मंदिर-मशिदीच्या नावावर खोटे संघर्ष उभे करून जनतेला दंगे करणाऱ्या गर्दीत रूपांतरित करण्याच्या संघी षडयंत्राला बळी पडू नका!!

काही वर्षांपासून मशीदीच्या खाली मंदिरे “सापडण्याच्या” घटनांमध्ये वेगाने वाढ झाली आहे. या घटनांचा धार्मिक आस्थेशी काहीही संबंध नाही. त्यांचा एकच उद्देश आहे, तो म्हणजे जनतेला दंगलींच्या आगीमध्ये ढकलणे! भाजपा आणि संघ परिवाराचा एकंदरीत हिंदू लोकसंख्येच्या हिताशी काहीही संबंध नाही. त्यांचं एकच काम आहे आणि ते म्हणजे बहुसंख्यक गरीब हिंदू लोकांचे लक्ष त्यांच्या बिकट जीवनापासून हटवून, अल्पसंख्यक मुस्लिम समुदायाला त्यांचा शत्रू म्हणून दाखवणे! धर्माच्या नावावर लढणारी जनता आपलं जीवन नरक बनवणाऱ्या या भांडवलशाही व्यवस्थेविरुद्ध लढू शकत नाही. जनतेला एकमेकांशी लढवून भांडवलदारांची सेवा करणं हा भाजपच्या फॅशिस्ट राजकारणाचा सार आहे. फॅशिस्टांना त्यांच्या धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या राजकारणाला पुढे नेण्यासाठी जो नकली शत्रू हवा असतो, तो भारतात मुस्लिम समाजाला बनवला जात आहे.

आजकाल संभळ, अजमेर, मथुरा इत्यादी ठिकाणांवर मंदीर-मशीद यांच्या नावाखाली वाद निर्माण करण्याचे प्रयत्न वेगाने वाढत चालले आहेत. संभळमध्ये संघी वकिलांनी स्थानिक कोर्टाच्या माध्यमातून सर्वेक्षणाचे नाटक रचले, ज्यातून झालेल्या उपद्रवात पाच तरूणांना मृत्यूच्या दारात ढकलण्यात आले, ज्यात उत्तरप्रदेश पोलिसांचा संशयास्पद सहभाग सर्वांना ठाऊक आहे. यापूर्वी बहेराईचमध्येही मशीदीसमोर तणाव निर्माण केला होता आणि त्यानंतर पीडितांच्या घरावर बुलडोजर चढवला होता. अजमेर ते मथुरा पर्यंत हेच करण्याची तयारी सुरू आहे. समाजात विष पसरवणाऱ्या संघी प्रचार गटाचा सोशल मीडिया नेटवर्क आणि गोदी मिडियाच्या धार्मिक प्रचारामुळे जनतेचा, खास करून निम्नमध्यमवर्गाचा मोठा भाग साम्प्रदायिकतेच्या नशेत ओढला गेला आहे. त्यामुळे निःसंशयपणे आज न्यायप्रिय युवकांसमोर जर कोणते आव्हानात्मक काम असेल तर ते जनतेपर्यंत आलोचनात्मक विवेक आणि योग्य इतिहासबोध पोहोचवणे होय.

हल्लीच्या प्रकरणांमध्ये मशीदिच्या खाली मंदिरे “सापडण्याच्या” संघाच्या षडयंत्रात न्यायपालिका देखील सोबत उभी असल्याचे दिसून आले आहे. स्थानिक न्यायालयांना माजी मुख्य न्यायमूर्ती डी. वाय. चंद्रचूड यांच्या त्या विधानाचा आधार मिळाला आहे, ज्यामध्ये त्यांनी म्हटले आहे की ‘प्रार्थनास्थळ अधिनियम 1991′ कोणत्याही धार्मिक स्थळाच्या भूतकाळातील स्वरूपाचा तपास किंवा सर्वेक्षण करण्यास प्रतिबंध करत नाही. जर एखाद्या प्रार्थना स्थळाच्या स्वरूपात बदल करणे निषिद्ध असेल, तर सर्वेक्षण करून वाद निर्माण करणे हे पूर्णपणे अयोग्य आहे. चंद्रचूडजींना मंदीर-मशीद वाद निर्माण करून दंगलींच्या आगीत राजकीय फायदे कमवणाऱ्या राजकीय गटांच्या खऱ्या उद्देशाची जाणीव नव्हती का? जर नाही, तर जज साहेब खूप “भोळे” आहेत. ‘प्रार्थनास्थळ अधिनियम 1991’ स्पष्टपणे धार्मिक स्थळांचे 15 ऑगस्ट 1947 पर्यंतचे स्वरूप जसेच्या तसे राखले जावे याची खात्री देतो. जर हा कायदा कडकपणे लागू केला जाईल, तर सर्वेक्षण वगैरेची गोष्टच येत नाही.

