धार्मिक कट्टरतावादी मुर्दाबाद !
सामान्य जनतेचा आपसातील बंधुभाव जिंदाबाद !
कोण कालवतंय सामान्य लोकांच्या मनात जाती-धर्माच्या नावाने विष ?
कोण आहेत जे घेवून जाताहेत सामान्य तरुणांना इसीसच्या मार्गानं ?
मित्रहो, नुकतंच तीन-चार दिवसांपूर्वी राजस्थान मधल्या राजसमंध मध्ये झालेल्या एका हत्येचा विडीओ सगळ्या समाज माध्यमांवर व्हायरल झाला.विडीओ इतका हिंसक व बीभत्स आहे कि किमान संवेदना शिल्लक असलेला कुणीही खचितच पूर्ण पाहू शकेल. ज्याची हत्या झाली तो एक प्रवासी कामगार होता . त्याचा गुन्हा फक्त एवढाच कि तो एक गरीब मुस्लीम होता. नाव अफ्रजुल खान ,वय ५०. हत्येचा विडीओ बनवून सोशल मिडीयावर तो प्रसारित करण्यात व त्याच्या जोडीला पद्धतशीरपणे धार्मिक द्वेष पसरवणारी चिथावणीखोर गरळ ओकण्याच्या कृत्याचा निषेध करावा तितका थोडा आहे. निषेध ! निषेध !! निषेध!!!
अशा प्रकारचा विडीओ बनवून प्रसारित करण्यामागचा हेतू स्पष्टपणे हिंदू-मुस्लिमांमध्ये तणाव निर्माण करणे व सामाजिक स्वास्थ्य बिघडवणे असाच आहे .या व अश्या घटनांमागे असणारा नेमका उद्देश समजून घ्यायला हवा व हाणून पाडायला हवा.
गेल्या ३ वर्षात सामान्य जनतेच्या जिव्हाळ्याचे ,जगण्याचे व हिताचे सगळे मुद्दे जणू गायब झालेत.आर.एस.एस.ने लव जिहाद च सोडलेलं पिल्लू, घरवापसी, गोरक्षा, बीफ बंदी ,५ मुलाना जन्म अशा गैर मुदयांभोवतीच संपूर्ण देश जणू पिंगा घालतोय. मित्रांनो, विचार करा, वाढत्या महागाईने बेजार झालेली जनता, फुगत चाललेल्या बेरोजगारीचा आकडा, कोलमडलेली आरोग्य व्यवस्था-रेशनिंग व्यवस्था, भूक-कुपोषणाचे बळी , न परवडणारे शिक्षण व वाढते दारिद्र्य हेच नाहीत का आपले खरेखुरे मुद्दे? काय या सगळ्या स्थितीला कुठला तरी एक धर्म-जात-प्रांत जबाबदार आहे का? नक्कीच नाही. याला जबाबदार आहे सरकारची धोरणे व ही भांडवली व्यवस्था ,जी उभी आहे बहुसंख्य कष्टकरी जनतेच्या शोषणावर .जी मुठभर श्रीमंतांच्या तिजोऱ्या भरण्यासाठी बहुसंख्य कष्टकरी जनतेचं रक्त शोषत आहे आणि ही व्यवस्था अबाधित राहावी म्हणून जनतेला सतत विभाजित ठेवलं जातं: कधी जाती, कधी धर्म, तर कधी प्रांताच्या नावाखाली.
लव जिहादचा भंपक खोटारडेपणा वारंवार उघडा पडला, अगदी पोलीस तपास यंत्रणा व न्यायालयाने हा भंपकपणा नाकारल्या नंतरसुद्धा वारंवार तोच जनतेमध्ये प्रचारित केला जातो आहे. एका बाजूला समाजात धार्मिक तेढ वाढवणे आणि दुसरीकडे स्त्रियांच्या स्वातंत्र्यावर बंधन आणून त्यांना चार भिंतीतच बांधून ठेवणे अशी दोन्ही उद्दिष्टे यामागे आहेत. सोशल मिडीया वर या कामासाठी हिंदुत्ववादी सत्ताधाऱ्यांनी राबवलेला खास पगारी नोकरांचा आय.टी सेल कार्यरत आहेच .शंभरदा खोटं बडवून त्याला खरं करायचा हा उद्योग याचसाठी आहे की जनतेनं तिच्या हक्क व अधिकारांसाठी रस्त्यावर येवू नये, न्याय व समतेसाठी संघर्ष करू नये . निवडणुका लढवणारे या अश्याच क्लुप्त्या वापरून आपली वोट बँक मजबूत करत असतात.
मित्रानो, सावध रहा.या चालबाजीला बळी पडू नका .आपल्या मध्ये उभारलेल्या या जाती-धर्माच्या भिंती पाडून चला एक खरीखुरी जन-एकजूट उभारूया व या कट्टरतावाद्यांना धडा शिकवूया.भगतसिहाच्याच शब्दात सांगायचं तर “जगातल्या सगळ्या गरीबाचं हित एकच आहे, मग ते कुठल्याही जाती धर्माचे असोत!”
तमाम न्यायप्रिय संवेदनशील तरुणांना, बहिणींना आणि नागरिकांना या संघर्षात भागीदार बनण्याचे आवाहन आम्ही करत आहोत.
