मित्र-मैत्रिणींनो,
शहीद भगतसिंह यांच्या 117व्या जन्मदिवस प्रीत्यर्थ नौजवान भारत सभा ( ) द्वारे पुण्यातील विविध भागांतील कामगार कष्टकऱ्यांच्या वस्त्यांमध्ये, शाळा महविद्यालयांमध्ये, सामाजिक ठिकाणी “शहीद भगतसिंह स्मृती संकल्प अभियान” आयोजित केल्या गेले आहे. त्याच अंतर्गत आज 28 सप्टेंबर रोजी नौजवान भारत सभेच्या कार्यकर्त्यांनी दापोडी, पुणे येथील शहीद भगतसिंहांच्या पुतळ्यास प्रभातसमयी भेट दिली आणि माल्यार्पण करून त्यांना क्रांतिकारी अभिवादन केले.
सुरुवातीला नौजवान भारत सभेच्या साथी सुप्रीत यांनी भगतसिंहांच्या स्वप्नातील भारताविषयी वक्तव्य केले. त्यांनी ज्या समतामुलक समाजाची स्वप्ने बघितली त्याविषयी देखील मांडणी करण्यात आली. तद्नंतर साथी सुप्रीत यांनी वर्तमानात देशभरातील विविध समस्यांबद्दल बोलत भगतसिंहांच्या विचारांच्या प्रासंगिकतेविषयी मांडणी करत देशभरातील तरुणांना संघटित होण्याचे आव्हान केले.
शेवटी साथी रवी यांनी भगतसिंहांच्या प्रेरणादायी जीवनप्रवासातील वेगवेगळे अनुभव, त्यांनी केलेला विविध समस्यांचा सामना, इत्यादी प्रेरक प्रसंगांतून तरुणांना शिकवण घेण्यास प्रोत्साहित केले. बालवयापासूनच त्यांचे जनतेवर असलेले निस्सीम प्रेम आणि कामगार कष्टकरी वर्गाशी घट्ट जुळलेली नाळ युवकांमध्ये त्यांच्याविषयी आदरभावासहितच आत्मीयता उत्पन्न करते.
वसाहतवादाच्या निराशाजनक अंधाऱ्या समयी जेव्हा देशातील अधिकांश युवक चळवळीपासून दूर होते व चळवळीत उतरण्यास तयार नव्हते, अशा विकट प्रसंगी अभ्यास करून आपली वैचारिक समजदारी वाढवत वैज्ञानिकतेच्या आधारावर समाजाची पुनर्निर्मिती करणाऱ्या साम्यवादी विचारधारेचे खंदे पुरस्कर्ते आणि क्रांतिकारी प्रवर्तक बनण्याच्या त्यांच्या प्रेरक प्रवासाचे अध्ययन करण्यासाठी प्रेरित होण्याचे तरूणांना आव्हान करण्यात आले.
इतर क्रांतिकारकांविषयी त्यांची प्रेमात्मियता, तसेच त्यांच्या साथींसोबतची त्यांची कॉम्रेडरी, त्यांचे सौहार्द, सोबतींच्या आयुष्यातील प्रश्नांना, द्वंद्वांना सैद्धांतिक पद्धतीने सोडवून साथींना पुढे आणण्यात त्यांचा खारीचा वाटा, स्वतःसारखेच त्यांना चळवळीसाठी आणि समाजवादाच्या प्रस्थापनेच्या व्यापक क्रांतिकार्यासाठी समर्पित होण्यास प्रेरित करणे इत्यादी गोष्टी त्यांच्यापासून शिकण्यासारख्या आहेत. युवावस्थेतच विचारांची अशी प्रखरता अन् सिद्धांतांची जाण, तसेच मानवीय संवेदनांनी युक्त जिवंतता सुद्धा आज देशभरातील तरुणांनी आत्मसात करणे गरजेचे आहे.
