10 मे रोजी, कर्वेनगरमधील डॉमिनोजच्या एका शाखेसमोर ‘इंडियन पीपल इन सॉलिडॅरिटी विथ पॅलेस्टिन’ आणि ‘बीडीएस इंडिया’ शी संलग्न असलेल्या विद्यार्थी आणि कार्यकर्त्यांनी गाझा येथील नरसंहाराविरोधात आणि झायोनिस्ट इस्त्रायलला थेट किंवा अप्रत्यक्षरित्या मदत करणाऱ्या कंपन्यांच्या बहिष्कारासाठी शांततेत जनजागृती मोहीम राबवली. यावेळी त्यांनी माहितीपत्रके वाटली व लोकांना गाझावरील युद्धाचा निषेध करण्याचे आवाहन केले. डॉमिनोजसारख्या कंपन्यांच्या इस्त्रायलमध्ये शेकडो शाखा असून त्या केवळ रॉयल्टीमधून नफा कमावत नाहीत, तर अनेक वेळा इस्त्रायली लष्कर (IDF) आणि त्यांकडून पॅलेस्टिनची जमीन बळकवण्याला उघडपणे समर्थनही देतात.
हे संपूर्ण आंदोलन हे शांततापूर्ण असून केवळ गाझामधील नरसंहाराचा निषेध करणारे आहे, हे कार्यकर्त्यांनी वारंवार स्पष्ट करूनही भाजप-आरएसएस शी संबंधित गुंडांनी त्यांच्या हातातील पोस्टर फाडले, त्यांना मारहाण केली, आणि महिला कार्यकर्त्यांना बलात्काराच्या धमक्या दिल्या. हे सर्व पुणे पोलिसांच्या उपस्थितीत घडले. पुणे पोलिसांनी केवळ हल्ला होताना मूकदर्शक राहूनच भूमिका मर्यादित ठेवली नाही, तर आता त्या हल्ल्यात सहभागी असलेल्या स्थानिक कुख्यात भाजप-आरएसएस नेत्यांविरोधात FIR दाखल करण्यासही नकार दिला. देशातील लोकशाहीची ही शोकांतिका आहे.
याशिवाय, भाजपच्या आयटी सेलने आता खोट्या बातम्यांचा प्रचार सुरू केला असून, कार्यकर्त्यांनी ‘पाकिस्तान जिंदाबाद’च्या घोषणा दिल्यामुळे त्यांना मारहाण झाली, असा खोटा दावा केला जात आहे. आम्ही सर्व प्रगतिशील नागरिकांना आवाहन करतो की, अशा खोट्या प्रचाराचा पर्दाफाश करा, या कार्यकर्त्यांच्या सोबत ठामपणे उभे राहा आणि आंदोलन करण्याच्या लोकशाही अधिकाराचे रक्षण करा.
नौजवान भारत सभा मागणी करते की कर्वेनगर पोलिसांनी आपल्या निष्क्रियतेबद्दल आणि उशीराने कारवाई केल्याबद्दल खुलासा करावा. दाखल करण्यात आलेल्या FIR मध्येही गंभीर आरोप समाविष्ट करण्यात आलेले नाहीत, यावरून पोलिस भाजप-आरएसएस च्या गुंडांचे रक्षण करत असल्याचे स्पष्ट दिसते. म्हणून आम्ही मागणी करतो की या घटनेची पारदर्शक चौकशी व्हावी आणि गुन्हेगार संघी गुंडांवर कठोर कारवाई करावी.
