स्पर्धा परिक्षांची तयारी करणाऱ्या युवकांसाठी इकडे आड तिकडे विहीर!! तलाठी भरतीच्या घोटाळ्याची चौकशी करून सर्व दोषींवर कारवाई झालीच पाहिजे!

बेरोजगारीचा फास दिवसेंदिवस आणखी आवळला जात असताना, हजारो तरुण व विद्यार्थी तणाव व भविष्याच्या असुरक्षिततेपायी आत्महत्येला जवळ करत असताना भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना ई. विविध पक्षांची भांडवली सरकारे मात्र त्यांच्या मोठमोठ्या कॉर्पोरेट मित्रांना, उद्योगपतींना सवलती देण्यात मग्न आहेत. हे सर्व पक्ष दिखाव्यापुरते अशा मुद्यांवर आंदोलने करतात, परंतु या सर्वांनी सत्तेत असताना हीच धोरणे राबवली आहेत, कारण त्यांच्या बोलवत्या धन्यांची म्हणजे भांडवलदार वर्गाची तीच इच्छा आहे. त्यांच्या फायद्यासाठी कंत्राटीकरण, खाजगीकरण पुढे रेटले जात आहे आणि कोट्यवधी तरुणांच्या आयुष्याशी खेळ केला जात आहे. म्हणूनच सध्या सुरू असलेले आंदोलन हे विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्यांना धरून आहे. पण हे आंदोलन फक्त तलाठी भरतीमधील घोट्याळ्यापुरते मर्यादित नसले पाहिजे. सध्या वाढत असलेली बेरोजगारी, सरकारी नोकऱ्यांचे खाजगीकरण आणि कंत्राटीकरण हे प्रश्न आज सर्वच तरुणांसमोर आ वासून उभे आहेत. म्हणूनच सध्या सुरू असलेल्या आंदोलनाला व्यापक करत सर्व विद्यार्थी तरुणांनी आज एकत्र येणे गरजेचे आहे. मालक वर्गासाठी चालत असलेल्या या भांडवली सत्तेचे खरे चरित्र ओळखणे आज विद्यार्थी युवकांसाठी सर्वात महत्त्वाचे आहे. आपले खरे हित लक्षात घेऊन जाती-धर्माचे सगळे भेद बाजूला सारत विद्यार्थी-युवकांनी आज सर्वांसाठी शिक्षण व रोजगाराच्या अधिकाराच्या योग्य मागणीभोवती संघटित होणे आज काळाची गरज आहे, अन्यथा विद्यार्थी तरुणांचे जीव भांडवली पक्षांच्या राजकारणाला बळी पडत राहतील.