भारतीय भांडवलदारवर्ग आपल्याच जनतेचा विश्वासघात करून त्याच्या मोबदल्यात परकीय भांडवलदारांकडून सरकारात काही फुटकळ वाटा मिळवण्याच्या प्रयत्नात आहे. म्हणूनच कष्टकरी वर्गाच्या सर्व आशा आता समाजवादावर केंद्रीत झाल्या आहेत. त्यातूनच संपूर्ण स्वातंत्र्य मिळवण्याच्या, सर्व भेदभाव व विशेषाधिकार नष्ट करण्याच्या दिशेने यशस्वी वाटचाल करता येणार आहे. देशाचे भवितव्य आता तरुणांच्या खांद्यावर आहे. तेच या धरतीचे सुपुत्र आहेत. हालअपेष्टा सहन करण्याची त्यांची तयारी, त्यांचे निडर शौर्य आणि आत्मबलिदानाची उसळती भावना हेच सांगतात, की भारताचे भवितव्य त्यांच्या हाती सुरक्षित आहे. एका अनुभूतीपूर्ण क्षणी देशबंधू दास म्हणाले होते की, “युवक हे भारतमातेचा मानबिंदू आणि आशास्थान दोन्ही आहेत. या आंदोलनाच्या मागे त्यांची प्रेरणा, त्यांचे बलिदान आणि त्यांचा विजय आहे. हाती मशाल घेऊन स्वातंत्र्याच्या मार्गावर निघालेले आघाडीचे सैनिक हेच आहेत. ते मुक्तीच्या मार्गावरील तीर्थयात्री आहेत.”