जाती धर्माचे झगडे सोडा, खऱ्या लढ्याशी नाते जोडा
दलित मुक्ती व जाती अंताचा एकच रस्ता — वर्ग-आधारीत जातिविरोधी आंदोलन
देशभर वाढत्या दलित विरोधी अत्याचारा विरुद्ध सर्व कष्टकऱ्यांनो एक व्हा
साथींनो,
मोदी सरकार सत्तेत आल्यापासून, भाजपा शासित राज्यांमध्ये, त्यातही विशेषत: उत्तरप्रदेशांत योगी आल्यानंतर दलित, धार्मिक अल्पसंख्याक आणि महीलांवरील हल्ल्याच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. गुजरात मध्ये कधी ‘गरबा’दांडीया बघीतल्याचं निमीत्त करून, तर कधी मिशा ठेवल्याच निमीत्त पुढे करून दलितांवर हल्ले होताहेत. तुम्ही सुद्धा या घटनां ऐकल्या असतीलच. ३० सप्टेंबरच्या रात्री पियुष परमार व त्याच्या दोन भावांना गुजरातच्या गांधीनगर जिल्हात मिशा ठेवल्या म्हणून अमानुष मारहाण केली गेली. या घटनेला दोन दिवस उलटत नाही तोच आणंद जिल्ह्यामध्ये जयेश सोलंकी या दलित तरुणाला गरबा बघीतला म्हणून मारुन टाकण्यात आले. या घटनेतील मारेकरी हे पटेल जातीतल्या खात्यापित्या घरांतले आहेत. पोलीसांच्या म्हणण्यानुसार मारणाऱ्यांचे जयेश सोलंकीशी व्यकतीगत ओळख किंवा शत्रुत्व अजिबात नव्हते. पण तरी ते मारहाण करताना म्हणत होते की दलितांना गरबा बघण्याचा अधिकार नाही. या दोन्ही घटनां मधून स्पष्ट होत आहे की जातीवादी मानसिकता किती खोलवर आपल्या समाजांत रुतून बसली आहे. आज तमाम सवर्ण आणि विशेषत: मध्यम शेतकरी जातीतील धनदांडगे जातीवादी वर्चस्वाच्या अत्यंत पाशवी-घृणास्पद रूपाला समोर आणत आहेत. या दोन्ही घटनांतील पीडित अतिशय गरीब आहे. (मृत युवक जयेश सोलंकी तर रोजंदारी मजूर होत) पूर्वीच्या तमाम घटनांप्रमाणेच ही घटनाही पून्हा एकवार सांगते आहे की, सवर्णवादी वर्चस्वाच्या या घृणास्पद पाशवी रूपाचा सामना गरीब, कष्टकरी दलितांनाच करावा लागतो आहे. जरी जातीगत अपमानाला दलित नोकरशहा, नेता व इतर उच्चवर्गीय दलितांनाही सामोर जावं लागत असले,तरी जातीगत उत्पीडनाच्या अशा पाशवी घटना प्रामुख्याने कष्टकरी दलितांच्या विरोधातच घटत असतात. एकुण काय, जर आकडे गोळा केले तर दिसेल की जातीय अत्याचाराच्या १०० पैकी ९९ प्रकरणांमध्ये कष्टकरी गरीब दलितचाच बळी जातो.
