भगतसिंह – हिंदुस्‍तान सोशालिस्‍ट रिपब्लिकन असोसिएशनचा जाहीरनामा

हिंदुस्‍तान सोशालिस्‍ट रिपब्लिकन असोसिएशनचा जाहीरनामा

लाहोर काँग्रेसमध्ये वितरित करण्यात आलेल्या या दस्तावेजाचे लिखाण भगतसिंह व इतर सहकाऱ्यांशी चर्चा विनिमय करून प्रामुख्याने भगवतीचरण वोहरा यांनी केले होते. दुर्गा भाभी व अन्य क्रांतिकारक सहकाऱ्यांनी हा तेथे वितरित केला. सीआईडीने हे पत्रक जप्त केले होते व त्याच्या कागदपत्रांतूनच हे प्राप्त झाले.

स्वांतंत्र्याचे रोपटे हुतात्म्यांच्या रक्ताने बहरते. भारताच्‍या स्‍वातंत्र्याचे रोपटे बहरावे म्‍हणून दशकानुदशके क्रांतिकारक आपले रक्‍त सांडत आले आहेत. जे श्रेष्‍ठ आदर्श उरात बाळगून त्‍यांनी जे महान बलिदान केले आहे, त्‍याविषयी शंका घेणारी माणसे क्‍कचितच निघतील. परंतु त्‍यांच्‍या सर्वसाधारण कारवाया गुप्‍त असल्‍याने, त्‍यांचे हेतू आणि आताची त्‍यांची धोरणे याबाबत आपले देशवासी अंधारात आहेत. म्‍हणूनच हिंदुस्‍थान सोशालिस्‍ट रिपब्लिकन असोसिएशनला हे घोषणापत्र प्रसिद्ध करण्‍याची आवश्‍यकता भासते आहे.

परकीयांच्‍या गुलामीतून भारताला मुक्‍त करण्‍यासाठी भारताला सशस्‍त्र क्रांती करण्‍यासाठी ही संघटना कटीबद्ध आहे. गुलामीत ठेवल्‍या गेलेल्‍या जनतेकडून खुला उठाव होण्‍याआधी गुप्‍त प्रचार व गुप्‍तपणे तयारी केली जाणे आवश्‍यक आहे. देश एकदा का अशा क्रांतीच्‍या अवस्‍थेप्रत प्रोचला, की परकीय सरकारला ती रोखणे कठीण होऊन जाते. त्‍या क्रांतीसमोर ते काही काळापर्यंत तग धरू शकते. परंतु त्‍याला काहीच भवितव्‍य उरलेले नसते. मानवी स्‍वभावात भ्रम आणि स्थितिशीलता असल्‍याने त्‍याला क्रांतीबद्दल एक प्रकारचे भय वाटत असते. सामाजिक परिवर्तन या नेहमीच सत्‍ता आणि विशेष अधिकार उपभोगणाऱ्या वर्गांमध्‍ये दहशत निर्माण करत असतात. क्रांती ही अशी एक अद्भुत गोष्‍ट आहे की जिच्‍याविषयी निसर्गाला प्रेम असते, आणि तिच्‍याशिवाय ना निसर्गामध्‍ये प्रगती होऊ शकते ना मानवी व्‍यवहारांमध्‍ये. क्रांती म्‍हणजे अविवेकी हत्‍यांची किंवा जाळपोळीची हिंसामोहीम नक्‍कीच नव्‍हे; वा इकडे-तिकडे चार बॉम्‍ब फेकणे किंवा गोळ्या झाडणेही नव्‍हे; अथवा संस्‍कृतीची संपूर्ण नामोनिशाणी मिटवणेही नव्‍हे; किंवा कालौघात मान्‍य झालेल्‍या न्‍याय आणि समतेच्‍या तत्‍त्‍वांच्‍या ठिकऱ्या उडवून ठाकणेही नव्‍हे. क्रांती म्‍हणजे निराशेपोटी जन्‍मलेले एखादे तत्‍त्‍वज्ञान अथवा साहसवाद्यांचा संप्रदाय नव्‍हे. क्रांती ईश्‍वरविरोधी असू शकते, पण ती नक्‍कीच मनुष्‍य जातीच्‍या विरुद्ध नसते. ती एक ठोस आणि जिवंत शक्‍ती आहे, नवे आणि जुने-पुराणे, जीवन आणि साक्षात मृत्‍यू, प्रकाश आणि अंधार यातील आंतरिक द्वंन्‍द्व, निरंतर संघर्षाचा तो एक आविष्‍कार आहे, निव्वळ योगायोग नाही. अशी कोणतीही संगीताची सुरावट, कोणतीही एकतानता नाही, असा कोणताही ताल नाही जो क्रांतीविना निर्माण झाला आहे. संपूर्ण अवकाशातून जर निरंतर क्रांती नष्‍ट केली गेली, तर कवी ज्‍या ‘गोळ्यांच्या रागा’ विषयी गात आले आहेत, तो खोटा, पोकळ होऊन जाईल. क्रांती नियम आहे, क्रांती हा एक आदर्श आहे आणि क्रांती हे सत्‍य आहे.

