शहीद सुखदेव यांच्या जन्मदिनानिमित्ताने (15 मे)

भारतीय स्वातंत्र्य चळवळीत ‘सुखदेव’ असे नाव आहे जे केवळ देशभक्तीच नव्हे तर धाडस आणि बलिदानाचे सुद्धा प्रतीक आहे. 23 मार्च 1931 या दिवशी सुखदेव यांना त्यांचे दोन क्रांतिकारी साथी भगतसिंह आणि राजगुरू यांच्यासोबत फाशी देण्यात आली होती. बलिदानाच्या इतक्या वर्षानंतर सुद्धा हे शहीद जनतेच्या हृदयात अजूनही जिवंत आहेत. भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांना इंग्रज सरकारने 23 मार्च 1931 रोजी लाहोर षडयंत्र खटल्यामध्ये फाशी दिली होती. या वीरांना फाशी देऊन इंग्रज सरकार या भ्रमात होते की भारताची जनता या कारवाईने भयभीत होईल आणि स्वातंत्र्याच्या भावनेला विसरून जाऊन विद्रोह करणार नाही. परंतु त्यांचा डाव फसला आणि या शहीदांच्या बलिदानाने देशातील जनतेमध्ये स्वातंत्र्याची भावना प्रज्वलित केली. हजारो देशवासी मृत्यूशी दोन हात करत इंग्रज सत्तेविरोधात युद्धात उतरले.

सुखदेव यांचा जन्म 15 मे 1907 रोजी लुधियाना मध्ये झाला. त्यांच्या वडिलांचे नाव श्री रामलाल आणि आईचे नाव श्रीमती रल्ली देवी होते. तीन वर्षे वय असतांनाच सुखदेव यांच्या वडिलांचा मृत्यू झाला. त्यांचे पालनपोषण त्यांच्या काकांनी केले. लहानपणापासूनच इंग्रजी सरकारच्या अत्याचाराला सुखदेव यांनी बघितले होते. या अत्याचारग्रस्त जनतेला मुक्ती मिळवून देण्यासाठी ते क्रांतिकारी बनले. सुखदेव अतिशय हसतमुख, हजरजबाबी आणि जिंदादिल व्यक्ती होते.

ते नेहमीच आपल्या साथींची काळजीपूर्वक चौकशी करायचे. इंग्रजांपासून स्वातंत्र्य मिळवण्याच्या नेहमी चिंतनात असायचे. सुखदेव एच.आर.ए. (हिन्दुस्तान रिपब्लिकन एसोसिएशन) ची दूसरी पिढी व एच.एस.आर.ए. (हिन्दुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन एसोसिएशन) च्या पहील्या पिढीचे नेते होते. सुखदेव पक्षाप्रती सदैव समर्पित राहिले आणि उद्दिष्टांसाठी आयुष्य अर्पण करण्यात सुद्धा मागे राहीले नाहीत.

फाशीच्या तीन दिवस आधी पंजाबच्या गव्हर्नरांना लिहिलेल्या आपल्या पत्रात सुखदेव, भगतसिंग आणि राजगुरू यांनी ही घोषणा केली “युद्ध सुरू झाले आहे, आणि हे युद्ध तोपर्यंत चालू राहील जोपर्यंत शक्तिशाली व्यक्तींनी भारतीय जनतेवर आणि श्रमिकांच्या उत्पन्नाच्या साधनांवर आपला अधिकार कायम करून ठेवला आहे. असे व्यक्ती इंग्रज भांडवलदार असले किंवा भारतीय असले किंवा दोन्ही असले तरी त्यामुळे या स्थितीमध्ये काही फरक पडणार नाही”. शहीद सुखदेव आणि त्यांच्या साथींच्या स्वप्नातला समतामूलक समाज बनवणे अजूनही बाकी आहे. त्यासाठी कामगार कष्टकरी जनता आणि विशेष करून युवकांनी पुढे यावे लागेल. त्यांच्या जन्मदिवसावर हीच त्यांना खरी श्रद्धांजली असेल.

नौजवान भारत सभा, महाराष्ट्र

Related posts

Leave a Comment

seventeen + thirteen =