भूतकाळाचा हिशोब घेण्याचा निरर्थक प्रयत्न कोणी करत असेल, तर त्याला अशा हजारो हिंदू मंदिरे सापडतील जी बौद्ध आणि जैन धर्माचे मठ आणि प्रार्थना स्थळे तोडून, तेथील मूर्त्यांचे स्वरूप बदलून तयार केली गेली आहेत. चोल, चालुक्य, राष्ट्रकूट शासकांपासून हर्षवर्धनपर्यंत अनेक राजे झाले आहेत ज्यांनी एकमेकांच्या राज्यातील मंदिरे लुटली, तोडली आणि त्यांचे स्वरूप बदलले. जर सलतनत आणि मुघल काळात अशा काही घटना घडल्या असतील, तर त्यात काहीही नवीन नाही. आणि प्रत्यक्षात सलतनत आणि मुघल काळ हे मुस्लिम-राजपूत शासनाचे एक मिश्रित रूप होते. भूतकाळातील कुठल्या तथाकथित अन्यायाचा वर्तमानात हिशोब घेतला जाणे, हे फक्त अन्यायकारक नाही तर हे देशातील लोकांच्या धार्मिक सौहार्द्राला धक्का देण्याचा प्रयत्न देखील आहे. भूतकाळात गाडले गेलेले मुर्दे उकरण्याचा हा खेळ एका ठिकाणी थांबणार नाही. हा आपल्याला दक्षिण आफ्रिकेपर्यंत नेऊन सोडेल!

जनता स्वत: मंदिर-मशीदीच्या राजकारणात अडकलेली नाही. शासक कोणत्याही धर्म-संप्रदायाचे असो, त्यांनी फक्त जनतेचे शोषण केले आहे आणि प्रत्येक काळातील जनता हे समजत अली आहे. 1857 च्या क्रांतीपूर्वी (ज्यात हिंदू-मुस्लिम जनतेने खांद्याला खांदा लावून परदेशी आक्रमकांविरुद्ध लढा दिला होता) भारतात धर्मांध दंगलींचा काही इतिहास नाही. भारतात साम्प्रदायिकतेची बीजे इंग्रजांनी रोवली. संघी फॅशिस्टांनी त्या धर्मांधतेला आधार बनवून देशाला नरकात ढकलले आहे. आपल्या फॅशिस्ट राजकारणाला बळ देण्यासाठी कोणत्याही धार्मिक स्थळाला मंदीर म्हणून घोषित करणे हा संघासाठी फक्त एक खेळ आहे.

न्यायालयात बसलेल्या न्यायाधीशांना देखील त्यांच्याशी सहकार्य करण्यात काही हरकत नाही. देशात मुस्लिम असणे आज गुन्हा झाला आहे. योगी पासून मोदी पर्यंत “बटेंगे तो कटेंगे” आणि “एक हैं तो सेफ हैं” अशी विषारी घोषवाक्ये दिली जात आहेत आणि हिंदू लोकांमध्ये इस्लामोफोबिया पसरवला जात आहे. हिंदूंना मुस्लिमांपासून धोका नाही, तर त्या द्वेष पसरवणाऱ्या ठेकेदारांकडून आहे, ज्यांच्या राजवटीत बेरोजगारी, आजार आणि महागाईने लाखो लोकांना मृत्यूच्या दारावर नेऊन ठेवले आहे. नक्कीच, त्यात बहुसंख्यक लोक हिंदूच असेल पाहिजेत. प्रत्येक न्यायप्रिय व्यक्तीला आजच्या या अन्यायकारक व्यवस्थेचा विरोध करावा लागेल, नाहीतर तो दिवस दूर नाही जेव्हा फॅशिस्ट शक्तींनी पसरवलेली आग आपल्या दारापर्यंत येईल आणि ती येत आहे.

आपल्या देशातील कामगार कष्टकरी लोकांना, न्यायप्रिय तरुणांना आणि विद्यार्थ्यांना हे समजून घ्यायला हवं की, क्रांतिकारी परिवर्तनाच्या माध्यमातूनच आपण समाजाला भांडवलशाही व्यवस्थेपासून आणि त्याच्या सडलेल्या फॅशिस्ट रूपापासून मुक्त करू शकतो. अशफाक-बिस्मिल, भगतसिंह-आझाद यांच्या क्रांतिकारी वारशाला आपल्याला जनतेपर्यंत पोहोचवावं लागेल. आपल्याला साम्प्रदायिक विभागणीच्या राजकारणाचा विरोध करावा लागेल आणि धर्म, जात, लिंग यांच्या सीमांना तोडून जनआंदोलन निर्माण करून फॅशिस्ट हल्ल्यांना सडेतोड प्रत्युत्तर द्यावं लागेल. धर्माला व्यक्तिगत मुद्दा बनवण्याच्या मुद्द्यावरही आपल्याला संघर्ष करावा लागेल. आपल्याला शिक्षण, रोजगार, आरोग्य, निवास, महागाई आणि भ्रष्टाचार अशा त्या वास्तविक आणि ठोस मुद्द्यांना उचलावे लागेल जे आपल्या जीवनावर परिणाम करतात.

जाती धर्माचे झगडे सोडा, खऱ्या लढ्याशी नाते जोडा!

Related posts

Leave a Comment

18 − one =