एका महान क्रांतिकारकाची शेवटची लढाई आणि त्यांच्या स्मृतींच्या आरशात आपला काळ

आज 13 सप्टेंबर रोजी यतींद्रनाथ दास यांच्या हौतात्म्याला 93 वर्षे पूर्ण होत आहेत. त्यांची लढाई ब्रिटिश तुरुंगातील राजकीय कैद्यांच्या हक्कांसाठी होती. पण ज्या स्वतंत्र भारतासाठी जतीन दासांनी उपाशी राहून मरण स्वीकारण्याचा मार्ग निवडला तो स्वतंत्र भारत आपल्याला मिळाला आहे का?
जतीन दास, भगतसिंग आणि त्यांचे सगळे साथीदार आज असते तर ते तुरुंगात असते, आणि तुरुंगातही त्याच प्रकारे लढत असते जसे ते त्यावेळी लढले. फरक एवढाच की टीव्ही चॅनेल्स आणि वृत्तपत्रांच्या कार्यालयात बसलेल्या दलालांनी त्यांना गुन्हेगार, रक्तपिपासू आणि देशद्रोही ठरवले असते. आजही देशाच्या तुरुंगात कैद असलेल्या हजारो नागरिकांसोबत असेच केले जात आहे, ज्यांचा गुन्हा एकच आहे की त्यांनी काही लुटारूंच्या फायद्यासाठी सुरु असलेल्या करोडो-करोड सामान्य जनतेच्या लुटमारीच्या विरोधात आवाज उठवला, कोट्यावधी लोकांना धर्म आणि जातीच्या आधारावर दुय्यम दर्जाचे नागरिक बनवण्याच्या षडयंत्राला विरोध केला आणि प्रत्येक अत्याचाराला तोंड देत खंबीरपणे उभे राहिले. या जुलमी व्यवस्थेविरुद्ध बोलण्याची हिंमत असेल तरच आज जतीनदास यांच्या हौतात्म्याची आठवण करण्यात अर्थ आहे, अन्यथा प्रत्येक क्रांतिकारकाच्या हौतात्म्यादिवशी ट्विट करणार्या ढोंगी नेत्यांमध्ये आणि आपल्यात काही फरक राहणार नाही.
आज या निमित्ताने या महान क्रांतिकारकाची शेवटची लढाई आणि त्या क्रांतिकारक तरुणांचे जीवन यतींद्रनाथ दास यांचे सहकारी आणि त्यांच्या अखेरच्या काळातील संघर्षात सहभागी असलेले शिववर्मा यांच्या शब्दांत जाणून घेण्याचा प्रयत्न करूया.
(शिववर्मा यांच्या ‘संस्मृतियाँ’ पुस्तकातून साभार)
10 जुलै 1929 रोजी जेव्हा आम्ही प्रथम कोर्टात एकत्र भेटलो तेव्हा भगतसिंग आणि बटुकेश्वर दत्त यांच्या उपोषणाला एक महिना उलटून गेला होता, पण सरकार हलायला तयार नव्हते. बाकीच्यांनीही तातडीने उपोषण जाहीर करावे, अशी भूमिका काही सहकाऱ्यांनी मांडली. भगतसिंग आणि दास तात्काळ उपोषणाची घोषणा करण्याच्या बाजूने नव्हते. त्यांना उपोषण राजकीय लढाई म्हणून लढायचे होते आणि त्यामुळे लढ्याचे कोणतेही पाऊल टाकण्यापूर्वी ते प्रत्येक पैलूला संवादातून तोलून पाहण्याच्या बाजूने होते. याशिवाय उपोषणाचा उद्देश एका चांगल्या राजकीय दस्तऐवजाद्वारे मागणी पत्राच्या स्वरूपात जनतेपर्यंत आणि सरकारपर्यंत पोहोचवणे सुद्धा आवश्यक होते. या वाटाघाटी आणि मागणीपत्र तयार करण्यासाठी तीन दिवस लागले. आणि 13 तारखेपासून भगतसिंग आणि दत्त यांच्या मागण्यांच्या समर्थनार्थ, दोन-चार सोडून इतर सर्व साथींनी उपोषण सुरू केले.
