शहीद भगतसिंह स्मृति संकल्प अभियान : पुणे, 25 सप्टेंबर 2024

28 सप्टेंबर शहीद भगतसिंह जन्मदिवसानिमित्त देशभरामध्ये शहीद स्मृती संकल्प अभियान राबविले जात असून त्या अंतर्गत पुस्तक प्रदर्शन, पथनाट्य इत्यादींच्या माध्यमातून जनतेपर्यंत जात शहिदांचा वारसा घेऊन जाण्याचे काम नौजवान भारत सभेतर्फे केले जात आहे. पुण्यातील तळजाई, व्हीआयटी कॉलेज चौक इत्यादी ठिकाणी बुकस्टॉलच्या माध्यमातून शहीद क्रांतिकारकांचे विचार तरुणांपर्यंत पोहोचवण्याचे काम याअंतर्गत केले जात आहे. गुडलक चौक, अप्पर वसाहत, जनता वसाहत इत्यादी ठिकाणी “बाईचीच चूक” या पथनाट्याचे प्रयोग करण्यात आले. या नाटकाच्या माध्यमातून महिलांची सुरक्षितता आणि पुरुषसत्ताक समाजव्यवस्था यावर समाजप्रबोधन करण्यात आले.

शहीद भगतसिंह यांनी एका समतामुलक समाजाचे स्वप्न बघितले होते, ज्यामध्ये एका माणसाकडून दुसऱ्या माणसाचे शोषण होणार नाही, त्यात स्त्री पुरुष समानता असेल, स्त्रिया सुरक्षित असतील, आर्थिक विषमता नसेल. परंतु आज परिस्थिती अगदी उलट आहे. आज देशभरामध्ये स्त्रियांवरील अत्याचारांमध्ये प्रचंड वाढ झालेली आहे. युवकांमध्ये मोठ्या प्रमाणावर बेरोजगारी असल्यामुळे नैराश्याने ग्रस्त होऊन आत्महत्या करण्याची वेळ त्यांच्यावर ओढवत आहे. भांडवली शोषणाने कळस गाठला आहे आणि कामगारांचे जीवन नरकासमान झालेले आहे. अशा परिस्थितीमध्ये आज परत एकदा आपल्या लाडक्या क्रांतिकारकांचा वारसा, त्यांचे विचार, त्यांचे स्वप्न जनतेमध्ये, तरुणांमध्ये घेऊन जाण्याची गरज आहे आणि त्यातून प्रेरणा घेत एका नवीन शोषण मुक्त समाजाच्या निर्मितीकडे वाटचाल करण्याची गरज आहे. ह्याच उद्दिष्टाने शहीद स्मृती संकल्प अभियान नौजवान भारत सभा राबवत आहे. या अभियानाला, बुकस्टॉल व पथनाट्याला जनतेचा चांगला प्रतिसाद मिळत असून लोकांमध्ये सध्याच्या परिस्थितीबाबत प्रचंड चीड असल्याचे दिसून येत आले. तरुण नवीन पर्यायाच्या शोधात आहेत. नौजवान भारत सभा तरुणांना आणि न्यायप्रिय जनतेला आवाहन करत आहे की त्यांनी नौजवान भारत सभे सोबत जोडून घेत क्रांतिकारकांचा वारसा पुढे घेऊन जाण्यासाठी योगदान द्यावे.

Related posts

Leave a Comment

4 × 3 =