अजून एक अत्यंत महत्वाची गोष्ट आपणही समजून घेतली पाहीजे की गेल्या तीन दशकांत जातीवाद व जातीय वैरभाव वाढण्याचा एक व्यापक ऐतिहासिक संदर्भ सुद्धा आहे. हा व्यापक संदर्भ आहे नवउदारवादी धोरणांच्या परिणामी देशभरात वाढत्या बेरोजगारीचा, उरलेसुरलेल्या रोजगाराच्या संधीची समाप्तीचा, वाढती महागाई आणि सामाजिक असुरक्षितता व अनिश्चिततेच्या वातावरणाचा. या परिस्थितीत मोदी सरकारच्या येण्यानं तर खासकरून जोरदार वाढ झाली आहे. गेल्या अडीच वर्षात तब्बल दोन कोटी रोजगार हिसकावून घेतले गेलेत. तर शेतीतील भांडवली संकटाने मध्यम जातीच्या मोठ्या संख्येला कर्ज, बर्बादी आणि दारिद्रयात ढकलले आहे अन् शेतीतून बेदखल केले आहे. परिणामी, रोजगाराची अगोदरच घटती संधी त्यात बेरोजगारांची वाढती संख्या अशी भयानक स्थिती निर्माण झाली आहे. शासक वर्गाद्वारे या असुरक्षित व अनिश्चितीततेच्या परिणामी निर्माण होणाऱ्या अंध प्रतिक्रियांच्या परिस्थितीचा फायदा उचलायला दोन हत्यारांचा उपयोग होताना स्पष्टपणे आपल्याला दिसतोय. पहिला हत्यार आहे सांप्रदायिकतेच, ज्यात धार्मिक अल्पसंख्यकांना नकली शत्रू म्हणून उभं केलं जातं. आणि दुसरा ब्राह्मणवाद व जातीवादाच, ज्यात व्यापक दलितेतर बेरोजगार व गरीब लोकसंख्येसमोर आरक्षण आणि दलितांना एका नकली शत्रूच्या रूपात उभं केलं जात आहे. या दोन्ही हत्यारांचा मोदी सरकारने खुप हुशारीने उपयोग केला आहे जेणेकरून व्यापक कष्टकरी जनता तीच्या समोरील त्रासदीच्या खऱ्या कारणांना समजून घेण्याऐवजी जातीय व धार्मिक आधारांवर आपसांतच लढत रहावी. उलट वस्तुस्थिती अशी आहे की दलितांमधली बेरोजगारीचा दर दलितेतरांच्या तुलनेत दुप्पट आहे. आरक्षणाच्या इतक्या वर्षानंतरही दलितांचा ९० टक्के हिस्सा कामगार-कष्टकऱ्यांच्याच रांगेत उभा आहे. आणि अतिशोषण व उत्पीडनाचा बळी आहे. भाजपाचा दलित विरोधी चेहरा उत्तरप्रदेशांतील योगीराज मध्येही पाहता येऊ शकेल. ज्याप्रकारे भीम आर्मीच्या सदस्य व नेत्यांना योगी आदीत्यनाथ सरकार तीच्या राज्यसत्तेद्वारे (पोलीस, न्यायालय) प्रताडीत करत आहे त्यातून स्पष्टच कळतयं की यांच्या रामराज्यांचा काय अर्थ आहे. योगी आदीत्यनाथचे सरकार खुलेपणाने ब्राह्मणवादी वर्चस्ववाद व सवर्णवादाच्या बाजूने उभी आहे. यांच्या तथाकथित रामराज्यामध्ये सामान्यपणे कामगार-कष्टकरी व विशेषत: दलित कष्टकरी दमन-उत्पीडनाचे व पाशवीपणाचे बळी ठरत आहेत. या ‘रामराज्य’मध्ये भांडवलशाही व ब्राह्मणवादाच्या घृणास्पद व नग्न आघाडीला पाहता येईल.
गुजरात मधील जयेश सोलंकीची हत्या पून्हा एकदा बहुजनवादाच्या (दलित-ओबीसी एकता) पोकळ घोषणा देणाऱ्यांसमोर आरसा धरत आहे. आज जर आकडे पाहीले तर स्पष्ट होतय की दलितांविरुद्ध होणाऱ्या अधिकतर घटनां ओबीसी जातीतील उच्चवर्गाच्या एका हिश्शाद्वारे घडवल्या जातात. गेल्या तीन-चार दशकांत अस्मितावादी बहुजनवादाच्या मर्यादा स्पष्टपणे दिसून आल्या आहेत. जरी जातीव्यवस्था व ब्राह्मणवादी विचारधारेच्या हजारो वर्षांच्या परिणामी गरीब कष्टकरी दलितेतर समूहांत जातीय पूर्वाग्रह आहेत ,तरीही हे सुद्धा खरे आहे की जातीय अत्याचाराच्या अशा घटनांमध्ये दहा पैकी नऊ घटनांना मध्य जातीतील ‘उच्च वर्गच ‘घडवत असतो. गोहाणा, भगाणा, खैरलांजी, मिर्चपूर इत्यादी घटनांमधून हेचतर दिसून येत आहे ना? त्यामुळे ब्राह्मणवाद व सवर्णवादाच उत्तर बहुजन अस्मितावाद नाही तर कष्टकऱ्यांची वर्ग-एकजुट आहे.
