भगतसिंह – बॉम्‍ब प्रकरणात सत्र न्यायालयात निवेदन

बॉम्‍ब प्रकरणात सत्र न्यायालयात निवेदन

असेंब्‍लीमध्‍ये बॉम्‍ब फेकल्‍यानंतर ६ जून १९२९ रोजी दिल्‍ली सत्र न्यायालयाचे न्यायाधीश लिओनार्ड मिडल्टन यांच्यासमोर शहीद भगतसिंह व बटुकेश्‍वर दत्‍त यांनी केलेले ऐतिहासिक निवेदन

आमच्‍यावर गंभीर आरोप ठेवले गेले आहेत. त्‍यामुळे आमची बाजू मांडण्‍यासाठी आम्‍हीही काही गोष्‍टी सांगणे आवश्‍यक आहे. आमच्‍या तथाकथित गुन्‍ह्याविषयी खालील प्रश्‍न उद्भवतात : (१) असेंब्‍लीत बॉम्‍ब फेकले गेले होते हे सत्‍य आहे का? आणि असेल, तर ते का फेकले गेले होते? (२) खालच्‍या कोर्टात आमच्‍यावर जे आरोप ठेवले गेले आहेत, ते खरे आहेत की खोटे?

पहिल्‍या प्रश्‍नाच्‍या पहिल्‍या भागाबद्दल आमचे उत्‍तर होकारार्थी आहे. परंतु तथाकथित ‘डोळ्यांनी प्रत्‍यक्ष पाहणाऱ्या’ साक्षीदारांनी याबातीत जी साक्ष दिली आहे, ती निकालस खोटी आहे. आम्‍ही बॉम्‍ब फेकल्‍याचे नाकारत नाही, आणि म्‍हणूनच इथे या साक्षीदारांच्‍या जबान्‍यांचा खरेपणा पारखून पाहिला गेला पाहिजे. उदाहरणार्थ, आम्‍ही हे सांगू इच्छितो की आम्‍हा दोघांपैकी एकाकडून पिस्‍तूल जप्‍त केले, हे सार्जंट टेरीचे म्‍हणणे धडधडीत असत्‍य आहे. कारण आम्‍ही जेव्‍हा स्‍वेच्‍छेने स्‍वत:ला पोलिसांच्‍या स्‍वाधीन केले, तेव्‍हा आमच्‍या दोघांपैकी कुणाजवळही मुळीच पिस्‍तूल नव्‍हते. आम्‍हाला बॉम्‍ब फेकताना पाहिले असे ज्‍या साक्षीदारांनी सांगितले, ते खोटे बोलत आहेत. न्‍याय आणि सचोटी यावर विश्‍वास ठेवणाऱ्या लोकांनी या खोट्या गोष्‍टीपासून एक धडा घेतला पाहिजे. त्‍याचबरोबर सरकारी वकिलांचा आमच्‍याबरोबरचा व्‍यवहार योग्‍य होता आणि न्‍यायालयाने आम्‍हांला आजवर दिलेली वागणूक न्‍यायाला धरून होती, हे आम्‍ही मान्‍य करतो.

पहिल्‍या प्रश्‍नाच्‍या दुसऱ्या भागाचे उत्‍तर देण्‍यासाठी आम्‍हांला या बॉम्‍ब फेकण्‍याच्‍या ऐतिहासिक घटनेचा जरा विस्‍तारपूर्वक परामर्श घ्‍यावा लागेल. आम्‍ही हे कृत्‍य कोणत्‍या उद्देशाने आणि कोणत्‍या परिस्थितीत केले, याचे संपूर्ण स्‍वच्‍छ स्‍पष्‍टीकरण करणे आवश्‍यक आहे.

