बॉॅम्बचे तत्तवज्ञान
२३ डिसेंबर, १९२९ रोजी ब्रिटिश साम्राज्यवादाचा भारतातील आधारस्तंभ व्हाइसरॉय याची गाडी उडवून देण्याचा प्रयत्न क्रांतिकारकांनी केला, पण तो अयशस्वी ठरला. गांधीजींनी या प्रसंगावर ‘बॉम्बची पूजा’ नावाचा एक अतिशय कडवट असा लेख लिहिला. त्यात त्यांनी व्हाइसरॉयला देशाचे शुभचिंतक म्हटले होते, तर या नवयुवकांना स्वातंत्र्याच्या मार्गात विघ्न निर्माण करणारे म्हणून संबोधले होते. त्यावर प्रतिक्रिया म्हणून हिंदुस्तान सोशालिस्ट रिपब्लिकन असोसिएशनच्या वतीने भगवतीचरण वोहरा यांनी ‘बम का दर्शन’ (बॉम्बचे तत्त्वज्ञान) हा लेख लिहिला. त्याचे शीर्षक ठेवले होते “हिंदुस्तान सोशालिस्ट रिपब्लिकन असोसिएशनचे घोषणापत्र.” कारागृहात भगतसिंहांनी त्याला अंतिम रूप दिले. २६ जानेवारी, १९३० रोजी देशभरात तो वितरित करण्यात आला.
अलीकडच्याच घटना. विशेषतः २३ डिसेंबर, १९२९ रोजी व्हाइसरॉयची स्पेशल ट्रेन उडवण्याचा जो प्रयत्न करण्यात आला होता, त्यावर टीका करणारा काँग्रेसने संमत केलेला ठराव, तसेच ‘यंग इंडियामध्ये’ गांधीजींनी लिहिलेले लेख यावरून स्पष्ट होते, की गांधीजींशी साटेलोटे करून भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने भारतीय क्रांतिकारकांविरुद्ध एक घोर आंदोलन सुरू केले आहे. भाषणांमधून तसेच पत्रकांद्वारे क्रांतिकारकांविरुद्ध जनतेमध्ये नियोजनबद्ध प्रचार केला जात आहे. एक तर हा प्रचार जाणूनबुजून केला गेला आहे किंवा केवळ अज्ञानापोटी त्यांच्याविषयी अपप्रचार केला जात आहे. त्यामुळे त्यांना चुकीचे समजले जात आहे. पण क्रांतिकारक आपले आदर्श व कार्यावर होणाऱ्या अशा टीकेला भीत नाहीत. उलट ते अशा टीकेचे स्वागतच करतात व ही एक सुवर्णसंधी असल्याचे मानतात. कारण अशा टीकेमुळे त्यांना क्रांतिकारकांच्या प्रेरणेचे आणि शक्तीचे अक्षय स्रोत असलेले मूलभूत सिद्धान्त तसेच उच्च आदर्श लोकांना समजावण्याची संधी मिळते. या लेखामुळे सर्वसामान्य जनतेला हे जाणून घेण्याची संधी मिळेल, की क्रांतिकारक नेमके काय आहेत. त्यांच्याविरुद्ध करण्यात येणारा भ्रामक प्रचार आणि त्यामुळे निर्माण होणारे गैरसमज यापासून त्यांना वाचवता येऊ शकेल, अशी आशा आहे.
आपण आधी हिंसा आणि अहिंसेच्या प्रश्नावर विचार करू. आमच्या मते या शब्दांचा वापरच चुकीच्या पद्धतीने केला गेला आहे. असे करणे हे दोन्हीही बाजूंवर अन्याय करणारे आहे. कारण या शब्दांमधून दोन्हीही पक्षांच्या सिद्धान्तांचा स्पष्ट बोध होऊ शकत नाही. हिंसा या शब्दाचा अर्थ आहे, अन्यायासाठी केला गेलेला बलप्रयोग. परंतु क्रांतिकारकांचा तर हा मुळीच उद्देश नाही. दुसऱ्या बाजूला अहिंसेचा सामान्यतः जो अर्थ समजला जातो, तो म्हणजे आत्मिक शक्तीचा सिद्धांत. त्याचा उपयोग व्यक्तिगत तसेच राष्ट्रीय अधिकार मिळवण्यासाठी केला जातो. आत्मक्लेशाद्वारे शेवटी आपल्या विरोधकाचे हृदय परिवर्तन होऊ शकेल अशी अपेक्षा ठेवली जाते.