आमच्‍या देशातील तरुणांनी हे सत्‍य जाणले आहे. अपार कष्‍ट सहन करून त्‍यांनी हा धडा घेतला आहे, की आज चार दिशांनी पसरलेली अव्‍यवस्‍था, कायदेशीर गुंडगिरी आणि तिरस्‍काराची भावना यांच्‍या जागी सुव्‍यवस्‍था, कायद्याचे राज्‍य आणि प्रेम स्‍थापन करायचे तर क्रांतीशिवाय तरणोपाय नाही. आमच्‍या या भाग्‍यशाली भूमीमध्‍ये कोणाच्‍याही मनात असा विचार येता कामा नये, की आमचे तरुण बेजबाबदार आहेत. ते नेमके कुठे उभे आहेत याची त्‍यांना पूर्ण जाणीव आहे. त्‍यांचा मार्ग हा फुलांच्‍या पायघड्या अंथरलेल्‍या वाटेने जात नाही, याची त्‍यांच्‍यापेक्षा चांगली जाणीव अन्‍य कुणाला असणार? वेळोवेळी आपल्‍या आदर्शांसाठी त्‍यांनी फार मोठे मोल चुकते केले आहे. म्‍हणूनच असे कोणाच्‍याही तोंडून निघता कामा नये, की तरुण हे उतावळ्या आवेशाने कुठल्‍यातरी फालतू गोष्‍टींच्‍या मागे लागले आहेत.

आमच्‍या आदर्शांवर चिखलफेक केली जाते हे योग्‍य नाही. आमचे विचार पुरेसे सक्रिय आणि जोशपूर्ण आहेत आणि ते आम्‍हांला आगेकूच करण्‍यास मदत तर करतातच, पण हसत हसत फासावर जाण्‍याची हिम्‍मतही देतात, एवढे जरी तुम्‍ही जाणून घेतले तरी खूप होईल.

अहिंसेविषयी पार गोंधळलेली आणि वायफळ चर्चा करणे ही आजची फॅशन झाली आहे. महात्‍मा गांधी महान आहेत आणि त्‍यांचा पूर्ण आदर करून आम्‍ही ठामपणे नमूद करतो, की देशाला स्‍वातंत्र्य मिळवून देण्‍यासाठीची त्‍यांची पद्धत आम्‍हांला पूर्णतया नामंजूर आहे. त्‍यांनी चालवलेल्‍या असहकार आंदोलनाने अफाट लोकजागृ‍ती केली, त्‍यातील त्‍यांची महत्‍त्‍वपूर्ण भूमिका पाहता त्‍यांना सलाम न करणे हे नक्‍कीच कृतघ्‍नपणाचे ठरेल. परंतु आमच्‍या दृष्‍टीने महात्‍मा हे असंभाव्‍य गोष्‍टींचे तत्‍त्‍वज्ञ आहेत. अहिंसा हा नक्‍कीच महान आदर्श आहे. परंतु ती भावी काळातील गोष्‍ट आहे. आज आपण ज्‍या अवस्‍थेत आहोत, ते पाहता निव्‍वळ अहिंसेच्‍या जोरावर स्‍वातंत्र्य मिळवणे शक्‍य नाही. जग नखशिखांत शस्‍त्रास्त्रांनी सुसज्‍ज आहे आणि हे जग आजचे कठोर वास्‍तव आहे. शांततेबाबतचे सगळे म्‍हणणे प्रामाणिक असू शकते, परंतु आपण गुलाम देश असताना अशा खोट्या कल्‍पनांसाठी आपण आपल्‍या मार्गापासून विचलित होणे योग्‍य नाही. आम्‍ही विचारतो की, जग जेव्‍हा हिंसेच्‍या आणि दुर्बलांच्‍या शोषणाच्‍या वातावरणाने भरलेले आहे, अशा वेळी देशाला अहिंसेच्‍या मार्गाने चालवण्‍यात काय मतलब आहे? देशातील तरुणांना अहिंसेच्‍या अशा स्‍वप्‍नजालाच्‍या मोहात पाडले जाऊ शकत नाही, असे आमचे ठाम म्‍हणणे आहे.

