क्रांतिकारी शहीद राजगुरू यांच्या १११ व्या जयंती निमित्त
कामगार कष्टकऱ्यांच्या राज्यासाठी मृत्यूला हसत-हसत आलिंगन देणाऱ्या थोर क्रांतिकारकाचा वारसा पुढे न्या!
साथींनो!
भारतीय स्वातंत्र्यलढा म्हणजे जगातील सर्वोत्तम क्रांतिपर्वांपैकी एक होय. कित्येक क्रांतिकारकांनी जीवाची पर्वा न करता या लढ्यामध्ये उडी घेतली आणि बलिदान स्वीकारले. त्या क्रांतिकारकांची आठवण होताच तीन चेहरे आपसूकच डोळ्यासमोर येतात. ते म्हणजे भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव!

क्रांतीच्या मार्गाने स्वातंत्र्यप्राप्ती व त्यातून शोषणमुक्त,समतामुलक समाजाचे निर्माण यासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या शहीद भगतसिंह, सुखदेव, राजगुरू, चंद्रशेखर आझाद, रामप्रसाद बिस्मिइल, अश्फाकउल्लां खान यासांरख्या क्रांतिकारी युवकांपैकी एका प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वाला म्हणजे शहीद क्रांतिकारी राजगुरू यांची आपण अशा कठीण प्रसंगी आठवण करत आहोत. अशा वेळी जेव्हा पूर्ण देशभरातील विद्यार्थी, तरुण, कामगार, कर्मचारी, व कष्टकरी श्रमजीवी जनतेच्या जीवनाला, भविष्याला अंधाराच्या नरकमय दलदलित दल-दलीत ढकलण्यात येत आहे. यात एकीकडे विद्यार्थी, तरुण बेरोजगारीच्या भयंकर संकटामुळे निराश, हताश होऊन आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलण्यास हतबल केले जात आहे; तर दुसरीकडे शेती, कारखाने व महानगरां पासून ग्रामीण भागातील कष्टकरी लोकांना कंबर मोडेपर्यंत काम करून देखील नरका सारख्या अंधाऱ्या झोपड्या, चाळीत मजबूर, हतबल जीवन जगावे लागत आहे. तर कर्मचारी वर्गाच्या प्रत्येक मूलभूत सुविधांना देखील प्रत्येक दिवसाला कमी केले जात आहे.
असे असताना या देशातील सत्ताधारी जाती, धर्म, भाषा, प्रांत, मंदिर-मशिद च्या नावाखाली दंगली घडविण्यात व्यस्त आहेत. आज प्रत्येक दिवसाला तिसरे लहान बालक उपाशी झोपण्यासाठी मजबूर आहे. तर त्याच वेळेस देशातील मूठभर भांडवलदार, उद्योगपती, मालक आणि नेत्यांच्या पार्ट्या आणि रॅली आयोजनावर पाण्यासारखा पैसा वापरला जात आहे. लोकांना थोडेफार अधिकार देणारे माहितीचा अधिकार (आरटीआय) सारखे कायदे संपवले जात आहेत आणि अशा जनविरोधी पावलांचा विरोध केला किंवा सार्वजनिक चिकित्सा केली तर बेकायदा कृत्य प्रतिबंध कायदा’(यूएपीए) सारख्या कायद्यांतर्गत अटक देखील केली जाऊ शकते किंवा देशद्रोही घोषित करून पाकिस्तानात जाण्याचा सल्ला देण्यात येत आहे. यासाठी लागणारे सर्व धाडस हे भांडवलदारांच्या पैशावर पोसलेले बीजेपी सारखे सत्ताधारी पक्ष स्वयंघोषित भक्तांना पूर्णपणे देत आहेत. याची खात्री गेल्या काही वर्षात आपल्याला आली असावी. जरा विचार करा राजगुरू, भगतसिंग, सुखदेव, यासारख्या क्रांतिकारकांना असा स्वतंत्र भारत अपेक्षित होता का? काय अशाच समाजासाठी क्रांतिकारकांनी तरुण वयात बलिदान दिले का?
