गौरी लंकेश यांचे शेवटचे संपादकीय
(मूळ कन्नड. हिंदी अनुवादावरून केलेला मराठी अनुवाद, अनुवादक : अभिजीत )
पत्रिकेबद्दल: ‘गौरी लंकेश पत्रिका’ असे नियतकालिकाचे नाव आहे. 16 पानांचे हे साप्ताहिक होते. 15 रुपये किंमत असायची. 13 सप्टेंबरचा अंक शेवटचा अंक होता. त्यांच्या शेवटच्या संपादकीयाचा हा मराठी अनुवाद आहे. कन्नड मध्ये लिहीणाऱ्या या लेखिकेच्या विचारांचा परिचय मराठी वाचकांना व्हावा म्हणून हा अनुवाद. गौरी ‘कंडा हागे’ या नावाने आपला स्तंभ लिहीत होत्या. ‘कंडा हागे‘ चा अर्थ आहे ‘मी पाहिले तसे’. शेवटचे संपादकीय पुढे दिले आहे.
खोट्या बातम्यांच्या (फेक न्यूज)च्या काळात
या आठवड्याच्या अंकात माझे मित्र डॉ. वासू यांनी भारतात गोबेल्सच्या पद्धतीने चालणाऱ्या खोट्या बातम्यांच्या कारखान्यांबद्दल लिहीले आहे. खोटारडेपणाच्या अशा कारखान्यांना बहुतक करून मोदी भक्तच चालवतात. अफवा पसरवण्याच्या या कारखान्यांमुळे जे नुकसान होत आहे त्याबद्दल मी आपल्या संपादकीयात सांगण्याचा प्रयत्न करेल. आता परवाच गणेश चतुर्थी झाली. त्यादिवशी सामाजिक प्रसारमाध्यमांवर (सोशल मीडीया)वर एक अफवा पसरवली गेली. पसरवणारे संघाचे लोक होते. काय होती ही अफवा? असे म्हटले की कर्नाटक सरकार म्हणेल तिथेच गणेशमूर्ती स्थापन करावी लागेल, अगोदर दहा लाख रुपये सुरक्षाठेव (डिपॉझिट) करावी लागेल, मूर्तीची उंची किती असावी यासाठी सरकारची परवानगी घ्यावी लागेल, दुसऱ्या धर्माचे लोक जिथे राहतात त्या रस्त्यांवरून विसर्जनासाठी नाही जाऊ शकणार, फटाके फोडू नाही शकणार. संघाच्या लोकांनी या अफवेला जोरजोरात पसरवले. ही अफवा इतकी पसरली की शेवटी कर्नाटक पोलिस प्रमुख आर. के. दत्ता यांना पत्रकार परिषद बोलावून स्पष्टीकरण द्यावे लागले की सरकारने असे कोणतेही नियम बनवलेले नाहीत व हे सगळं खोटं आहे.
या अफवेचा मूळ स्त्रोत जेव्हा आम्ही शोधला तेव्हा postcard.in नावाच्या वेबसाईटवर जाऊन पोहोचलो. ही वेबसाईट नक्कीच हिंदुत्ववाद्यांची आहे. या वेबसाईटचे काम आहे की दररोज खोट्य़ा बातम्या बनवून सोशल मीडीयावर पसरवणे. 11 ऑगस्ट रोजी postcard.in वर एक मुख्य बातमी झळकली. कर्नाटकात तालिबान सरकार. या बातमीद्वारे सर्व राज्यभरात अफवा पसरवण्याचा प्रयत्न झाला. संघाचे लोक यातही यशस्वी झाले. जे लोक काही न काही कारणांमुळे सिद्धारामय्या सरकार विरुद्ध नाराज असायचे त्या लोकांनी या अफवेला आपले हत्यार बनवले. सगळ्य़ात आश्चर्य आणि खेदाची गोष्ट ही की लोकांनी सुद्धा काहीही न समजता या गोष्टीला खरे मानले. आपल्या कान, नाक आणि मेंदूचा वापरही नाही केला.

खरेतर गेल्या वर्षी पर्यंत संघाच्या अफवांच्या प्रचाराला थांबवणारे कोणीच नव्हते. आता अनेक लोक या कामात गुंतले आहेत ही चांगली गोष्ट आहे. अगोदर अशा अफवा पसरत रहायच्या, आता अफवांसोबत खऱ्या बातम्या येणेसुद्धा चालू झाले आहे आणि लोक त्यांना वाचतही आहेत.