एक क्रांतिकारक जेव्हा काही गोष्टींना आपला अधिकार मानतो, तेव्हा तो त्यांची मागणी करतो. आपल्या त्या मागणीच्या समर्थनार्थ तो युक्तिवाद करतो. सर्व आत्मिक शक्ती पणाला लावून ते प्राप्त करण्याची आकांक्षा ठेवतो. ते साध्य व्हावेत म्हणून तो आत्यंतिक यातना सहन करतो. त्यासाठी मोठ्यातल्या मोठ्या त्यागाला तो तयार असतो आणि त्याच्या समर्थनार्थ तो आपले संपूर्ण शारीरिक बळही कामी आणतो. या त्याच्या प्रयत्नांना तुम्ही भले काहीही नाव द्या, परंतु त्याला तुम्ही ‘हिंसा’ म्हणू शकणार नाही. कारण त्यामुळे शब्दकोशात दिलेल्या शब्दाच्या अर्थावर अन्याय होईल. सत्याग्रहाचा अर्थ आहे ‘सत्यासाठी आग्रह.’ तो स्वीकारला जावा यासाठी केवळ आत्मिक शक्तीचाच वापर करण्याचा आग्रह कशासाठी? त्याच्या बरोबरच शारीरिक शक्तीचा वापर का नको? स्वातंत्र्य प्राप्तीसाठी आपल्या शारीरिक तसेच नैतिक अशा दोन्हींही शक्तींच्या वापरावर क्रांतिकारक विश्वास ठेवतो. परंतु केवळ नैतिक शक्तीचा वापर करणारे लोक शारीरिक बळाच्या वापराला निषिद्ध मानतात. म्हणून आता प्रश्न हा नाही की तुम्हाला हिंसा हवी की अहिंसा, तर प्रश्न हा आहे की आपल्या उद्दिष्ट प्राप्तीसाठी शारीरिक बळासहित नैतिक बळाचा उपयोग तुम्ही करू इच्छिता, का केवळ आत्मिक शक्तीचा?
क्रांतिकारक असे मानतात की क्रांतीमुळेच देशाला स्वातंत्र्य मिळेल. ते ज्या क्रांतीसाठी झटताहेत आणि ज्या क्रांतीचे रूप त्यांच्या समोर स्पष्ट आहे, तिचा अर्थ परकीय राज्यकर्त्यांशी आणि त्यांच्या बगलबच्यांशी लोकांचा केवळ सशस्त्र संघर्ष एवढाच नाही, तर देशाच्या मुक्तीसाठी नव्या सामाजिक व्यवस्थेचे द्वार खुले व्हावे असाही तो आहे. क्रांती भांडवलशाहीच्या वर्गीय व्यवस्थेचा तसेच काही लोकांना विशेष अधिकार प्रदान करणाऱ्या पद्धतीचा अंत करेल. ती राष्ट्राला स्वतःच्या पायांवर उभे करेल. त्यातून एका नव्या राष्ट्राचा आणि नव्या समाजाचा जन्म होईल. सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे क्रांती कामगार व शेतकऱ्यांचे राज्य प्रस्थापित करेल. देशाच्या राजकीय सत्तेचा ताबा घेऊन बसलेल्या सर्व समाजविरोधी घटकांचा ती खातमा करून टाकेल.
मानसिक गुलामगिरी आणि धार्मिक रूढींच्या बंधनांनी जखडलेली आजची तरुणपिढी आणि त्यातून स्वत:ची सुटका करून घेण्यासाठी आजच्या तरुणवर्गात जी अस्वस्थता आहे, त्यातच क्रांतिकारकाला प्रगतिकारक अंकुर दिसत आहेत. नवयुवक जसजसे क्रांतीच्या मानसिकतेने भारले जातील, तसतशी राष्ट्राच्या गुलामीची स्पष्ट समज त्यांना येत जाईल आणि त्यांची स्वातंत्र्यासाठीची तृष्णा वाढत, तीव्र होत, प्रबळ होत जाईल. जोवर युवक न्यायासाठीच्या क्रोधाने ओतप्रोत भरून जाऊन अन्याय करणाऱ्यांची हत्या सुरू करत नाही, तोवर हे सुरूच राहील. अशा तऱ्हेने देशात दहशतवादाचा जन्म होतो. दहशतवाद म्हणजे संपूर्ण क्रांती नव्हे आणि क्रांतिसुद्धा दहशतवादाशिवाय पूर्ण नाही. क्रांतीचा एक आवश्यक, अनिवार्य टप्पा आहे. इतिहासातील कोणत्याही आणि प्रत्येक क्रांतीचे विश्लेषण केल्यास या सिद्धान्ताचे दाखले दिसून येतील. दहशतवाद अत्याचाऱ्यांच्या मनात भीती निर्माण करतो, पीडित जनतेच्या मनात सूडाची भावना जागी करून तिला बळ प्रदान करतो. असुरक्षित भावनेने घेरलेल्या लोकांना हिंमत आणि आत्मविश्वासही देतो. त्यातून जगासमोर क्रांतीच्या उद्देशाचे वास्तविक रूप प्रकट होते कारण तोच एका राष्ट्राची स्वातंत्र्याविषयीची उत्कट आस जागी असल्याचा सर्वाधिक विश्वसनीय पुरावा असतो. याआधी दुसऱ्या देशांमध्ये जसे घडत आलेले आहे, तसेच भारतातही दहशतवाद क्रांतीचे रूप धारण करेल. आणि त्या क्रांतीमधूनच देशाला सामाजिक, राजकीय, तसेच आर्थिक स्वातंत्र्य मिळेल.
तर हे आहेत क्रांतिकारकांचे सिद्धान्त ज्यावर त्यांची पूर्ण निष्ठा आहे आणि आपल्या देशासाठी त्यांची परिपूर्ती ते करू पाहतात. उद्दिष्ट साध्य करण्याकरता ते गुप्त रीतीने तसेच उघडपणे, अशा दोन्ही पद्धतींनी प्रयत्न करत आहेत. अशा तऱ्हेने शासकवर्ग आणि जनता यांच्यामध्ये एक शतकभर सतत चालू असलेल्या जगव्यापी संघर्षाचा अनुभव, हा क्रांतिकारकांना आपल्या उद्दिष्टाप्रत जाण्यासाठीचा मार्गदर्शक आहे. आणि क्रांतिकारक जे मार्ग, ज्या पद्धतींवर निष्ठा ठेवतात ते कधीही अयशस्वी ठरलेले नाहीत.
