शहीद भगतसिंह स्मृति संकल्प अभियान : मुंबई, 25 सप्टेंबर 2024

आज जेव्हा आपण देशाच्या परिस्थितीकडे पाहतो तेव्हा एक गंभीर चित्र डोळ्यासमोर दिसते. झपाट्याने वाढणारी बेरोजगारी आणि महागाई, केंद्र आणि राज्य सरकारे, जी “शायनिंग इंडिया” चे खोटे चित्र दाखवत आहेत, त्याचे पितळ उघडे पाडतात. एकीकडे बहुसंख्य लोकसंख्या दर दिवस उदरनिर्वाहासाठी संघर्ष करताना दिसते तर दुसरीकडे, आपल्याला अल्प असा धनाढ्य वर्ग ऐषोआरामात आनंदात जगताना दिसतो. आपण अशा देशात राहतो जिथे एका कुटुंबाकडून लग्नासाठी 5000 कोटी रुपये खर्च केले जातात, तर दररोज 5 वर्षांखालील 4500 मुलं भुकेमुळे मृत्यू पावतात. ही परिस्थिती आपल्याला शहीद भगतसिंह यांच्या लिखाणाची आठवण करून देते, जेव्हा त्यांनी ब्रिटिश सत्ताधीशांच्या जागी भारतीय शासक येतील आणि सामान्य जनतेची लूट करतील असं म्हटलं होतं.

भगतसिंह आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी देशाच्या भविष्याबद्दल केलेली सर्व भाकितं खरी ठरल्यासारखी दिसतात. स्वातंत्र्यानंतर सर्वच सरकारांनी भगतसिहांचे विचार लोकांपर्यंत पोहचू दिले नाहीत ज्यामुळे आज त्यांच्या समान आणि न्यायपूर्ण अशा समाजवादाच्या स्वप्नाला बहुसंख्य लोक विसरले आहेत. भगतसिंह आणि त्यांच्या सहकाऱ्यांचीओळख केवळ स्वातंत्र्यसैनिक असण्यापुरत्या मर्यादित केली जाते आणि त्यांच्या समाजात क्रांतीद्वारे संपूर्ण परिवर्तनाच्या मूलगामी विचारांना त्यातून वजा केले जाते.

शहीद भगतसिंह अशा देशाचे स्वप्न पहात होते जिथे प्रत्येक नागरिकाची मूलभूत गरज – निवारा, अन्न, आरोग्य, शिक्षण आणि रोजगार – पूर्ण केली जाईल. भविष्यातील पिढीला त्यांनी दिलेला संदेश होता की, जाती-धर्म आणि प्रदेशाच्या आधारावर आपण विभाजित होऊ नये. त्यांचा हा संदेश आता अधिक तातडीने जनतेपर्यंत पोहोचवण्याची गरज आहे, विशेषतः अशा काळात जेव्हा फॅशिश्ट शक्ती आपल्यामध्ये धार्मिक द्वेष भडकवून आपल्याला खऱ्या समस्यांपासून दूर ठेवत आहेत.

भगतसिहांचे क्रांतिकारी विचार सर्वांपर्यंत पोहचवण्यासाठी शहीद भगतसिंह स्मृती संकल्प अभियाना अंतर्गत नौजवान भारत सभा देशभरात काम करत आहे. मुंबईत आम्ही क्रांतिकारी साहित्याचे पुस्तक स्टॉल्स लावत आहोत, मानखुर्द तसेच इतर ठिकाणीही मुलांमध्ये सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करत आहोत आणि विविध महाविद्यालयांत जाऊन “इंकलाब” हा माहितीपट दाखवून भगतसिंह आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा क्रांतिकारी वारसा पुढे नेत आहोत.

Related posts

Leave a Comment

ten − two =