तुरुंगामध्‍ये आमच्‍याकडे काही पोलिस अधिकारी आले होते. त्‍यांनी आम्‍हांला सांगितले की या (बॉम्‍ब फेकण्‍याच्‍या) घटनेनंतर लगेच लॉर्ड आयर्विनने असेंब्‍लीच्‍या दोन्‍ही सभागृहांच्‍या एकत्रित अधिवेशनात सांगितले, की “हा विद्रोह कुणा एका विशिष्‍ट व्‍यक्‍तीच्‍या विरूद्धचा नव्‍हता, तर तो संपूर्ण शासनव्‍यवस्‍थेच्‍या विरुद्ध होता.” हे ऐकून आम्‍ही त्‍वरित ताडले, की आमच्‍या या कृत्‍यामागील उद्दिष्‍ट लोकांना खऱ्या अर्थी समजून आले आहे.

मानवतेवर प्रेम करण्‍याच्‍या बाबतीच आम्‍ही इतर कुणाहीपेक्षा तसूभरही मागे नाही. आम्‍ही कुणाचाही व्‍यक्तिगत द्वेष करीत नाही आणि आम्‍ही सर्व प्राणिमात्रांकडे नेहमी आदराने पाहत आलो आहोत. स्‍वत:ला सोशालिस्‍ट म्‍हणवणाऱ्या दिवाण चमनलालने म्‍हटल्‍याप्रमाणे, आम्‍ही रानटी वर्तनाने देशाला कलंक लावणारे उपद्रवी लोक नाही; किंवा लाहोरचे ‘ट्रिब्‍यून’ आणि इतर काही वर्तमानपत्रे जसे सिद्ध करू पाहत आहेत, तसे माथेफिरूही आम्‍ही नाही. स्‍वत:च्‍या देशाचा इतिहास, त्‍याची सद्य:परिस्थिती आणि मानवोचित आकांक्षा यांचा अभ्‍यास करणारे आम्‍ही केवळ मननशील विद्यार्थी आहेत, एवढाच विनम्रतापूर्वक दावा आम्‍ही करू शकतो. ढोंगीपणा आणि पाखंडीपणा यांचा आम्‍ही तिरस्‍कार करतो.

एक अनर्थकारक संस्‍था

हे कृत्‍य आम्‍ही कोणत्‍याही व्‍यक्तिगत स्‍वार्थपोटी किंवा विद्वेषाच्‍या भावनेने केलेले नाही. ज्‍या शासनाच्‍या प्रत्‍येक कृतीतून त्‍याची अयोग्‍यताच नव्‍हे, तर अपाय करण्‍याची अमाप क्षमतासुद्धा प्रकट होते, अशा शासन-व्‍यवस्‍थेला विरोध व्‍यक्‍त करणे हाच आमचा उद्देश होता. या विषयावर आम्‍ही जितका जास्‍त विचार केला तितका आमचा असा दृढ विश्‍वास होत गेला, की जगासमोर भारताच्‍या लज्‍जास्‍पद आणि असहाय अवस्‍थेचे ढोल बडवून जाहिरात करणे, एवढ्यासाठीच केवळ हे शासन तेथे आहे. हे शासन म्‍हणजे एक बेजबाबदार आणि निरंकुश सत्‍तेचे प्रतीक आहे.

जनतेच्‍या प्रतिनिधींनी कितीतरी वेळा आपल्‍या राष्‍ट्रीय मागण्‍या सरकारसमोर मांडल्‍या, परंतु त्‍या मागण्‍यांची सर्वथा अवहेलना करून सरकारने त्‍यांना कचऱ्याची टोपलीच दाखवली. संसदेने पास केलेल्‍या गंभीर ठरावांना भारताच्‍या तथाकथित पार्लमेंटसमोरच तिरस्‍कारपूर्वक पायदळी तुडवले गेले आहे. दमनकारक आणि निरंकुश कायदे रद्द करू पाहणाऱ्या ठरावांकडे नेहमीच अवहेलनेच्‍या नजरेने पाहिले गेले आहे. जनतेने निवडून दिलेल्‍या प्रतिनिधींनी सरकारने ज्‍या कायद्यांना आणि ठरावांना ते लादले गेलेले तसेच अवैध ठरवून रद्द केले होते; त्‍यांना केवळ लेखणीच्‍या फटकाऱ्याने सरकारने पुन्‍हा लागू केले आहे.