अजिबात नाही! राजगुरू यांच्यासारख्या क्रांतिकारकांचे स्वप्न एक शोषणमुक्त, समतामूलक, धर्मनिरपेक्ष, समाजाचे निर्माण करणे हे होते. पुढे चालून एका निश्चित वैचारिक विकासानंतर आपले ध्येय स्पष्टपणे आपल्या संघटनेच्या नावात असायला पाहिजे. त्यामुळे ‘हिंदुस्थान रिपब्लिकन असोसिएशन’ या संघटनेच्या नावात बदल करत सोशलिस्ट (समाजवाद) शब्द या सर्व क्रांतिकारकांनी जोडला आणि या क्रांतिकारी संघटनेचे नाव ‘हिंदुस्थान सोशालिस्ट रिपब्लिकन असोसिएशन’ म्हणजे एच.एस.आर.ए. (HSRA) असे ठेवण्यात आले. फक्त स्वतंत्र नाही तर नफ्या-तोट्यावर आधारित समाजव्यवस्थेत आमूलाग्र परिवर्तन, कामगार वर्गीय सत्तेचे निर्माण, म्हणजेच ‘क्रांती’ हे त्यांचे ध्येय होते.
खरंतर आज राजगुरू व इतर क्रांतिकारकांच्या स्वप्नातील भारताची आणि आजच्या भारताची तुलना केल्यावर लक्षात येते की, विद्यार्थी, तरुण, कर्मचारी, कामगार, कष्टकरी हे बेरोजगरी, महागाई, कामगारांची कपात, शिक्षणाचे बाजारीकरण, धार्मिक, सांप्रदायिक, ताण-तनाव अशा अनेक कारणामुळे अंधाऱ्या नरकमय स्थितीत जगण्यासाठी बाध्य आहेत. सीएमआयआय (CMII) च्या एका अहवालानुसार देशात बेरोजगार तरुणांची संख्या ३१ ते ३५ करोड असल्याचे निदर्शनात आले आहे. बेरोजगारी दर २०१७-१८ पासून आजपर्यंत सातत्याने वाढत आहे व गेल्या पंचेचाळीस वर्षातील सर्वात अधिक बेरोजगारी आज असल्याचे हे जाहीर कटू सत्य आहे. जवळजवळ ९० टक्के स्टार्टअप व्यवसाय अयशस्वी होत बंद पडले आहेत. २०१८ मध्ये लाख १ करोड १० लाख नोकऱ्या नष्ट झाल्या आहेत आणि हा आकडा वाढतच आहे. इंडियन एक्स्प्रेस या वर्तमानपत्रातील एका अहवालानुसार रोजगार विनिमय कार्यालयात नोंदणी केलेल्या पैकी केवळ ०.५७ टक्के लोकांना रोजगार मिळत आहे. सरकारच्या रोजगार विकासाचे हे पितळ उघडे पडू नये म्हणून बीजेपी सरकार हे आकडे दाबत आहे. याच कारणामुळे सांख्यिकी विभागातील दोन सदस्यांनी राजीनामे दिले होते. यात मुख्य म्हणजे असे होते की, सरकार राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण संस्थेद्वारे (NSSO) जाहीर बेरोजगारीचे आकडे लपवत आहेत. पारदर्शकपणे जाहीर करत नाही. एका रिपोर्टनुसार २०१४-१६ च्या दरम्यान २६,००० तरुणांनी आत्महत्या केल्या आहेत. आणि हा आकडा प्रत्येक दिवसाला २०१९ पर्यंत वाढत गेला आहे.
