भगतसिंहांपासून धर्मांधांना धोका का वाटतो?

अलीकडेच संगरूरमधून नवनिर्वाचित अकाली दलाचे (अमृतसर) खासदार सिमरनजीत सिंह मान यांनी पुन्हा एकदा भगतसिंह यांच्याविरोधात विषारी कुत्साप्रचार सुरू केला आहे. भगतसिंह हे निष्पापांचे खुनी आणि दहशतवादी होते, असे मान यांचे म्हणणे आहे आणि त्यांनी त्यांची तुलना जर्नेलसिंग भिंद्रनवाले यांच्याशी केली आणि भिंद्रनवाले हे समाजाचे शहीद असल्याचे वर्णन केले. सिमरनजीत मान यांच्या राजकारणाचा मूळ अजेंडा धार्मिक कट्टरता हा आहे. ते प्रामुख्याने शीख धर्माच्या अस्मितेचे राजकारण करतात आणि ते खलिस्तानचे समर्थक आहेत. फक्त त्यांचे म्हणणे आहे की खलिस्तान “कायदेशीरपणे” निर्माण झाला पाहिजे. सिमरनजीत मान यांनी तोंड उघडताच हरियाणात धार्मिक अस्मितेचे प्रतिगामी राजकारण करणारे मनोज दुहन यांच्यासारखे लोकही भगतसिंहांच्या विरोधात अपप्रचारात करायला लागले. ज्याप्रमाणे वेड्यांना अधूनमधून वेडेपणाचे झटके येतात, त्याचप्रमाणे धार्मिक कट्टरतेने ग्रस्त झालेली लोकं देखील प्रसिद्धीच्या झोतात राहण्यासाठी आणि आपल्या भक्तांमध्ये लोकप्रियता मिळवण्यासाठी वेळोवेळी अशी फालतू कृत्ये करतात.

शहीद भगतसिंह यांच्या हौतात्म्याला आज 91 वर्षे पूर्ण झाली आहेत. भगतसिंह हे केवळ नाव नसून अन्याय, अत्याचार आणि शोषणावर आधारित व्यवस्थेविरुद्ध शौर्य आणि क्रांतीचे प्रतीक आहे. भगतसिंह जनतेला जात-धर्म-भाषा-रंग-वंश यांच्या भिंती ओलांडून वर्गीय एकजूट निर्माण करण्याचे आणि शोषकांविरुद्ध क्रांतीचे रणशिंग फुंकण्याचे आवाहन करायचे. त्यांनी आणि त्यांच्या पक्षाने केवळ इंग्रज वसाहतवादी लुटारूंविरुद्धच युद्ध केले नाही तर जमीनदार, सरंजामदार आणि देशी भांडवलदारांच्या शोषणाबद्दल जनतेला शिक्षित आणि सावध केले. भगतसिंह आणि त्यांच्या साथीदारांची सर्व प्रकारच्या जातीयवाद, धर्मवाद आणि शोषणाविरुद्धची वृत्ती वाखाणण्याजोगी होती. ते हिंदू-मुस्लिम-शीख किंवा कोणत्याही प्रकारच्या धर्मवादाच्या कट्टर विरोधात होते. भगतसिंह हे लोकांच्या आकांक्षांचे मूर्त स्वरूप होते आणि त्यामुळेच संपूर्ण भारतीय उपखंडातील करोडो लोक आजही भगतसिंहांवर मनापासून प्रेम करतात. निवडणुकीतील पक्षांचे नेते मजबुरीने भगतसिंहांच्या पुतळ्याला पुष्पहार घालतात, त्यांच्या लोकविरोधी थिल्लर राजकारणाचा प्रचार करण्यासाठी भगतसिंहांच्या नावाचा आणि फोटोचा वापर करतात, पण आजची भांडवली भारतीय राज्यसत्ता भगतसिंहांना आतल्या-आत दहशतवादी मानते. त्यामुळेच धार्मिक धर्मांध जे बोलत आहेत ते काही नवीन नाही.

