क्रांतीशिवाय जातीचे उच्चाटन संभव नाही! जातिविरोधी संघर्षाशिवाय क्रांती संभव नाही!

भांडवलशाही मुर्दाबाद, जातियवाद मुर्दाबाद, ब्राम्हण्यवाद मुर्दाबाद
क्रांतीशिवाय जातीचे उच्चाटन संभव नाहीजातिविरोधी संघर्षाशिवाय क्रांती संभव नाही!

मित्रहो,

नरेंद्र मोदींच्या नेतृत्वातील फासीवादी आणि सवर्णवादी भाजप सरकार सत्तेत आल्यापासून कष्टकरी दलित जनता आणि धार्मिक अल्पसंख्याकांचे जगणे कठीण झाले आहे. आपल्या राजकीय फायद्यासाठी मोदी सरकारने फासीवादी गुंड़ टोळ्यांना वाट्टेल ते करण्याची सूट दिली आहे. गोरक्षेच्या नावाखाली अगोदर ऊनामध्ये दलितांवर पाशवी अत्याचार करण्यापासून गोमांस खाल्ल्याचा खोटा आरोप लावून अखलाकची हत्या करण्यापर्यंत देशात फासीवादी राक्षस आपले हातपाय पसरत असल्याची अनेक उदाहरणे देता येतील. अशाच प्रकारे हिटलरच्या नेतृत्त्वाखाली नाझींनी जर्मनीमध्ये यहुद्यांवर आणि राजकीय विरोधकांवर क्रूर अत्याचार केले होते. भारतातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा फासीवाद आपल्या नाझी आणि फासीवादी पूर्वजांच्या पावलांवर पाऊल टाकून चालतो आहे.

मोदी सरकार सत्तेत आल्यापासून बेरोजगारी आणि महागाईमध्ये भयंकर वाढ झालेली आहे. मात्र देशातील सामान्य कष्टकरी जनतेचे त्याकडे लक्ष जाऊ नये म्हणूनच कष्टकरी दलित आणि धार्मिक अल्पसंख्याकांवर गोरक्षा आणि धर्मरक्षेच्या नावाखाली हल्ले केले जात आहेत. गेल्या दोन वर्षांत अडानी आणि मोदी सरकार यांच्या हातमिळवणीमुळेच डाळीची जबरदस्त साठेबाजी होऊन आपल्या ताटातून डाळ गायब झाली आहे, हे आपल्या लक्षात येऊ नये यासाठीच धार्मिक आणि जातियवादी उन्माद पसरवला जात आहे. गेल्या दोन वर्षांमध्ये मोदी सरकारने कांग्रेस सरकारचीच जनविरोधी धोरणे जास्त धडाक्यासह लागू केली आहेत, व त्यामुळे आज देशातील बेरोजगार आणि अर्धबेरोजगारांची संख्या २७ कोटींवर पोहोचली आहे, असंघटित कामगारांच्या संख्या ४७ कोटीच्या जवळ पोहोचली आहे, ४ कोटी तरुण बीए, एमएच्या पदव्या घेऊन चपला फटकारत रस्त्यावर फिरत आहेत. हे आपल्याला कळू नये म्हणूनच धार्मिक आणि जातिय फूट पाडली जात आहे. मोदी सरकार आणि एकूण भांडवली व्यवस्थेच्या अपयशाच्या कटू वास्तवाची जाणीव आपल्याला होऊ नये, म्हणूनच कष्टकरी दलित आणि धार्मिक अल्पसंख्याकांच्या विरोधात गोरक्षेच्या नावाखाली उन्माद पसरवला जात आहे.