आम्‍ही हिंसवेर विश्‍वास ठेवतो ते आमचे अंतिम ध्‍येय म्‍हणून नव्‍हे, तर एका उदात्‍त ध्‍येयापर्यंत पोचण्‍यासाठी स्‍वीकारलेले केवळ एक माध्‍यम म्‍हणून. अहिंसेचे पुरस्‍कर्ते आणि जपून धीमी वाटचाल करण्‍याच्‍या मार्गाची वकिली करणारे देखील किमान एवढे तरी मान्‍य करतात, की आम्‍ही ज्‍यावर विश्‍वास ठेवतो त्‍याच मार्गाने चालण्यास व त्यासाठी वाट्टेल त्या हालअपेष्टा सहन करण्यास तयार आहोत. त्‍यासाठी आमच्‍या साथीदारांनी भारतमातेच्‍या बलीवेदीवर चढवलेल्‍या हौतात्‍म्‍याचे मोजमाप का करायला हवे? ब्रिटिश सम्राटाच्‍या तुरुंगात अंगावर शहारे आणणाऱ्या आणि हृदयाचे ठोके बंद पाडणाऱ्या अनेक प्रसंगांचा भीषण खेळ दाखवला गेला आहे. आमच्‍या दहशतवादी कारवायांमुळे आम्‍हांला अनेकदा शिक्षाही झाली आहे. आमचे स्‍पष्‍ट म्‍हणणे आहे की दहशतवाद हे कधीही क्रांतिकारकांचे उद्दिष्‍ट असूच शकत नाही. केवळ दहशतवाद एकट्याने स्‍वातंत्र्य मिळवू शकतो असेही ते समजत नाहीत. पण इंग्रज सरकारचे थोबाड फोडण्‍यासाठी या मार्गाचा अवलंब करण्‍याची पद्धतच सर्वाधिक परिणामकारक ठरणार आहे, असे क्रांतिकारकांना वाटते आणि ते बरोबर आहे यात शंकाच नाही. संपूर्ण देशाला दहशतीच्‍या जोरावर भयभीत करण्‍यात यशस्‍वी झाल्‍यामुळेच इंग्रज सरकार आज टिकून आहे. या सरकारी दहशतीचा सामना आपण कसा करायचा? फक्‍त क्रांतिकारकांची प्रतिदहशतच त्यांची दहशत रोखण्यास यशस्‍वी होऊ शकेल. समाजात एक प्रकारची हतबलतेची भावना खोलवर पसरलेली आहे. हे घातक नैराश्‍य दूर कसे करता येईल? फक्‍त बलिदानाची प्रेरणा प्रज्‍वलित करूनच हरवलेला आत्‍मविश्‍वास जागा केला जाऊ शकतो. दहशतवादाला एक आंतरराष्‍ट्रीय पैलूदेखील आहे. इंग्‍लंडचे अनेक शत्रू आहेत आणि आमची ताकद पाहून आम्‍हांला संपूर्ण साहाय्य करायला ते तयार आहेत. हाही एक मोठा लाभच आहे.

भारत साम्राज्‍यवादाच्‍या जोखडाखाली भरडला जात आहे. त्‍यामुळे कोट्यवधी लोक आज अज्ञानाला व गरिबीला बळी पडत आहेत. भारताच्‍या लोकसंख्‍येचा मोठा भाग असलेले कामगार व शेतकरी हे परकीय वर्चस्‍व आणि आर्थिक शोषण याखाली पिचून गेले आहेत. भारतीय कष्टकरी वर्गाची स्थिती आज गंभीर आहे. या वर्गापुढे दुहेरी धोका आहे. एका बाजूला परकीय भांडवलशाहीच्‍या आक्रमणाचा, तर दुसऱ्या बाजूला भारतीय भांडवलशाहीच्‍या घातक हल्‍लयाचा. भारतीय भांडवलशाही दररोज परकीय भांडवलाशी सहकार्याचे नवनवे संबंध जोडत चालला आहे . काही नेत्‍यांनी साम्राज्‍यांतर्गत स्‍वराज्‍याचा (डोमिनियन स्‍टेटस) स्‍वीकार केला आहे. यावरूनच वारे कोणत्‍या दिशेने वाहत आहे, हे उघड आहे.