यावेळी संपूर्ण देश रोजगार आणि अर्थव्यवस्थेच्या बाबतीत गर्तेत गेलेला आहे. पंजाबमध्येही परिस्थिती वेगळी नाही. पंजाबमध्येही लोक या किंवा त्या खोट्या पर्यायाकडे अविचारीपणाने धाव घेत आहेत. जातीवाद, धर्मवाद, बंदूक संस्कृती, गुन्हेगारी, तुच्छ नेतावाद आणि अश्लीलतेमध्ये जे तुडुंब डूबलेले आहेत, त्यांचे वर्णन मुक्तिदाता म्हणून केले जात आहे. शोषणकारी व्यवस्थेचीही हीच इच्छा असते की लोकांनी नेहमी छद्म-जाणिवेच्या आणि भ्रमाच्या जंजाळात राहावे आणि त्यांनी व्यवस्थेचे वास्तव समजून घेऊन त्याचा पर्याय शोधू नये व बंडखोर बनू नये. अशा स्थितीत जात-धर्म आणि भाषा-प्रदेशाच्या नावावर लोकांमध्ये फूट पाडणारे लुटखोर व्यवस्थेसाठी फायद्याचेच ठरतात. कुठल्याही धर्माची धार्मिक कट्टरता असो, ती दुसऱ्या धर्माच्या कट्टरतेला प्रोत्साहनच देते. 1984 मध्ये भारतीय राज्यसत्तेने शीखांचा केलेला नरसंहार हा निःसंशयपणे भारतीय इतिहासावर एक कलंक आहे आणि त्याचा विरोध करावा तितका कमी आहे, पण असे असूनही धर्मांधता राज्यसत्तेशिवाय कोणाचेही भले करत नाही. कोणत्याही धार्मिक राज्यात इतर धर्माचे लोक हे द्वितीय श्रेणीचे नागरिक असतात. प्रत्येक मानवाने धार्मिक राज्याच्या प्रत्येक प्रयत्नाला कडाडून विरोध केला पाहिजे आणि मानवी मूल्यांवर आधारित समाज आणि लोकशाहीसाठी पुढाकार घेतला पाहिजे. धार्मिक दंगलींच्या मूर्खपणाचा आणि फॅसिस्ट मानसिकतेचा मुकाबला लोकांच्या वर्ग एकजुटीनेच होऊ शकतो.

भगतसिंहांचे विचार लोकांमध्ये वर्गीय चेतना जागृत करू शकतात, म्हणूनच त्यांच्या हौतात्म्याच्या इतक्या वर्षानंतरही गुंड-लुटारू आणि त्यांचे भक्त त्यांच्याविरुद्ध कुत्साप्रचार करतात. भूतकाळात ज्याप्रमाणे वसाहतवादी लुटारू, देशी भांडवलदारांचे प्रतिनिधी, धर्मांध आणि इंग्रजांकडून सर-सूर ही पदवी मिळालेल्या लोकांना भगतसिंह आवडत नव्हते, त्याचप्रमाणे स्वतंत्र भारतातही देशी लुटारू आणि विविध प्रकारच्या धर्मांधता पसरविणारे त्यांचे मदतनीस भगतसिंहांच्या नावानेच थरथरायला लागतात. भगतसिंह वाचून लोकांना त्यांच्या समस्यांचे खरे कारण कळेल, मग या गुंडांचा धंदा कसा चालणार?

अशा परिस्थितीत आपल्या महान शहिदांचा वारसा आणि त्यांचे विचार दुहेरी ताकदीने लोकांपर्यंत पोहोचवणे हे भगतसिंहांच्या चाहत्यांचे कर्तव्य बनते. भगतसिंहांच्या विरोधात खोटा प्रचार करणारे लोक जनतेचे शत्रू आहेत. लोकांनी वर्ग-जाणिवेने सुसज्ज होऊन त्यांचे हक्क मिळवण्यासाठी मूलगामी संघर्ष सुरू करावा असे त्यांना वाटत नाही. हे धर्मांध लोक ‘फोडा आणि राज्य करा’ या वसाहतिक धोरणाला चालना देणाऱ्या सध्याच्या राज्यसत्तेचे जबरदस्त सहाय्यक आहेत. त्यांचे वाईट हेतू हाणून पाडण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले पाहिजेत. बाकी धर्मांधांच्या कुत्साप्रचार मोहिमेने भगतसिंहांच्या प्रतिमेला केसाइतकाही फरक पडणार नाही, उलट त्यांचा धंदा बंद होण्याचे दिवस जवळ येतील. सूर्यावर थुंकणाऱ्यांची थुंकी त्यांच्याच तोंडावर पडणार हे नक्की.

काही महत्त्वाच्या लिंक्स:

माहितीपट *इन्क़लाब*

भगतसिंह आणि त्यांच्या साथीदारांची संपूर्ण उपलब्ध कागदपत्रे (हिंदी)

शहीद भगतसिंह व साथियों के सम्पूर्ण उपलब्ध दस्तावेज

शहीद भगतसिंहांची जेल नोटबुक (हिंदी)

शहीदेआज़म की जेल नोटबुक

साम्प्रदायिक दंगे और उनका इलाज – भगतसिंह

भगतसिंह – साम्प्रदायिक दंगे और उनका इलाज

धर्म और हमारा स्वतन्त्रता संग्राम – भगतसिंह

भगतसिंह – धर्म और हमारा स्वतन्त्रता संग्राम

अछूत का सवाल – भगतसिंह

भगतसिंह – ‘अछूत का सवाल’

Related posts

Leave a Comment

5 + eighteen =