कष्टकरी साथींनो आणि तरुण मित्रांनो,जीवनाच्या संघर्षात आणि रोजीरोटीच्या शोधात वणवण करता करता स्वातंत्र्यानंतरच्या पिढ्यांनी खूप काही बघितलं, जाणलं आणि भोगलं आहे. त्यांनी जनतेच्या खऱ्या स्वातंत्र्यासाठी क्रांतिकारकांच्या सर्वोच्च बलिदानासोबत भांडवलधार्जिण्या पुढाऱ्यांचे तडजोडी देखील बघितल्या आहेत. त्यांनी सत्तासूख आणि निहीत स्वार्थासाठी होणारं देशाचं धार्मिक विभाजन आणि धार्मिक दंगली सुद्धा बघितल्या आहेत. स्वातंत्र्यानंतर स्वतःच्या जमिनीवरून उध्वस्त होणारे शेतकरी व मजूर बघितले आहेत. रोजगाराच्या शोधात वणवण भटकणारे तरुण बघितले आहेत. देशात भरपूर खाद्यान्न असतानासुद्धा भूक आणि कुपोषणाने होणारे मृत्यु बघितले आहेत. देशातील कष्टकरी जनतेची आजची पिढीसुद्धा त्याच समस्या, अडचणी व संघर्षांमध्ये गुंतलेली आहे जे अगोदरच्या पिढ्यांनी भोगलं आहे. उलटपक्षी आज जीवनाच्या समस्या व अडचणी अधिक जास्त जटील व गुंतागुंतीच्या झाल्या आहेत. असं का घडलं ह्याचा आपण कधी विचार केला आहे? ज्या इंग्रजांच्या जाण्याने जनतेला आनंदी जीवन मिळणार होतं, ज्यांच्या जाण्याने शेतकरी व मजुरांचे दिवस बहरणार होते, ज्या इंग्रजांच्या जाण्याने सर्वांना शिक्षण – स्वास्थ्य, रोजगार मिळणार होता, ज्यांच्या जाण्याने समाधानाचा घास मिळणार होता, त्यांच्या जाण्यानंतरही सर्व जसेच्या तसेच का आहे? उलटपक्षी आम्हा कष्टकऱ्यांचे जीवन अधिकाधिक उध्वस्त होत गेलं. असं का झालं?
कारण स्वातंत्र्याच्या लढ्याचं नेतृत्व करणाऱ्या मुख्य धारेचा लढा सर्व शोषणाविरोधात नव्हता. देशी शोषकांविरुद्ध नव्हे तर फक्त विदेशी शोषकांविरुद्ध होता. कारण त्यांचा लढा हा कष्टकऱ्यांच्या सत्तेसाठी नव्हे तर देशी भांडवलदारांच्या सत्तेसाठी लढला गेला. कारण लढाई समतामूलक समाजासाठी नव्हे तर नफ्यावर ताबा मिळवण्यासाठी होती.
परंतु शोषणाविरुद्ध, कष्टकऱ्यांच्या सत्तेसाठी व समतामुलक समाजासाठी कोणीच लढत नव्हतं असंही नव्हतं. ही लढाई लढत होते हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशनचे कार्यकर्ते! जिचे सदस्य भगतसिंग, राजगुरू, सुखदेव, भागवतीचरण वोहरा यांसारखे क्रांतिकारक होते. आणि ज्यांचे कमांडर इन चीफ होते चंद्रशेखर आझाद. त्यांच्याच बलिदान दिनाच्या (27 फेब्रुवारी ) निमित्ताने आम्ही तुमच्याशी बोलत आहोत.
सन 1931 भारताच्या क्रांतिकारी आंदोलन व देशातील कष्टकरी जनतेसाठी सर्वांत घातक ठरलं! कारण 27 फेब्रुवारी 1931 रोजी इंग्रजांशी लढतांना आझाद शहीद झाले आणि 23 मार्च 1931 लाच भगतसिंग, राजगुरू व सुखदेव यांना इंग्रज सरकारने फाशी देऊन भांडवलशाही – सम्राज्यशाही व प्रत्येक प्रकारच्या शोषणाविरुद्ध लढणाऱ्या खऱ्या योद्धांना आपल्या मार्गातून हटविले. या क्रांतिकारकांच्या बलिदानानंतर कामगार कष्टकऱ्यांची सत्तेची आशा थोडी धूसर झाली, परंतु संपली नाही. कारण ह्या व्यक्तींना मारून सुद्धा ते त्यांच्या विचारांना संपवू शकले नाहीत.
