देशातील कष्टकरी जनतेला युद्ध नको आम्हाला हवे चांगले शिक्षण, आरोग्य सुविधा, रोजगाराच्या संधी आणि चांगले राहणीमान ! युद्धाच्या उन्मादात फसून आपण सत्ताधारी वर्गाला त्यांच्या दुष्ट हेतूंमध्ये यशस्वी होऊ देता कामा नये!

22 एप्रिल रोजी पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर, एकमेकांना आव्हान दिल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये 6-7 मे च्या रात्री युद्धाच्या झडपा सुरू झाल्या. भारतीय सैन्याच्या म्हणण्यानुसार, त्यांनी ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील काही दहशतवादी अड्ड्यांवर हल्ला केला. यानंतर, पाकिस्तानी सैन्याने त्याला नागरी क्षेत्रावरील हल्ला म्हणून भारताच्या सीमावर्ती राज्यांमधील काही शहरांवर हल्ला केला. या हल्ल्यांमध्ये अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आणि शेकडो लोक उद्ध्वस्त झाले. यानंतर, भारताकडूनही प्रतिहल्लाची चर्चा आहे आणि लाहोरची हवाई संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त केल्याच्या बातम्या आहेत. सध्या सर्वत्र युद्ध उन्माद आणि अंधराष्ट्रवादाचे वारे वाहत आहेत. अफवांचा बाजार गरम आहे आणि प्रत्यक्षात काय चालले आहे हे निश्चितपणे सांगता येत नाही. गोदी मीडियापासून ते सोशल मीडियापर्यंत, प्रत्येकजण कोणताही व्हिडिओ शेअर करून युद्ध उन्माद आणखी भडकवण्याचा प्रयत्न करत आहे. तथाकथित पुरोगामी आणि उदारमतवादी गटही आंधळ्या राष्ट्रवादाच्या गटारात डुबकी मारत आहेत. एकंदरीत परिस्थिती अजूनही चिंताजनक आहे. जर परिस्थिती पूर्ण युद्धाकडे वळली तर मोठ्या प्रमाणात जीवितहानी आणि वित्तहानी होईल. दोन्ही देश अण्वस्त्रांनी सज्ज आहेत, त्यामुळे कोणत्याही मोठ्या युद्धाचे परिणाम विनाशकारी ठरू शकतात. आम्ही देशाच्या सरकारकडे मागणी करतो की युद्धाकडे जाणारी स्थिती कोणत्याही परिस्थितीत थांबवावी.

देशातील तरुणांनी कोणत्याही प्रकारच्या युद्ध उन्माद आणि अंधराष्ट्रवादापासून सावध राहिले पाहिजे. युद्धातून कोणाला फायदा होतो आणि कोणाचे नुकसान होते हे आपण व्यवस्थित समजून घेतले पाहिजे आणि जनतेला सत्याची जाणीव करून दिली पाहिजे. जेव्हा सीमेवर तणाव किंवा चकमकीची बातमी येते तेव्हा मीडिया आणि संकुचित विचारसरणीचा मध्यमवर्ग युद्धाचा उन्माद भडकवण्यात मग्न होतो. अशा परिस्थितीत अनेक लोकांच्या नसा फडफडू लागतात आणि सगळीकडे “बदला घ्या!”, “धडा शिकवा!”, “घरात घुसून मारून टाका!” अशा उन्मादी घोषणा ऐकू येऊ लागतात. मध्यमवर्गीय लोकच या प्रकारच्या खोट्या राष्ट्रवादाला जास्त बळी पडतात ! तीव्र प्रतिस्पर्धा असूनही, भारतीय आणि विदेशी कॉर्पोरेट घराणे एकमेकांशी हातमिळवणी करून नफा कमावण्याच्या प्रयत्नात गुंतलेले आहेत. कामगार वर्ग कधीही स्वतःहून युद्धाच्या उन्मादाला बळी पडत नाही आणि सत्य बाहेर येताच तो त्यातून लवकर सावरतो. परंतु बनावट राष्ट्रवादाच्या गर्मीमध्ये इतिहासाची जाणीव नसलेला एक वर्ग भूतकाळाची किंवा भविष्याची पर्वा न करता, स्वतःच्या धुंदीत विनाशाची तयारी करण्याचा प्रयत्न करत राहतो. आणि हे तेच लोक आहेत जे सैनिकांना चांगले अन्न आणि आवश्यक उपकरणे यासारख्या मूलभूत गरजांपासून वंचित ठेवले जाते तेव्हा मात्र गप्प राहतात !