दोस्तहो, आपण हे सुद्धा समजून घ्यायला हवं की गरीब कष्टकरी दलितेतरांमधील जातीयवादी ब्राह्मणवादी विचारांच्या प्रभावाविरुद्ध संघर्ष करून तो नष्ट करने हे तेव्हाच शक्य आहे, जेव्हा सर्व जातीसमूहाच्या गरीब कष्टकरी, निम्न मध्यमवर्गीयांना रोजगार, आरोग्य, शिक्षण, महागाई इत्यादी मुद्द्यांवर समस्त भांडवली व्यवस्थेविरोधात जागृत, संघटीत व मोर्चाबद्ध करता येईल. जर व्यापक कष्टकऱ्यांमध्ये व्याप्त जातीवादी संस्कारांना दलित विरुद्ध दलितेतर अथवा दलित विरुद्ध ओबीसी (जसे दलित विरुद्ध जाट, दलित विरुद्ध मराठा, दलित विरुद्ध पाटीदार इ.) सारख्या अस्मितावादाचा मुद्दा बनवला जातो आणि जातीय अस्मितांच्या संघर्षाला हवा घातली जात आहे, यांतून तर समस्येचं समाधान मिळणार नाहीच उलट समस्या अजून गुतागुंतीची होत जाईल. यात नुकसान मुख्यत्वे व्यापक दलित समूहांना आणि सामान्यपणे समस्त कष्टकरी जनतेलाच सोसावे लागणार.
या सर्व तात्कालिक व दुरगामी आयामांना समजून घेतलं तर स्पष्ट होत की दलित अत्याचाराच्या सर्व घटनांच्या विरोधात आपल्याला सर्व कामगार-कष्टकऱ्यांची वर्ग-एकजुट करून रस्त्यावर उतरावं लागेल. अस्मितावादी राजकारणाला कचरापेटीत फेकावं लागेल; व्यवहारवादी अर्ज-विनवण्यांचा भंडाफोड करावा लागेल; रोजगार, महागाई, शिक्षण, निवारा, आरोग्य व व्यापक कष्टकऱ्यांच्या जगण्याशी संबंधीत सर्व प्रश्नांवर भांडवली व्यवस्थेच्या विरोधात क्रांतीकारी संघर्ष करावा लागेल, कारण वर्गीय एकजुटीवर आधारीत अशाच संघर्षाद्वारे भांडवली ब्राह्मणवाद आणि जातीवादाचा निर्णायक पराभव करणे शक्य आहे.
क्रांतीकारी अभिवादनासह
अखिल भारतीय जाति विरोधी मंच, नौजवान भारत सभा
ब्राह्मणवादाचा एकच इलाज, कष्टकऱ्यांचा इंकलाब!
कष्टकऱ्यांची वर्ग एकजुट – जिंदाबाद, जिंदाबाद!
जातीत विभागले नाही जाणार, एकजुटीने संघर्ष पूढे नेणार!
मुंबई संपर्क
पताः शहीद भगतसिंह पुस्तकालय, रूम न-103, बिल्डिंग 61 ए, लल्लूभाई कम्पाउण्ड, मानखुर्द (पश्चिम), मुम्बई
फोन न. – 9619039793, 9145332849, 8826265960
अहमदनगर संपर्क
पताः शहीद भगतसिंह पुस्तकालय, गुगळे क्लिनिकच्या पाठीमागेे, सिद्धार्थनगर, अहमदनगर
फोन न. – 9156323976, 8888350333, 9156824706, 7058197729
वेबसाइट : https://www.facebook.com/abjvm, www.facebook.com/nbsmaharashtra
फेसबुक पेज : www.abjvm.blogspot.com, www.ma.naubhas.in