कामगार दिनाचा इतिहास, आजची कामगार वर्गाची परिस्थिती, भगतसिंहाचे अपूर्ण स्वप्न, मागच्या एक वर्षापासून कोरोनामुळे आणि सत्ताधाऱ्यांच्या कामगार वर्गविरोधी धोरणांमुळे कामगार-कष्टकरी वर्ग सहन करत असलेल्या हालअपेष्टा यांवर भाष्य करण्यात आले. कोरोना संकटाचा सर्वाधिक मार पडला आहे तो कामगार-कष्टकरी वर्गावर. अगोदर अनियोजित, अमानवी लॉकडाऊनमध्ये मोदी सरकारने काहीही मदत न करता कंबरडे मोडले, बेरोजगार केले, उपासमार घडवली, कोट्यवधी कामगारांना शेकडो-हजारो किलोमीटर पायी चालवले. वर्षभर भांडवलदारांच्या नफ्याच्या चिंतेत गुंतलेल्या राज्य-केंद्र सरकारांनी आता दुसऱ्या लाटेसाठी ऑक्सिजन, औषधे, बेड, आयसीयू, लशीचे कारखाने वाढवलेच नाहीत. परिणामी आता काळ्याबाजारात लाखो-कोटी खर्चून सुद्धा इलाज दुर्लभ आहे. सर्वांना मोफत आणि दर्जेदार आरोग्य सेवा मिळणे हे कामगार-कष्टकरी वर्गाचे येत्या काळातील लक्ष्य असले पाहिजे. कामगार दिवसाच्या दैदिप्यमान इतिहासाचा वारसा पूढे चालू ठेवण्यासाठी आज सर्वात जास्त गरज असलेल्या आरोग्यसेवेचे राष्ट्रीयीकरण करण्याच्या मागणीसाठी संघटित होण्याचे आवाहन यावेळी नौभासच्या कार्यकर्त्यांनी केले.
• सरकारने सर्व हॉस्पिटल्स, पॅथॅलॉजी लॅब्स, लसीचे कारखाने, औषधांचे कारखाने ताब्यात घ्यावेत.
• आरोग्य सुविधेचे पूर्णपणे राष्ट्रीयीकरण करून प्रत्येक व्यक्तीला पूर्णपणे मोफत, सार्वजनिक खर्चाने चालणारी, दर्जेदार आरोग्य सुविधा पुरवली गेली पाहिजे.
• आरोग्याचा अधिकार राज्यघटनेमध्ये मूलभूत अधिकार झाला पाहिजे!
• तातडीने कामगार, डॉक्टर, आरोग्य कर्मचारी कायमस्वरूपी भरती करून मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन, लसींचे कारखाने, हॉस्पिटल उभे करावेत.