आम्ही मागणी करतो की पहलगाम आणि पुलवामासह अशा सर्व हल्ल्यांची उच्चस्तरीय निष्पक्ष चौकशी व्हावी. अलिकडच्या दशकांमध्ये, पाकिस्तानच्या शासक वर्गाला बलुच, पश्तून आणि पाकव्याप्त काश्मीरमधील काश्मिरी लोकांवर होणाऱ्या राष्ट्रीय दडपशाहीविरुद्ध जनतेच्या प्रतिकाराचा सामना करावा लागत आहे. तेथील बिघडत्या आर्थिक परिस्थितीमुळे जनतेमध्ये मोठ्या प्रमाणात संताप निर्माण झाला आहे. जेव्हा जेव्हा तिथे जनतेचा असंतोष वाढतो तेव्हा तिथले राज्यकर्ते खऱ्या मुद्द्यांपासून जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी काश्मीरचा मुद्दा उपस्थित करतात. सध्या भारताच्या अर्थव्यवस्थेची स्थितीही चांगली नाही. इथेही वेळोवेळी लोकांना जाती आणि धर्माच्या नावाखाली भांडायला लावण्याचे प्रयत्न सुरूच असतात. सध्या देशातील जनता शिक्षण, आरोग्य सेवा आणि रोजगारापासून वंचित आहे आणि वाढती महागाई आणि बेरोजगारीने जनतेचे कंबरडे मोडले आहे. सीमेवरील संघर्ष आणि युद्धाच्या परिस्थितीमध्ये लोक त्यांचे खरे प्रश्न विसरतात आणि युद्धाच्या उन्मादात वाहून जातात. सीमेवरील वाढत्या तणावामुळे सरकारांना जनतेचे लक्ष खऱ्या मुद्द्यांपासून विचलित करता येते आणि शासक वर्गाला दिलासा मिळतो. पण यामुळे जनतेसमोरील समस्यांचा डोंगर आणखी वाढणार हे निश्चित.

विचार करण्यासारखी गोष्ट म्हणजे या लष्करी संघर्षांचा, युद्धांचा आणि युद्धाच्या उन्मादाचा फटका कोणाला बसतो ? स्पष्ट आहे, सर्वसामान्य जनतेला ! त्यांचीच तरुण मुले आणि मुली सीमेवर मरतात. युद्धाच्या उन्मादाचा राजकीय फायदा घेणारे राजकारणी आणि युद्ध उन्मादात वाहलेले द्वेषाने भरलेले लोक, ज्या सैनिकांना सूडाचे “नायक” बनवून युद्धाच्या भट्टीत टाकू इच्छितात त्यांच्या घरात कोणत्या प्रकारचे दुःखद वातावरण असते याची त्यांना कल्पना नसते ! आणि युद्धाच्या उन्मादाच्या विषारी वातावरणात जनतेचे खरे प्रश्नही गायब केले जातात. साम्राज्यवादी युद्धे आणि युद्धखोरीचा फायदा कोणाला होतो? स्पष्ट आहे भांडवलदार वर्गाला आणि त्यांची चाकरी करणाऱ्या सरकारांना. कारण एकतर युद्धांदरम्यान भांडवलदारांना शस्त्रास्त्रांचा व्यवसाय करण्याची संधी मिळते. भांडवलशाही शस्त्रास्त्र उद्योग सामान्य निष्पाप लोकांच्या रक्ताच्या किंमतीवर भरभराटीला येतो. दुसरे म्हणजे, युद्धांदरम्यान होणाऱ्या विनाशामुळे भांडवली गुंतवणुकीच्या नवीन शक्यता निर्माण होतात आणि तिसरे म्हणजे या काळात लोकांना त्यांच्या हक्कांपासून वंचित ठेवणारी डळमळीत व्यवस्था कोसळण्याऐवजी पुन्हा काम करण्यास सक्षम होते. युद्धे आणि प्रादेशिक संघर्षांना जन्म देणारी भांडवलशाही व्यवस्था जोपर्यंत अबाधित राहील तोपर्यंत युद्धामध्ये जीव जात राहतील. म्हणून, आपल्या शक्तीचा वापर समतावादी आणि शोषणमुक्त समाज निर्माण करण्यासाठी केला पाहिजे. युद्धाच्या उन्मादाला बळी पडणे म्हणजे स्वतःच्या पायावर गोळी झाडून घेण्यासारखे होईल. कष्टकरी जनतेने आपापल्या देशातील सरकारांवर देशाला युद्धात ओढण्याविरुद्ध दबाव आणला पाहिजे आणि आपले खरे हक्क-अधिकार क्षणभरही विसरले नाही पाहिजेत.

देशातील कष्टकरी जनतेला युद्ध नको आम्हाला हवे शिक्षण, आरोग्य सुविधा, रोजगाराच्या संधी आणि चांगले राहणीमान युद्धाच्या उन्मादात फसून आपण सत्ताधारी वर्गाला त्यांच्या दुष्ट हेतूंमध्ये यशस्वी होऊ देता कामा नये!

Related posts

Leave a Comment

4 × 3 =