यतींद्रनाथ दास सोडले तर आमच्यापैकी कोणालाही उपोषणाचा अनुभव नव्हता. कोणत्याही साथीद्वारे भावनेच्या भरात उपोषण करण्याच्या घोषणेला दास यांनी विरोध केला. ते म्हणाले, “हा संप जाहीर करून, आम्ही एका दीर्घ संघर्षात प्रवेश करत आहोत, जो एका अर्थाने रिव्हॉल्व्हर किंवा पिस्तुलाच्या लढाईपेक्षा कठीण आहे. आमरण उपोषण करून रोज तीळ-तीळ खपत इंच-इंचाने मरण्यापेक्षा पोलिसांच्या गोळीला बळी पडून मृत्यू पावणे किंवा फासावर लटकणे सोपे आहे. आणि उपोषणाच्या मैदानात उतरल्यानंतर माघार घेणे म्हणजे क्रांतिकारकांची प्रतिष्ठा पणाला लावणे होय. अशा स्थितीत संघर्षात उतरून मागे हटण्यापेक्षा पहिल्यापासूनच संघर्षात सहभागी न झालेले बरे.”
त्यांनी हेसुद्धा म्हटले की जिथपर्यंत त्यांचा प्रश्न आहे त्यांनी एकदा उपोषण सुरू केल्यानंतर जोपर्यंत सरकार मागणीपत्र मान्य करत नाही तोपर्यंत ते मागे हटणार नाहीत. त्यांनी इतर साथींना सल्ला दिला की त्यांनी एक दिवस वेळ काढून पूर्ण विचार करावा आणि शेवटपर्यंत चालण्याचा स्वतःवर पूर्ण विश्वास नसेल तर त्यांनी कोणत्याही परिस्थितीत उपोषण सुरु करू नये. त्याचबरोबर जे साथी उपोषणात सहभागी होणार नाहीत ते इतर साथींप्रमाणेच आमचे आदरणीय क्रांतिकारी साथीदार राहतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
आधीच्या निर्णयानुसार 13 जुलैपासून आमचे ऐतिहासिक उपोषण सुरू झाले. उपोषणाच्या वेळी आजारी पडलो तरी कोणत्याही प्रकारची औषधे वगैरे घेणार नाही व ताकत असतांना अधिकाऱ्यांना बळपूर्वक दूध सुद्धा पाजू देणार नाही असा आमचा निर्णय होता.
सुरुवातीला दहा दिवस जवळपास सर्वच साथी चालते-फिरते राहिले आणि काही लोक अशक्तपणामुळे मागे हटतील या अपेक्षेने सरकारने आमच्याकडे विशेष लक्ष दिले नाही. तुरुंग अधिकारी आम्हाला परावृत्त करण्याच्या हेतूने उत्तम सुगंधी अन्न तयार करून आमच्या सेलमध्ये ठेवायचे. अन्न, फळे, दूध इत्यादी ठेवल्यानंतर अधिकारी पाठ फिरवताच, बहुतेक साथीदार ते उचलून बाहेर फेकून देत किंवा त्याच वेळी अन्नाला घाण करून टाकत. यतींद्रनाथ दास हे एकमेव व्यक्ती होते ज्यांना या बाबतीत स्वतःवर पूर्ण विश्वास होता आणि त्यांनी कधीही अन्न फेकले नाही किंवा ते घाण केले नाही. त्यांच्या कोठडीतून अधिकारी रोज मोजून आपल्या रोट्या, फळे वगैरे घेऊन जायचे.
