विद्यार्थी आणि राजकारण
एका महत्त्वपूर्ण राजकीय विषयावर आधारित हा लेख जुलै, १९२८ मध्ये ‘किरती’-मध्ये प्रसिद्ध झाला होता. त्या काळात अनेक नेते विद्यार्थ्यांना राजकारणामध्ये भाग न घेण्याचा सल्ला देत होते. त्यांच्या उत्तरादाखल लिहिलेला हा लेख अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. हा लेख संपादकीयमध्ये छापून आला होता, व बहुतेक भगतसिंह यांनी लिहिलेला आहे.
शिकणाऱ्या तरुणांनी (विद्यार्थ्यांनी) राजकीय कार्यात भाग घेऊ नये, या गोष्टीवर आज मोठी ओरड ऐकू येत आते. याबाबत पंजाब सरकारचे मत तर अगदी विचित्रच आहे. विद्यार्थ्यांनी महाविद्यालयात प्रवेश घेण्याआधी राजकीय कार्यात भाग घेणार नाही, अशा आशयाच्या अटीवर त्यांच्याकडून सह्या करून घेतल्या जातात. पुढे जाऊन आमचे दुर्भाग्य असे, की लोकांनी निवडून दिलेला आणि आज शिक्षणमंत्री असलेला मनोहर शाळा-महाविद्यालयांना परिपत्रक धाडतो, की ‘शिकविणाऱ्यांनी अथवा शिकणाऱ्यांपैकी कोणीही राजकीय कार्यात भाग घेऊ नये.’ काही दिवसांपूर्वीची गोष्ट लाहोरमध्ये स्टुडंट्स यूनियन अर्थात विद्यार्थी सभेच्या वतीने ‘विद्यार्थी सप्ताह’ साजरा केला जात होता. तिथे देखील विद्यार्थ्यांनी राजकीय कार्यात भाग घेऊ नये यावरच सर अब्दुल कादर आणि प्रोफेसर ईश्वरचंद्र नंदा यांनी जोर दिला होता.
पंजाबला राजकारणाच्या क्षेत्रात सर्वात मागासलेला (Politically backward) समजले जाते. याचे कारण काय आहे? पंजाबने काय कमी बलिदाने दिली आहेत? पंजाबने कमी संकटे झेलली आहेत का? मग आम्ही या बाबतीत इतके मागे असण्याचे कारण काय आहे? आमच्या शिक्षण विभागातील अधिकारी अगदी बुद्धू आहेत, हेच यामागचे उघड कारण आहे. आत्ताच्या पंजाब विधानसभेचे कामकाज बघितल्यानंतर हे चांगलेच स्पष्ट होते, की आज आपले शिक्षण हे कुचकामी आणि निरुपयोगी बनले आहे. आणि विद्यार्थी-युवकांची पिढी आपल्या देशाच्या व्यवहारात अजिबात भाग घेत नाही. त्यांना याबाबतचे काहीच ज्ञान असत नाही. ते जेव्हा शिकून बाहेर पडतात तेव्हा त्यापैकी काही विद्यार्थीच उच्च शिक्षण घेऊ शकतात; परंतु ते अशा वायफळ व बालिश गोष्टी करतात, की त्या ऐकून स्वत: पश्चात्ताप करत बसण्याशिवाय काहीच मार्ग उरत नाही. पुढे जे नवयुवक देशाची धुरा सांभाळणार आहेत त्यांची बुद्धी आजच पंगू बनविण्याचे प्रयत्न केले जात आहेत. याचे भविष्यात काय परिणाम होतील हे आपणच समजून घेणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांचे मुख्य काम शिक्षण घेणे हे आहे, हे आम्हांला मान्य आहे आणि त्यांनी आपले पूर्ण लक्ष त्यावर केंद्रित करावे; पण देशाच्या सद्य:स्थितीचे ज्ञान आणि ती सुधारण्याचे उपाय यांचा विचार करण्याची क्षमता विकसित करणे याचा शिक्षणात समावेश असू नये? आणि जर असे नसेल, तर जे शिक्षण फक्त कारकूनी करण्यासाठी घेतले जाते, त्या शिक्षणालाही आम्ही निरुपयोगी मानतो. मग अशा शिक्षणाची गरजच काय? काही महाचतुर लोक असे म्हणतात, “मुला, तु राजकारण बघून जरूर शिक आणि विचार कर, पण प्रत्यक्ष राजकारणात कोणत्याही प्रकारचा सहभाग घेऊ नकोस. तू अधिक लायक बनलास तर तेच देशाच्या दृष्टीने फायद्याचे आहे.”
