शहीद भगतसिंग यांचे साथी भगवतीचरण वोहरा एकदा म्हणाले होते की ‘शहिदांच्या रक्ताच्या खुराकावरच स्वातंत्र्याचे झाड वाढत असते’. देशाला इंग्रजांच्या गुलामगिरीपासून मुक्त करण्यासाठी अनेक शहिदांनी बलिदान दिले. करतार सिंह सराभा असेच एक वीर सुपुत्र होते ज्यांनी गदर आंदोलनाच्या काळात अतिशय कमी वयात बलिदान दिले. आपणास माहीतच असेल की शहीद भगतसिंग त्यांना आपला आदर्श मानत होते आणि त्यांचा फोटो नेहमीच सोबत बाळगत असत. 16 नोव्हेंबर 1915 ला 19 वर्षे वय असतांना शहीद होणारे करतार सिंह सराभा यांचा जन्म लुधियाना जिल्ह्यातील सराभा गावात सन 1896 मध्ये झाला. लहानपणीच मातापित्यांचे छत्र हरवलेल्या करतार सिंह यांचे पालन-पोषण त्यांच्या आजोबांनी केले. लुधियाना मधून मॅट्रिक पास केल्यानंतर इंजिनिअरिंगचा अभ्यास करण्यासाठी ते सॅन फ्रान्सिस्को, अमेरिका येथे गेले. 1860 नंतर अनेक भारतीय, विशेष करून पंजाबी लोक अमेरिका आणि कॅनडा मध्ये मजुरीसाठी जाऊन वसले होते. तिथे त्यांना नेहमीच अपमानाचा सामना करावा लागत होता. अमेरिकेतील गोरे लोक त्यांना काळे आणि घाणेरडे लोक म्हणून संबोधित करायचे, त्यांना अपमानजनक प्रश्न विचारले जायचे आणि खिल्ली उडवली जायची की 33 कोटी भारतीय लोकांना चार-पाच लाख गोऱ्यांनी गुलाम बनवून ठेवले आहे. जेव्हा या भारतीयांना विचारले जायचे की तुमचा झेंडा कुठला तर ते युनियन जॅक कडे इशारा करायचे, त्यावर अमेरिकी गोरे लोक हसून म्हणायचे की हा तर इंग्रजांचा झेंडा आहे तो तुमचा कसा होऊ शकतो? प्रवासी भारतीयांना आता गमावलेल्या स्वातंत्र्याची किंमत कळायला लागली. देशाला स्वतंत्र करण्याची उर्मी निर्माण झाली आणि बैठकांचे सत्र सुरू झाले.
लाला हरदयाल, मोहम्मद बरकतुल्ला, सोहन सिंह भकना इत्यादी अनेक देशभक्तांनी मिळून देशाला स्वतंत्र करण्यासाठी पार्टीची स्थापना केली. 1857 च्या सशस्त्र विद्रोहानंतर नवीन उत्साहाने सशस्त्र विद्रोहाची गरज जाणवू लागली आणि त्यासाठी प्रयत्न सुरू झाले. या पार्टीला गदर पार्टी च्या नावाने ओळखले गेले कारण त्यांच्या द्वारे विविध भाषांमध्ये गदर नावाचे वृत्तपत्र काढले जायचे. करतार सिंह सराभा सुद्धा अमेरिकेत आंदोलना सोबत जोडले गेले आणि त्यांनी अतिशय कमी वयात आश्चर्यजनक संघटक क्षमतेचा परिचय दिला. त्यामुळेच गदरच्या पंजाबी आवृत्तीच्या संपादनाची जबाबदारी करतार सिंह सराभा यांच्याकडे सोपविण्यात आली. आता करतार सिंह सराभा यांच्या जीवनाचा उद्देशच क्रांती करणे हा होता. सन 1914-15 मध्ये कामागाटमारू आणि अन्य समुद्री जहाजांद्वारे गदर आंदोलनकारी भारतात सशस्त्र क्रांती करण्याच्या उद्देशाने पोहोचले परंतु किरपाल सिंह च्या गद्दारी मुळे विद्रोहाच्या एक दिवस आधीच इंग्रजांना सुगावा लागला आणि त्यांनी गदर च्या वीर बहादूरांची धरपकड सुरू केली. करतार सिंह सराभा सोबतच अनेक गदर कार्यकर्ते अटक केल्या गेले. आपल्या खटल्यात 19 वर्षे वय असलेल्या करतार सिंह सराभा यांनी अजिबात न घाबरता छाती ठोकून सांगितले की त्यांनी साम्राज्यवादाच्या विरोधात विद्रोह केला आहे आणि अशी ज्वाळा भडकवली आहे जी त्यांच्या मरणानंतर सुद्धा विझणार नाही. हे ऐकून इंग्लिश न्यायाधीश आश्चर्यचकित होऊन बघत राहिले. इतक्या कमी वयात फाशीची शिक्षा दिल्यामुळे करतार सिंह यांच्या आजोबांना अतिशय दुःख झाले होते. जेव्हा ते तुरुंगात करतार सिंहांना भेटले तेव्हा त्यांनी आपल्या दादांना समजावले की मी खाटेवर म्हातारा होऊन मरू इच्छित नाही, हा मृत्यू त्या मृत्यूपेक्षा हजार पटीने चांगला आहे. गदर आंदोलनादरम्यान 200 पेक्षा जास्त लोकांनी बलिदान दिले आणि अनेकांना इंग्रजांनी तुरुंगात सडवले. 16 नोव्हेंबरला करतार सिंह सराभा, महाराष्ट्राचे गणेश विष्णू पिंगळे आणि इतर पाच गदर आंदोलन कर्त्यांना फाशी दिली गेली. नौजवान भारत सभेचे संस्थापक शहीद भगतसिंग करतार सिंह सराभा यांना आपला प्रेरणास्त्रोत, गुरु, साथी आणि भाऊ मानत होते. त्यावेळच्या प्रताप, कीर्ती सारख्या अनेक राष्ट्रीय वर्तमानपत्रांमध्ये भगतसिंगांचे लेख करतार सिंह च्या नावाने सुद्धा प्रकाशित झाले होते.