थोडक्‍यात, या सध्‍याच्‍या शासनसंस्‍थेचे अस्तित्‍व टिकून राहण्‍यात काय चांगले आहे, हे खूप विचार करूनही आम्‍हांला समजू शकलेले नाही. ही शासनसंस्‍था भारतातील कोट्यवधी कष्‍टकऱ्यांच्‍या श्रमांच्‍या कमाईच्‍या आधारे जरी डामडौल करत असली, तरी ती एक केवळ कुचकामी, मनोरंजक, पोकळ, दिखाऊ व बदमाशीने भरलेली अशी संस्‍था आहे. आमच्‍या सार्वजनिक नेत्‍यांची मनोवृत्‍ती समजून घेण्‍यासही आम्‍ही असमर्थ आहोत. भारताच्‍या असाहाय पारतंत्र्याची इतक्‍या उघडपणे व पूर्वनियोजित पद्धतीने खिल्‍ली उडवण्‍यामध्‍ये व त्‍याचे प्रदर्शन मांडण्‍यामध्‍ये एवढ्या सार्वजनिक संपत्‍तीचा आणि वेळेचा अपव्‍यय केला जात असताना, आमची नेतेमंडळी त्‍याला साहाय्य का करतात ते आम्‍हांला कळू शकत नाही.

आम्‍ही या समस्‍यांबद्दल आणि कामगार आंदोलनाच्‍या नेत्‍यांच्‍या धरपकडीबद्दल विचार करत होतो. इतक्‍यात औद्योगिक विवाद विधेयक (ट्रेड्स डिस्‍प्‍युट बिल) घेऊन सरकार सामोरे आले. याच संबंधात असेंब्‍लीमधील कामकाज पाहण्‍यासाठी आम्‍ही गेलो. जी असेंब्‍ली दीनदुबळ्या श्रमिकांच्‍या दास्‍याची आणि शोषण करणाऱ्यांच्‍या गळाकापू शक्‍तीची कडवट आठवण करून देते; त्‍या संस्‍थेकडून भारतातील लाखो श्रमिक लोक कोणत्‍याही गोष्‍टीची अपेक्षा करू शकत नाहीत, हा आमचा विश्‍वास तेथे गेल्‍यावर आणखीनच दृढ झाला.

ज्‍याला आम्‍ही रानटी आणि अमानुष समजतो असा तो कायदा शेवटी देशाच्‍या प्रतिनिधींच्‍या माथी मारला गेला. कोट्यवधी संघर्षरत भुकेल्‍या कामगारांना अशा प्रकारे त्‍यांच्‍या प्राथमिक हक्‍कांपासून वंचित केले गेले. त्‍यांच्‍या आर्थिक मुक्‍तीचे एकमेव हत्‍यारदेखील त्‍यांच्‍या हातातून हिसकावून घेतले गेले. अंग मोडून मेहनत करणाऱ्या मूक श्रमिकांच्‍या परिस्थितीचा ज्‍याने आमच्‍याप्रमाणे विचार केला आहे, असा कुणीही माणूस शांत चित्‍ताने हे सर्व पाहू शकणार नाही. शोषकांच्‍या बलिवेदीवर – आणि सरकार स्‍वत:च सर्वांत मोठा शोषक आहे – मजुरांचे दररोज होणारे ते बकऱ्यासारखे मूक बलिदान पाहून ज्‍याच्‍या आतड्याला पीळ पाडतो, तो माणूस स्‍वत:च्‍या आत्‍म्‍याच्‍या चित्‍काराची उपेक्षा करू शकत नाही.

