मित्रांनो आणि मैत्रिणींनो,
साम्राज्यवादी ब्रिटिश सत्तेपासून भारताला स्वतंत्र करण्यासाठी आणि फक्त तेवढ्यावरच न थांबता एका माणसाचे दुसऱ्या माणसाकडून शोषण होणार नाही असा समतामूलक न्याय्य समाज निर्माण करण्यासाठी जो क्रांतिकारक वयाच्या अवघ्या तेविसाव्या वर्षी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता हसत-हसत फासावर गेला त्या महान क्रांतिकारक भगतसिंह यांचा आज 116 वा जन्मदिवस आहे.
भगतसिंह म्हणाले होते “…आम्ही हे सांगू इच्छितो की युद्ध पेटले आहे, आणि बलिष्ठ जोपर्यंत भारतीय जनता आणि श्रमिकांच्या उत्पन्नाच्या साधनावर आपला एकाधिकार टिकवून ठेवतील, तोपर्यंत हे युद्ध सुरूच राहील. मग ते ब्रिटिश भांडवलदार असोत, ब्रिटिश शासक असोत व पूर्ण भारतीय असोत. आपापसात साटेलोटे करून त्यांनी लूट चालवली आहे. जरी भारतीय भांडवलदार गरिबांची पिळवणूक करत असतील, तरी या अवस्थेत काही फरक पडणार नाही. ” – भगतसिंह
भगतसिंह यांचे विचार आज कधी नव्हे एवढे प्रासंगिक झाले आहेत. देश आज एका संकटकाळातून जात आहे. जनतेची बहुसंख्या महागाई, बेरोजगारी, गरिबी, शिक्षण व आरोग्याचा अभाव अशा अनेक समस्यांनी त्रस्त आहे. जातीय अत्याचार, स्त्रियांवरील अत्याचार यांमध्ये सातत्याने वाढच होत आहे. सगळीकडे धार्मिक उन्मादाचे, द्वेषाचे वातावरण निर्माण केले जात आहे जेणेकरून सामान्य जनतेचे लक्ष मुख्य प्रश्नांपासून दूर वळवले जाईल. अशा वेळी भगतसिंह यांनी शंभर वर्षांपूर्वी दिलेला इशारा आजही तंतोतंत लागू पडतो. ते म्हणाले होते की काँग्रेसच्या मार्गाने मिळणारे स्वातंत्र्य हे फक्त वरच्या 10 टक्के लोकांचे स्वातंत्र्य असेल, भांडवलदार सावकारांचे स्वातंत्र्य असेल, देशातील 90 टक्के कामगार-शेतकऱ्यांचे जीवन मात्र शोषण आणि लुटीपासून स्वतंत्र होऊ शकणार नाही. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरच्या प्रत्येक दिवसाने त्या क्रांतिकारकाचा हा इशारा खरा ठरवला आहे. दोनशे वर्षात इंग्रजांनी जेवढ्या लोकांचे रक्त सांडले त्याहून जास्त नंतरच्या 75 वर्षात भारतीय राज्यसत्तेने सांडले आहे. लोकांचे लोकशाही अधिकार काढून टाकले जात आहे, अन्यायाविरुद्ध उठणारा आवाज दडपून टाकला जात आहे, सत्तेविरुद्ध बोलणाऱ्या कार्यकर्त्यांना, पत्रकारांना इतकेच काय तर आंदोलनकर्त्या सामान्य लोकांनाही तुरुंगात डांबले जात आहे.
