तब्बल 175 वर्षांपूर्वी मुलींची पहिली शाळा उघडण्याचा निर्णय ज्योतिराव फुलेंनी घेतला होता. विधवा विवाहाला समर्थन, विधवांचे केशोपन थांबविण्यासाठी न्हाव्यांचा संप, बाल विवाहाला विरोध, मुलांचे संगोपन, मुलींना शिक्षण अशा एक ना अनेक गोष्टींतून ज्योतिराव-सावित्रीबाईंचा स्त्री समतेचा, स्त्री स्वातंत्र्याचा दृष्टीकोन समोर येतो. स्त्री मुक्ती व जाती उच्चाटनाच्या ह्या दोन्ही ही संघर्षांमध्ये फुले दांपत्यानी महत्वाचे योगदान दिलेले आहे.
सामाजिक परिवर्तनासाठी जोतीराव फुले कधीही सरकारकडे जोडे झिजवत बसले नाहीत. उपलब्ध साधनांसहीत त्यांनी आपल्या संघर्षास सुरुवात केली. सामाजिक प्रश्नांबाबतही फुले शेटजी आणि भटजी या दोघांना शत्रू म्हणून चिन्हीत करतात. आयुष्याच्या उत्तरार्धात ते ब्रिटीश शासनाच्या आणि भारतातील ब्राम्हणवाद्यांच्या यूतीला ओळखायला लागले होते; म्हणूनच ते म्हणाले होते की इंग्रजांच्या सत्तेमध्ये बहुतेक अधिकारी ब्राम्हण आहेत आणि जरी काही अधिकारी इंग्रज असले तरी ते हाडाने ब्राम्हणच आहेत. परंतु ते सगळ्याच ब्राह्मणांविरुद्ध नाही तर ब्राह्मणवादाविरुद्ध होते. ते म्हणत “ख्रिस्त महंमद मांग ब्राह्मणासी। धरावे पोटाशी। बंधूपरी।।”. उलट फक्त जातीवर न थांबता ते “धर्मराज्यभेद मानवा नसावे” म्हणत सर्व भेदांचे खंडन करीत. याव्यतिरिक्त “स्त्रीपुरुषे सर्व। कष्टकरी व्हावे।” म्हणत ते ऐतखाऊंचे वाभाडे काढत कष्टाचे थोरवे गात होते.
आज जेव्हा संघी फॅशिस्ट जातीप्रथा आणि पितृसत्तेच्या आधारावर आणि सांप्रदायिक ध्रुवीकरणातून दलित, अल्पसंख्यांक व स्त्रीयांवरील हल्ले तीव्र करत आहेत, खाण्या-पिण्यापासून ते जोडीदाराच्या निवडीचे व प्रेमाचे अधिकारही हिसकावून घेऊ इच्छितात, अशा काळात फुलेंचे विचार जाणून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. फुलेंना अपेक्षित समाज निर्माण करण्यासाठी जोरदार संघर्ष करूनच त्यांच्या स्मृती जपल्या जाऊ शकतील. ब्राम्हणवाद व भांडवलशाहीच्या विरोधातला संघर्ष तीव्र करुनच जोतीराव फुलेंना खरेखुरे अभिवादन करता येईल.
शिक्षणाचे महत्त्व पटवून देणाऱ्या त्यांच्या कवितेच्या खालील ओळी प्रसिद्ध आहेत.
विद्येविना मती गेली। मतिविना नीती गेली।
नीतिविना गती गेली। गतिविना वित्त गेले।
वित्ताविना शूद्र खचले।
इतके अनर्थ एका अविद्येने केले।।
नौजवान भारत सभेतर्फे स्त्री मुक्तीचे पक्षधर आणि जाती-अंताचे योद्धे, ज्योतिराव फुलेंच्या स्मृतीदिनी क्रांतिकारी अभिवादन!