देशात अन्नधान्यापासून ते गरजेच्या सर्व धान्य, वस्तू तयार करणाऱ्या शेती ते कारखान्यापर्यंत सर्व ठिकाणी परिस्थिती अत्यंत दयनीय आहे. शेतमजूर, भूमिहीन, शेतमजुरांची स्थिती तर दोन वेळचे अन्न देखील मिळविणे कसोटीचे आहे. त्यांच्या साठी कोणतेही श्रम कायदे देखील ह्या मुलभूत गरजा मिळवून देण्याची हमी देखील देण्यात आली नाही. औद्योगिक कामगारांची स्थिती जर पाहिली तर असे लक्षात येते की, मुलांचे शिक्षण, आरोग्य व योग्य शिक्षण या पायाभूत सुविधा देखील त्यांच्यापर्यंत पोहोचलेल्या नाहीत. आज सुद्धा उद्योगधंद्यात काम करणारे कष्टकरी हे घाण, नाल्याच्या बाजूला असलेल्या झोपडपट्ट्यामध्ये राहण्यासाठी मजबूर आहेत आणि त्यात सुद्धा किमान वेतन हे माणसाला जनावरासारखे जगण्यासाठी ठरविले जात असते. आता तर ते देखील लागू केले जात नाही. कामगारांच्या श्रमाला लुटून भांडवलदारांच्या तिजोऱ्या भरण्यासाठी कामगार कायद्यांना देखील धाब्यावर बसवत आहेत. या प्रक्रियेला मोदी सरकारने अजून जास्त तीव्र केले आहे.
मंदिर-मशिद या मुद्द्याची हवा निघून गेली. हे लक्षात येताच बीजेपी ने पुलवामा सुरक्षा दलाच्या जवानांच्या मृत्यूचे भांडवल करत २०१९ च्या निवडणुकीत प्रचार केला. ही बाब ‘मेलेल्यांच्या टाळुवरचे लोणी खाणे’ याच पद्धतीची आहे. सीमेवर लढायला हे नेते आणि भांडवलदार जात नाहीत, तर गरिब कष्ट्करी, शेतकरी, कामगारांचीच मुलं जातात! पण दहशतवादी हल्ला का झाला यावर तर सरकार बोलायलाच तयार नाही आणि नंतर या घटनेला अंधराष्ट्रवादाच्या उन्मादात दाबण्यात आले. या घटनेनंतर त्याच दिवशी नरेंद्र मोदी डिस्कवरी चॅनेलच्या ‘मॅन वर्सेस वाईल्ड’ कार्यक्रमाचे शुटींग करत होते आणि अमित शहा, योगी आदित्यनाथ यांच्या रॅल्या व भाजपचेच मनोज तिवारी यांचे नाच गाण्याचे कार्यक्रम तसेच सुरू होते. आपल्याला हे सुद्धा लक्षात घ्यावे लागेल की, सीआरपीएफ जवानांच्या मुद्द्यावर राजकारण करत राहणाऱ्या भाजप नेत्यांनी अजुनही त्यांच्या पेंशनच्या मागण्या मान्य केलेल्या नाहीत आणि जवानांनी अनेक आंदोलने करून देखील यात काडीमात्र देखील बदल झालेला नाही.
उदारीकरण, खाजगीकरण धोरणाच्या अंमलबजावणीनंतर भांडवलशाही जग मोठ्या आर्थिक संकटाच्या असाध्य चक्रात अडकले आहे. भांडवलदारांच्या नफ्याचे दर खाली गेले आहेत आणि मंदीची स्थिती कायम आहे. बऱ्याच क्षेत्रात ही स्पष्टपणे समोर देखील आली आहे. अशात भांडवलदारांच्या नफ्याचे दर कायम ठेवण्यासाठी लोकांसाठी असलेले शिक्षण, आरोग्य, रोजगार आणि इतर मूलभूत खर्चात कपात केली जात आहे, धनदांडग्यां भांडवलदारांना हे माहीत आहे की, या सर्व कारणांमुळे लोकांमध्ये असंतोष निर्माण होऊ शकतो. म्हणून पुन्हा एकदा २०१९ मध्ये देखील भाजपला सत्तेत आणण्यासाठी प्रचंड पैसा ओतून, मीडीयाला हाती धरून, संघाची सूत्रबद्ध कार्यकर्त्यांची फळी (कॅडर बेस ऑर्गनायझेशन) वापरून जातीय तणाव वाढवून, निवडणुक आयोगापासून ते ईव्हीएमपर्यंत यंत्रणेचा गैरवापर करून सर्व आटापिटा केला.
