देशभक्त स्मृती अभियान
देश म्हणजे कागदावरचा निव्वळ नकाशा नसतो…
सच्च्या देशभक्तांचे स्मरण करा, नव्या क्रांतीचा मार्ग धरा!
बंधू आणि भगिनींनो,
देशभक्तीबद्दल विचार करू लागताच सर्वप्रथम आपल्या मनात जे नाव येते, ते म्हणजे शहीदे आजम भगतसिंह. तसेच आपल्याला आठवतात त्यांचे साथीदार राजगुरू, सुखदेव, चंद्रशेखर आजाद, अशफाक-उल्ला, बिस्मिल. इंग्रजांची गुलामी आणि शेतकरी व कामगारांच्या शोषणाच्या विरोधात त्यांनी महान लढा दिला आणि विलक्षण शौर्यासह प्राणांचे बलिदान केले.
शहीदे आजम भगतसिंह यांची देशभक्ती
देश म्हणजे निव्वळ कागदावरचा नकाशा नव्हे, असे भगतसिंह यांचे मत होते. देशाला मातृभूमी किंवा पितृभूमी म्हणणे हा काही पोकळ आचार नाही. आई किंवा पिता ते असतात जे आपल्या मुलांना अन्न, वस्त्र आणि आसरा देतात. तर मग देश आणि देशभक्तीचा अर्थ काय आहे? देशाचे खरे माता पिता कोण आहेत? जे देशाला धान्य, कापड आणि घरे पुरवतात ते देशाचे खरे माता पिता. ते आहेत या देशातील ८४ कोटी कामगार, मध्यमवर्ग आणि गरीब शेतकरी जे महागाई, बेरोजगारी, दुष्काळ, अंबानी अदानींची लुटालूट आणि सरकारी दमनाचे बळी ठरून आत्महत्या करायला बाध्य ठरत आहेत. हेच लोक देशात सुईपासून जहाजापर्यंत सारे काही निर्माण करतात. “देश”, “राष्ट्र”, “भारत माता”, “हिंद”, “भारत” यांसारख्या विराट शब्दांना जर खराच काही अर्थ असेल, तर हे लोक हाच त्याच्या अर्थ आहे. देश म्हणजे हे कामगार, सामान्य कष्टकरी माणसे आणि शेतकरी, असे भगतसिंहांचे मत होते. तर मग देशभक्तीचा खरा अर्थ काय आहे? देशभक्तीचा अर्थ आहे, अन्नदात्या, वस्त्रदात्या, आश्रयदात्या जनतेला गरीबी, बेरोजगारी, महागाई आणि भांडवलदारांच्या गुलामीपासून मुक्त करणे. म्हणूनच शहीदे आजम भगतसिंहांनी म्हटले होते, “आमच्यासाठी स्वातंत्र्याचा अर्थ फक्त इंग्रजांपासून स्वातंत्र्य हा नाही, तर देशातील कामगार, शेतकऱ्यांना हरतऱ्हेच्या लूटीपासून आणि शोषणापासून मुक्ती देणे आहे”.