भारतीय भांडवलदारवर्ग आपल्‍याच जनतेचा विश्‍वासघात करून त्‍याच्‍या मोबदल्‍यात परकीय भांडवलदारांकडून  सरकारात काही फुटकळ वाटा मिळवण्‍याच्‍या प्रयत्‍नात आहे. म्‍हणूनच कष्‍टकरी वर्गाच्‍या सर्व आशा आता समाजवादावर केंद्रीत झाल्‍या आहेत. त्‍यातूनच संपूर्ण स्‍वातंत्र्य मिळवण्‍याच्‍या, सर्व भेदभाव व विशेषाधिकार नष्‍ट करण्‍याच्‍या दिशेने यशस्‍वी वाटचाल करता येणार आहे. देशाचे भवितव्‍य आता तरुणांच्‍या खांद्यावर आहे. तेच या धरतीचे सुपुत्र आहेत. हालअपेष्‍टा सहन करण्‍याची त्‍यांची तयारी, त्‍यांचे निडर शौर्य आणि आत्‍मबलिदानाची उसळती भावना हेच सांगतात, की भारताचे भवितव्‍य त्‍यांच्‍या हाती सुरक्षित आहे. एका अनुभूतीपूर्ण क्षणी देशबंधू दास म्‍हणाले होते की, “युवक हे भारतमातेचा मानबिंदू आणि आशास्‍थान दोन्‍ही आहेत. या आंदोलनाच्‍या मागे त्‍यांची प्रेरणा, त्‍यांचे बलिदान आणि त्‍यांचा विजय आहे. हाती मशाल घेऊन स्‍वातंत्र्याच्‍या मार्गावर निघालेले आघाडीचे सैनिक हेच आहेत. ते मुक्‍तीच्‍या मार्गावरील तीर्थयात्री आहेत.”

तरुणांनो, नव्‍हे भारतीय प्रजासत्‍ताकाच्‍या सैनिकांनो, सज्‍ज व्‍हा. ढिलावू नका, पायातले त्राण गेल्‍यासारखे करू नका. तुम्‍हांला नाकाम करणाऱ्या प्रदीर्घ जडत्‍वाला कायमचे उखडून फेका. तुम्‍ही अंगिकारलेले हे कार्य अपार उदात्‍त आहे. देशभर दशदिशांना आणि कानाकोपऱ्यात जाऊन लोकांना आगामी क्रांतीसाठी तयार करा, क्रांती होणार हे निश्चित आहे. कर्तव्‍याच्‍या तुतारीचा ध्‍वनी ऐका. आपले जीवन व्‍यर्थ घालवू नका. पुढे चला, तुमच्‍या जीवनाचा प्रत्‍येक क्षण नव्‍या पद्धती आणि नव्‍या कल्‍पना शोधण्‍याच्‍या कामी लावा. त्‍यातून आपल्‍या प्राचीन धरतीमातेच्‍या नेत्रांमध्‍ये ज्‍वाला भडकून उठू द्या. तिला रौद्ररूप धारण करू द्या. नवयुवकांच्‍या धडधडत्‍या हृदयांमध्‍ये इंग्रज साम्राज्‍याविरूद्ध तिरस्‍कार व द्वेष ठासून भरा. त्‍यांच्‍यामध्‍ये क्रांतीचे असे बीज पेरा जे अंकुरावे आणि त्याचा महावृक्ष बनावा. त्‍याला तुम्‍ही आपल्‍या उष्ण रक्‍ताचे सिंचन करणार आहात. त्‍यातून एक प्रलयकारी भूकंप होईल. तो अखिल विश्‍वाला हादरवणारी अशी शक्‍ती प्रसृत करेल, जी साम्राज्‍यवादाचा महाल धुळीला मिळवेल, झपाट्यात सर्व वाईट गोष्‍टी नष्‍ट करून टाकेल. तो एक महान विनाश असेल. असे होईल तेव्‍हा आणि फक्‍त तेव्‍हाच, भारतीय जनता जागी होईल. आपल्‍या गुणांनी आणि महानतेने संपूर्ण मानवजातीला चकीत करून टाकेल. आजवर दुर्बल आणि साधी राहिलेली माणसे बलदंड आणि धूर्त-लबाड लोकांना धडा शिकवतील. तेव्‍हा व्‍यक्तिगत स्वातंत्र्यसुद्धा सुरक्षित राहील आणि क्षमिकांच्या सार्वभौम प्रभूसत्‍तेचा सन्‍मान केला जाईल. अशा क्रांतीच्‍या आगमनाची आम्‍ही ग्‍वाही देत आहोत.

क्रांती चिरायू होवो.

कर्तारसिंह*, अध्‍यक्ष

१९२९ रिपब्लिकन प्रेस, अरहवन, भारत येथून प्रकाशित

*कर्तारसिंह – भगतसिंह यांचे टोपण नाम

 

Related posts

Leave a Comment

ten − three =