दहा दिवसांनी काही लोकांची प्रकृती बिघडलेली पाहून सरकारने नेमलेल्या अनेक डॉक्टरांच्या पथकाने येऊन आमचा ताबा घेतला आणि अकराव्या दिवसापासून सक्तीने दूध पाजण्याचे नाटक सुरू झाले. आठ-दहा निवडक बलाढ्य जवान येऊन आमच्यापैकी एकाला घेरायचे. ते त्याला पकडून खाली पाडण्याचा प्रयत्न करायचे, साथी विरोध करायचे, त्याच्या ताकदीने लढायचे. एक विरुद्ध आठ-दहा अशा काही वेळाच्या कुस्तीत तो साथी आटोक्यात आला की त्याला दाबून बसायचे. मग डॉक्टर नाकातून पोटात एक लांब रबर ट्यूब टाकण्याचा प्रयत्न करायचा. उपोषण करणारा खोकून, हबकी घेऊन नळी पोटात जाण्यापासून थांबवायचा. या कसरतीत कधी कधी नळी तोंडात यायची, तेव्हा उपोषणकर्ता साथी ती दातांनी दाबायचा. त्यानंतर संयमाची परीक्षा सुरू व्हायची. कधी-कधी असहायतेने डॉक्टर धीर गमावून बसायचे आणि रागाने कुरकुर करत त्या साथीला सोडून तो आपल्या कर्मचाऱ्यांसोबत दुसऱ्याच्या सेलकडे जायचा. डॉक्टर हरायचे आणि तो साथी जिंकायचा.
यतींद्रनाथ दास यांना त्या कसरतीचा पूर्वीचा अनुभव होता, त्यामुळे पहिल्याच दिवशी डॉक्टरांना त्यांच्यासमोर पराभव पत्करावा लागला. त्यांचा ज्या डॉक्टरशी आमनासामना झाला तो लाहोरमधील एका पागलखान्याचा प्रभारी होता आणि त्याला जबरदस्तीने दूध पाजण्याच्या कलेतील तज्ञ म्हणून आणले गेले. वेड्यांसोबत राहताना त्याचा स्वतःचा स्वभावही बराचसा वेड्यासारखा झाला होता. वेड्यांची सोबत आणि तज्ञ असण्याचा अहंकार – यामुळे तो रागीट बनला होता. पहिल्याच दिवशी दास कडून पराभव झाल्याने तो खूप चिडला होता आणि तिथेच उभा राहून दासला सर्वांसमोर आव्हान देत म्हणाला, “तुम्ही माझ्या कामात कसा अडथळा आणता ते उद्या मी बघेन.” प्रत्युत्तरात दास हसले आणि तो डॉक्टर दुसर्या सहकाऱ्याकडे लांब पाऊल टाकत पुढे गेला.
तिसर्या दिवशी म्हणजे 26 जुलै 1929 रोजी इतर साथीदारांपासून वेळ मिळाल्यानंतर डॉक्टरने दासला सर्वात शेवटी पकडले. त्यांना दास सोबत निवांतपणे निपटायचे होते. जेव्हा कुस्ती आणि धरपकडीचा पहिला अध्याय संपला आणि जवानांनी दासला पूर्णपणे नियंत्रित केले तेव्हा त्याने नाकातून एक ट्यूब घातली, जी दासने तोंडातून बाहेर काढली आणि दातांनी दाबली. डॉक्टरांनी त्याच्या दुसऱ्या नाकपुडीत दुसरी ट्यूब टाकायला सुरुवात केली. दास गुदमरायला लागले. तरीही तोंड न उघडता दास दुसरी नळी पोटात जाण्यापासून थांबवण्याचा प्रयत्न करत राहिले. दुसरी नळी पोटात न जाता त्याच्या फुफ्फुसात गेली. डॉक्टर घाईत होता. त्याला आपला विजय हातातून जाऊ द्यायचा नव्हता. गुदमरल्यामुळे दासचे डोळे उलटे झाले होते, पण त्याच्या चेहऱ्याकडे न पाहता डॉक्टरांनी त्याच्या फुफ्फुसात जवळजवळ एक पाव दुधाचा पेला रिकामा केला आणि विजयोल्हासात दासला तडफडत ते सोडून निघून गेले.