या दरम्यान कांग्रेस काय करत आली आहे? तिने आपले ध्येय ‘स्वराज्या’ ऐवजी ‘पूर्ण स्वातंत्र्य’ असे बदलले. त्यातून कोणीही असा निष्कर्ष काढेल की कांग्रेस आता ब्रिटिश शासनाविरुद्ध युद्धाची घोषण करेल. पण त्या ऐवजी, असे दिसते की कांग्रेसने क्रांतिकारकांविरुद्ध युद्ध पुकारले आहे. या संदर्भात कांग्रेसने केलेला पहिला वार म्हणजे २३ डिसेंबर १९२९ रोजी व्हाइसरॉयची स्पेशल ट्रेन उडवण्याच्या प्रयत्नांची निंदा करणारा त्यांचा प्रस्ताव. या प्रस्तावाचा मसुदा गांधीजींनी स्वत: तयार केला होता आणि तो संमत केला जावा यासाठी गांधीजींनी स्वत:ची सर्व शक्ती पणाला लावली होती. परिणाम असा झाला की, अधिवेशनात एकूण १७१९ सदस्य असताना केवळ ३१ मते अधिक मिळवून हा प्रस्ताव संमत होऊ शकला. इतक्या काठावरच्या बहुमतामध्ये कितपत राजकीय प्रामणिकपणा होता? याबाबतीत कांग्रेसच्या आजीवन भक्त राहिलेल्या सरलादेवी चौधरानींचे मतच इथे आम्ही उद्धृत करतो. या मुद्द्याविषयी विचारल्यावर उतरादाखल त्या म्हणाल्या, “मी महात्मा गांधींच्या बऱ्याच अनुयायांशी केलेल्या चर्चांमधून माझ्या असे लक्षात आले, की महात्मा गांधींवरच्या त्यांच्या व्यक्तिगत निष्ठेमुळे याविषयीचे स्वत:चे स्वतंत्र विचार त्यांनी प्रकट केले नाहीत. त्यामुळेच म. गांधी प्रणित या प्रस्तावाच्या विरोधात मत देण्यास ते असमर्थ ठरले.” गांधीजींच्या या मुद्द्यामागच्या युक्तिवादाचा आपण नंतर विचार करू. त्यांचा युक्तिवाद म्हणजे कांग्रेसमध्ये त्यांनी केलेल्या भाषणाचेच विस्तृत रूप आहे.
या दु:खद प्रस्तावाबाबत नजरेआड करता येणार नाही अशी एक गोष्ट प्रकर्षाने लक्षात आली आहे. कांग्रेस अहिंसेच्या सिद्धान्तावर विश्वास ठेवते, एवढेच नव्हे तर गेली 10 वर्षे त्याचा ती प्रचारही करते आहे. असे असूनही या प्रस्तावाच्या समर्थनाच्या भाषणात शिवीगाळ करण्यात आली. कांग्रेसजनांनी क्रांतिकारकांना ‘भेकड’ आणि त्यांच्या कार्याला ‘घृणास्पद’ म्हटले! एका वक्त्याने तर धमकी दिली की, जर त्यांना (सदस्यांना) गांधीजींचे नेतृत्व यापुढेही हवे असेल तर त्यांनी प्रस्ताव बिनविरोध संमत करणे आवश्यक आहे! एवढे सारे होऊनही प्रस्ताव फारच चिंता वाटावी इतक्या कमी फरकाने संमत होऊ शकला. यातून हीच गोष्ट नि:संशय सिद्ध होते की देशातील जनता मोठ्या संख्येने क्रांतिकारकांना पाठिंबा देत आहे. एका अर्थी आम्ही गांधीजींचे अभिनंदन करतो की या प्रश्नावर त्यांनी वाद उभा केला; आणि जगाला हे दाखवून दिले की अहिंसेचा किल्ला मानली गेलेली कांग्रेस – काही प्रमाणात तरी कांग्रेसपेक्षाही जास्त क्रांतिकारकांच्या पाठीशी आहे.
या बाबतीत गांधीजींना मिळालेला विजय हा एक प्रकारे पराभवच होता. आणि आता पुन्हा त्यांनी ‘द कल्ट ऑफ द बॉम्ब’ या लेखाद्वारे क्रांतिकारकांवर दुसरा हल्ला चढवला आहे. याबाबत पुढचे आणखी काही म्हणण्यापूर्वी या लेखाबद्दल आपण अधिक विचार करू. या लेखात त्यांनी तीन गोष्टींचा उल्लेख केला आहे. त्यांची निष्ठा, त्यांचे मत आणि त्यांचा युक्तिवाद. आम्ही त्यांच्या निष्ठेचे विश्लेषण करू इच्छित नाही, कारण निष्ठेमध्ये तर्काला काही स्थान नसते. गांधीजी जिला हिंसा म्हणतात त्याबाबतची त्यांची मते आणि त्याबाबत त्यांनी जे तर्कसंगत विचार प्रकट केले आहेत, त्याचे आपण क्रमाने विश्लेषण करू.