मित्रहो, स्वातंत्र्याच्या ६९ वर्षांनंतरदेखील आपल्या देशात जातियवादी आणि ब्राह्मण्यवादी विचार अगदी रोमारोमात भिनलेले आहेत, हे लक्षात घेण्यासारखे आहे. या मनोवृत्तीचा वापर निवडणुकीचे राजकारण पुरेपूर वापर करते, आणि जनतेत फूट पाडण्यासाठी तिचा वापर करते. कांग्रेसपासून भाजपपर्यंत आणि शिवसेनापासून राकांपा पर्यंत आणि सपापासून बसपापर्यंत सर्व पक्ष जातिय समीकरणे लक्षात घेऊनच राजकारण खेळतात. भाकपा, माकपा आणि भाकपा (माले) सारखे डावे पक्षसुद्धा जातिय समीकरणे लक्षात घेऊनच निवडणुकीची रणनीती तयार करीत असतात. त्याचबरोबर सामान्य कष्टकरी जनतेच्या मानसिकतेतसुद्धा वेगवेगळ्या शासकांनी हजारो वर्षांपासून जातियवादाचे विष खोलवर पेरले आहे. त्यामुळे, भांडवलदार आणि त्यांचे प्रतिनिधित्व करणारे वेगवेगळे राजकीय पक्ष यांच्या जनविरोधी धोरणे आणि हल्ल्यांच्या विरोधात सामान्य कष्टकरी जनता एक होऊ शकत नाही, आणि जातीच्या आधारावर तिच्यात फूट पडते आहे. शहीदे आजम भगतसिंह म्हणाले होते, “लोकांना आपापसात लढण्यापासून रोखण्यासाठी वर्गजाणीवेची आवश्यकता आहे. गरीब, कष्टकरी आणि शेतकऱ्यांना स्पष्टपणे सांगितले पाहिजे की तुमचे खरे शत्रू भांडवलदार आहेत. म्हणूनच तुम्ही त्यांच्या डावपेचांपासून सावध राहिले पाहिजे, आणि त्यांच्या नादी लागून काहीही भलतेसलते करता कामा नये.” भगतसिंहांचे हे शब्द आज पूर्वीपेक्षा अधिक प्रासंगिक आहेत.

आज देशभरात कष्टकरी दलित जनता फासीवादी संघवाल्यांच्या अत्याचारांच्या विरोधात आवाज उठवते आहे. त्यांनी केवळ केवळ घटना आणि सरकारच्या भरोश्यावर विसंबून राहणे, सवलती मागणे आणि सुधारवादावर विश्वास ठेवणे बंद केले आहे. गुजरातच्या कष्टकरी दलितांनी सन्मान आणि समतेच्या हक्कासाठी पुकारलेला लढा थोर आहे. आज देशातील कष्टकरी गरीब दलित कामगार आणि सामान्य कष्टकरी हे जाणून आहे की क्रांतीशिवाय दुसरा मार्ग नाही. शासक वर्गाचे सहकार्य मिळवून काही सवलती पदरात पाडून घेण्याच्या मार्गाने गेल्या आठ दशकांमध्ये विशेष काही प्राप्त झालेले नाही. देशातील कष्टकरी दलित आणि मागास वर्गांतील दमित गरीबांना हे कळले आहे की फक्त आरक्षणाच्या मार्गाने त्यांना समता आणि न्याय मिळू शकत नाही. सरकारी नोकऱ्या गेल्या कित्येक वर्षांपासून २ टक्क्यांहून अधिक वेगाने कमी होत आहेत. आरक्षण लागू न करण्याच्या सवर्णवादी भ्रष्टाचाराच्या विरोधात लढणे गरजेचे आहे. मात्र फक्त आरक्षणाच्या आधारे दलित मुक्तीचे पोकळ स्वप्न दाखवणाऱ्यांपासून सावध राहिले पाहिजे. गेल्या कित्येक दशकांच्या आरक्षणानंतरही देशातील ९० टक्के दलित गरीबी, अपमान आणि अन्याय झेलत असतील, तर दलित मुक्तीचा कार्यक्रम फक्त आरक्षणापुरता मर्यादित ठेवणे म्हणजे एक कारस्थान नाहीये का? दलितांमधून जो एक श्रीमंत आणि उच्च मध्यमवर्गीय गट तयार झाला आहे, तो सत्ताधारी वर्गाचा सहकारी आहे. या कुलीन मध्यमवर्गीय दलित गटाला आता कष्टकरी दलितांविरुद्ध होणाऱ्या अत्याचारांशी आणि अन्यायाशी काहीही देणेघेणे राहिलेले नाही. हाच गट नोकऱ्यांमध्ये आणि उच्च शिक्षणामध्ये आरक्षणाचा लाभसुद्धा घेत असतो. कष्टकरी दलितांना त्याचा लाभ क्वचितच मिळत असतो कारण ८७ टक्के दलित शालेय शिक्षणसुुद्धा पूर्ण करू शकत नाहीत. दलितांमधून निर्माण झालेल्या या छोट्याश्या शासक वर्गाने जातीच्या उच्चाटनाच्या संघर्षाशी केव्हाच द्रोह केलेला आहे. नाहीतर, गेल्या काही वर्षांमध्ये दलितांच्या विरुद्ध भीषण अत्याचार होत असताना कोणताही दलित नेत्याने किंवा नोकरशहाने तोंडी घोषणा देण्याच्या पलीकडे काहीसुद्धा कां केले नाही? उलट रामविलास पासवान, रामदास आठवले, उदित राज यांसारखे दलितांचे तारणहार म्हणवून घेणारे राजकारणी सवर्णवादी आणि ब्राम्हणवाद्यांच्या पालखीचे भोई झाले आहेत. मायावती आणि थिरुमावलनसारखे भांडवली दलित राजकारणी वेळ येताच संघाच्या आणि सवर्णवाद्यांच्या सोबत हातमिळवणी करीत नाहीत का? दलित मुक्तीच्या आंदोलनाला व्यापणाऱ्या व्यवहारवादाने जातीच्या उच्चाटनाच्या ऐतिहासिक संघर्षाची मोठी हानी केली आहे. व्यवहारवाद म्हणजे, प्रसंग येताच गाढवाला बाप करणे, जो कुणी सत्तेत असेल त्याच्याशी सहकार्य करून सवलती मागणे, बदल जनतेच्या झुंजार क्रांतिकारी आंदोलनातून होत नसतो, तर सरकारी कायदे आणि सरकारच्या धोरणांमुळे होत असतो, असे मानणे, परिवर्तनवादी मार्ग निरर्थक आहे, लहान लहान सुधारांसाठी लढत रहा म्हणून सांगणे.