ही घटना हॉस्पिटलमध्ये घडली. त्यावेळी दास व्यतिरिक्त जवळपास अर्धा डझन इतर साथीदारही रुग्णालयात पोहोचले होते आणि ते सर्व एकाच बराकीत बंदिस्त होते. दासला रडताना पाहून सर्वजण त्याच्याजवळ पोहोचले. दास यांच्या शरीराचे तापमान झपाट्याने वाढत होते. त्यांना सतत खोकला येत होता आणि श्वास घेण्यास त्रास होत होता. त्यांची ही अवस्था पाहून इतर साथीदारांनी आरडाओरडा सुरू केला. सुमारे अर्ध्या तासानंतर डॉक्टरांचे पथक परत आले. दासला पाहताच त्यांचे होश उडाले. त्यांनी त्यांना जमिनीवरून उठवून कॉटवर ठेवले आणि जेव्हा ते तोंडात औषध टाकू लागले, तेव्हा अर्धमूर्च्छित अवस्थेतही दासची चेतना जागी झाली आणि त्याने तोंड घट्ट बंद करून इंग्रजीत ‘नाही’ म्हटले. जेव्हा आमच्यापैकी काही साथींनी औषध घेण्याची विनंती केली तेव्हा त्या दुःखातही त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले. त्यांना समजले की ममत्वाने सोबत्यांच्या संकल्पावर विजय मिळवला आणि त्यांनी हसून आमची विनंती नाकारली. शेवटपर्यंत त्यांनी ना कोणते इंजेक्शन घेतले ना कोणते औषध घेतले. त्या परिस्थितीत बळाचा वापर करण्याचा प्रश्नच नव्हता. परिणामी, डॉक्टरांना बाह्य उपायांवर समाधान मानावे लागले (छातीचे मलम आणि मसाज इ.). दास यांना न्यूमोनिया झाल्याचे घोषित करून ते निघून गेले.
या घटनेच्या सुमारे दोन ते तीन तासांनंतर त्यांचा खोकला थोडासा कमी झाला आणि काहीसे बरे झाल्यावर त्यांनी डोळे उघडले. आम्हाला आजूबाजूला पाहून पुन्हा एकदा त्यांच्या चेहऱ्यावर हसू पसरलं. अतिशय खालच्या आवाजात जितेंद्रनाथ सन्यालला उद्देशून ते म्हणाले, “आता ते मला पकडू शकणार नाही.” त्या दिवसापासून त्यांची धीमे-धीमे मृत्यूकडे जाण्याची प्रक्रिया सुरू झाली. त्याच्या शांत आणि कोमल चेहऱ्यावर दृढनिश्चयाच्या रेषा हौतात्म्याकडे जाणाऱ्या प्रत्येक क्षणानगणिक गंभीर होत गेल्या.
काही दिवसांतच त्यांची प्रकृती अधिकच बिघडली. शरीरात विष पसरले आणि डोळे बंद राहू लागले. डॉक्टरांना एनीमा द्यायचा होता पण दास त्यासाठीही तयार नव्हते. काँग्रेस नेते आणि संरक्षण समितीच्या सदस्यांच्या विनंत्याही कामी आल्या नाहीत. कोणीतरी सरकारला सुचवले की कदाचित ते भगतसिंगांचे म्हणणे ऐकतील. म्हणून भगतसिंग यांना मध्यवर्ती कारागृहातून आणण्यात आले. भगतसिंगांनी एकदा विनंती करताच दास यांनी एनीमा मंजूर केला. यावर तुरुंगातील एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याने दास यांना विचारले की, तुम्ही या एनीमासाठी सर्वांची विनंती फेटाळून लावली होती, मग भगतसिंग यांच्या सांगण्यावरून तुम्ही कसे काय मान्य केले? उत्तरात दास म्हणाले, “सर, भगतसिंग काय शूर पुरुष आहे हे तुम्हाला माहीत नाही. मी त्याची गोष्ट कधीच टाळू शकत नाही.”
अशाचप्रकारे दुसर्या एका प्रसंगी भगतसिंगांनी त्यांना औषध पिण्याची विनंती केली तेव्हा ते म्हणाले: “हे बघ भगतसिंग, मला माहीत आहे की मी माझ्या वचनापासून मागे हटता काम नये, पण मी तुझे शब्दही टाळू शकत नाही. बरं, यापुढे आता मला काही मागू नकोस.”
