकरी-कामगार जनतेची मुलं!
समाजामध्ये इस्लामोफोबीया (इस्लामची आततायी भीती) पसरवण्यात गोदी मीडियाचासुद्धा मोठा वाटा आहे. धार्मिक ध्रुवीकरणाचा एकमेव अजेंडा समोर ठेवून काम करणाऱ्या गोदी मीडियाने सत्याची बाजू तर केव्हाच सोडली आहे. बहुतांश मीडिया मोठमोठ्या कॉर्पोरेट घराण्यांच्या खिश्यात असल्यामुळे आज कॉर्पोरेटच्या लाडक्या संघ-भाजपसमोर त्यांनी पूर्णपणे लोटांगण घातले आहे. त्याला जोड म्हणून भाजप-संघाचा आयटी सेल कायम सोशल मीडियावरून जनतेमध्ये खोटा इतिहास रुजवण्याचा, धार्मिक द्वेष पसरवण्याचा आणि अंधराष्ट्रभक्तीचा प्रचार करत असते. बॉलीवूडच्या उरल्या-सुरल्या पुरोगामी तत्त्वाचा फॅशीस्ट शक्तींकडून विरोध झाल्यानंतर बॉलीवूडने गुडघे टेकले आहेत आणि त्यामुळेच आज छावा, काश्मीर फाईल्स, केरला स्टोरी, रझाकार, जहांगीर नॅशनल युनिवर्सिटी, स्वातंत्र्यवीर सावरकर, सारखे असंख्य सिनेमे मोठ्या प्रमाणात प्रदर्शित होत आहेत, ज्यामध्ये सतत मुस्लिमाना शत्रू म्हणून प्रस्तुत केले जात आहे. या सर्व प्रचारामुळे निम्नमध्यमवर्गाचा एक मोठा भाग धर्मवादाच्या धुंदीत हरवला आहे. आज देशातल्या कष्टकरी जनतेला धोका आहे तो या धर्माच्या स्वयंघोषित ठेकेदारांकडून. बहुसंख्य जनतेला आज मुलभूत सुविधा न मिळाल्यामुळे अतिशय दारिद्र्यात जीवन व्यतीत करावे लागत आहे. मरणाच्या कड्यावरून जनतेला खोल दरीत ढकलणाऱ्या व्यवस्थेला या संघटनांकडून आणि भाजप सरकारकडून आज संरक्षण मिळत आहे.
कोणत्याही न्यायप्रिय व्यक्तीला हे वास्तव पाहून या व्यवस्थेची चीड आल्यावाचून राहणार नाही. आज सर्व कष्टकरी-कामगार जनतेपुढे आणि न्यायप्रिय विद्यार्थी-तरुणांपुढे या फॅशिस्ट प्रचाराला तोंड देण्याचे मोठे आव्हान आहे. समाजात वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवत विवेकबुद्धी आणि इतिहासाची योग्य समजदारी घेऊन जनतेत जाण्याची जबाबदारी आज युवक-युवतींची आहे. शहीद भगतसिंह-सुखदेव-राजगुरू-अश्फाकउल्ला-रामप्रसाद बिस्मिल यांच्या धर्मवादाविरोधी, खऱ्या धर्मनिरपेक्षतेच्या वारश्याला पुन्हा जिवंत करत जनतेमध्ये क्रांतिकारी चेतनेची ज्योत पेटवावी लागेल. धर्माला वैयक्तिक मुद्दा बनवत इतर सर्व भेद विसरून आज व्यापक जनतेच्या जीवनाच्या खऱ्या मुद्द्यांना घेऊन संघर्ष करण्यासाठी एकत्र यावे लागेल.
नौजवान भारत सभा आवाहन करत आहे की युवक-युवती, कामगार-कष्टकरी यांनी या खोट्या धर्मवादी प्रचाराला बळी पडू नये, धार्मिक सलोखा राखावा आणि महाराष्ट्राला आणि देशाला लुटणाऱ्या, सर्वाधिक भ्रष्ट, जातीय़वादी-धर्मवादी, फॅशिस्ट भाजपने प्रचंड वाढवलेल्या बेरोजगारी, महागाई, भ्रष्टाचाराविरोधात एकजूट व्हावे !
