महिनाभराहून अधिक कालावधीपासून दांडेकर पूल भागातील शहीद भगतसिंह वाचनालयामध्ये नौजवान भारत सभेकडून स्थानिक विद्यार्थ्यांचे कॉम्प्युटर वर्ग घेण्यात येत आहेत. यामध्ये विद्यार्थ्यांना कॉम्प्युटरबद्दल मूलभूत माहिती देण्याबरोबरच कॉम्प्युटर हाताळण्याबद्दल आणि टायपिंग तसेच संबंधित इतर कौशल्यांचे प्रशिक्षण दिले जात आहे. सर्व क्षेत्रांमध्ये कॉम्प्युटर आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून उत्पादन होत असले तरीही बहुतांश शाळांमध्ये त्याच्या शिक्षणाबद्दल अजूनही तेवढी जागरूकता दिसून येत नाही आणि त्यातल्या त्यात आर्थिक आणि सामाजिक दृष्ट्या निम्न वर्गांतून आलेले विद्यार्थी ज्या शाळांमध्ये जातात, तिथे त्या प्रकारचे प्रशिक्षण उपलब्ध नसण्याची जवळपास शाश्वतीच असते. बाजारात उपलब्ध असलेले कॉम्प्युटर कोर्सेस सामान्य कामगार-कष्टकरी पार्श्वभूमीतून येणाऱ्या विद्यार्थ्यांना परवडण्याजोगे नाही. आर्थिक सक्षमतेच्या अभावी कामकरी वर्गाच्या पार्श्वभूमीतून आलेले विद्यार्थी दर्जेदार शिक्षणापासून वंचित राहतात.
आजच्या खासगीकरणाच्या काळात शिक्षणाला जणू काही ती एक आवश्यक आणि विद्यार्थ्यांचे मानवीकरण करणारी क्रिया नसून चैनीची वस्तू आहे असे वाटावे इतके सामान्य जनतेपासून वेगळे करण्यात येत आहे. शिक्षणाची मक्तेदारी देशातल्या उच्चभ्रू वर्गाकडे एकवटली जात आहे. याचा अर्थ हाच होतो की मेहनतीच्या लुटीतून चालणारी ही भांडवलधार्जिणी व्यवस्था अधिकाधिक प्रतिक्रियावादी बनत आहे. आजवर भारतामध्ये भांडवली व्यवस्थेतील सर्व दुर्गुणांसहित तथाकथित “कल्याणकारी राज्य” नावाचा असमानता लपवणारा आणि त्यावर एक उदार पडदा टाकणारा जो मुखवटा राज्यसत्तेकडे होता, तो आता व्यवस्थेच्या आर्थिक संकटाच्या काळात छिन्न-भिन्न होऊन पडू लागला आहे. आजवर ज्या तोकड्या सुविधा समाजातील निम्न आणि शोषित वर्गातील एका हिश्श्याला मिळू शकत होत्या त्या देखील आता हिसकावून घेतल्या जात आहेत. परिणामी इतर क्षेत्रांमध्ये सुरु असलेल्या खासगीकरणासोबतच शिक्षणाचे देखील खाजगीकरण वाढत आहे. नौभास युवकांच्या खऱ्या गरजा आणि समस्या ओळखते आणि म्हणूनच शिक्षण आणि रोजगाराच्या मागणींना प्राधान्य देत सर्वांना शासनाकडून मोफत, समान आणि दर्जेदार शिक्षण आणि भगत सिंह रोजगार हमी कायदा लागू होऊन रोजगाराचा अधिकार या मुद्द्यांवर संघर्ष करते.
नौजवान भारत सभा, पुणे
संपर्क:
रवि 8956840785
सुरज 8806038914