त्यांची प्रकृती ढासळत असल्याचे पाहून आधी सरकारने त्यांना मेयो रुग्णालयात नेण्याचे ठरवले. मात्र दास यांनी रुग्णालयात जाण्यास नकार दिल्याने त्यांनी त्यांना जामिनावर सोडण्याचा निर्णय घेतला. जमानतकर्त्याच्या रूपात सरकारला बाहेर बनावट शेठ सापडला होता. अचानक स्वतःच्या सुटकेची बातमी ऐकून दासने आम्हा सर्वांना त्याच्याभोवती गोळा केले. “हे सर्व एक सापळा आहे,” तो म्हणाला. “मी वाचणार नाही हे सरकारला माहीत आहे. त्यांना माझ्या मृत्यूची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर घ्यायची नाही. ते मला तुरुंगाच्या गेटमधून बाहेर काढून माझ्यापासून सुटका करून घेऊ इच्छित आहे. मी ते होऊ देणार नाही.” असे म्हणत त्याने आमच्याकडे पाहिले. तो म्हणाला, “मला इथेच तुमच्यात राहून लढत-लढत मरायचे आहे. माझी इच्छा आहे की तुम्ही लोकांनी मला येथून हटवण्याला ताकदीने विरोध करावा.”
त्यावेळी आमच्या उपोषणाला दीड महिन्यांहून अधिक काळ लोटला होता आणि दोन एक सोडून जवळपास सर्व सोबती अशक्तपणामुळे हॉस्पिटलमध्ये होते. दासच्या बोलण्यामुळे त्या अशक्तपणाच्या अवस्थेतही साथींमध्ये न जाणे कुठून शक्ती आली. रुग्णालयाच्या बॅरेकचा दरवाजा आतून बंद होता. मग सर्वांनी आपापले लोखंडी पलंग, टेबल, कॅबिनेट वगैरे बाहेर काढून, ओढून दारात लावले आणि सक्रिय आंदोलनासाठी सज्ज झाले. खाटेवर झोपलेल्या दासने डोळे उघडले आणि आजूबाजूला बघितले आणि म्हणाला, “आता ठीक आहे.”
काही वेळाने तुरुंग अधिकारी दासला घेऊन जाण्यासाठी त्यांच्या ताफ्यासह आले. मोर्चेबंदी पाहून त्यांना समजले की परिस्थिती चांगली नाही. शारीरिकदृष्ट्या त्यावेळी आमच्यापैकी कोणाचीच परिस्थिती अशी नव्हती की आमच्याविरुद्ध बळाचा वापर होऊ शकेल. दास यांनी बाहेर उभ्या असलेल्या अधीक्षकांना जामीन मंजूर नसल्याचे सांगितले. दूरध्वनी खणखणला आणि नाटक पुढे जायचे थांबले. इंग्रज अधीक्षकांनी येशू ख्रिस्ताच्या शपथेवर, दासला त्याच्या इच्छेविरुद्ध घेण्याचा प्रयत्न करणार नाही, अशी ग्वाही दिल्यावर बॅरेक्सची मोर्चेबंदी काढून टाकण्यात आली.
सुमारे एक आठवड्यानंतर, एके दिवशी दासने पुन्हा सर्वांना एकत्र केले. ज्यांना उठण्या-बसण्याची ताकद नव्हती, त्यांच्या खाटा आपल्या जवळ ओढल्या. त्यांचा धाकटा भाऊ किरणदास यांना त्यांची काळजी घेण्यासाठी त्यांच्यासोबत राहण्याची परवानगी देण्यात आली होती. त्याने स्वतःसाठी बिस्किटांचे एक पॅकेट आणले होते. दास यांनी प्रत्येकाला आपल्या हाताने एकेक बिस्कीट दिले. ते म्हणाले, “आम्ही उपोषण मोडत नाही आहोत. हा आपला शेवटचा सहभोज आहे – माझ्या प्रेमाचे केवळ एक प्रतीक.” सर्वांनी बिस्किट खाल्ले. त्यानंतर त्यांनी किरणदास कडून काझी नजरुल इस्लामचे ‘बोलो वीर, चिर उन्नत मम शीर’ हे गाणे ऐकले. त्या रात्री बराच वेळ सर्वांना जमवून ते बोलत राहिले. तेथे नसलेल्या आणि कोठडीत बंदिस्त असलेल्या सर्व साथीदारांच्या परिस्थितीबाबत विचारले आणि वंदे मातरम ऐकले. विझणाऱ्या दिव्याची ती शेवटची चमक होती. त्यानंतर त्यांची प्रकृती झपाट्याने खालावू लागली. त्यांचे बोलणे बंद झाले, हात-पाय सुजले, डोळेही बंदच राहू लागले. पण त्या अवस्थेतही ते मान हलवून प्रत्येक गोष्टीला हो किंवा नाही असे उत्तर देत असे. शेवटच्या क्षणापर्यंत त्यांच्या मानसिक सतर्कतेत ढिलाई नव्हती.
