नौजवान भारत सभा व स्त्री मुक्ती लीग तर्फे पुणे शहरात विविध ठिकाणी “राजाचा वाजला बाजा” या पथनाट्याचे प्रयोग सादर करण्यात येत आहेत

नौजवान भारत सभा व स्त्री मुक्ती लीग तर्फे पुणे शहरात विविध ठिकाणी “राजाचा वाजला बाजा” या पथनाट्याचे प्रयोग सादर करण्यात येत आहेत. 5 सप्टेंबरला पुण्यातील बाजीराव रोड रस्त्यावर या पथनाट्याचे 3 प्रयोग करण्यात आले. अतिशय बोलक्या पद्धतीने या पथनाट्याद्वारे बेरोजगारीची भीषण समस्या जनतेपुढे मांडण्यात आली. नाटकाचा मुख्य रोख बेरोजगारीकडे असला तरी इतर अनेक गोष्टींकडेही हे नाटक जनतेचे लक्ष वेधते. जसे की कुचकामी झालेली शिक्षण व्यवस्था, कामगार कष्टकरी वर्गातील मुलांना शिकण्यासाठी करावी लागणारी धडपड, इत्यादी.
नाटकानंतर नौजवान भारत सभेची ओळख जनतेला देण्यात आली. नौजवान भारत सभा शहीद भगतसिंह यांच्या क्रांतिकारी विचारांवर पुढे चालत शोषणमुक्त, समतामुलक समाजाच्या निर्मितीसाठी युवकांमध्ये, कामगार कष्टकरी जनतेमध्ये प्रचार करते आणि त्यांना संघटित करते. आम्ही आज समाजात असलेली बेरोजगारी, गरीबी, जातीय अत्याचार, महिलांवरील हिंसाचार यांवर वेळोवेळी भूमिका मांडतो, आंदोलने करतो आणि लोकांपर्यंत शिक्षण, रोजगार, आरोग्य यांसारखे मुद्दे घेऊन जातो. या सर्व मुद्द्यांवर आज एक व्यापक जनआंदोलन उभे करण्याची गरज आहे तरच आपल्यासमोर असलेल्या फॅसिझमच्या संकटाला आपण तोंड देऊ शकतो.
याच क्रांतिकारी प्रचाराचा एक भाग म्हणून हे पथनाट्य आम्ही पुणे शहरात विविध ठिकाणी सादर करीत आहोत. या माध्यमातून सामान्य जनतेला बेरोजगारीच्या भीषण वास्तवाची जाणीव करून देण्यात आली आणि या विरोधात संघटित होण्याचे आवाहन करण्यात आले. आज देशातल्या युवकांसमोर बेरोजगारीचा प्रश्न आ वासून उभा आहे. याचसाठी युवकांनी व्यापक रोजगाराच्या अधिकारासाठी संघटीत होण्याची गरज आहे. हे प्रयोग सुरू ठेवण्यासाठी आणि एकंदरीत नौजवान भारत सभेचे काम पुढे वाढवण्यासाठी आम्हाला आपल्याकडून सढळ आर्थिक सहयोगाची गरज आहे. तसेच ही चळवळ अजून व्यापक करण्यासाठी नौजवान भारत सभेच्या विविध उपक्रमांमध्ये आपणही सक्रिय सहभागी व्हावे हे आमचे आवाहन आहे.

Related posts

Leave a Comment

20 − two =