उदाहरणार्थ जेव्हा 15 ऑगस्ट रोजी पंतप्रधानांनी लाल किल्यावरून भाषण दिले तेव्हा त्याचे एक विश्लेषण 17 ऑगस्ट रोजी खुप व्हायरल झाले. ध्रुव राठींनी त्याचे विश्लेषण केले होते. ध्रुव राठी दिसायला तर कॉलेजच्या पोरासारखे आहेत परंतु गेले अनेक महिने ते मोदींचा खोटारडेपणा सामाजिक प्रसारमाध्यमांवर उघडकीस आणत आहेत. अगोदर हा व्हिडीओ आमच्यासारख्या लोकांनाच दिसत होता, सामान्य लोकांपर्यंत पोहोचत नव्हता, परंतु 17 ऑगस्टचा व्हिडीओ एका दिवसात लाखापेक्षा जास्त लोकांपर्यंत पोहोचला. ध्रुव राठींनी सांगितले की राज्यसभेत ‘बूसी बसिया’ सरकारने (गौरी लंकेश अनेकदा मोदींना बूसी बसिया म्हणत ज्याचा अर्थ आहे जेव्हाही बोलतील खोटंच बोलतील) महिनाभर अगोदर सांगितले होते की 33 लाख नवीन करदाते आले आहेत. त्याअगोदर अर्थमंत्री अरुण जेटलींनी 91 लाख करदाते जोडले गेल्याचे म्हटले होते. शेवटी आर्थिक सर्वेक्षणात म्हटले गेले की फक्त 5 लाख 40 हजार नवीन करदात जोडले गेले आहेत. यापैकी काय खरे आहे हाच प्रश्न ध्रुव राठींनी आपल्या व्हिडीओ मध्ये उचलला आहे.

आज राष्ट्रीय स्वंयसेवक संघाकडून अशाप्रकारे पसरवल्या जाणाऱ्या अफवांचे सत्य समोर आणण्यासाठी अनेक लोक पुढे आले आहेत. ध्रुव राठी व्हिडीयोच्या माध्यमातून हे काम करत आहेत. प्रतिक सिन्हा altnews.in नावाच्या वेबसाईटच्या माध्यमातून हे काम करत आहेत. हॉक्स स्लेयर, बूम आणि फॅक्ट चेक सारख्या वेबसाईट्स हे काम करत आहेत. यासोबतच thewire.in, scroll.in, newslaundry.com, thequint.com सारख्या वेबसाईट्स सुद्धा सक्रीय आहेत. मी ज्या लोकांचे नाव घेतले आहे त्यातील अनेकांनी नुकतेच अनेक अफवांच्या वास्तवाला समोर आणले आहे. यांच्या कामामुळे संघी लोक फारच त्रस्त आहेत. यात अजून महत्वाची गोष्ट अशी की हे लोक पैशांसाठी काम करत नाहीयेत. त्यांचे एकच उद्दिष्ट आहे: फासीवादी लोकांच्या अफवांच्या कारखान्याला लोकांसमोर आणणे.
काही आठवड्यांअगोदरच बंगळुर मध्ये जोरदार पाऊस झाला. त्यावेळी संघाच्या लोकांनी एक फोटो व्हायरल केला. खाली लिहिले होते की नासाने मंगळावर लोक चालत असल्याचा फोटो दिला आहे. बंगळूर नगरपालिका बीबीएमसीने वक्तव्य दिले की हा फोटो मंगळ ग्रहाचा नाहीये. संघाचे उद्दिष्ट होते की मंगळ ग्रह सांगून बंगळूरची थट्टा करायची. यातून लोकांना हा संदेश गेला असता की सिद्धरामय्या सरकार काहीच काम करत नाहीय़े म्हणून इथले रस्ते खराब झाले आहेत. परंतु त्यांना हे भलतेच महागात पडले कारण हा फोटो बंगळूरचा नव्हता तर महाराष्ट्राचा होता जिथे भाजपचे सरकार आहे.
नुकत्याच पश्चिम बंगाल मध्ये जेव्हा दंगली झाल्या तेव्हा संघाच्या लोकांनी दोन पोस्टर काढले होते. एका पोस्टरखाली लिहीले होते बंगाल जळत आहे, ज्यात मालमत्ता जळत असल्याचे चित्र होत. दुसऱ्या फोटोमध्ये एका महिलेची साडी ओढली जात होती आणि खाली लिहीले होते बंगालमधील हिंदू महिलांसोबत होणारे अत्याचार. लवकरच या फोटोंचे सत्य समोर आले. पहिला फोटो गुजरात मधील 2002 सालच्या दंगलींचा होता जिथे मुख्यमंत्री मोदींचे सरकार होते. दुसरा फोटो भोजपुरी सिनेमातील एका दृश्याचा होता.
संघच नाही तर भाजपचे केंद्रीय मंत्री सुद्धा अशा खोट्या बातम्या पसरवण्यात पटाईत आहेत. उदाहरणार्थ, केंद्रीय मंत्री नितिन गडकरींनी एक फोटो सामायिक (शेअर) केला होता ज्यात लोक तिरंग्याला आग लावत होते. खाली लिहिले होते की प्रजासत्ताक दिनी हैदराबाद मध्ये तिरंग्याला आग लावली जात आहे. आता गूगल इमेज सर्च (गुगलची चित्र शोधणारी सोय) एक नवीन सुविधा देत आहे ज्यात कोणताही फोटो टाकला की समजते की फोटो कधीचा आणि कुठला आहे. प्रतिक सिन्हांनी हे काम केले आणि गडकरींच्या खोटारडेपणाला समोर आणले. असे दिसून आले की हा फोटो हैदराबादचा नाही तर पाकिस्तानातील आहे जिथे एका बंदी घातलेल्या कट्टरपंथी संघटनेनेने भारताच्या विरोधात तिरंगा जाळला होता.