हे मत अतिशय छान वाटते, पण तरीही आम्ही ते पूर्ण बाद करतो. कारण हे वरवरचे उथळ म्हणणे आहे. पुढच्या उदाहरणांतून ते अधिक स्पष्ट होईल. एके दिवशी एक विद्यार्थी ‘तरुणांना आवाहन-प्रिन्स क्रोपोट्कीन (An Appeal to the young – Prince Kropotkin) हे पुस्तक वाचत होता. एका प्रोफेसरसाहेबांनी त्याला विचारले, ‘हे कोणते पुस्तक आहे? हे तर बंगाली नाव वाटतेय.’ यावर तो मुलगा म्हणाला, ‘प्रिन्स क्रोपोट्किनचे नाव तर फारच प्रसिद्ध आहे.’ ते अर्थशास्त्राचे विद्वान होते. तसे पाहता प्रत्येक प्रोफेसरला हे नाव माहीत असणे अत्यंत आवश्यक होते. प्रोफेसरच्या ‘समजे’वर मुलगा हसला. मग तो म्हणाला, ‘ते रशियातील सद्गृस्थ होते.’ बस्स्! मुलाच्या तोंडून ‘रशिया’ हे शब्द बाहेर पडताच जणू आभाळ कोसळले. प्रोफेसर म्हणाले, ‘तू बोल्शेविक आहेस, कारण तू राजकीय पुस्तके वाचतोस.’
पाहिलीत प्राध्यापकाची पात्रता! बिचारे विद्यार्थी त्यांच्याकडून काय शिकणार? अशा परिस्थितीत आमचे युवक शिकणार तरी काय?
दुसरी गोष्ट, व्यावहारिक राजकारण म्हणजे तरी काय? महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू आणि सुभाषचंद्र बोस यांचे स्वागत करणे आणि भाषण ऐकणे हे झाले व्यावहारिक राजकारण, पण मग कमिशन किंवा व्हाईसरायचे स्वागत करण्याला काय म्हणायचे? ती राजकारणाची दुसरी बाजू नाही का? सरकार आणि देशाच्या व्यवस्थेशी निगडित कोणतीही गोष्ट जर राजकारण्याच्या आखड्यातील गोष्ट मानली जात असेल, तर मग हेदेखील राजकारण होते की नाही? कोणी म्हणेल, एकामुळे सरकार खूष होते आणि दुसऱ्यामुळे नाराज! म्हणजे मग प्रश्न सरकारच्या खुषीचा किंवा नाराजीचा झाला. म्हणजे विद्यार्थ्यांना जन्मापासून खुशमस्करी करण्याचा धडाच शिकविला जायला पाहिजे का? आमच्या मते जोपर्यंत हिंदुस्तानवर विदेशी डाकूंचे राज्य आहे, तोपर्यंत हे असले ‘प्रामाणिक’ लोक प्रामाणिक नव्हे तर विश्वासघातकी आहेत; हे माणूस नव्हे, पशू आहेत, पोटाचे गुलाम आहेत. मग विद्यार्थ्यांनी प्रामाणिकपणाचा धडा शिकावा, असे आपण कोणत्या तोंडाने म्हणू शकतो?
भारताला आज अशा देशसेवकांची गरज आहे, की जे देशासाठी तन-मन-धन अर्पण करतील आणि देहभान हरपून सारे आयुष्य देशाच्या स्वातंत्र्यासाठी समर्पित करतील, असे सर्वच मानतात. पण अशी माणसे काय वृद्धांमधून मिळतील? कौटुंबिक आणि दैनंदिन जीवनाच्या कटकटीत अडकलेल्या वयस्क लोकांमधून का अशी माणसे पुढे येतील? कसल्याही जंजाळात न अडकलेले युवकच असे पुढे येऊ शकतात आणि युवक-विद्यार्थ्यांनी जर फक्त परीक्षेसाठी गणित आणि भूगोलाची धोकंपट्टी नव्हे, तर काही व्यावहारिक ज्ञान प्राप्त केलेले असेल, तरच ते या जंजाळात अडकण्यापूर्वी असा विचार करू शकतात.
इंग्लंडच्या सर्व विद्यार्थ्यांनी कॉलेज सोडून जर्मनीच्या विरुद्ध लढण्यासाठी बाहेर पडणे, हे राजकारण नव्हते काय? तेव्हा हे उपदेश करणारे कुठे होते? ते त्यांना म्हणाले असते का, ‘जा, जाऊन आधी शिक्षण घ्या?’ बार्डोली सत्याग्रहातील लोकांना मदत करणारे अहमदाबादच्या नॅशनल कॉलेजचे विद्यार्थी काय मूर्खच राहतील? बघू, पंजाब विद्यापीठ त्यांच्या तुलनेत किती योग्य लोक निर्माण करते ते? सर्वच देशांना स्वातंत्र्य मिळवून देणारे हे तिथले विद्यार्थी आणि युवकच असतात. हिंदुस्तानमधील युवक वेगळे राहून आपले आणि आपल्या देशाचे अस्तित्व टिकवून ठेवू शकतील काय? १९१९ मध्ये विद्यार्थ्यांवर झालेला अन्याय युवक विसरू शकत नाहीत. त्यांना हेही समजते की, त्यांना एका मूलगामी क्रांतीची आवश्यकता आहे. त्यांनी शिकावे. जरूर शिकावे, पण त्याचबरोबर राजकारणाचेही ज्ञान प्राप्त करावे आणि वेळ येईल तेव्हा मैदानात उतरावे, आणि आपले जीवन याच कार्यासाठी समर्पित करावे. आपल्या प्राणांचे यासाठी बलिदान करावे. आपल्याला वाचवू शकेल असा दुसरा कोणताच मार्ग समोर दिसत नाही.