गांधीजींनी असे वाटते की बहुतांश भारतीय जनतेला हिंसेचा विचार स्पर्शूनसुद्धा गेलेला नाही आणि अहिंसा हेच आता हमखास राजकीय शस्त्र बनले आहे, हे त्यांचे मत अगदी खरे आहे. हल्लीच त्यांनी जी देशाची भ्रमंती केली आहे, त्या अनुभवावरून त्यांचे हे मत बनले आहे. परंतु या यात्रेतील अनुभवांवरून त्यांनी अशा भ्रमात राहू नये. हे खरे की सर्वसाधारण (कांग्रेस) नेता आपले दौरे जिथे टपालगाडी त्यांना आरामात घऊन जाऊ शकेल अशा ठिकाणापर्यंतच सीमित ठेवतो. गांधीजींनी मात्र त्यांच्या दौऱ्याचा परिघ जिथवर ते मोटारकारने जाऊन पोहचू शकतील, अशा मर्यादेपर्यंत वाढवला आहे. त्यातही दौऱ्याच्या काळात ते त्या त्या ठिकाणच्या धनाढ्य व्यक्तींच्या निवासस्थानी राहिले. या दौऱ्याचा बराचसा वेळ हा त्यांच्या भक्तांनी आयोजित केलेल्या सभांमधून केल्या गेलेल्या त्यांच्या प्रशंसेमध्ये आणि सभांमधून त्यांनी अधूनमधून अशिक्षित जनतेला दिलेल्या दर्शनांमध्येच गेला. याबाबत त्यांचा दावा मात्र असा आहे की त्यांनी लोकांना फार चांगल्या तऱ्हेने समजून घेतले आहे. परंतु नेमकी हीच गोष्ट जनतेचे मानस कळल्याचा त्यांचा दावा खोडून काढते.
कोणीही व्यक्ती केवळ व्यासपीठावरून सर्वसामान्य जनतेला दर्शन घेऊन आणि उपदेश करून तिचे मानस समजून घेऊ शकत नाही. फार तर ते एवढाच दावा करू शकतात की त्यांनी विविध विषयांवर आपले स्वत:चे विचार लोकांसमोर ठेवले. गांधीजींनी एवढ्या वर्षात आम जनतेच्या सामाजिक जीवनात शिरण्याचा कधी प्रयत्न केला आहे? कधी त्यांनी एखाद्या संध्याकाळी एखाद्या गावात शेकोटीभोवती बसून कुणा शेतकऱ्याचे विचार जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे? कधी एखाद्या कारखान्यातील कामगाराबरोबर एखादी तरी संध्याकाळ बोलण्यात घालवून त्याचे म्हणणे समजून घेण्याचा प्रयत्न केला आहे? पण आम्ही हे केले आहे, आणि म्हणूनच आम्ही असा दावा करतो, की आम्ही सर्वसामान्य जनतेचे मानस जाणतो. आम्ही गांधीजींना खात्रीपूर्वक सांगू इच्छितो की सर्वसामान्य भारतीय हा इतर सामान्य माणसाप्रमाणेच अहिंसा आणि आपल्या शत्रूवर प्रेम करण्याची आध्यात्मिक भावना फार कमी प्रमाणात समजू शकतो. जगाचासुद्धा हाच नियम आहे – तुमचा एक मित्र आहे, तुम्ही त्याच्यावर प्रेम करता, कधीकधी तर इतका की त्याच्यासाठी तुम्ही आपले प्राणही देता. तुमचा शत्रू आहे, तुम्ही त्याच्याशी कोणत्याही तऱ्हेचा संबंध ठेवत नाही. क्रांतिकारकांचा हा सिद्धान्त नितांत सत्य, सरळ आणि थेट आहे. हे अढळ सत्य, आदम आणि इव्ह यांच्या काळापासून चालत आलेले आहे आणि हा सिद्धान्त समजण्यात कधी कुणाला अडचण आलेली नाही. आम्ही हे स्वत:च्या अनुभवावरून सांगत आहेत. क्रांतिकारक विचारसरणीला क्रियाशील रूप देण्यासाठी हजारो-हजारोंच्या संख्येने लोक एकत्र येण्याचे दिवस आता फार दूर नाहीत.
गांधीजींची घोषणा आहे की अहिंसेचे सामर्थ्य आणि आत्मक्लेशाच्या प्रणालीद्वारे ते एक दिवस परकीय राजकर्त्यांचे हृदय परिवर्तन करून त्यांना आपल्या विचाराचे अनुयायी बनवतील, अशी त्यांना आशा आहे. आता त्यांनी आपल्या सामाजिक जीवनाच्या या चमत्काराच्या प्रेमसंहितेच्या प्राचारासाठी स्वतःला वाहून घेतले आहे. ते ठाम विश्वासासह या विचाराचा प्रचार करीत आहेत. त्यांच्या काही अनुयायांनीही असे केले आहे? परंतु भारतातील किती शत्रूंचे हृदय परिवर्तन करून त्यांना भारताचे मित्र बनवण्यात ते यशस्वी ठरले आहेत, हे ते जगाला सांगू शकतात का? किती ओडायर, डायर, रिडिंग, आणि आयर्विन यांना ते भारताचे मित्र बनवू शकले आहेत? जर कोणालाच ते मित्र बनवू शकले नसतील, तर मग ते इंग्लंडला अहिंसेद्वारे पटवून भारताला स्वातंत्र्य द्यायला तयार करतील या त्यांच्या विचारप्रणालीशी देश कसा सहमत होऊ शकेल?