गव्‍हर्नर जनरलच्‍या कार्यकारिणी समितीचे भूतपूर्व सदस्‍य दिवंगत एस. आर. दास यांनी आपल्‍या मुलाला लिहिलेल्‍या प्रसिद्ध पत्रात म्‍हटले होते, की इंग्‍लंडची सुखनिद्रा भंग करण्‍यासाठी बॉम्‍ब उपयोग आवश्‍यक आहे. श्री. दास यांचे हेच शब्‍द प्रमाण मानून आम्‍ही संसद भवनात बॉम्‍ब फेकले. कामगारांच्‍या वतीने बिलाचा निषेध व्‍यक्‍त करण्‍यासाठी आम्‍ही हे कृत्‍य केले. आपल्‍या जीवघेण्‍या यातना व्‍यक्‍त करण्‍यासाठी त्‍या निराधार मजुरांकडे दुसरे कोणतेही साधन नव्‍हते. आमचा एकमेव उद्देश होता- ‘बहिऱ्यांना ऐकवणे’ आणि संधी मिळालीच तर या पीडित जनतेच्‍या मागण्‍यांकडे दुर्लक्ष करणाऱ्या सरकारला वेळ आहे तोवर इशार देणे, हे आमचे एकमेव उद्दिष्‍ट होते.

अथांग प्रशांत सागररूपी भारतीय मानवतेची ही वरवर दिसणारी शांतता म्‍हणजे कोणत्‍याही क्षणी उद्भवू शकणाऱ्या एका भीषण तुफानाचे चिन्‍ह आहे. येणाऱ्या भीषण संकटाची पर्वा न करता बेफाम वेगाने पुढे धावणाऱ्या लोकांसाठी आम्‍ही तर फक्‍त धोक्‍यची घंटा वाजवली आहे. ‘स्‍वप्‍नाळू अहिंसे’चे युग आता सरले आहे आणि आजच्या उदयोन्मुख पिढीच्या मनात या स्वप्नाळू अहिंसेच्‍या व्‍यर्थतेबद्दल कोणत्‍याही प्रकारचा संदेह उरलेला नाही, एवढेच फक्‍त आम्‍ही जनतेला सांगू इच्छितो.

मानवतेबद्दल आम्‍हाला हार्दिक सद्भावना आणि निस्‍सीम प्रेम वाटत असल्‍यामुळे निरर्थक रक्‍तपातापासून तिला वाचवण्‍यासाठीच, केवळ इशारा देण्‍याकरता आम्‍ही या उपायाचा आधार घेतला. आणि नजिकच्‍या भविष्‍यातला तो रक्‍तपात आम्‍हांलाच नव्‍हे, तर लाखो लोकांना आधीपासूनच दिसतो आहे.

स्‍वप्‍नाळू अहिंसा

वर आम्‍ही ‘स्‍वप्‍नाळू अहिंसा’ हा शब्‍दप्रयोग वापरला आहे. येथे त्‍याची व्‍याख्‍या करणे आवश्‍यक आहे. आक्रमण करण्‍याच्‍या हेतूने जेव्‍हा बळाचा वापर केला जातो, तेव्‍हा त्‍याला हिंसा म्‍हणतात आणि नैतिक दृष्टिकोनातून त्‍याचे समर्थन करता येत नाही. परंतु जेव्‍हा एखाद्या उचित आदर्शासाठी त्‍याचा वापर केला जातो, तेव्‍हा नैतिकदृष्‍ट्याही हे उचित असते. कोणत्‍याही परिस्थितीत बलप्रयोग केला जाऊ नये, हा विचार स्‍वप्‍नाळू आणि अव्‍यवहारी आहे. गुरू गोविंदसिंह, छ. शिवाजी, केमाल पाशा, रिजाखान, वॉंशिंग्‍टन, गॅरीबाल्‍डी, लाफायेत आणि लेनिन यांच्‍या आदर्शांपासून स्‍फूर्ती घेऊन आणि त्‍यांच्‍या पाऊलखुणांवर पाऊल ठेवूनच भारतात उसळणारे हे नवे आंदोलन निर्माण होत आहे. आणि त्‍याची पूर्वसूचना आम्‍ही देत आहोत. भारतातील परकीय सरकार आणि आमचे राष्‍ट्रीय पुढारी दोघेही या आंदोलनाबाबत उदासीन आहेत. ते जाणूनबुजून या आंदोलनाच्‍या हाकांना प्रतिसाद न देता आपले कान बंद ठेवण्‍याचा प्रयत्‍न करीत आहेत. म्‍हणून ज्‍याकडे दुर्लक्ष करता येणार नाही असा एक इशारा त्‍यांना देणे, हे आम्‍ही आमचे कर्तव्‍य मानले.

