सामाजिक शांतता व सौहार्द जपा , खरा शत्रू ओळखा .

जातीवाद,धर्मांधता व द्वेषाचे राजकारण हाणून पाडण्यासाठी
सर्व कष्टकऱ्यांची लढाऊ एकजुट कायम करा
सामाजिक शांतता व सौहार्द जपा , खरा शत्रू ओळखा

मित्रांनो ,
भिमाकोरेगाव मध्ये १ जानेवारीला घडलेला दगडफेक व जाळपोळीच्या अतिशय निंदनीय घटनांचा आपण निषेध करावा तेवढा कमी आहे. या घटनेनंतर महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी दगडफेक व तणाव निर्माण झाला आणि नेमकं हेच घटनेमागे असणाऱ्या जातीयवादी मेंदूंना हवे आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून बेरोजगारी वाढते आहे. महाराष्ट्र सरकारने नुकतीच, सरकारी नोकर भरतीतील 30 टक्के पदांमध्ये कपात करण्याची घोषणा केली आहे. दुसरीकडे गेली साडेतीन वर्षाच्या काळात सामाजिक आरोग्य बिघडवणाऱ्या अनेक घटना घडल्या आहेत. मग ती ‘उना’ मधली घटना असो किंवा अखलाक ते प्रवासी कामगार अफ्राजूल खान पर्यंतच्या हत्या असोत. या घटना समाजात जाती-धर्माच्या आधारावर ध्रुवीकरण करून जनतेला कायम विभाजित करण्याचा कुटील डाव आहे .जनतेला तीच्या मूळ प्रश्नांपासून भरकटवून जात, धर्म, प्रदेश, आरक्षण, गाय-गोबर, घर वापसी, लव जिहाद सारख्या बिनमुद्द्यावर झगडत गुंतवून ठेवण्याचे कारस्थान आहे. वास्तविकतः वाढती बेरोजगारी, वाढते दारिद्रय, शिक्षण, आरोग्‍य, महागाई हेचतर ते खरेखुरे मुद्दे आहेत, जे आज आपल्‍या समोर आ वासून उभे आहेत.
जेव्हा केव्हा दंगली उसळतात तेव्हा मरणारे,जखमी होणारे व अटक होणारे कोण असतात? त्यांच्यात काय श्रीमंत असतात का कधी ? नाही मित्रहो ,ते आपल्या सारखेच काबाडकष्ट करणारेच असतात. अस्मितांचं राजकारण करून जनतेला आपसांत लढवणारे नेते आरामात हा द्वेषाचा खेळ मांडून बाजूला होतात, आणि गोरगरीब तरूण बळी जातात, पण या नेत्यांना कधीही शिक्षा होत नाही
मित्रांनो, सावध रहा, सांप्रदायिक, धर्मांध शक्‍ती देश, देव व धर्मांच्‍या नावाखाली आपली माथी भडकवायला येतील, त्‍यांना तिथचं रोखा. आपल्‍या आजच्‍या दारिद्रयाला आरक्षण, अट्रोसिटी एक्‍ट, विशिष्‍ट जात-उपजात, एक विशिष्ट धर्म जबाबदार आहे असां खोटा प्रचार करतील, बळी पडू नका. कधी परप्रांतीय म्‍हणून, कधी परका म्‍हणून काबाडकष्‍ट करणाऱ्यांमध्‍ये बेकी निर्माण करतील, फसू नका. हे पक्‍कं लक्षात ठेवा — आपल्‍या दु:ख, दारिद्र व दैन्याच्‍या मुळाशी भांडवलशाही व्‍यवस्‍थेचं अर्थशास्‍त्र आहे. नफ्याचं आणि राजकीय सत्तेचं समिकरण आहे. अस्मितेचे राजकारण हे नेहमीच आपल्या खऱ्या प्रश्नांच्या लढाईला कमजोर करत असते. हे विसरले नाही पाहिजे की आज जे धार्मिक-जातीय विद्वेषाचे वातावरण तयार केले जात आहे तो देशातील भांडवलदार वर्गाचा पाठिंबा असलेल्या जातीयवादी शक्तींचा खेळ आहे. हा पाठिंबा आहे म्हणूनच या जातीयवादी शक्तींमध्ये इतकी हिंमत आली आहे.
आम्‍ही सर्व जनतेला आवाहन करत आहोत की कुठल्‍याही अपप्रचाराला, अफवांना बळी पडू नका. सामाजिक सद्भावना कायम ठेवण्‍यासाठी पुढे या. विभाजनाचं राजकारण करणाऱ्यां विरोधात सर्व श्रमिक-कष्‍टकऱ्यांची लढाऊ एकजूट उभी करा.
जाती-पातीचे झगडे सोडा, खऱ्या लढ्याशी नाते जोडा.

क्रांतिकारी अभिवादनासह

नौजवान भारत सभा, दिशा विद्यार्थी संघटना, अखिल भारतीय जाति विरोधी मंच

यूनीवर्सिटी कम्युनिटी फ़ॉर डेमोक्रेसी एण्ड इक्वॉलिटी (यूसीडीई)

मुंबई संपर्क
पताः शहीद भगतसिंह पुस्तकालय, रूम न-103, बिल्डिंग 61 ए, लल्लूभाई कम्पाउण्ड, मानखुर्द (पश्चिम), मुम्बई
फोन न. – 9619039793, 9145332849, 8826265960

अहमदनगर संपर्क
पताः शहीद भगतसिंह पुस्तकालय, गुगळे क्लिनिकच्या पाठीमागेे, सिद्धार्थनगर, अहमदनगर
फोन न. – 9156323976, 8888350333, 9156824706, 7058197729

Related posts

Leave a Comment

seventeen + 6 =