“धर्मवादाचे राजकारण आणि भगतसिंहांचा संदेश” ह्या विषयावर चर्चासत्र

 

 

 

 

 

 

 

 

शहीद भगतसिंह स्मृती संकल्प अभियानांतर्गत 28 सप्टेंबर च्या पूर्वसंध्येला “धर्मवादाचे राजकारण आणि भगतसिंहांचा संदेश” ह्या विषयावर चर्चासत्र आयोजित करण्यात आले. त्यामध्ये मुख्य मांडणी नौजवान भारत सभेचे साथी रवि, सुस्मित आणि राहुल ह्यांनी केली.
सुरुवातीला साथी रवी यांनी 2014 पासून देशभरामध्ये धार्मिक द्वेषाच्या घटनांमध्ये झालेल्या वाढी  बद्दल तथ्यात्मक मांडणी केली. परंतु फक्त फॅशिस्ट आरएसएस भाजप सरकारच्या काळातच नाही तर त्याच्या आधी सुद्धा काँग्रेस, शिवसेना, सपा, इत्यादींच्या काळातही संघ परिवारास मदत होतील असे दंगे भडकविण्यात आले. ह्या देशाचा भांडवलदार वर्ग आणि धर्मवादी शक्तींनी सत्ता बळकाविण्यासाठी, बळकट करण्यासाठी, सत्तेमध्ये पोहोचण्यासाठी त्याचा कसा पुरेपूर फायदा घेतला, ह्याविषयी साथी रवी यांनी मांडणी केली.
साथी राहुल ह्यांनी शहीद भगतसिंहाच्या संदेशाची मांडणी केली. त्यांनी भगत सिंहाच्या लेखनातील उतारे वाचून त्याचा अर्थ समजावून सांगितला. धर्मांध दंगली घडण्यामागची कारणे कशी आर्थिक आहेत, हे सुद्धा मांडण्यात आले. समाजाच्या आणि जनतेच्या प्रश्नांपासून, मूळ मुद्यांपासून जनतेला भटकविण्यासाठी आज हे सगळे मुद्दे काढले जात आहेत. स्वातंत्र्यलढ्याला कमकुवत करण्यासाठी ब्रिटिशांनी धर्मवादाचे राजकारण केले आणि ब्रिटिशांच्या ह्या राजकारणामुळेच हिंदुत्ववादी व कट्टरपंथी मुस्लिम संघटना फोफावल्या आणि त्यांनी आपले पाय जनतेमध्ये मजबूत केले. भगतसिंहांचा संदेश पुढे सांगत ते म्हणाले की आज ह्या सगळ्या अनिष्ट चालीरीती, रूढी-परंपरा, इ. समाजाला पोखरत आहेत, अंधश्रध्देला वाव देत आहेत. त्यामुळे या सगळ्यांविरोधात आज आपल्याला लढावे लागेल आणि देशातल्या तरुणांना एकत्र यावे लागेल. कामगार कष्टकरी जनतेचे ह्यातच हित आहे की आज त्यांनी आपला खरा शत्रू ओळखावा आणि इतर सर्व भाषा, प्रांत, धर्म, जाती, लिंग, लैंगिकता, इ. भेद विसरत वर्गाच्या आधारावर संघटित व्हावे. भांडवलदार वर्गाच्या भूलथापांना बळी न पडता, एकमेकांच्या—अर्थात, आपल्याच बंधूंच्या विरोधात उभे न राहता वर्गीय एकजूट बनविली पाहिजे.
त्यानंतर साथी सुस्मित ह्यांनी फॅशिजमचा उभार, उदय, त्याची कारणे, आरएसएस चा इतिहास इ. विषयांची तथ्यात्मक मांडणी केली. फॅशिजम म्हणजे एक प्रतिक्रियावादी, अंधराष्ट्रवादी सामाजिक चळवळ असून आज देशातल्या भांडवलशाहीने निर्माण केलेल्या समस्यांवर पडदा टाकत जात, धर्म, भाषा इत्यादिंतून एखादा गैरमुद्दा घेत छद्मचेतनेच्या आधारावर जनतेला संघटित करते, खोटा शत्रू निर्माण करते आणि भांडवलदारांची सेवा करण्यामध्ये गुंतलेली असते. तद्नंतर त्यांनी फॅशिजमच्या उदयामागील आर्थिक कारण—अर्थातच, नफ्याचा सरासरी दर कमी होण्याविषयी मांडणी केली.
नंतर साथी रवी यांनी भगतसिंहांचा क्रांतीचा संदेश आणि आज तरुणांसमोरील आव्हाने मांडली. धार्मिक दंगलींची कारणे आर्थिक आहेत म्हणून बेरोजगारी सारखे प्रश्न सुटल्याशिवाय ती सुटणार नाहीत. ह्या प्रश्नांचे उत्तर भांडवलशाहीकडे नाहीये, म्हणून समाजवादी तत्वांच्या आधारावर नवसमाज निर्मितीची गरज आहे. ऐतिहासिक दृष्टीने तरुणांनी जगभरातील क्रांत्यांमध्ये, लढ्यांमध्ये, परिवर्तनामध्ये नेहमीच मोठा सहभाग घेतलेला आहे; त्यात त्यांचा खूप मोठा वाटा आहे. म्हणूनच आज देशाच्या समाजव्यवस्थेत अमुलाग्र बदल घडविण्यासाठी तरुणांनी पुढे येणे गरजेचे आहे.

Related posts

Leave a Comment

1 × 3 =