संघ परिवार आणि मोदी यांच्या राष्ट्रवादाचे नाटक
आज देशभरात काही शक्ती देशभक्ती आणि राष्ट्रवादाच्या ठेकेदार बनल्या आहेत. ते देशभक्तीची नवीन व्याख्या तयार करत आहेत. त्यांच्यानुसार, जो कुणी मोदी सरकार आणि आरएसएसवर टीका करेल, तो देशद्रोही आहे. परंतु, मित्रहो, जरा विचार करा, संघ परिवार आणि आरएसएसचे हे लोक देशभक्तीचे ठेकेदार कधीपासून झाले? कारगिलच्या युद्धानंतर युद्धात शहीद झालेल्या सैनिकांसाठीच्या शवपेट्यांच्या खरेदीतही भाजपच्या मंत्र्यांनी घोटाळा केला होता, हे आपल्याला आठवतेय का? सैन्यासाठीच्या खरेदीत दलाली आणि लाच घेताना भाजपचे अध्यक्ष बंगारु लक्ष्मण रंगे हाथ सापडले होते, हे आपण विसरलात का? भाजपचे एक नेते दिलीप सिंह जुदैव लाच घेताना व “पैसा देव नसेल, पण देवापेक्षा कमीसुद्धा नाही” म्हणून पैशाचं माहात्म्य आळवताना कॅमेऱ्यात कैद झाले होते, हे आपल्याला आठवत नाहीये का? सरकारी नोकऱ्या बरखास्त करण्यासाठी भाजप सरकारनेच देशात पहिल्यांदा निर्गुंतवणूक मंत्रालय स्थापन केले होते, हे आपल्याला आठवतेय ना? १९२५ साली आर.एस.एस. ची स्थापना झाल्यापासून १९४७ मध्ये देशाला स्वातंत्र्य मिळेपर्यंत आर.एस.एस. ने नेहमीच स्वातंत्र्य लढ्याला विरोध केला होता तसेच त्यांच्या नेत्यांनी भगत सिंहाच्या बलिदानाची “बिनकामाचा त्याग” म्हणून हेटाळणी केली होती, हे आपण कसे विसरु शकतो? ज्यावेळी भगतसिंह आणि त्यांचे साथीदार ब्रिटिश शासनाकडे फाशीऐवजी बंदूकीच्या गोळीने उडवून देण्याची मागणी करत हौतात्म्याला आलिंगन देत होते, त्यावेळी हिंदू महासभेचे सावरकर अंदमानच्या तुरुंगातून इंग्रजांची माफी मागत व पुन्हा कधीही ब्रिटिशविरोधी कारवाया न करण्याचे वचन देत एकापाठोपाठ एक माफीनामे लिहित होते, हे आपण विसरु शकता का? १९४२ च्या भारत छोड़ो आंदोलनात ज्यावेळी देशातील तरुणांनी उडी घेतली होती, त्यावेळी आंदोलनात सहभागी देशभक्तांशी फितुरी करून अटल बिहारी वाजपेयी यांनी त्यांची माहिती इंग्रजांना पुरविली होती, हे आपल्याला ठाऊक आहे का? स्वातंत्र्यानंतर जेव्हा कांग्रेसच्या इंदिरा गांधी सरकारने तरुणांच्या आणि कामगारांच्या आंदोलनाला चिरडून टाकण्यासाठी आणीबाणी लादली, तेव्हा संघाचे सर्वोच्च नेता बाळासाहेब देवरस इंदिरा गांधींच्या नावे माफीपत्र लिहित होते व इंदिरा गांधींना “देवीतुल्य” म्हणत होते, हे आपल्याला ठाऊक आहे का? मोदी सरकारने आपल्या दोन अर्थसंकल्पांमध्ये वरच्या ५ टक्के श्रीमंत लोकांसाठी धोरणे बनवत टाटा,बिरला, अंबानी, अदानी सारख्यांना गेल्या दहा वर्षात देण्यात आलेली ४२ लाख कोटींची करमाफी पुढे चालू ठेवली आहे, हे आपल्याता माहीत आहे का? तेसुद्धा अशा वेळी जेव्हा गेल्या दोन वर्षात कर्जाच्या बोज्याखाली दबून लाखो गरीब शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. मोदी सरकारने शिक्षणावरचा खर्च निम्मा केला आहे व त्यामुळे शाळा आणि कॉलेजच्या फी इतक्या वाढणार आहेत की आपण आपल्या मुलांना तेथे शिक्षण देण्याचे स्वप्नसुद्धा पाहू शकणार नाही, हे आपल्याला माहीत आहे का? खाद्यपदार्थांवरील सब्सिडी मोदी सरकारने सुमारे ७०००० कोटी रूपयांनी कमी केली आहे, आरोग्य आणि कुटुंब कल्याणावरच्या खर्चात ६००० कोटींची कपात केली आहे,म्हणजेच सरकारी इस्पितळांत औषधोपचार दुप्पट महाग होणार आहे, मोठमोठ्या देशी विदेशी कंपन्याचे १.१४ लाख कोटी रूपयांचे कर्ज सरकारने माफ केले आहे आणि दुसरीकडे आपल्या खिशावर दरोडा घालून सगळे अप्रत्यक्ष कर वाढवलेले आहेत व त्यामुळे महागाई वेगाने वाढली आहे, अंबानी-अदानी सारख्यांचा ७० हजार कोटींचा पेंडिंग टॅक्ससुद्धा माफ केला आहे, दुसरीकडे “देशभक्त सरकार” ने खाद्य जिन्नसांमध्ये वायदा कारोबाराला अनुमती देऊन सट्टेबाजीसाठी दरवाजे खुले केले आहेत व त्यामुळेच डाळ १७० रूपयाला विकली जात आहे. लहान व्यापाऱ्यांचा पक्ष म्हटल्या जाणाऱ्या भाजपने किरकोळ व्यापारात थेट विदेशी गुंतवणुकीला परवानगी देऊन लहान उद्योगांना ध्वस्त करण्याचा मार्ग मोकळा करुन दिला आहे, इतकेच नाही तर त्यांनी संरक्षण क्षेत्रातही विदेशी कंपन्यांना घुसण्याची परवानगी दिली आहे. हेच लोक पूर्वी थेट विदेशी गुंतवणुकीला विरोध करण्याचे नाटक करत होते कारण त्यावेळी त्यांना मध्यमवर्गाची मते हवे होती. हीच देशभक्ती आहे का? हाच का राष्ट्रवाद?
