‘जनतेची सेवा करा’ या तत्वाला समोर ठेवून नौजवान भारत सभा देशाभरात विविध राज्यांमध्ये विद्यार्थ्यांसाठी शिक्षण सहायता केंद्र, आझाद स्पोर्ट्स क्लब, फिरते वाचनालय यांसारखे विविध उपक्रम राबवते.
शिक्षण सहायता केंद्रामध्ये कामगार-कष्टकरी पार्श्वभूमीतून येणाऱ्या विद्यार्थ्यांना शाळेत भाषा, गणित, विज्ञान, इतिहास, भूगोल इत्यादी विषयांत अवघड जाणार्या संकल्पना सोप्या भाषेत विद्यार्थ्यांना समजावल्या जातात, अभ्यास करवून घेतला जातो. एकंदरीतच देशभरात शिक्षणाचा ढासळलेला शिक्षणाचा दर्जा, कामगार-कष्टकऱ्यांच्या आर्थिक आवक्याबाहेर गेलेले दर्जेदार शिक्षण, मोफत शिक्षणाचा अभाव यांमुळे शाळेत शिकून देखील विद्यार्थ्यांना अतिरिक्त वर्गांची गरज पडते. अनेकवेळा हजारो रुपये खर्च करून लावलेल्या खाजगी शिकवण्या पालकांचा खिसा रिकामा करण्याव्यतिरिक्त विद्यार्थ्यांच्या स्थितीत फारसा बदल घडवण्यात अपयशीच ठरताना दिसतात. लिहिता – वाचता न येण्यापासून ते भाषा, गणित, विज्ञान या विषयांतील सामान्य संकल्पनाही स्पष्ट नसणे ह्या समस्या वाढत्या वर्गानुसार अधिक वाढत जातात. खासकरून या सर्व समस्या कामगार – कष्टकरी पार्श्वभूमीतून येणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात दिसून येतात. त्यामुळेच ह्या विद्यार्थ्यांचा शैक्षणिक पाया पक्का करणे ही गरज बनली आहे.
त्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासाच्या वेगवेगळ्या पद्धती विकसित करून, मनोरंजात्मक पद्धतीने विद्यार्थ्यांना कसे शिकवता येतील, याचे प्रयत्न नौजवान भारत सभा मागच्या काही वर्षांपासून पुण्यातील वेगवेगळ्या भागांमध्ये करत आलेली आहे. जनता वसाहत येथे गेल्या वर्षीपासून शिक्षण सहायता केंद्र नियमित चालते आणि आता उन्हाळ्यात दिलेल्या सुट्ट्यानंतर पुन्हा नव्याने सुरु झाले आहे. शिक्षण सहायता केंद्रामध्ये शिकवण्यासाठी येणाऱ्या स्वयंसेवकांचा सहभाग उस्फुर्त आहेच, सोबतच पालक आणि विद्यार्थी यांची साथ या उपक्रमाला अधिक बळकटी देत आहे, अधिक यशस्वी करत आहे.
नौजवान भारत सभा, पुणे