शरकार आणि घटनेच्या भरोश्यावर राहून काहीही मिळणार नाही, हे देशातील कष्टकरी दलित आणि मागास जनता ओळखून आहे. म्हणूनच देशभरात दलित कष्टकरी जनेतेने झुंजार संघर्ष आणि आंदोलनाचा मार्ग निवडला आहे. अन्य जातींचे कष्टकरीसुद्धा त्यांना काही प्रमाणात साथ करीत आहेत. मात्र ही वर्गएकता अजून जास्त मजबूत करण्याची गरज आहे. कामगार आणि कष्टकऱ्यांनी हे ओळखले पाहिजे की जातियवादी रुढीवादी विचार झटकून टाकल्याशिवाय त्यांचे भले होणार नाही. शत्रूच्या विरोधात लढण्याऐवजी ते आपापसात लढून मरून जातील. जातीय अत्याचारांचे बळी नेहमीच गरीब दलित कां ठरतात? एखादा नोकरशहा किंवा दलित नेत्याला कधी अशा अत्याचारांना तोंड द्यावे लागते का? जातिय हिंसेमध्ये कधीच श्रीमंत सवर्ण किंवा मध्यमवर्गीय दलिताचे घर कधी जळते का? दर वेळी अशा अत्याचारांमध्ये आणि दंग्यांमध्ये गरीब जनतेलाच जिविताची आणि मालमत्तेची हानी कां झेलावी लागते? या प्रश्नांवर विचार करताच सत्य समोर येऊ लागते.