व्हाइसरॉयच्या गाडीखाली बॉम्बचा स्फोट अपेक्षेप्रमाणे अचूकपणे झाला असता तर गांधीजींनी सुचवलेल्या दोन पैकी एक गोष्ट नक्की झाली असती. एक तर व्हाइसरॉय गंभीररीत्या जखमी झाले असते अथवा त्यांचा मृत्यू ओढवला असता. अशा परिस्थितीत व्हाइसरॉय आणि राजकीय पक्षांच्या नेत्यांमध्ये चर्चा घडू शकली नसती. ही धडपड थांबली असती, आणि त्यातून खचितच राष्ट्राचे भले झाले असते. कलकत्ता कांग्रेसच्या खणखणीत इशाऱ्यानंतरसुद्धा ओठावर केवळ ‘स्व’ शासनाची भीक आणि हातात कटोरा घेऊन व्हाइसरॉय भवनाच्या दारात घोटाळणाऱ्यांचे लांच्छनास्पद प्रयत्न विफल झाले असते. त्यामुळे अर्थातच राष्ट्राचे भले झाले असते. बॉम्बचा जर योग्य रीतीने स्फोट झाला असता तर भारताच्या आणखी एका शत्रूला योग्य शिक्षा मिळाली असती. केवळ भारताच्या स्वातंत्र्याच्या शत्रूलाच मिरत कट, लाहोर कट आणि भुसावळ कांड असे खटले चालवणारा (सरकार) हा आपल्या मित्रासमान वाटू शकतो! सायमन कमिशनला सामूहिक विरोध उभारून देशात जे ऐक्य स्थापित झाले होते; त्याला गांधीजी आणि नेहरूंच्या राजकीय मुत्सद्दीपणानंतरच आयर्विन छिन्नभिन्न करण्यात यशस्वी ठरला. आज खुद्द कांग्रेसमध्येही फूट पडली आहे. अापल्या या दुर्दैवाला व्हाइसरॉय आणि त्याचे बगलबच्चे यांच्याशिवाय आणखी कोण जबाबदार असू शकतात? या उप्परही आपल्या देशात असे लोक आहेत जे त्याला भारताचा ‘मित्र म्हणून घोषित करतात.
देशात असेही लोक असतील ज्यांना कांग्रेसप्रति श्रद्धा नाही किंवा कांग्रेसकडून त्यांना कोणतीही आशा नाही. जर गांधीजी क्रांतिकारकांना या प्रकारचे लोक समजत असतील, तर ते त्यांच्यावर अन्याय करत आहेत. क्रांतिकारक हे चांगल्या प्रकारे जाणतात की कांग्रेसने जनसमुदायांमध्ये स्वातंत्र्याची तीव्र आस जागृत करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केले आहे. मात्र त्यांचा असा दृढ विश्वास आहे की जोपर्यंत व्हाइसरॉयची स्पेशल गाडी उडवण्यात गुप्तचर विभागाचा हात असेल असे वक्तव्य करणारे सेनगुप्तासारखे ‘अजब’ प्रतिभावंत आणि कोणत्याही राष्ट्राला बॉम्बमुळे स्वातंत्र्य मिळवता आलेले नाही, असे म्हणणारा अन्सारी सारखा माणूस की ज्याची स्वत:ची राजकीय समज तोकडी, हास्यास्पद आणि तर्कहीन युक्तिवाद करणारी आहे; अशा माणसांच्या विचारांना जोपर्यंत कांग्रेसच्या निर्णयप्रक्रियेत प्राधान्य राहील, तोपर्यंत देश कांग्रेसकडून फारच थोडी आशा ठेवू शकेल. कांग्रेसमधून अहिंसेची ही सणक संपून जाण्याच्या, आणि ती क्रांतिकारकांच्या खांद्याला खांदा भिडवून संपूर्ण स्वातंत्र्याच्या सामूहिक उद्दिष्टाकडे वाटचाल सुरू करेल त्या दिवसाची क्रांतिकारक वाट पाहत आहेत. क्रांतिकारक गेली २५ वर्षे ज्याचे प्रतिपादन करत आले आहेत त्या उद्दिष्टाला कांग्रेसने यावर्षी मान्यता दिली आहे. आम्हांला आशा आहे पुढच्या वर्षात ते स्वातंत्र्य प्राप्तीच्या (आमच्या) पद्धतींचेही समर्थन करतील.
गांधीजी असे प्रतिपादन करतात की जेव्हा जेव्हा हिंसेचा प्रयत्न झाला, तेव्हा तेव्हा सैनिकांवरील खर्च वाढला. त्यांचा निर्देश जर क्रांतिकारकांच्या गेल्या २५ वर्षातील कृतींकडे असेल, तर आम्ही त्यांचे वक्तव्य मुळापासून चूक आहे असे म्हणतो. आणि आम्ही आव्हान देतो की त्यांनी आपले हे म्हणणे प्रत्यक्ष वस्तुस्थिती आणि आकडेवारीने सिद्ध करून दाखवावे. उलट आमचे असे म्हणणे आहे, की त्यांच्या अहिंसेच्या आणि सत्याग्रहाच्या प्रयोगांचा – ज्यांची तुलना स्वातंत्र्य संग्रामाशी केली जाऊ शकत नाही – नोकरशाहीच्या अर्थव्यवस्थेवर झाला आहे. जनआंदोलन, मग ती हिंसात्मक होवोत अथवा अहिंसात्मक, यशस्वी होवोत वा अयशस्वी; देशातील सरकारच्या अर्थव्यवस्थेवर सारख्याच स्वरूपाचे परिणाम घडवणारच.