हे स्पष्ट आहे की भाजपा च्या जागी सपा, बसपा, कॉंग्रेस-राष्टवादी कॉंग्रेस, आप यासारख्या पक्षाच्या आगमनानंतर देखील ही परिस्थिती बदलणार नाही. कारण हे पक्ष देखील मूठभर धनदांडग्यांचे संबंध सुरक्षित ठेवणारे व त्यांचे प्रतिनिधित्व करणारे आहेत. म्हणून आजच विद्यार्थी, कर्मचारी, कष्टकरी व सामान्य जनतेने विद्यमान व्यवस्थेचे खरे चरित्र काय आहे हे लवकरात-लवकर नीट समजून घ्यावे व या भ्रष्ट, दरोडेखोर, निवडणूकबाज पक्ष, व त्यांच्या शेपूटासारखे बटिक म्हणून काम करणाऱ्या संघटनांच्या गोंधळातून बाहेर यावे. लूट आणि खोट्या गोष्टीवर आधारित मीडियाद्वारे समाजात पसरवलेली अश्लीलता, जाती प्रवृत्तीचे कार्यक्रम, अंधश्रद्धा व देशभक्तीच्या नावाखाली पसरविण्यात आलेला अंधराष्ट्रवाद आणि सर्व प्रकारच्या खोट्या प्रचाराचा भांडाफोड करावा लागेल. तर्क व विवेकाचा वापर करत आपली ऊर्जा प्रतिक्रियावादी शक्तींनी वापरण्यापासून वाचले पाहिजे. राजगुरू, भगतसिंग, सुखदेव, चंद्रशेखर, यासारख्या क्रांतिकारकांचा न्याय, समता, धर्मनिरपेक्ष समाजाचा वारसा जनसामान्यापर्यंत पोहोचला पाहिजे. यासाठी नौजवान भारत सभा, दिशा विद्यार्थी संघटना, बिगुल मजदूर दस्ता व अन्य सहयोगी संघटनांच्या माध्यमातून या हुतात्म्यांच्या स्वप्नावर आधारित भारत घडविण्यासाठी, आम्ही देशाच्या विविध भागात सक्रियपणे संघर्ष करत आहोत. आम्हाला सर्व न्यायप्रिय, संवेदनशील तरुणांना सांगायचे आहे की, केवळ शहिदांच्या नावाचा जयघोष करून, राष्ट्रीयत्ववाच्या भावनेतून उत्कटतेने बोलणे, भ्रष्ट विद्यमान राजकीय व्यवस्थेला शिव्या देऊन काहीही होणार नाही. त्याऐवजी या क्रांतिकारकांनी दाखवलेल्या मार्गाची योग्य समजून सूत्रबद्धपणे विकसित करत. देशातील तरुणांनी ‘इन्कलाब जिंदाबाद’ चा नारा बुलंद करत व्यक्तिगत स्वार्थ व दुनियादारीच्या संकुचित मानसिकतेतून मुक्त होत, त्याग, बलिदान, ध्येयनिष्टा व कठोर परिश्रमाचे जीवन जगताना, जनतेच्या न्याय अधिकारांसाठी, कामगार कष्टकऱ्यांच्या हक्कांसाठी आणि क्रांतीसाठी लढण्याचा दृढ निश्चय करावा लागेल. या संघर्षात आम्ही खंबीरपणे उभे आहोत आणि अशा तरुणांच्या प्रतीक्षेत आहोत जे या प्रवासात राजगुरु, भगतसिंग, सुखदेव या क्रांतिकारकांच्या विचारांना आदर्श मानून न्यायिक संघर्षासाठी लढायला तयार असतील.
अंधकाराचे युग संपेल, जो लढेल तो जिंकेल!
जाती धर्माचे झगडे सोडा, खऱ्या लढाईशी नाते जोडा!
भांडवलशाही मुर्दाबाद! साम्राज्यवाद मुर्दाबाद! इंकलाब जिंदाबाद!
नौजवान भारत सभा
संपर्क – नौजवान भारत सभा कार्यालय, वीर जिजामाता भोसले मार्ग, लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठेनगर, मानखुर्द, मुंबई -४०००४३, संपर्क- ९६१९०३९७९३,९०८२८६१७२७