जातीच्या उच्चाटनाच्या संघर्षात तरुणांच्या विशेष भूमिकेची गरज आहे. आपल्या देशामध्ये स्वातंत्र्यानंतर जे शहरीकरण आणि औद्योगिकीकरण झाले त्याने अस्पृश्यता आणि आनुवंशिक जातीय श्रमविभाजन मोठ्या प्रमाणात कमकुवत केले, परंतु आंतरजातीय विवाह न झाल्यामुळे जातीव्यवस्था आपले रूप बदलून खंबीरपणे शासकवर्गाची सेवा करते आहे. अवैज्ञानिक आणि अतार्किक विचारांनी जातिगत रूढींना खतपाणी घातले आहे. त्याचबरोबर, स्त्रियांच्या गुलामीनेसुद्धा जातीव्यवस्थेचा नाश अवघड बनवला आहे. स्त्रियांना चूल आणि मूल एवढ्यापुरते मर्यादित करून ठेवण्यात येते आणि त्यांना आपल्या जीवनाविषयी कोणताच निर्णय घेण्याचा अधिकार दिला जात नाही. म्हणूनच, समाजात जातीचा गुमदरून टाकणारा रुढीबद्ध संरचना अजून कायम आहे. अशात, नवयुवक आणि नवयुवतींनी पुढाकार घेऊन अवैज्ञानिक आणि अतार्किक विचारांवर हल्ला चढवला पाहिजे. सर्वप्रथम त्यांनी अस्पृश्यता हाणून पाडली पाहिजे, आंतरजातीय विवाहांची परंपरा निर्माण केली पाहिजे, आणि शहीदे आजम भगतसिंहांचे विचार स्वीकारून हर तऱ्हेच्या ब्राम्हण्यवादी- मनुवादी विचारांवर प्रहार केले पाहिजेत. परंतु तरुण- तरुणी हे काम तेव्हाच करू शकतात जेव्हा ते संघटित होतील आणि आपली क्रांतिकारी संघटना उभारतील. शमाजातील प्रबुद्ध नागरिकांनीसुद्धा जातीच्या उच्चाटनाची ही मोहीम पुढे घेऊन जाण्यासाठी जातिविरोधी अभियान चालविले पाहिजे. दलित उच्चाटनाचे ऐतिहासिक कर्तव्य ही केवळ दलित जनतेचीच जबाबदारी नाही. जातीचे उच्चाटन अस्मितेच्या आधारावर बनलेल्या दलित संघटना आणि दलित आंदोलनांच्या द्वारे नाही तर वर्गाधारित जातिविरोधी संघटनांच्या आणि आंदोलनांच्या द्वारेच शक्य आहे. हा एकूण क्रांतिकारी आंदोलनाचा मुख्य एजंडा आहे.

अशा वर्गाधारित जातिविरोधी आंदोलनाची कामगार चळवळ, स्त्रीमुक्ती चळवळ, दमित राष्ट्रीयतांची चळवळ यांच्याशी सांगड घातली पाहिजे आणि एका आमूल राजकीय, सामाजिक आणि आर्थिक क्रांतीचे उद्दीष्ट डोळ्यांसमोर ठेवले पाहिजे. राजकीय आणि आर्थिक क्रांतीशिवाय सामाजिक क्रांती होईल, किंवा आर्थिक शोषणाच्या विरोधात लढल्याशिवाय सामाजिक अन्यायाविरोधात लढले जाऊ शकते, असे ज्यांना वाटते आहे, ते भयंकर गैरसमाजाचे बळी आहेत. आर्थिक शोषण नेहमीच सामाजिक अन्याय आणि अत्याचाराशी जोडलेले असते. म्हणूनच राजकीय आर्थिक क्रांतीसाठी शहीदे आजम भगतसिंह आणि सामाजिक क्रांतीसाठी आंबेडकरवाद, ही भूमिका अज्ञानपूर्ण आहे, असेच म्हटले पाहिजे. शहीदे आजम भगतसिंह हे जाणून होते की आर्थिक शोषण आणि सामाजिक उत्पीडन एकमेकांशी घट्टपणे बांधलेले असतात आणि ते टिकवून ठेवण्याचे कार्य शासक वर्ग आणि त्यांची राजकीय सत्ता करीत असते. आर्थिक शोषण सामाजिक अत्याचारांचे ऐतिहासिक संदर्भ आणि पार्श्‍वभूमी घडवीत असते आणि सामाजिक अत्याचार फिरून आर्थिक शोषणाला आर्थिक अतिशोषणात बदलत असतात. म्हणूनच १० पैकी ९ दलितविरोधी अपराधांचे बळी गरीब कष्टकरी दलित असतात आणि म्हणूनच श्रमिकांमध्येसुद्धा  सर्वाधिक शोषित दमित दलित जातीच असतात. आर्थिक शोषण आणि सामाजिक उत्पीडनाच्या एकत्रित रूपांना टिकवून ठेवण्याचे काम शासक वर्ग आणि त्याची राजकीय सत्ता करीत असते. म्हणूनच या आर्थिक शोषणाला आणि सामाजिक उत्पीडनाला पूर्णविराम देण्यासाठीचा संघर्ष वास्तविक भांडवलदार वर्गाच्या राजकीय सत्तेचा ध्वंस आणि कष्टकऱ्यांच्या सत्तेच्या स्थापनेचेच एक अंग आहे. दुसऱ्या शब्दांत सांगायचे झाल्यास, राजकीय आर्थिक सामाजिक क्रांतीला तिचे तुकडे पाडून पाहणे अवैज्ञानिक आहे आणि जो राजकीय आर्थिक क्रांतिशिवाय सामाजिक क्रांती घडवून आणण्याबद्दल बोलतो त्याचे विचार सुधारवाद, संविधानवाद आणि शासकांकडून सवलती मागण्याच्या पलीकडे जाऊ शकत नाही – त्याने ब्राम्हण्यवाद आणि मनुवादाच्या विरोधात कितीही गळा फाडला तरी. शहीदे आजम भगतसिंहांचा कष्टकरी जनतेच्या इंकलाबचा मार्गच वास्तविक एका आमूल सामाजिक आर्थिक राजकीय क्रांतीचा मार्ग आहे, जो आर्थिक शोषणाबरोबरच सामाजिक उत्पीडनाच्या वेगवेगळ्या रूपांच्या विरोधात प्रभावी संघर्ष संभव बनवतो.