करतार सिंह सराभा आणि त्यांच्यासारखे कितीतरी नौजवान युवक देशाच्या स्वातंत्र्यासाठी हसत हसत फासावर गेले. इंग्रजांना तर जनदबावामुळे पळावे लागले परंतु पळता पळता त्यांनी सत्ता मात्र आपल्या देशी भाई-बंधूंकडे सुपूर्द केली. या देशी सत्ताधाऱ्यांनी जनतेला सुद्धा पिळून काढले आणि स्वातंत्र्यानंतर मिळालेले सर्व हक्क अधिकार एकतर हिसकावून घेतले किंवा फक्त आता ते कागदांची शोभा वाढवत आहेत. सत्तर वर्षांचे अर्धवट स्वातंत्र्य ओरडून ओरडून सांगत आहे की हे स्वातंत्र्य शहिदांच्या स्वप्नातले स्वातंत्र्य अजिबात नाही. आज सुईपासून तर जहाज बनवणाऱ्या कामगारांना गुलामासारखे अंगतोड मेहनत करूनसुद्धा दोन वेळचे जेवणपण कठीण झाले आहे. शेतांमध्ये काम करणारे गरीब शेतकरी आणि शेतमजूर कर्जात बुडून वाईटात वाईट जीवन जगण्यास मजबूर आहेत. लाखो टन अन्नधान्य गोदामांमध्ये सडून जातं परंतु देशाची मोठी जनसंख्या कुपोषणाची शिकार आहे. देशात प्रत्येक वर्षी शिकले-सवरले करोडो युवक बेरोजगारांच्या फौजेत सामील होत आहेत. आपल्या समाजात दररोज स्त्री- दलित-अल्पसंख्यांक आणि गरीब विरोधी अपराधांच्या घटना घडत आहेत. जाती आणि धर्माचे ठेकेदार लोकांना आपापसात लढवून आणि दंगली करून त्यांच्या रक्तावर आपली निवडणुकीची पोळी भाजून घेत आहेत. देशाच्या या चित्राच्या उलट शहिदांनी ज्या समतामूलक, शोषणविहीन समाजाचे स्वप्न बघितले होते ते अजूनही अपूर्ण आहे.
मित्र-मैत्रिणींनो, करतार सिंह सराभा आणि इतर क्रांतिकारकांच्या स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी युवकांना पुढे यावे लागेल. आज देशात धर्म आणि जातीच्या नावावर विद्वेषाचे विष पसरवल्या जात आहे. महागाई, बेरोजगारी, शिक्षण, आरोग्य यासारख्या मूलभूत मुद्द्यांवरून लक्ष भटकवण्यासाठी सत्ताधारी “फूट पाडा राज्य करा” याच इंग्रजांच्या जुन्या चालीचे अनुकरण करत आहे. कुठे गाईचे नावावर राजकारण होत आहे तर कुठे टिपू सुलतान च्या नावावर. तर कुठे जातीच्या आणि धर्माच्या नावावर. दिशा विद्यार्थी संघटना आणि नौजवान भारत सभा देशामधील जनतेत शांती, बंधुत्व आणि एकदा कायम करण्यासाठी त्या बहादुर युवकांना आणि न्यायप्रिय लोकांना आवाहन करीत आहे ज्यांच्या हृदयात आपले शहीद अजूनही जिवंत आहेत. करतार सिंह सराभा यांच्या जन्मदिनानिमित्त त्यांच्या विचारांना व स्वप्नांना जनतेपर्यंत पोहोचवणे आणि त्यावर अंमल करणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल.