मात्र आज भगतसिंह यांचे विचार मुख्यधारेच्या मीडियामधून संपूर्णपणे गायब आहे. त्याचे कारणही अगदी स्पष्ट आहे. ज्याप्रमाणे साम्राज्यवादी इंग्रज सत्तेला भगतसिंह आणि त्यांच्यासारख्या इतर क्रांतिकारकांच्या विचारांची भीती होती तशीच भीती आजच्या भांडवली भारतीय राज्यसत्तेला आहे. काय विचार होते भगतसिंह यांचे? काय स्वप्न होते त्या महान बलिदानी तरुण क्रांतिकारकाचे की आजही सत्ता त्यांच्या विचारांना दाबण्याचे काम करत आहे? भगतसिंह आणि त्यांचे साथीदार सुखदेव, राजगुरू, चंद्रशेखर आजाद, बटुकेश्वर दत्त, यतींद्रनाथ दास इत्यादी केवळ बहादूर आणि देशभक्तच नव्हते तर ते त्यांच्या काळातील सर्वात जास्त अभ्यासू आणि उन्नत चेतना असलेले क्रांतिकारी होते. ते वर्गसंघर्ष समजत होते. भांडवलदार-जमीनदार वर्ग कशा पद्धतीने गरिबांचे शोषण करतो आणि स्वातंत्र्याचा लढा त्यांच्याच नेतृत्वात पुढे गेला तर कामगार कष्टकऱ्यांच्या जीवनात काहीच फरक पडणार नाही हे ते जाणून होते. म्हणूनच कष्टकरी जनतेला क्रांतिकारी परिवर्तनासाठी संघटित केले पाहिजे आणि तिनेच ब्रिटिश सत्तेला हाकलून लावून राज्यकारभार आपल्या हाती घेऊन कामगारांची सत्ता स्थापन करून समाजवाद आणला पाहिजे या विचारांपर्यंत ते पोहोचले होते. त्यासाठीच त्यांनी हिंदुस्थान सोशालिस्ट रिपब्लिकन असोसिएशन चे गठन केले आणि त्याचे लक्ष्य समाजवादी गणराज्याची स्थापना करणे आहे हे घोषित केले. 1926 साली त्यांनी लाहोर मध्ये नौजवान भारत सभेची स्थापना केली. हे भारताच्या क्रांतिकारी आंदोलनातील एक महत्वाचे पाऊल होते. परंतु 1931 साली इंग्रजांनी भगतसिंह, सुखदेव, राजगुरू या क्रांतीकारकांना फाशी दिली आणि क्रांतिकारी चळवळीवर मोठा आघात झाला. इंग्रजांनी राहिलेल्या क्रांतिकारकांचे दमन चालवून चळवळ पूर्णपणे दाबून टाकली.
आज परत आपल्याला भगतसिंह आणि त्यांच्या साथीदारांनी बघितलेल्या न्यायपूर्ण समाजाच्या स्वप्नाला जिवंत ठेवत ते स्वप्न व्यापक कष्टकरी जनतेपर्यंत आणि युवकांपर्यंत घेऊन जायचे आहे. जोपर्यंत समाजात अन्याय, विषमता, गरिब-श्रीमंत भेद, जातीयवाद, स्त्री अत्याचार ह्या समस्या अस्तित्वात आहेत तोपर्यंत आपल्या ह्या लाडक्या क्रांतिकारकांचे हे स्वप्न जिवंत ठेवणे आणि त्यासाठी संघर्ष करणे हीच त्यांच्याप्रती आपली खरी आदरांजली ठरेल.
“क्रांतीच्या ध्येयपूर्तीसाठी एक भयंकर युद्ध पेटणे अनिवार्य आहे. सर्व बंधनांना व अडथळ्यांना तुडवून पुढे जाणाऱ्या त्या युद्धाच्या शेवटी सर्वहारा वर्गाच्या अधिनायकत्वाची स्थापना होईल. हे अधिनायकत्वच क्रांतीच्या ध्येयाची पूर्ती करण्याचा मार्ग प्रशस्त बनवेल. क्रांती मानवजातीचा जन्मजात अधिकार आहे. श्रमिक वर्गच समाजाचा खरा पोशिंदा आहे. जनतेच्या सर्वंकष सत्तेची स्थापना हे श्रमिक वर्गाचे अंतिम उद्दिष्ट आहे. या आदर्शांसाठी आणि या विश्वासासाठी आम्हांला जी काही शिक्षा होईल तिचे आम्ही सहर्ष स्वागत करू. क्रांतीच्या या पूजावेदीवर आम्ही आमचे यौवन नैवेद्य म्हणून आणले आहे, कारण या महान ध्येयासाठी मोठ्यात मोठा त्यागसुद्धा कमीच आहे. आम्ही समाधानी आहोत आणि क्रांतीच्या आगमनाची उत्सुकतेने प्रतीक्षा करत आहोत. इंकलाब जिंदाबाद!” – भगतसिंह
नौजवान भारत सभा, महाराष्ट्र Naujawan Bharat Sabha, Maharashtra
