नौजवान भारत सभेतर्फे बुधवार, 14 मे रोजी पुण्यात उन्हाळी सर्जनशीलता शिबिराला सुरुवात करण्यात आली.

पहाटे झोपेतून लवकर उठून सर्व मुले पूर्ण उत्साहात शिबिराच्या ठिकाणी उपस्थित होते. मुलांकडून व्यायाम करवून घेत शिबिराला सुरुवात झाली. तद्नंतर “अलाईक” हा लघू-चित्रपट दाखवण्यात आला, ज्याद्वारे मानवी जीवनात कलेचे आणि सौंदर्याचे महत्त्व स्पष्ट करण्यात आले. चित्रपटावरील चर्चेमध्ये प्राण्यांपासून माणसाच्या भिन्नतेचे वेगवेगळे पैलू उलगडत गेले. त्यानंतर वेगवेगळ्या खेळांद्वारे मुलांमध्ये मैत्री प्रस्थापित करणे तसेच त्यांच्यातील विविध कलागुण बाहेर काढणे ही कार्ये पार पडली. सामूहिक नाश्ता केल्यावर “कोको” हा संगीतावरील संवेदनशील चित्रपट दाखवून शिबिराच्या पहिल्या दिवसाची सांगता झाली.
दुसऱ्या दिवशी 15 मे रोजी शहीद सुखदेव थापर जन्मदिवस साजरा करण्यात आला. शहीद सुखदेव, भगतसिंग आणि राजगुरू यांच्या प्रतिमा ठेवण्यात आल्या व क्रांतिकारी गीतांनी आपल्या क्रांतिकारक पूर्वजांना स्मरून शिबिराची सुरुवात झाली. सुरुवातीला व्यायामासोबतच मुलांना आत्मसंरक्षणाचे प्रशिक्षण देखील देण्यात आले.
भारत यांनी वृक्षांची, निरपराधांची हत्या न करणे, कागदांचा अपव्यय न करणे आणि निसर्गाचा विनाश या विषयांवर मुलांकडून कविता वदवून घेत आपल्या सत्राला सुरुवात केली. आपल्या परस्परसंवादी शैलीतून, व्यंग्यात्मक अभिनय व संवादातून, आणि मुलांना सक्रिय सहभागी करण्याच्या पद्धतीतून अंधश्रद्धेच्या विविध स्वरूपांचा पर्दाफाश केला आणि वैज्ञानिक दृष्टीकोन आणि विवेकाचा संचार केला. आपल्या संपूर्ण मांडणीत विज्ञानाचे विविध प्रयोग घेत अंधश्रद्धा, विवेकहीनता, अवैज्ञानिकता, इत्यादींचे विडंबन केले आणि कुतूहल, जिज्ञासा, चिकित्सक वृत्ती, प्रश्न विचारणे इत्यादींची महत्ता सांगितली. या मांडणीचा शेवट जाती धर्मात विखुरलेल्या समाजावर टिपणी करणाऱ्या एका कवितेने करण्यात आली.
सामुहिकरीत्या एकत्र नाश्ता करून खेळांचे सत्र घेण्यात आले. चित्रकला व ओरिगामी/कागदकलेच्या सत्रामध्ये कागदापासून डब्ब्यांसारख्या उपयोगी गोष्टी बनवण्यात आल्या. कागदावर विविध झाडांची पाने, हातांची बोटे, अंगठे इत्यादींचे रंगीत ठसे उमटवून त्यांना मोटारकार, विनोदी पात्रे, निसर्गचित्रण यांमध्ये रूपांतरित करून मुलांनी आपल्या कलात्मकतेचे दर्शन घडवले.

Related posts

Leave a Comment

three + twenty =