भगतसिंह तुरुंगात असताना, फाशीची शिक्षा सुनावल्यानंतर देखील, मृत्युमुखी जावे लागण्याची भीती न बाळगता, निर्भयपणे नैराश्याच्या नरड्याचा घोट घेत अत्यंत चिकाटीने त्यांनी जगभरातील प्रगतीशील साहित्य अन् क्रांतिकारकांचे लिखाण वाचले आणि त्यामधून पुढच्या समाजाची ही चळवळीची मशाल स्वतः मृत्युशय्येवर गेल्यानंतरही कशी तेवत राहील यासाठी—म्हणजे, ह्या समाजाच्या पुनर्निर्मितीच्या चळवळीला निरंतर ठेवत तिला योग्य दिशा देण्यासाठी त्यांनी अभ्यास सुरू ठेवला व तुरुंगातूनच अनेक पुस्तके व लेख त्यांनी लिहिले. मृत्युलादेखील न घाबरता जनतेला संघटित करत ह्या जनविरोधी सत्तेसोबत लढण्याची प्रेरणा त्यांच्या आयुष्यातून मिळते ही मार्मिक मांडणी करण्यात आली. शेवटी “इंकलाब जिंदाबाद”, “शहीदों के जो ख़्वाब अधूरे, इसी सदी में होंगे पूरे” इत्यादी घोषणांच्या गर्जनांना प्रतिनाद देत कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
सायंकाळी अप्पर, सुप्पर बिबवेवाडी, व्हीआयटी कॉलेज चौक या भागात पदयात्रा काढण्यात आली. पदयात्रेदरम्यान पत्रके वाटत, घोषणाबाजी करत, ठीकठिकाणी भाषणे करत पदयात्रा संपन्न झाली.
भगतसिंह म्हणाले होते “…आम्ही हे सांगू इच्छितो की युद्ध पेटले आहे, आणि बलिष्ठ जोपर्यंत भारतीय जनता आणि श्रमिकांच्या उत्पन्नाच्या साधनावर आपला एकाधिकार टिकवून ठेवतील, तोपर्यंत हे युद्ध सुरूच राहील. मग ते ब्रिटिश भांडवलदार असोत, ब्रिटिश शासक असोत व पूर्ण भारतीय असोत. आपापसात साटेलोटे करून त्यांनी लूट चालवली आहे. जरी भारतीय भांडवलदार गरिबांची पिळवणूक करत असतील, तरी या अवस्थेत काही फरक पडणार नाही.”
याच वर्षी नीट, नेट, सीयूईटी इत्यादी परिक्षांतील पेपरफुटी आणि घोटाळे घ्या, देशातील वाढते बेरोजगारीचे आकडे, आरजी कर, बदलापूर, कोल्हापूर इ. येथील घटना, छेडछाड, बलात्कार, स्त्री सुरक्षेचे मुद्दे, देशपातळीवर घटीत होणाऱ्या धर्मांध दंगली, गोरक्षेच्या नावाखाली चिरडल्या जाणारी आयुष्ये, सत्ताधीश नेत्यांकडून, धर्मवादी कट्टरपंथीय पंड्यांकडून दिल्या जाणाऱ्या नरसंहारांच्या घोषणा, वाढती महागाई, एनईपी मुळे ढासळती सरकारी शिक्षण व्यवस्था, चार लेबर कोड्स इ. भगतसिंहांचा 118 वा जन्मदिन येईपर्यंत ही हा पाढा संपणार नाही इतकी जनविरोधी कृत्ये… विद्यार्थी, तरुण, महिला इ. सर्वच, एकंदरीत कामगार कष्टकरी वर्ग आजरोजी छळवणुकीचे आयुष्य जगत आहे. आज देश आर्थिक मंदीच्या संकटाने ग्रसित आहे आणि फॅशिस्ट आरएसएस भाजप सरकार मागील एका दशकापासून केंद्रात स्थापित आहे आणि भांडवलदार वर्गाची चाकरी करीत त्यांची लाळ पुसण्यासाठी सदैव आसुसलेले आहे.
