
साथींनो नौजवान भारत सभेद्वारे 24 सप्टेंबर रोजी सांस्कृतिक संध्या आयोजित करण्यात आली होती. मोठ्या संख्येने पुणे शहरातील न्याय प्रिय तरुणांनी-नागरिकांनी कार्यक्रमामध्ये आपली उपस्थिती दर्शवली. कार्यक्रमाची सुरुवात नौजवान भारत सभेच्या सांस्कृतिक टीमने कवी यश मालवीय यांच्या ‘दबे पैरोसे उजाला आ रहा है’ या गीताने केली. या नंतर अदम गोंडवी यांच्या ‘काजू भुने पलेट में, विस्की गिलास में’ या कवितेचे वाचन साथी स्वप्नजा यांनी केले. ही कविता भांडवली राज्यसत्तेचे चरित्र उघडे पाडते आणि त्या विरुद्ध संघर्ष करण्यासाठी प्रेरणाही देते. साथी सुस्मित यांनी ‘संविधान’ या पाश यांच्या संविधानाच्या भांडवली चरित्रावर बोट ठेवणाऱ्या कवितेचे वाचन केले.
साथी अश्विनी यांनी कवयित्री कात्यायनी यांची ‘सामान्यता की शर्ते’ या कवितेचे वाचन केले. फॅसिझमच्या या काळात सांप्रदायिक, जातीय, पितृसत्ताक, भांडवली हिंसाचाराच्या घटना अनेकांना सामान्य वाटू लागल्या आहेत. परंतु या घटना सामान्य नसून असा मान्य आहेत आणि यांना असामान्य मानणे हीच समान्यतेची शर्त आहे हे या कवितेतून कवयित्री कात्यायनी यांनी मांडले आहे. या सोबतच मंगेश पाडगावकर यांच्या ‘सलाम’ आणि गोरख पाण्डेय ‘समझदारों का गीत’ या कवितांचे वाचन सुद्धा करण्यात आले.
भांडवली पितृसत्ताक व्यवस्थेमुळे घरकाम करणाऱ्या महिलांच्या श्रमाची किंमत केली जात नाही. घरकाम करणाऱ्या महिलांना घरकाम करताना जाणवणारा तोचतोचपणा आणि त्यांच्या कामाची किंमत केली जात नसल्यामुळे त्यातून येणारा वैताग आणि नैराश्य कवी विं.दा. करंदीकर यांनी “कर कर करा, मर मर मरा” या कवितेतून मांडला आहे. या कवितेचे वाचन साथी सुजाता यांनी केले. भांडवली पितृसत्तेने महिलांवर दुहेरी मारा केला आहे. एकीकडे भांडवली व्यवस्थेमुळे महिलांना घरा बाहेर पडून मजुरीवर काम करावे लागते आणि दुसरीकडे पितृसत्तेमुळे घरातीलही काम करावे लागते.
देशात फॅसिस्ट मोदी सरकार सत्तेत आल्यापासून सांप्रदायिकतेचे वातावरण तयार करण्यात आले आहे. 2014 पासून देशभरात अनेक धार्मिक-जातीय दंगली होऊन अनेक लोक मारल्या गेली आहेत. जनतेने रोजगार, शिक्षण, महागाई, आरोग्य सुविधा यांसारख्या आपल्या खऱ्या प्रश्नांवर आवाज उठवू नये म्हणून देशात जनतेला जाती-धर्माच्या नावावर लढवले जात आहे. जनता जातीय-धार्मिक मुद्द्यांवर जो पर्यंत लढत राहील तो पर्यंत त्याचा फायदा देशातील सत्ताधारी वर्ग घेत राहील. कवी नारायण सुर्वे यांनी ‘शिग वाला’ या कवितेतून एका मुस्लिम खाटिकाची व्यथा मांडली आहे. या कवितेचे वाचन साथी निखिल यांनी केले. सांप्रदायिक दंगलीदरम्यान एका गरोदर महिलेवर कशा प्रकारे अमानुषपणे अत्याचार केला जातो आणि सांप्रदायिकमुळे माणूस आपले माणूसपण हरवून पशुप्रमाने कसे वर्तन करतो याचे चित्रण या कवितेतून केलेले आहे. या नंतर मंगेश पाडगावकर यांची ‘तुमचं काय गेलं?, कात्यायनी यांची ‘प्रेम करने की कठिनाइयों, चुनौतियों और समस्याओं के बारे में कुछ बातें’ आणि या सारख्या अनेक कवितांचे वाचन करण्यात आले.
क्रांतिकारी जर्मन कवी बेर्टोल्ट ब्रेख्त यांनी म्हटले आहे की कला ही फक्त वास्तव प्रतिबिंबित करणारा आरसा नाही तर त्याला आकार देणारा हतोडासुद्धा आहे. सध्या साहित्य जगतात निर्माण होत असलेले बहुतेक साहित्य हे भांडवली समाजाचे गौरवीकरण करणारे आहे. भांडवली समाजातील असमानता, त्यातील अंतर्विरोध लपवण्याचेच काम हे साहित्य करते. अशा स्थिती मध्ये भांडवली समाजातील विभत्सपणा दाखवणारे, एका नव्या समतामुलक समाजाचे स्वप्न दाखवणाऱ्या कला-साहित्याची गरज आहे. यासाठीच नौजवान भारत सभा अशा प्रकारच्या सांस्कृतिक संध्या आयोजित करून खऱ्या अर्थाने जनतेच्या साहित्याचा प्रचार-प्रसार करत आहे.
कार्यक्रमाच्या शेवटी मंच उपस्थितांसाठी खुला करण्यात आला. उपस्थित असलेल्या अनेकांनी स्वतः लिहिलेल्या तसेच इतर कवींच्या कवितांचे वाचन केले. ‘नौजवान भारत सभा’ पुणे शहरात चालवत असलेल्या शिक्षण सहायता केंद्रामध्ये शिकवण्यासाठी तसेच ‘नौजवान भारत सभे’ला यथाशक्य सहयोग करण्याचे आवाहन केल्या गेले. या सारखे सांस्कृतिक कार्यक्रम या पुढेही आयोजित करण्याचे ठरवण्यात आले. कार्यक्रमाची सांगता फ़ैज़ अहमद फ़ैज़ यांच्या ‘हम देखेंगे’ या गीताने करण्यात आली.
तुम्ही सुद्धा नौजवान भारत सभा कडून आयोजित कार्यक्रमात सहभागी होऊ शकतात.
सहभागी होण्यासाठी संपर्क : रवी +918956840785