चंद्रशेखर आझाद यांचा जन्म कमालीची गरिबी, अशिक्षितता, धार्मिक कट्टरतेच्या वातावरणात झाला. आणि ते पुस्तकं वाचून नाही तर राजकीय संघर्ष व जीवन संघर्षातील आपल्या सक्रिय अनुभवातून शिकून त्या क्रांतिकारी दलाचे नेते झाले ज्या दलाचं उद्देश्य फक्त इंग्रजांना घालवणं नव्हतं तर एक शोषणविरहित आणि समतामूलक समाजाची स्थापना करणं होतं. कामगारांच्या सत्तेशिवाय आणि शोषणाच्या प्रत्येक रूपाचा विनाश केल्याशिवाय, देशातील कष्टकरी जनतेची मुक्ती शक्य नाही हे सत्य ते जाणून होते. जोपर्यंत आपल्या देशातील जनता देशी – विदेशी भांडवलदारांच्या नफ्यासाठी आपल्या हाडामासाचा, रक्ताचा एक एक थेंब वाहायला मजबूर आहे, जोपर्यंत शिक्षण, आरोग्य, रोजगार, उत्तम आवास, उत्तम भोजन यांपासून एकही कामगार वंचित आहे, जोपर्यंत भूक आणि कुपोषणाचा भस्मासुर आमच्या बालकांना गिळत राहील तोपर्यंत आमच्या क्रांतिकारकांचे स्वप्न आमच्या स्मरणात राहील. ज्या स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी त्यांना आपल्या प्राणांची देखील आहुती द्यावी लागली ते स्वप्न आम्ही जिवंत ठेवू.
साथींनो, आजचा काळ हातावर हात धरून आणि स्वतःच्या नशिबावर विश्वास ठेवून बसण्याचा नाही. कुणी मसीहा किंवा पैगंबर येऊन आपल्याला मुक्ती मिळवून देईल असेही नाही. आपणच आपली ताकद ओळखायला हवी. चंद्रशेखर आझादसारखे क्रांतिकारक देखील कोणी अवतार पुरुष नव्हते, ते सुद्धा तुमच्याआमच्या सारखे मानवंच होते. त्यांनीसुद्धा मुंबईत मजुरी करण्यापासून कितीतरी रात्री रस्त्यावर व फूटपाथवर व्यतीत केल्या होत्या. परंतु त्यांनी जीवनाच्या त्या संकटांपुढे गुडघे न टेकता जीवनाला अधिक सुंदर आणि अर्थपूर्ण बनविण्याचं जे स्वप्न बघितलं, जो संकल्प केला त्यास पूर्णत्वाकडे नेण्याचा प्रयत्न शेवटच्या श्वासापर्यंत करत राहिले. आपण कष्टकऱ्यांनी ज्या हातांनी या भांडवली जगाच्या इमल्यांना उभं केलं, ज्यावर भांडवलदार मिरवतात, त्याच हातांनी आता आपल्या शोषणमुक्त समतामूलक भविष्याला रचावं लागेल. नव्या जोमानं क्रांतिकारी आंदोलनाची सुरुवात करावी लागेल. इतिहासातील चुकांपासून धडा घेत, क्रांतिकारी संघटनेचा पाया रचावा लागेल. आपल्याला पुन्हा एकदा नव्या ऊर्जेनं आणि नव्या आवेगानं आपल्या मुक्तीस्वप्नांना देशाच्या कानाकोपऱ्यात पसरवावं लागेल. शासक वर्गाच्या आपल्याला जाती धर्मात वाटण्याच्या षडयंत्राविरुद्ध आपल्याला प्रत्येक जाती – धर्मातील कष्टकऱ्यांची वर्गीय एकजूट बनवावी लागेल. तेव्हाच आपण आपल्या शहिदांच्या वास्तविक स्वप्नांना पूर्ण करू शकू.
क्रांतिकारी अभिवादनसोबत,
नौजवान भारत सभा