आमचे म्‍हणणे

आतापर्यंत आम्‍ही या घटनेमागील मूळ उद्देशावरच प्रकाश टाकला. आता आम्‍ही आमचे म्‍हणणे काय आहे हे स्‍पष्‍ट करू इच्छितो.

या घटनेमध्‍ये मामुली जखमा झालेल्‍या व्‍यक्‍तींबद्दल किंवा असेंब्‍ली मधील कुणाही दुसऱ्या व्‍यक्‍तीबद्दल आमच्‍या मनात थोडीही वैयक्तिक द्वेषभावना नव्‍हती, हे सांगण्‍याची जरूरी नाही. याउलट आम्‍ही पुन्‍हा एकदा स्‍पष्‍ट करू इच्छितो की मानव जीवनाला आम्‍ही अत्‍यंत पवित्र मानतो. दुसऱ्या कुणा व्‍यक्‍तीला इजा करण्‍याऐवजी मानवजातीची सेवा करता करता आम्‍ही स्‍वत:हसत हसत प्राणर्पण करू. मनुष्‍यहत्‍या हेच ज्‍यांचे काम असते त्‍या साम्राज्‍यशाहीच्‍या भाडोत्री सैनिकांसारखे आम्‍ही नव्‍हेत. आम्‍ही मानव जीवनाची कदर करतो आणि त्‍याचे रक्षण करण्‍याचा सतत आटोकाट प्रयत्‍न करतो. असे असूनही आम्‍ही हे मान्‍य करतो की आम्‍ही जाणूनबुजून असेंब्‍लीत बॉम्‍ब फेकले.