महाप्रयाणाच्या तयारीत प्रथम त्यांच्या पायाचा अंगठा संवेदनाहीन झाला, नंतर हळूहळू पाय व नंतर हात अचेत झाले आणि नंतर डोळ्यांनी साथ सोडली. एवढं सगळं होऊनही शेवटपर्यंत त्याच्या इच्छाशक्तीत घट झाली नाही.
परिस्थिती बिघडत असल्याचे पाहून सरकारने पुन्हा एकदा तुरुंग अधीक्षक मेजर ब्रिग्ज याच्याद्वारे सांगितले की, सरकार त्यांची विनाशर्त सुटका करून त्यांच्याविरुद्ध असलेली कटाच्या खटल्याची कारवाई मागे घेण्यास तयार आहे. सरकारने आमच्या मागण्या मान्य केल्या आहेत का, असा सवाल यतिंद्रनाथ यांनी उत्तरात केला. आणि सरकार आंदोलकांच्या मागण्यांचा विचार न करताच त्यांना सोडून देण्याचे बोलत आहे हे कळल्यावर त्यांनी सरकारची सूचना मान्य करण्यास साफ नकार दिला.
13 सप्टेंबर 1929 रोजी उपोषणाच्या त्रेसष्ठाव्या दिवशी त्यांची प्रकृती बिघडत असल्याचे पाहून डॉक्टरांनी त्यांना इंजेक्शन देण्याचा प्रयत्न केला. बेशुद्ध अवस्थेत दासला आपल्याला इंजेक्शन दिले जात आहे याची जाणीव नसेल असा डॉक्टरांचा अंदाज होता. पण स्पिरीट हातावर घासताच दासने कर्कश स्वरात ‘नाही’ म्हटले आणि त्याबरोबर डॉक्टरांचे पथक हटले. त्या घटनेनंतर काही वेळातच त्यांनी कायमचे डोळे मिटले.
त्या दिवशी पहाटेपासूनच अधिकाऱ्यांनी कोठडीत बंद असलेल्या साथींनाही आणून हॉस्पिटलमध्ये ठेवले. सर्वजण शांतपणे त्यांना आदरांजली वाहण्यासाठी त्यांच्याभोवती उभे राहिले, डॉक्टरांनी रांगेत उभे राहून डोके टेकवले आणि तुरुंगाच्या ब्रिटिश अधीक्षकांनी त्यांची टोपी काढून लष्करी सलामी देऊन त्यांचा सन्मान केला.
दास यांची प्रकृती वाईट आहे, ही बातमी सकाळपासूनच लाहोरमध्ये वादळासारखी पसरली होती आणि मृतदेहाच्या अंतिम दर्शनासाठी संपूर्ण शहर तुरुंगाच्या गेटवर जमा झाले होते. लाहोरमध्ये, लाहोर ते कलकत्ता घेऊन जाताना या मार्गावरील स्थानकांवर आणि नंतर कलकत्ता शहरात दास यांच्या मृतदेहाला जो सन्मान दिला गेला तो देशाच्या इतिहासात आजही अतुलनीय आहे.
✊️ नौजवान भारत सभा
संपर्क: रवि 8956840785
सुरज 8806038914

Related posts

Leave a Comment

five × four =