याचप्रकारे टीव्हीवर पॅनेल चर्चेत भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी म्हटले की सीमेवर सैनिकांना तिरंगा फडकवण्यात किती अडचणी येतात, तर जेएनयू सारख्या विद्यापीठांमध्ये तिरंगा फडकवण्यात काय अडचण आहे? प्रश्न विचारून संबितने एक फोटो दाखवला. नंतर समजले की हा फोटो एक प्रसिद्ध फोटो आहे पण यात भारतीय सैनिक नसून अमेरिकन सैनिक आहेत. दुसऱ्या महायुद्धाच्या दरम्यान अमेरिकन सैनिकांनी जेव्हा जपानच्या एका बेटावर कब्जा केला होता तेव्हा आपला झेंडा फडकवला होता. परंतु चित्रामध्ये फेरबदल करून संबित पात्रा लोकांना भरकटवत होते. त्यांना हे फार महगात पडले. ट्वीटरवर लोकांनी संबित पात्रांची खुप खिल्ली उडवली.
केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी नुकताच एक फोटो सामायिक केला. लिहिले होते की 50,000 किलोमीटर रस्त्यांवर सरकारने 30 लाख एलईडी बल्ब लावले आहेत. परंतु त्यांनी दिलेला फोटो खोटा निघाला. भारतातील नाही तर 2009 मधील जपानचा हा फोटो होता. याच गोयलांनी अगोदर एक ट्वीट केले होते की कोळशाच्या पुरवठ्यामध्ये भारत सरकाने 25,000 कोटींची बचत केली आहे. या ट्वीटमधील फोटोही खोटा निघाला.
छत्तीसगड मधील सार्वजनिक बांधकाम खाते मंत्री राजेश मूणत यांनी एका पुलाचा फोटो सामायिक केला होता. आपल्या सरकारचे यश त्यांनी सांगितले होते. त्या ट्वीटला 2000 जणांनी पसंती दिली. नंतर समजले की तो फोटो छत्तीसगडचा नाही व्हिएतनामचा होता.
अशा खोट्या बातम्या बनवण्यामध्ये आमचे कर्नाटकचे संघाचे आणि भाजपाचे नेते सुद्धा कमी नाहीत. कर्नाटकातील खासदार प्रताप सिम्हा यांनी एक अहवाल सामायिक केला आणि म्हटले की हा टाईम्स ऑफ इंडियामध्ये आला आहे. त्यात मथळा होता की हिंदू मुलीने मुस्लिम मुलाचा चाकूने खून केला. सर्व जगाला नैतिकतेचे ज्ञान देणाऱ्या प्रतिक सिम्हा यांनी सत्य जाणून घेण्याचा थोडाही प्रयत्न केला नाही. कोणत्याही वर्तमानपत्राने या बातमीला छापले नव्हते तर फोटोमध्ये फेरबदल करून दुसऱ्या बातमीला मथळा चिटकवून फोटो बनवला होता, आणि हिंदू-मुस्लिम रंग देण्यात आला होता. यासाठी टाईम्स ऑफ इंडियाचे नाव वापरले गेले. जेव्हा गदारोळ झाला तेव्हा समजले की ही तर बनावट बातमी आहे, आणि मग खासदारांनी बातमी काढून टाकली पण माफी मात्र मागितली नाही. जातीय़ असत्य पसरवल्याबद्दल कोणताही पश्चाताप सुद्धा जाहीर केला नाही.
माझे मित्र वासू यांनी यावेळी स्तंभात लिहिल्याप्रमाणे मी सुद्धा एकदा न समजता एक खोटी बातमी सामायिक केली होती. गेल्या रविवारच्या पाटण्यातील आपल्या रॅलीची बातमी लालू यादवांनी बनावटी फोटो वापरून सामायिक केली होती. थोड्याच वेळात शशिधरने सांगितले की फोटो नकली आहे. मी लगेच काढून टाकले आणि चूक मान्यही केली. एवढेच नाही तर खोटा आणि खरा फोटो सुद्धा एकत्रच ट्वीटही केला. या चूकेमागे जातीय भावना भडकावण्याचा किंवा प्रचाराचा उद्देश नव्हता. फासीवाद्यांविरोधात लोक जमा होत आहेत हा संदेश देणे माझे उद्दिष्ट होते. शेवटी, जे लोक खोट्या बातम्यांना उघडकीय आणत आहेत, त्यांना सलाम. माझी इच्छा आहे की त्यांची संख्या अजून वाढो.