खऱ्या देशभक्तांचे स्मरण करा! नकली देशभक्तांचे खरे रूप ओळखा!
बंधू आणि भगिनीनो, स्वत: विचार करा, “देशभक्ती” “राष्ट्रवाद” “भारत माता” यांसारख्या गोंधळाद्वारे संघ परिवार आणि मोदी सरकार देशाशी गद्दारी करण्याचा आपला जुना इतिहास आणि जनतेच्या विरोधात टाटा, बिर्ला, अंबानी, अदानी यांची दलाली करण्याचे आपले खरे स्वरूप दडवण्याचा प्रयत्न तर करत नाहीये ना? खऱ्या मुद्यांपासून आपले लक्ष विचलित करण्यासाठी तर ते हा गदारोळ माजवन नाहीयेत ना? महागाई दूर करण्याच्या,बेरोजगारीपासून मुक्ती देण्याच्या, सर्व खात्यांमध्ये १५ लाख रूपये जमा करण्याच्या वचनांचा आपल्याला विसर पाडण्याचा प्रयत्न तर संघ परिवार आणि मोदी सरकार या गोंधळाद्वारे करीत नाहीये ना? स्प्ष्टच बोलायचे तर आपल्याला मूर्ख तर बनवले जात नाहीये ना? विचार करा, आपले खरे शत्रू कोण आहेत? द्वेषभावना बाजूला सारून, थांबून, एकदा विचार करा. २ लाख कोटी रूपयांचा व्यापम घोटाळा करणारे, घोटाल्यातील ५० साक्षीदारांचे खून पाडणारे, विधानसभेत बसून पॉर्न वीडियो पाहणारे, विजय माल्या आणि ललित मोदी सारख्यांना देश सोडून पळून जाण्यास मदत करणारे देशभक्ती आणि राष्ट्रवादाचे ढोंग करुन आपल्या खिशावर दरोडा घालत नाहीयेत ना? तुमच्या घरांना भगदाड तर पाडत नाहीयेत ना? आपण आपल्या खऱ्या शत्रूंना ओळखू नये, जात-धर्माचे झगड़े सोडून एकजूट होऊ नये म्हणून ते ब्रिटिशांचे “फोडा आणि झोडा”चे धोरण तर राबवीत नाहीयेत ना? विचार करा, नाहीतर उद्या फार उशीर झालेला असेल. जी आग ते लावत आहेत त्यात आपली घरे जळणार आहेत, आपलीच माणसे होरपळणार आहेत. म्हणून, विचार करा
क्रांतिकारी अभिवादनासह,
फासीवादावर एकच उपाय, इंकलाब जिंदाबाद
नौजवान भारत सभा
यूनीव्हर्सिटी कम्युनिटी फॉर डेमॉक्रेसी एण्ड इक्वॉलिटी
बिगुल मजदूर दस्ता
संपर्क : विराट 9619039793, नारायण 9764594057 ई-मेल : naubhas@gmail.com, ucde.mu@gmail.com
फेसबुक पेज : www.facebook.com/naujavanbharatsabha