मूळ घटनाच आमच्‍या या म्‍हणण्‍यावर प्रकाश टाकतात. आमच्‍या कृत्‍याच्‍या परिणामांवरूनच आमचा हेतू काय होता हे ठरवले पाहिजे. केवळ तर्काने किंवा कपोलकल्पित गोष्‍टींवरून ते ठरवले जाऊ नये. सरकारी तज्‍ज्ञांच्‍या साक्षीविरुद्ध आम्‍ही हे सांगू इच्छितो, की आम्‍ही असेंब्‍लीत फेकलेल्‍या बॉम्‍बमुळे फक्‍त एका रिकाम्‍या बाकड्याची मोडतोड झाली, आणि साधारण पाच-सहा माणसांना थोडेसे खरचटले. जरी सरकारी तज्‍ज्ञांच्‍या आणि शास्‍त्रज्ञांच्‍या मते बॉम्‍ब शक्तिमान असूनही त्‍यांच्‍यामुळे अधिक नुकसान झाले नाही, हा चमत्‍कारच म्‍हणावा लागेल; तरी आमच्‍या मते ते बॉम्‍ब शास्‍त्रशुद्ध पद्धतीने खास तसेच बनवले गेलेले होते. पहिली गोष्‍ट म्‍हणजे बाके आणि डेस्‍क्स यांच्‍यामधील रिकाम्‍या जागेत दोन्‍ही बॉम्‍ब पडले. दुसरी गोष्‍ट म्‍हणजे त्‍या जागेपासून केवळ दोन फुटांच्‍या अंतरावर बसलेल्‍या लोकांना – ज्‍यांच्‍यात श्री. पी. आर. राव, श्री. शंकर राव आणि सर जॉर्ज शूस्‍टर यांची नावे उल्‍लेखनीय आहेत, त्‍यांना कोणतीही इजा झाली नाही किंवा अगदीच नाममात्र इजा झाली. सरकारी तज्‍ज्ञांच्‍या म्‍हणण्‍याप्रमाणे त्‍या बॉम्‍बमध्‍ये अधिक शक्तिमान असे पोटॅशिअम क्‍लोरेट आणि पिक्रिक अॅसिड असते, तर त्‍या स्‍फोटाने लाकडी कठडा तोडून काही यार्डावर उभ्‍या असणाऱ्या लोकांनाही उडवले असते. जर त्‍या बॉम्‍बमध्‍ये त्याहूनही शक्तिशाली स्‍फोटक पदार्थ भरला असता, तर त्‍याने असेंब्‍लीतील बहुतेक सभासदांना निश्चितच उडवले असते. एवढेच नाही, आमची इच्‍छा असती तर आम्‍ही ते बॉम्‍ब सरकारी कक्षात फेकू शकलो असतो. कारण ती गॅलरी खास व्‍यक्‍तींनी अगदी खच्‍चून भरलेली होती. किंवा आम्‍ही त्या सर जॉन सायमनलाच आमचे लक्ष्‍य बनवले असते ज्यांच्या करंट्या कमिशनमुळे प्रत्‍येक विचारशील व्‍यक्‍तीच्‍या मनात त्‍याच्‍याविषयी तीव्र तिरस्‍कार निर्माण झालेला होता. आणि त्‍या वेळी तो असेंब्‍लीच्‍या अध्‍यक्षीय कक्षामध्‍ये बसलेलाही होता. परंतु आमचा असला कोणताही हेतू नव्‍हता आणि जेवढ्या कामासाठी ते बॉम्‍ब तयार केले गेले होते, नेमके तेवढेच काम त्‍या बॉम्‍बनी केले. नेमक्‍या योजलेल्‍या ठिकाणी म्‍हणजेच रिकाम्‍या जागी पडले, या पलीकडे त्‍यांनी दुसरा काहीच चमत्‍कार केला नाही!

एक ऐतिहासिक धडा

यानंतर आमच्‍या या कृत्‍याबद्दल शिक्षा भोगण्‍यासाठी आम्‍ही जाणूनबुजून स्‍वत:ला पोलिसांच्‍या स्‍वाधीन केले. साम्राज्‍यवादी शोषकांना आम्‍ही हे सांगू इच्छित होतो, की मूठभर लोकांना मारून कोणतेही उदात्‍त आदर्श गाडून टाकता येत नाहीत किंवा दोन य:कश्चित व्‍यक्‍तींना चिरडून टाकून राष्‍ट्राला दडपून ठेवता येत नाही. फ्रांसमधील क्रांतिकारक चळवळ दडपण्‍यासाठी परिचयपत्र वा परिचयचिन्‍ह (Letter de catchet) पद्धत अथवा बॅसिल (फ्रान्‍समधील राजकीय कैद्यांना अमानुष शिक्षा देणारा भयानक दगडी तुरुंग) असमर्थ ठरले. या इतिहासाच्‍या धड्याकडे आम्‍ही खास लक्ष वेधू शकतो. फाशीचे दोरखंड आणि सैबेरियातील कोठड्या रशियन क्रांतीची आग विझवू शकल्‍या नाहीत. मग वटहुकूम आणि सुरक्षा कायदे काय भारतीय स्‍वातंत्र्याची ज्‍योत विझवू शकतील? गुप्‍त कटांचा तपास लावून किंवा कपोलकल्पित कट-कारस्‍थानांचा आधार घेऊन, तरुणांना शिक्षा ठोठावून किंवा एका महान ध्‍येयाच्‍या स्‍वप्‍नाने प्रेरित झालेल्‍या नवयुवकांना तुरुंगात डांबून, क्रांतीचे अभियान थोपवता येईल काय? होय, जर त्‍याच्‍याकडे दुर्लक्ष केले जाणार नसेल तर. वेळेवर दिलेल्‍या सार्वत्रिक इशाऱ्याने लोकांचे प्राण वाचवणे शक्‍य आहे, आणि निरर्थक हालअपेष्‍टांपासून त्‍यांचे रक्षण करणे शक्‍य आहे. अशी पूर्वसूचना देण्‍याच्‍या कार्याचा हा भार उचलून आम्‍ही आमचे कर्तव्‍य पूर्ण केले आहे.