आम्हांला हे समजत नाही की सरकारने देशात ज्या भिन्नभिन्न वैधानिक सुधारणा केल्या त्यांच्यात गांधीजी आम्हा क्रांतिकारकांना का अडकवतात? क्रांतिकारकांनी मोर्ले-मिण्टो सुधारणा, मॉण्टेग्यू सुधारणा, किंवा अशाच इतर सुधारणांची ना कधी पर्वा केली, ना त्यांच्यासाठी कधी आंदोलन केले. ब्रिटिश सरकारने तर वैधानिक आंदोलनकर्त्यांना योग्य मार्गावरून पथभ्रष्ट करण्यासाठी म्हणून त्यांच्या समोर हे तुकडे फेकले होत. ब्रिटिश सरकारने त्यांना ही लाच यासाठी दिली की क्रांतिकारकांना चिरडण्याच्या व समूळ नष्ट करण्याच्या ब्रिटिशांच्या धोरणांना त्यांनी साथ द्यावी. ‘भारतासाठी हे एखाद्या खेळण्याप्रमाणे आहेत’ अशी ज्यांची संभावना गांधीजी करतात अशांना, लोकांना भ्रमात ठेवण्यासाठी वेळोवेळी, ‘होमरुल’, ‘स्वशासन’, ‘जबाबदार सरकार’, ‘पूर्ण जबाबदार सरकार’, ‘वसाहती अंतर्गत स्वराज्य’ अशी गुलामीची जी अनेक वैधानिक नावे आहेत, त्यांची मागणी करण्यासाठी पाठवले गेले. क्रांतिकारक कधीही सुधारणांना त्यांचे यश मानत नाहीत. त्यांनी तर स्वातंत्र्याची संकल्पना केव्हाच उच्च पातळीवर नेऊन ठेवली आहे आणि ते त्या उद्दिष्टाच्या पूर्ततेसाठी न कचरता बलिदान देत आहेत. त्यांचा असा दावा आहे की या त्यांच्या बलिदानांमुळे जनतेच्या मानसिकतेमध्ये प्रचंड परिवर्तन घडून आले आहे. त्यांच्या या प्रयत्नांनी देशाला स्वातंत्र्य मिळवण्याच्या मार्गावर फार पुढच्या टप्प्यांवर ते घेऊन गेले आहेत. त्यांच्याशी टोकाचे राजकीय मतभेद बाळगणारे लोकसुद्धा ही गोष्ट मान्य करतात.
गांधीजींचे असे म्हणणे आहे की हिंसेमुळे प्रगतीचा मार्ग खुंटतो आणि स्वातंत्र्य मिळवण्यामध्ये विलंब होत जातो. तर या विषयावर आम्ही अनेक समकालीन उदाहरणे देऊ शकतो की जिथे हिंसेचा अवलंब केल्याने त्यांची सामाजिक प्रगती झाली आणि त्यांना राजकीय स्वातंत्र्य प्राप्त झाले. रशिया आणि तुर्कीचे उदाहरण घ्या. दोन्ही ठिकाणी प्रागतिक पक्षांनी सशस्त्र क्रांतीच्या माध्यमातून राज्ययंत्रणा हस्तगत केली. त्यानंतरच सामाजिक सुधारणांमुळे तेथील जनतेने वेगाने प्रगती केली. अफगाणिस्तानच्या एकाच उदाहरणवरून राजकीय सूत्र सिद्ध केले जाऊ शकत नाही. ते उदाहरण अपवादात्मकच आहे.
गांधीजींच्या मते असहकार आंदोलनाच्या काळात जी जनजागृति झाली, ती अहिंसेच्या उपदेशाच्या परिणामीच होऊ शकली. परंतु ही धारणा चुकीची आहे आणि हे श्रेय अहिंसेला देणेही योग्य नाही. कारण जिथे जिथे थेट कृती झाली तिथे तिथे सर्वाधिक जनजागृति होऊ शकली असेच दिसते. उदाहरणार्थ रशियात कम्युनिस्टांनी उभारलेल्या लढाऊ शक्तिशाली जनआंदोलनामधूनच शेतकरी आणि कामगारांमध्ये जनजागृति झाली. त्यांना तर कोणीही अहिंसेचा उपदेश दिलेला नव्हता. उलटपक्षी आम्ही तर असेही म्हणू की सामूहिक कृतीच्या घोषणांशी एकरूप झालेल्या शक्तींमध्ये अहिंसेचे खूळ आणि गांधीजींची तडजोड वृत्ती यामुळे फाटाफूट झाली. राजकीय अन्यायाचा मुकाबला अहिंसेच्या शस्त्राने करता येईल असे म्हटले जाते. तथापि, याबाबत एवढेच म्हणता येईल, हा एक आगळा विचार आहे आणि आजवर व्यवहारात त्याचा वापर झालेला नाही.