जातिव्यवस्था आपला देश मागे पडण्याच्या अनेक कारणांपैकी एक महत्त्वाचे कारण आहे. तिच्यामुळेच आपल्या देशातील जनतेची लोकशाही चळवळ कमकुवत झाली, तिच्यामुळेच स्वातंत्र्यलढ्यात क्रांतिकारी पक्ष कमकुवत झाला, आणि तिच्यामुळेच आज भांडवलशाही- साम्राज्यवाद विरोधी लढ्यात सामान्य जनतेची बाजू दुबळी होते आहे. जातिव्यवस्था आपल्या देशाच्या ऐतिहासिक प्रगतीच्या मार्गातील एक अडथळा बनली आहे. जातिव्यवस्थेचे उन्मूलन आपल्या समाजाच्या ऐतिहासिक प्रगती गतिमान बनवण्यासाठी अत्यावश्यक आहे.

आम्ही सर्व कष्टकरी दलित बंधूंना आणि भगिनींना शहीदे आजम भगतसिंहांच्या त्या शब्दांचे स्मरण करून देऊ इच्छितो की, “उठा, आपली शक्ती ओळखा! संघटित व्हा! स्वतः प्रयत्न केल्याशिवाय काहीही मिळत नाही. स्वातंत्र्यासाठी स्वाधीनतेची इच्छा बाळगणाऱ्यांना प्रयत्न करावे लागतात. म्हणच आहे, लातों के भूत बातों से नही मानते. म्हणजेच, संघटित होऊन आपल्या पायांवर उभे राहून पूर्ण समाजाला आव्हान द्या. आणि पाहा, कोणीही तुम्हांला तुमचे अधिकार देण्यास नकार देण्याचे धाडस करणार नाही. तुम्ही इतरांचा आहार बनू नका. दुसऱ्याच्या तोंडाकडे आशेने पाहू नका. लक्षात ठेवा, नोकरशाहीच्या जाळ्यात अडकू नका. ते तुमची कसलीच मदत करणार नाहीत, उलट तुम्हांला आपल्या खेळातील प्यादे म्हणून वापरतील. हीच भांडवली नोकरशाही तुमच्या गरीबीचे आणि गुलामीचे खरे कारण आहे. म्हणूनच तुम्ही तिच्याशी कधीच हात मिळवू नका. त्यांच्या चालींपासून सावध रहा. तुम्ही खरे सर्वहारा आहात. संघटित व्हा. तुमचे काहीच नुकसान होणार नाही. फक्त गुलामीच्या बेड्या तेवढ्यात निखळून पडतील. उठा, आणि आजच्या या व्यवस्थेविरोधात विद्रोह करा. हळूहळू होणाऱ्या सुधारांनी काहीच होणार नाही. सामाजिक आंदोलनाच्या क्रांतीचे रणशिंग फुंका आणि राजकीय आणि आर्थिक क्रांतीसाठी कंबर कसा. तुम्हीच तर देशाचा खरा आधार आहात, खरीखुरी शक्ती आहात. निजलेल्या वाघांनो, उठा आणि विद्रोह करा.” (अस्पृश्यतेचा प्रश्न, भगतसिंह) शहीदे आजमचे हे शब्द जणू आजसाठीच लिहिले गेले आहेत. आज हीच कार्यदिशा समजून घेण्याची गरज आहे.