भाजप सत्तेत येण्यापूर्वी सुद्धा काँग्रेस सरकारने भांडवलदारांचे तळवे चाटत जनतेची लूट करण्याखेरीज दुसरे काहीही केलेले नाही. नाममात्र स्वातंत्र्य मिळाल्यापासूनच त्या “गोऱ्या इंग्रजांच्या” जागी हे “काळे इंग्रज” सत्तेत असून हे इंग्रजांपेक्षाही कैकपटीने जास्त रक्तशोषी आहेत याची यातनामयी प्रचिती देशाच्या कामगार कष्टकरी वर्गाला येत आहे.
भारतभूला स्वातंत्र्य मिळाले पण इथल्या कष्टकरी कामगार जनतेला छळ, शोषण आणि लुटीपासून निमिषार्धासाठीही स्वातंत्र्याचे अमृत चाखता आलेले नाही. लोकशाही अधिकारांचे हनन करण्याच्या चेष्टेविरोधात आवाज उठविणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याला, पत्रकाराला, किंबहुना आंदोलनकर्त्या सामान्य जनतेलाही तुरुंगात डांबले जात आहे. फॅशिस्टांच्या मांडीवर खेळणाऱ्या मीडिया कडून ह्यावर बोलण्याची अपेक्षा असूच शकत नाही; त्यातही कामगार कष्टकरी जनतेसाठी हसतमुखाने फासावर जाणाऱ्या भगतसिंहाचे विचार प्रसारण करणे तिला न झेपण्याजोगे आहे कारण तिच्या मानगुटीवर बसलेला भांडवलदार वर्ग आपला वरदहस्त काढून घेईल आणि तिला ही प्रस्थापितांच्या गटातून निघून तुरुगांत जावे लागेल.
पण ह्या अमाप अन्यायाविरुद्ध एकट्याने कारवाया करणे मूर्खपणाचे आहे. एकट्याने आवाज केला तर अत्याचाऱ्यांच्या कानाला फक्त गुदगुली होईल, अथवा क्षणभर खाज येईल; शहीद भगतसिंहांनीच सुचविल्याप्रमाणे आपल्याला व्यक्तीवाद सोडून एकत्रित येऊन आवाज उठविला पाहिजे म्हणजे बहिर्यांच्या कानाचे परदे फुटून अत्याचाऱ्याला थरथरी सुटल्याशिवाय सुटका नसेल. शिक्षण, बेरोजगारी, महागाई, इत्यादी जनतेच्या मूळ मुद्द्यांसाठी, अत्याचारी भांडवलदार वर्ग आणि त्यांचे चाकर भाजप सरकारविरोधात लढण्यासाठी आणि भगतसिंहांच्या स्वप्नातील तेजःपुंज समाजाची निर्मिती करण्यासाठी आज देशातील कामगार कष्टकरी वर्गाने जातीधर्माचे गैरमुद्दे सोडत वर्गाच्या आधारे संघटित होऊन खऱ्या स्वातंत्र्यसमरासाठी, अन्यायविरोधी संघर्षासाठी, समाजवादी व्यवस्था स्थापनेच्या क्रांतीसंग्रामासाठी एकत्र येणे आज अत्यावश्यक बनले आहे.
इंकलाब जिंदाबाद!
“क्रांतिकार्य हे इथे राहिले अपूर्णचि आमुचे ।
पुढे नेऊनी पूर्ण करा ते कर्तव्य तुमचे ॥
जीस्तव आम्ही प्राण वेचिले झेलुनिया घावा ।
मम मित्रांनो ध्वजा लाल ही तुम्ही उंच ठेवा ॥” (साठे)
शहीद भगतसिंह स्मृति संकल्प अभियान : पुणे, 28 सप्टेंबर 2024