दक्षिण आफ्रिकेमध्ये भारतीयांचे न्याय्य अधिकार मिळण्याची मागणी पदरात पाडून घेण्यात अहिंसेचे शस्त्र अपयशी ठरले. राष्ट्रीय कांग्रेस स्वयंसेवकांची एक मोठी सेना प्रयत्नशील असूनही, तसेच त्यावर जवळजवळ सव्वा कोटी रुपये खर्चूनही हे शस्त्र भारताला स्वराज्य मिळवून देण्यातही अपयशी ठरले. अलीकडेच बार्डोलीच्या शेतकऱ्यांना अगदी किमान अधिकार मिळवून देण्यासाठी गांधी-पटेलांनी जे आश्वासन दिले होते, तेवढेही ते मिळवून देऊ शकले नाहीत. या व्यतिरिक्त, देशव्यापी स्वरूपाच्या इतर कोणत्याही आंदोलनाची आम्हांला माहिती नाही. आत्तापर्यंत या अहिंसेला एकच आशीर्वाद मिळाला, जो अपयशाचा होता. अशा स्थितीत देशाने पुन्हा त्यांच्या प्रयोगाला नकार दिला यात आश्चर्य नाही. वास्तविक गांधीजी ज्या स्वरूपात सत्याग्रहाचा प्रचार करतात तो आंदोलनाचा एक प्रकार आहे, एक विरोध आहे; ज्याची परिणती प्रत्यक्षात पाहिल्याप्रमाणे तडजोडीमध्येच होते. म्हणूनच स्वातंत्र्य आणि गुलामीमध्ये कोणतीही तडजोड होऊ शकत नाही, हे जेवढ्या लवकर आपल्याला कळून येईल, तेवढेच चांगले.
गांधीजींना वाटते की, “आपण नव्या युगात प्रवेश करतो आहोत,” परंतु कांग्रेसच्या घटनेमध्ये केवळ तांत्रिकपणे शब्दांची अदलाबदल करून, म्हणजे ‘स्वराज्या’लाच ‘संपूर्ण स्वातंत्र्य’ असे म्हटल्याने, नव्या युगाचा प्रारंभ होत नाही. कांग्रेस जेव्हा सर्वमान्य क्रांतिकारी सिद्धान्तांचा आधार असलेले देशव्यापी जन आंदोलन करण्याचा निर्णय घेईल, तेव्हा तो दिवस खरोखरी एक महान दिवस असेल. तोवर स्वातंत्र्याचा झेंडा फडकवणे हे विडंबन ठरेल. याबाबतीत सरलादेवी चौधरानी यांनी अलीकडे एका वृत्तपत्र मुलाखतीत व्यक्त केलेल्या त्यांच्या विचारांशी आम्ही सहमत आहोत. त्या म्हणाल्या, “३१ डिसेंबर १९२९ च्या मध्यरात्रीनंतर बरोब्बर १ मिनिटांनी स्वातंत्र्याचा झेंडा फडकविणे ही एक विचित्र घटना होती. त्या वेळी जी. ओ. सी. आणि असिस्टंट जी. ओ. सी. तसेच भपकेदार गणवेषातील इतर बड्या अधिकाऱ्यांनाही हे चांगले माहीत होते, की स्वातंत्र्याचे निशाण फडकवण्याचा निर्णय अर्ध्या रात्रीपर्यंत अधांतरी लटकत होता. कारण व्हाइसरॉय किंवा सेक्रेटरी आफ स्टेट यांचा कांग्रेसला जर असा संदेश आला असता, की भारताला वसाहती-अंतर्गत स्वराज्य देण्यात येत आहे, तर रात्री ११ वाजून ५९ व्या मिनिटालादेखील परिस्थिती बदलू शकत होती. यावरून हेच स्पष्ट होते की संपूर्ण स्वातंत्र्याचे ध्येय ही या नेत्यांची मनापासूनची इच्छा नव्हतीच. उलट ती कृती एखाद्या बालहट्टासारखी घडली होती. आधी स्वातंत्र्य मिळवून मगच त्याची घोषण करणे, ही भारतीय राष्ट्रीय कांग्रेससाठी खरे तर योग्य कृती ठरली असती.” हे उघडच आहे की आता वसाहती अंतर्गत स्वराज्याऐवजी कांग्रेसचे वक्ते जनतेसमोर संपूर्ण स्वातंत्र्याचे ढोल बडवतील. ते आता लोकांना सांगतील की जनतेने संघर्षसाठी तयार झाले पाहिजे. अशा संघर्षात ज्यात एक बाजू ठोसे मारत राहील आणि दुसरी बाजू ते केवळ झेलत राहील. तिने तोपर्यंत हे सहन करत गेले पाहिजे, जोपर्यंत खूप तुडवले जाऊन पुन्हा फिरून ती उठूच शकणार नाही. याला संघर्ष म्हणता येईल का? आणि यातून देशाला स्वातंत्र्य मिळू शकेल का? कोणत्याही राष्ट्राने सर्वोच्च उद्दिष्टाचे ध्येय समोर ठेवणे हे चांगलेच आहे. परंतु त्याचबरोबर त्या उद्दिष्टांपर्यंत पोहोचण्यासाठी सर्वोत्तम, सर्वांत सामर्थ्यवान आणि पूर्वीही ज्यांचा उपयोग करण्यात आला आहे अशा साधनांचा उपयोग करणे, हेही आवश्यक आहे. अन्यथा सगळ्या जगासमोर आपण हास्यास्पद बनण्याचा धोका आहे.
