लेखणीचे सैनिक गणेश शंकर विद्यार्थी यांच्या जन्मदिनानिमित्त (२६ ऑक्टोंबर)
आजचा काळ असा काळ आहे जेव्हा फॅसिझमची काळी सावली समाजावर पसरलेली आहे, प्रत्येक उत्कृष्ट गोष्टीवर धूळ-राख टाकली जात आहे, मुक्त व स्वतंत्र विचारांचे दमन केले जात आहे, जनपक्षधर बुद्धिजीवी-विचारवंतांवर हल्ले केले जात आहे. अशा काळात गणेश शंकर विद्यार्थींसारख्या लेखणीच्या खरा सैनिकाच्या स्मृती जागवणे अधिक महत्त्वाचे बनले आहे.
अलाहाबादच्या अतरसुइया येथे जन्मलेल्या गणेश शंकर विद्यार्थी यांनी राष्ट्रीय आंदोलनाच्या काळात अनेक महत्त्वपूर्ण नियतकालिकांमध्ये लिखाण केले आणि हिंदी पट्ट्यात राष्ट्रीय चेतना पसरविण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. ‘स्वराज्य’, ‘अभ्युदय’, ‘हितवार्ता’ सारख्या नियतकालिकांमध्ये लिखाण करण्याव्यतिरिक्त ते ‘सरस्वती’ चे सहाय्यक संपादक पण राहीले आणि नंतर त्यांनी ‘प्रताप’ चे संपादनही केले. गंभीर आर्थिक समस्यांना तोंड देत, आरोग्याच्या त्रासाला सामोरे जात, तुरुंग यात्रा आणि सेन्सॉरशिप च्या दरम्यान ‘प्रताप’ सतत प्रकाशित होत राहिला. ‘प्रताप’ च्या माध्यमातून गणेश शंकर विद्यार्थी यांनी क्रांतिकारकांना त्यांच्या विचारांचा प्रसार करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करुन दिले.
गणेश शंकर विद्यार्थी खोलीत बसून लेखन करणारे विचारवंत नव्हते. त्यांना निर्भय लेखनामुळे, राष्ट्रीय चळवळीत आणि शेतकरी चळवळीत भाग घेतल्यामुळे बर्याच वेळा तुरुंगाच्या खेपा घालाव्या लागल्या आणि दंड भरावा लागला. १९१९ मध्ये गणेश शंकर विद्यार्थी यांनी कानपूरमध्ये २५,००० कामगारांच्या यशस्वी संपाचे नेतृत्व केले होते. स्वत: ला गांधीवादी म्हणत असतानादेखी कामगार चळवळीविषयी त्यांचा दृष्टिकोण, सशस्त्र क्रांतिकारक चळवळीबद्दलची त्यांची सहानुभूती सर्वश्रुत आहे. ‘प्रताप’ मध्ये काम करत असताना भगतसिंह यांच्या लेखणीला धार लावण्यात विद्यार्थी यांचे महत्त्वपूर्ण योगदान होते. अशफाकउल्ला खान यांनी आपले शेवटचे पत्र गणेश शंकर विद्यार्थी यांना पाठविले.
भगतसिंहाच्या शहादतीनंतर, इंग्रजांनी जाणीवपूर्वक घडवीलेल्या धर्मांध दंगली शांत करण्याचा प्रयत्नात गणेश शंकर विद्यार्थी शहीद झाले. आज गणेश शंकर विद्यार्थी यांच्या जन्मदिनानिमित्त नौजवान भारत सभा त्यांना क्रांतिकारक सलाम करते!