क्रांती म्‍हणजे काय?

(भगतसिंह यांना खालच्या न्यायालयात प्रश्न करण्यात आला होता की त्यांच्या मते क्रांतीचा काय अर्थ आहे. या प्रश्नाच्या उत्तरादाखल त्यांनी सांगितले की) ‘क्रांती’साठी रक्‍तरंजित युद्ध अनिवार्य नाही, तसेच यामध्‍ये व्‍यक्तिगत प्रतिहिंसेला कसलेही स्‍थान नसते. क्रांती म्‍हणजे केवळ बॉम्‍ब व पिस्‍तुले यांचा पंथ नव्‍हे. आमच्‍या मते क्रांती म्‍हणजे अन्‍यायावर आधारलेल्‍या प्रचलित समाजव्‍यवस्‍थेत आमूलाग्र परिवर्तन.

समाजाचे प्रमुख अंग असूनही आज कामगारांना त्यांच्या प्राथमिक हक्कांपासून वंचित ठेवले जाते. शोषण करणारे भांडवलदार त्यांच्या निढळाच्या कमाईतून निर्माण होणारी सर्व संपत्ती हडपून टाकतात. दुसऱ्याचे अन्नदाते असणारे शेतकरी आज त्यांच्या कुटुंबासह एकेका दाण्यासाठी मोताद बनले आहेत. जगभरच्या बाजारपेठांसाठी कपडे उपलब्ध करून देणाऱ्या विणकऱ्याला आपले व पोराबाळांचे शरीर झाकण्याइतकेदेखील कापड मिळत नाही. सुंदर महाल निर्माण करणारे गवंडी, लोहार, सुतार स्वत: मात्र घाणेरड्या वस्त्यांत राहून आपली जीवनयात्रा समाप्त करतात. या विपरित समाजातील शोषक भांडवलदार त्यांच्या छोट्यामोठ्या लहरींखातर लाखो-कोट्यावधींची उधळपट्टी करतात.

ही भयानक विषमता आणि जबरदस्‍तीने लादला गेलेला भेदभाव जगाला एका महाभयंकर उलथापालथीकडे घेऊन जाणे अटळ आहे. ही स्थिती अधिक काळ टिकून राहणे शक्‍य नाही. आजचा धनिक समाज आजची एका भयंकर ज्‍वालामुखीच्‍या तोंडावर बसून चैनबाजी करीत आहे, व शोषकांची निरागस मुले आणि कोट्यावधी शोषित माणसे एका उंच कड्यावरून चालत आहेत, हे अगदी उघड आहे.

