नौजवान भारत सभेतर्फे पुण्यात राबविण्यात आलेल्या उन्हाळी सर्जनशीलता शिबिराचा समारोप!

अप्पर सुप्पर बिबवेवाडी परिसरातील वस्तींतील मुलांसाठी नौजवान भारत सभेकडून राबविण्यात आलेल्या उन्हाळी सर्जनशीलता शिबिराचा 16 मे, 2025 रोजी समारोप झाला. शेवटच्या दिवशी व्यायामाचे नवनवीन कष्टप्रद प्रकार घेण्यात आले, तसेच आत्मसंरक्षणाच्या उन्नत पद्धती शिकवण्यात आल्या. वेगवेगळी प्रथिने, जीवनसत्वे असलेल्या पोषक भाज्या-फळांची माहिती देण्यात आली.
साथी लावण्या यांनी संगीताचे सत्र घेतले. इलेक्ट्रिक गिटारची आणि अकूस्टिक गिटारची माहिती देत त्यांच्यातले भेद सांगण्यात आले. भारतीय आणि जागतिक सांगीतिक स्वरलिपींची जडण-घडण समजावून सांगितली गेली. गिटारचे अवयव आणि गिटार वादनाच्या प्राथमिक पद्धती शिकवण्यात आल्या. सरगम वादनाची मूलभूत संरचनात्मक पद्धत शिकवून मुलांकडून त्याचे प्रात्यक्षिक करवून घेण्यात आले. त्यानंतर नितीन यांनी विज्ञानाचे प्रयोग दाखवले. मुलांसोबत विविध कविता वाचन तसेच रॅप, सामूहिक गायन, रॉक गायनाच्या माध्यमातून “का” हा जिज्ञासात्मक प्रश्न न विचारणे आणि वैज्ञानिकता नसण्याने होणारे दुष्परिणाम स्पष्ट करण्यात आले.
शेवटचे सत्र नाटकाचे झाले, ज्यात आशिषच्या शिकवण्याच्या कल्पक पद्धतीने मुलांना खिळवून ठेवले. बडबडगीते, सामूहिक खेळ इत्यादींच्या माध्यमातून चेहऱ्याचे विविध हावभाव, आवाजातील उतार-चढाव, रससिद्धांत आणि व्यक्तिमत्वाचे विविध पैलू उलगडले गेले. शेवटी मुलांनी भारत-पाक युद्धावर स्वतः एक नाटक लिहून सादर केले, ज्यात मीडियाची युद्धोंमाद पसरवून जनतेत भांडणे लावून आपल्यात फूट पडण्याची कूटनीती आणि युद्धामुळे सामान्य जनतेची बर्बाद होणारी आयुष्ये दाखवण्यात आली. युद्ध आणि हिंदू-मुस्लिम झगडे लावणे ह्या गोष्टींमुळे जनतेला होणारे नुकसान दाखवत नाटकाची तसेच ह्या शिबिराची सांगता झाली.
वस्तीतील कामगार-कष्टकरी पार्श्वभूमीतून येणाऱ्या मुलांच्या आयुष्यात प्रत्येक क्षेत्रात संधींचा अभाव असतो. मोठे होताना आयुष्यात जीवनाचे सौंदर्य टिपण्याची सुद्धा संधी त्यांना उपलब्ध नसते. स्त्री आणि मुलांच्या स्वस्त श्रमशक्तीच्या जोरावर चालणाऱ्या ह्या नफाकेंद्री भांडवली समाजव्यवस्थेत बालवयात सुद्धा अनेक मुलांना कामाला जावे लागते आणि शिक्षणाला मुकावे लागते. अगदी लहानपणीच कुंचला उचलण्याऐवजी कुदळ उचलण्याची वेळ येते आणि आर्थिक गुलामीचे बंधन ही कोमल आयुष्ये उध्वस्त करून टाकते. त्यात विविध माध्यमांतून भांडवली मूल्यांचा मारा सतत सुरू असतो. अशात मानवी जीवनात सौंदर्याचे महत्व, कलेचे आणि विद्यानाचे परस्परपूरक शिक्षण इत्यादींची पोकळी मुलांना सतत जाणवत असते, अन् ती भरून काढण्यासाठीच ते अशा उपक्रमांना उत्स्फूर्त प्रतिसाद तर देतातच, परंतु अशा उपक्रमांच्या निरंतरतेची सुद्धा मागणी करतात, जे शिबिराच्या शेवटी सुद्धा मुलांनी बोलून दाखवले. म्हणून नौजवान भारत सभा नेहमीच जनतेत जाताना मुलांमध्ये सुद्धा विविध उपक्रम घेण्यासाठी आणि क्रांतिकारी भरण-पोषण सुरू ठेवण्यासाठी कटिबद्ध आहे!

Related posts

Leave a Comment

ten + twenty =