भगतसिंह यांच्या पिढीतील क्रांतिकारकांप्रमाणेच उधमसिंह हे देखील विचारशील क्रांतिकारी होते. भगतसिंहांप्रमाणे उधमसिंह सुध्दा तर्कशील नास्तिक होते. 1930 च्या दशकात राष्ट्रीय राजकारणात साम्प्रदायिकतेच्या वाढत्या प्रभावामुळे ते फार अस्वस्थ आणि चिंतेत राहायचे. लहानपणीच त्यांनी गरिबीच्या कठोर यातना भोगल्या होत्या आणि दलित पार्श्वभूमीतून आल्यामुळे त्यांनी जातीय भेदभाव, अन्याय आणि छळ प्रत्यक्ष अनुभवला होता. या अनुभवांनी उधमसिंह यांना एक कट्टर धर्मनिरपेक्ष आणि जातिव्यवस्थेविरोधी लढणारे क्रांतिकारी बनवले. त्यांचा ठाम विश्वास होता की भारतीय जनता साम्प्रदायिक शक्तींच्या फूट पाडणाऱ्या धोरणांना अपयशी ठरवून आणि जातीय भेदभाव दूर करून जेव्हा मजबूत एकी निर्माण करेल तेव्हाच ती गुलामगिरीच्या बेड्यांमधून मुक्त होऊ शकेल. अन्यथा खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य मिळू शकणार नाही!
आपल्या या विचारांवर ठाम राहून त्यांनी आपले नाव बदलून राम मोहम्मद सिंह आझाद ठेवले होते, जे तीन प्रमुख धर्मांचे प्रतीक होते. ते या नावाने केवळ पत्रे लिहित नव्हते, तर त्यांनी हे नाव आपल्या मनगटावरही गोंदवून घेतले होते. उधमसिंह हे अशा स्वतंत्र भारताचे स्वप्न पाहत होते, जिथे सामान्य कष्टकरी जनतेच्या हातात सत्ता असेल, मूठभर श्रीमंतांच्या हाती नव्हे! उधमसिंह यांच्या स्वप्नातील भारत हा धार्मिक कट्टरता आणि जातीय भेदभावमुक्त भारत होता!