गांधीजींनी सर्व विचारी लोकांना असे सांगितले आहे, की त्यांनी क्रांतिकारकांना सहकार्य करण्याचे थांबवावे. तसेच त्यांच्या कार्याची निंदा करावी, त्यामुळे प्रत्येक वेळी हिंसात्मक कार्यामुळे झालेली प्रचंड हानी त्यांच्या लक्षात येईल. किती सोपे आहे, लोकांना भ्रमिष्ट तसेच विवेकशून्य म्हणणे; क्रांतिकारकांची निंदा करून जनतेला त्यांच्याशी सहकार्य न करण्याचा संदेश देणे व अशा प्रकारे आपले कार्य स्थगित ठेवण्यास त्यांना भाग पाडणे! विशेषकरून जनतेतील प्रभावशाली गटांचा विश्वास आणि पाठिंबा असलेल्या व्यक्तीला हे किती सहज सोपे आहे! गांधीजींनी आयुष्यभर जनजीवनाचा अनुभव घेतला आहे, परंतु तरीही ही दु:खाची गोष्ट आहे की त्यांना क्रांतिकारकांची मानसिकता ना कधी समजली आणि ना कधी ती समजून घेण्याची त्यांची इच्छा आहे. प्रत्येक क्रांतिकारकाला प्रिय असलेला सिद्धांत अमूल्य आहे. जी व्यक्ती क्रांतिकारक बनते, आपले शीर तळहातावर घेऊन ती कोणत्याही क्षणी आत्मबलिदान करण्यासाठी तयार असते; तेव्हा ती फक्त मौज म्हणून हे करत नसते. हा त्याग, हे बलिदान जनता जेव्हा सहानुभूती दाखवण्याच्या मनस्थितीत असते त्यावेळी तिने त्याचा जयजयकार करावा म्हणून केलेला नसतो, तर त्याचा विवेक त्याला तसे करायला भाग पाडतो, त्याची सद्सद्विवेकबुद्धी त्याला प्रेरणा देते म्हणून तो या मार्गाचा अंगिकार करतो.
कोणताही क्रांतिकारक इतर कशाहीपेक्षा तर्कशुद्ध विचारांवर सर्वांत जास्त विश्वास ठेवतो. तो तर फक्त विवेक आणि विवेकबुद्धीसमोरच झुकतो. कोणत्याही प्रकारची शिवीगाळ किंवा निंदा, मग ती कितीही उच्च स्तरावरून केली गेलेली असो, ती त्याला आपल्या उद्दिष्ट प्राप्तीपासून वंचित करू शकत नाही. त्याला जर लोकांचा पाठिंबा मिळाला नाही, किंवा त्याच्या कार्याची जर प्रशंसा झाली नाही तर तो आपले ध्येय सोडून देईल, असा विचार करणे हा तद्दन मूर्खपणा आहे. सनदशीर आंदोलनकर्त्यांनी ज्यांच्या कार्यावर कठोर टीका केली, अशा अनेक क्रांतिकारकांनी त्याची पर्वा न करता स्वत:ला फाशीच्या तख्तावर झोकून देऊन आपल्या उद्दिष्टांसाठी प्राण दिले. क्रांतिकारकांनी आपले कार्य स्थगित ठेवावे असे जर तुम्हांला वाटत असेल, तर त्यासाठी त्यांच्याशी थेट तर्कशुद्ध विचारांनी युक्तिवाद करून आपले मत सिद्ध करून दाखवले पाहिजे. त्यासाठी हा आणि केवळ हाच एकमेव मार्ग आहे. याबद्दल कोणाच्याही मनात कोणताही संदेह असता कामा नये. क्रांतिकारक अशा प्रकारच्या धमकावण्याला कदापि भीक घालणार नाहीत.
आम्ही प्रत्येक देशभक्ताला आवाहन करतो की आमच्यासोबत अतील गांभीर्यासह या लढ्यात सामील व्हा. कोणाही व्यक्तीने अहिंसा आणि तत्सम अजब तऱ्हेचे मानसशास्त्रीय प्रयोग करून राष्ट्राच्या स्वातंत्र्याशी खेळ खेळू नये. स्वातंत्र्य हा राष्ट्राचा प्राण आहे. आमची गुलामगिरी आमच्यासाठी लज्जास्पद आहे. ती झुगारून देऊन, त्यापासून मुक्त होण्यासाठी लागणारे पुरेसे धैर्य आणि शहाणपण आपल्यापाशी कधी येईल? परकीय गुलामी, परकीय झेंडे आणि परकीय सत्ताधीशांसमोर मान झुकवण्यापासून स्वत:ला रोखण्यासाठी लागणारा पुरेसा स्वाभिमान जर आमच्यात नसेल; तर आमच्या प्राचीन परंपरा आणि गौरवशाली इतिहास यांचा काय उपयोग?
ब्रिटन भारतात अनैतिक राज्य चालवले आम्हांला भिकारी बनवले, आमचे रक्त शोषले, हा अन्याय नव्हे का? एक समाज आणि माणूस म्हणून आमच्यावर घोर अपमान तसेच अत्याचार लादले. तरीही हा अपमान आम्ही विसरावा आणि ब्रिटिश राज्यकर्त्यांना क्षमा करावी, असे जनतेला वाटते का? आम्ही सूड घेऊ, जनतेकडून अत्याचारी राज्यकर्त्यांवर घेतलेला न्यायोचित सूड! माघार घेणे, समझोता व शांततेसाठी हांजी हांजी करणे हे भेकडांना करू द्या. आम्ही कोणाकडूनही दयेची भीक मागत नाही आणि आम्हीही कोणाला क्षमा करणार नाही. आमचे युद्ध विजय किंवा मृत्यूचा अंतिम निर्णय होईपर्यंत चालतच राहील.
इन्कलाब झिंदाबाद
कर्तारसिंह*
अध्यक्ष
(२६ जानेवारी १९३०) हिंदुस्तान सोशालिस्ट रिपब्लिकन असोसिएशन
(*भगतसिंह यांचे टोपण नाव)