भगतसिंह म्हणाले होते की जोपर्यंत तुम्ही स्वतः जातपात आणि उच्चनीचतेच्या अवैज्ञानिक व संकुचित विचार सोडून देत नाही, तोपर्यंत तुम्ही आपल्या गुलामीच्या बेड्या तोडू शकणार नाही. आम्ही सर्व कामगार बंधू आणि भगिनींना त्याची आठवण करून देऊ इच्छितो. तुम्ही जर दलित कष्टकरी सोबत्यांना आणि स्त्रियांना गुलाम समजत असाल, तर तुम्ही स्वतःची भांडवलाच्या गुलामीपासून सुटका करून घेऊ शकणार नाही. शहीदे आजम भगतसिंहांनी म्हटले होते की कामगार क्रांती आणि कामगारांच्या सत्तेसाठी कामगारांची वर्गएकता ही पहिली अट आहे. आपण जातीपातीचे विचार कायमचे गाडून टाकल्याशिवाय ही वर्गएकता निर्माण होऊ शकत नाही.

आम्ही सर्व विद्यार्थी आणि तरुण मित्रांना आणि सर्व प्रबुद्ध नागरिकांना आवाहन करतो आहोत की त्यांनी आपली अग्रणी भूमिका ओळखावी. कोणताही समाज क्रांतिकारी आणि परिवर्तनकामी युवक युवतींच्या त्यागाच्या आणि नेतृत्त्वाच्या बळावरच पुढे सरकत असतो. कोणत्याही प्रकारच्या अन्यायाच्या आणि शोषणाच्या विरोधात ज्याच्या मनात विद्रोह आणि क्रोध धगधगतो आहे, तोच खरा तरुण. ज्या तरुणाच्या दृष्टीने शोषण, अत्याचार, दमन या सामान्य बाबी बनल्या आहेत, तो मनाने म्हातारा झालेला आहे आणि तरुण म्हणवून घेण्याचा त्याला अधिकार नाही. जे नागरिक सध्याच्या सडलेल्या सामाजिक व्यवस्थेच्या विरोधात आवाज उठवत नाहीत, जे अंधविश्वास, अंधश्रद्धा आणि पाखंडाच्या विरोधात संघर्षाचा बिगुल फुंकत नाहीत, त्यांना खरोखरच स्वतःला सुशिक्षित आणि लोकशाही समुदायाचा भाग म्हणवून घेण्याचा अधिकार आहे का? आपल्या देशातील क्रांतिकारी तरुण आणि बुद्धिजीवी वर्ग आपल्या ऐतिहासिक कर्तव्यापासून मान फिरवणार नाहीत, याचा आम्हांला विश्वास आहे. आम्ही एक सुरुवात करतो आहोत मित्रांनो. आम्हांला तुमच्या सोबतीची आणि सहकार्याची गरज आहे. या मित्रहो, या जातिविरोधी जन अभियानाचा तुम्हीसुद्धा भाग व्हा. हे अभियान आपल्या सर्वांचे आहे. ही आपली सर्वांची जबाबदारी आहे.

 

जातिधर्माचे झगडे सोडा, खऱ्या लढ्याशी नाते जोडा!
जाति उन्मूलनाचा मार्ग, इंकलाबचा मार्ग!
ब्राम्हण्यवाद मुर्दाबाद, जातियवाद मुर्दाबाद!

अखिल भारतीय जाति-विरोधी मंच नौजवान भारत सभा 

 यूनीव्हर्सिटी कम्युनिटी फॉर डेमॉक्रेसी एण्ड इक्वॉलिटी  बिगुल मज़दूर दस्ता

Related posts

Leave a Comment

one + 13 =