शहीद सुखदेव फिरते वाचनालयाचे उद्दिष्ट तरुण व लहान मुलांपर्यंत पुरोगामी साहित्य पोहोचवणे हे आहे. सध्या हे फिरते वाचनालय मानखुर्द-गोवंडी येथील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नगर आणि गौतम नगर या वस्त्यांमध्ये नियमितपणे चालवले जाते. या परिसरातले सुमारे 30 ते 40 तरुण नियमितपणे पुस्तके घेतात. त्यांना फक्त वाचण्यासाठीच नाही, तर जे काही वाचलं आहे ते स्वतःच्या भाषेत लिहायला देखील प्रोत्साहन दिलं जातं.
फॅशिस्ट शक्ती, गोदी मिडिया आणि सोशल मिडियाचा वापर करून समाजात विष पसरवत आहेत. अवैज्ञानिक, धार्मिक आणि द्वेषपूर्ण विचार पेरले जात आहेत. अशा काळात तरुण आणि लहान मुलांना वैज्ञानिक, तर्कशुद्ध आणि प्रगतिशील विचारांचे साहित्य उपलब्ध करून देणे हीच खरी प्रतिकाराची दिशा आहे. हीच त्यांच्या द्वेषमूलक राजकारणाला जशास तसे उत्तर देण्याची ताकद आहे!
आज, 15 मे रोजी, शहीद सुखदेव यांची जयंती साजरी करताना आपण विद्यार्थी-तरुणांनी त्यांच्या स्वप्नातील समाज विसरू नये — असा समाज जो समता आणि न्यायावर आधारलेला असेल. शहीद सुखदेव आणि त्यांच्या क्रांतिकारी साथींनी तरुणांना दिलेला संदेश आजही तितकाच महत्त्वाचा आहे — समाजाप्रती आपली जबाबदारी पार पाडणे आणि अन्यायाविरुद्ध, तसेच या शोषणकारी व्यवस्थेला ग्राह्य ठरवणाऱ्या विचारसरणींविरुद्ध लढा देणे!
‘शहीद सुखदेव फिरते वाचनालय’ हे आपल्या समाजात अजूनही टिकून असलेल्या प्रतिगामी विचारसरणींना आव्हान देण्याचा एक प्रयत्न आहे. म्हणूनच आम्ही विद्यार्थ्यांना आणि तरुणांना आवाहन करतो — या मोबाईल लायब्ररीसाठी स्वयंसेवक म्हणून सहभागी व्हा आणि नौजवान भारत सभेच्या इतर उपक्रमांमध्येही सक्रिय सहभाग नोंदवा.
इंकलाब जिंदाबाद!!
