नौजवान भारत सभा, मुंबई तर्फे चालू राजकीय घडामोडींवर चर्चासत्र घेण्यात आले.

चर्चासत्रात भारत सरकारची ‘अग्निपथ’ योजना, शिवसेनेत पडलेली फूट आणि मानव अधिकार कार्यकर्ता तिस्ता सेटलवाड यांना झालेली अटक ह्या मुद्द्यांवर मुख्यत्वे चर्चा केली गेली.

अग्निपथ योजनेवर सरकारने गरीब कामगार घरांतून येणाऱ्या युवकांच्या भविष्याशी केलेली थट्टा यावर चर्चा केली गेली. अग्निपथ योजनेविरोधात अनेक ठिकाणी युवकांची आलेली प्रतिक्रिया ही बेरोजगारीच्या व्यापक प्रश्नाचाच एक भाग आहे. एकीकडे देशभरात सर्वच क्षेत्रांत जवळजवळ पूर्णपणे पसरलेले ठेकाकरण, रोजगाराची नसलेली हमी, दररोज नोकरीच्या आशेने दारोदारी भटकणारा युवक व दुसरीकडे अंबानी, अडाणी यांसारख्या सरकारचा ‘सिद्धहस्त’ प्राप्त झालेल्या भांडवलदारांची, नेत्या – मंत्र्यांची अहोरात्र वाढत जाणारी संपत्ती हेच दाखवून देते कुठलेही भांडवलधार्जिणे सरकार आता सामान्य जनतेला बेरोजगारीच्या विळख्यातून सोडवण्यास असमर्थ आहे.

शिवसेनेत पडलेली फूट ही मुख्यत्वे भांडवलदार वर्गाच्या विविध हिश्श्यांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या सर्व भांडवली पक्षांच्या खऱ्या चरित्राला दाखवून देते. “राष्ट्रवादा”च्या, “हिंदुत्वा”च्या, “धर्मनिरपेक्षते”च्या बेगडी प्रचाराचा वापर करून, जनतेला मूर्ख समजणाऱ्या ह्या सर्वांचा मुख्य प्रश्न हाच आहे की स्वतःची आणि मालकांची तिजोरी भरण्याची संधी किती आणि कुणाला मिळेल?

शिवसेना-भाजपचे सरकार येवो, भाजप-एकनाथ शिंदेचे येवो, भाजप-राष्ट्रवादीचे येवो किंवा इतर म.वि.आ.चेच सरकार चालू राहो, सत्तेमध्ये येणाऱ्या या सर्वांचे उद्दिष्ट आहे खुद्द स्वत:साठी किंवा आपल्या मर्जीतील ठेकेदार-बिल्डर-उद्योगपतींकरिता थोड्या विशेष सवलती पदरात पाडून घेणे आणि हे करताना आपल्या पाठिराख्या भांडवलदार वर्गाचे सामुहिक हित जपणे, विविध योजनांद्वारे भांडवलदारांना सरकारी निधीची खैरात वाटणे आणि बदल्यात आपली दलाली खाणे, पोलिस यंत्रणा वापरून जनतेच्या आंदोलनांना दाबणे, कामगारांच्या हिता विरोधात आणि भांडवलदारांच्या हिताचे कायदे-कानून सतत बनवत राहणे, जात-धर्मासारखे मुद्दे सतत उपस्थित करून जनतेत फूट पाडत राहणे, भांडवलदारांचे हित हेच जणू काही जनतेचे हित आहे हा भ्रम पसरवत राहणे, “राष्ट्रवाद”, “देशभक्ती”, “राष्ट्रहित”, “महाराष्ट्र-हित”, “शिवाजींचे राज्य”, वगैरे शब्दांचे खेळ करून जनतेमध्ये स्वत:बद्द्ल खोट्या प्रतिमा उभ्या करत राहणे, हेच यापुढेही चालत राहिल. राज्यातील आणि देशातील कोट्यवधी बेरोजगारांची दुर्दशा, उपासमारीच्या स्थितीवर मजुरी घेऊन राब-राब राबण्याची स्थिती, शाळा-कॉलेज-दवाखान्यांमधून गरिबांची बेदखली हे सर्व होते तसेच चालू राहिल.

मानव अधिकार कार्यकर्ता तिस्ता सेटलवाड व आर. बी. श्रीकुमार यांना अटक करून भाजप सरकारने परत एकदा सिद्ध केले आहे कि सत्तेच्या विरोधातील लहनातल्या लहान आवाजाला देखील फासिस्त घाबरता आणि त्या आवाजाला चिरडून टाकण्याचा यथा संभव प्रयत्न करतात. तसेच ह्या अटके द्वारे पुन्हा एकदा दिसून आली ती सरकारी यंत्रणेची (मग ती पोलीस असो वा न्यायपालिका) ‘निष्पक्षता’ आणि जनतेच्या विरोधात सत्ताधारी पक्षाच्या हातातील कळसूत्री बाहुले बनण्याची ‘कला’!!

Related posts

Leave a Comment

two × 1 =