आमूलाग्र परिवर्तनाची आवश्‍यकता

मानवी संस्‍कृतीचा हा प्रासाद वेळीच सावरला गेला नाही, तर लवकरच चक्‍काचूर होऊन जमीनदोस्‍त होईल. देशाला एका आमूलाग्र परिवर्तनाची गरज आहे. ज्‍यांना ही गोष्‍ट उमजली आहे त्‍यांचे हे कर्तव्‍य आहे की त्‍यांनी समाजवादी सिद्धान्‍तावर आधारित समाजाची पुनर्निर्मिती केली पाहिजे. जोपर्यंत हे केले जात नाही आणि माणसाचे माणसांकडून होणारे शोषण, तसेच ज्‍याला आपण साम्राज्‍यशाही म्‍हणतो, ते एका राष्‍ट्राचे दुसऱ्या राष्‍ट्राकडून होणारे शोषण जोवर नष्‍ट केले जात नाही, तोपर्यंत मानवतेची या यातनांमधून सुटका होणार नाही. तोपर्यंत युद्धे संपुष्‍टात आणून विश्‍वशांतीचे युग निर्माण करण्‍याच्‍या सर्व गोष्‍टी म्‍हणजे निव्‍वळ ढोंग असण्‍याखेरीज दुसरे काही नाही.

क्रांतीचा आम्‍हांला अभिप्रेत असणारा अंतिम अर्थ असा आहे, की वरील प्रकारच्‍या संकटांपासून मुक्‍त असलेली आणि जिच्‍यात सर्वहारा वर्गाची अधिसत्‍ता सर्वमान्‍य असेल, अशी एक समाजव्‍यवस्‍था स्‍थापन करणे. याच्‍या परिणामी निर्माण होणारा विश्‍वसंघच पीडित मानवतेला भांडवलशाहीच्‍या जोखडातून मुक्‍त करण्‍यास आणि साम्राज्‍यवादी युद्धांच्‍या विनाशातून सोडवण्‍यास समर्थ होऊ शकेल.

समयोचित इशारा

हा आहे आमचा आदर्श. आणि या आदर्शापासून प्रेरणा घेऊन आम्‍ही एक कळकळीचा आणि जोरदार इशारा दिला आहे. मात्र आमच्‍या या इशाऱ्याकडे लक्ष दिले गेले नाही आणि उसळणाऱ्या जनशक्‍तीच्‍या वाटेत सध्‍याच्‍या शासनसंस्‍थेने अडसर उभारण्‍याचे काम बंद केले नाही, तर मात्र क्रांतीच्‍या ध्‍येयपूर्तीसाठी एक भयंकर युद्ध पेटणे अनिवार्य आहे. सर्व बंधनांना व अडथळ्यांना तुडवून पुढे जाणाऱ्या त्‍या युद्धाच्‍या शेवटी, सर्वहारा वर्गाच्‍या सर्वाधिकारशाहीची स्‍थापना होईल. ही सर्वाधिकारशाहीच क्रांतीच्‍या ध्‍येयाची पूर्ती करण्‍याचा मार्ग प्रशस्‍त बनवेल. क्रांती हा मानवजातीचा जन्‍मजात अधिकार आहे, जो हिरावून घेतला जाऊ शकत नाही. स्‍वातंत्र्य हा प्रत्‍येक माणसाचा जन्‍मसिद्ध अधिकार आहे. श्रमिक वर्गच समाजाचा खरा पोशिंदा आहे. जनतेच्‍या सर्वंकष सत्‍तेची स्‍थापना हे श्रमिक वर्गाचे अंतिम उद्दिष्‍ट आहे.

या आदर्शांसाठी आणि या विश्‍वासासाठी आम्‍हांला जी काही शिक्षा होईल तिचे आम्‍ही सहर्ष स्‍वागत करू. क्रांतीच्‍या या पूजावेदीवर आम्‍ही आमचे यौवन नैवेद्य म्‍हणून आणले आहे, कारण या महान ध्‍येयसाठी मोठ्यात मोठा त्‍यागसुद्धा कमीच आहे. आम्‍ही समाधानी आहोत आणि क्रांतीच्‍या आगमनाची उत्‍सुकतेने प्रतीक्षा करत आहोत.

इन्‍कलाब झिंदाबाद

(६ जून १९२९)

Related posts

Leave a Comment

twenty + 6 =